प्रभाकर नानावटी - 9503334895
डॉक्टरांच्या देहयष्टीकडे पाहिल्यास ते इतरांपेक्षा वेगळे न वाटता चारचौघांसारखे सामान्य असेच वाटत होते. ‘डिसएंचांटिंग इंडिया’ या पुस्तकाच्या जॉन क्वॅक या संशोधक–लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे दिसण्यात किरकोळ अंगकाठी, अंगावर अगदीच फिकट रंगाची खादीची साधी पँट, त्यावर साधा खादी कुर्ता वा शर्ट, डोक्यावर पांढरे केस व डोळ्यांवर कालबाह्य वाटणारा चष्मा असे डॉक्टरांचे एकंदरीत बाह्यरूप होते. कदाचित नुसत्या बाह्यरूपावरून त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाची ओळख कधीच पटली नसती. परंतु जेव्हा ते बोलत, तेव्हा ऐकणारे मन लावून ऐकत असत. त्यांच्या मांडणीत तर्कशुद्धपणा असे. अधिकारवाणीने ते आपले मुद्दे पटवून देत असत.
अनेक वेळा मानवतावादी (ह्युमॅनिस्ट) व मानवताहितवादी (ह्युमॅनिटेरियन) हे शब्द समानार्थी असल्यासारखे वापरले जातात. ‘मानवताहितवादी’ या शब्दप्रयोगामागे केवळ करुणा व सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून उद्भवलेल्या दातृत्वाला अग्रक्रम दिला जातो. परंतु ‘मानवतावादी’ केवळ दातृत्वापुरते मर्यादित नसून समाजातील ज्वलंत समस्यांकडे जनतेचे लक्ष वेधत त्या समस्यांच्या निवारणासाठी सर्व तर्हेने प्रयत्न करून समाजाला एक पाऊल पुढे नेण्याच्या प्रयत्नात असतात.
मानवतावाद्यांमध्ये सैद्धांतिक मानवतावादी व व्यावहारिक मानवतावादी असे ढोबळपणे दोन प्रकार करता येतील. काही मानवतावादी एक तत्त्व वा सिद्धांत म्हणून त्याचा अंगीकार करत जमेल तशी चर्चा, भाषण, लेख इत्यादींमधून मानवतावादाचा संदेश देण्यात व मानवी मूल्यांसाठी लढा उभारणार्या व्यक्ती व/वा संघटनेला मदतीचा हात देतात. त्यांचा कल मानवतावादी विचारप्रवाहावर भर देणारा असतो. परंतु दुसर्या प्रकारचे मानवतावादी मानवी मूल्यांचा प्रसार, प्रचार व प्रत्यक्ष जीवनात त्यांचे आचरण करण्यासाठी सामान्य जनतेला प्रोत्साहित करत; प्रसंगी प्रत्यक्ष लढ्यात सहभागी होत असतात. या प्रकारच्या मानवतावाद्यांना प्रत्यक्ष व्यवहारात मानवी मूल्ये रुजविण्यात रस असतो. मानवी मूल्यांना पायदळी तुडविणारे शोषण, व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, दडपशाही, कालबाह्य रूढी-परंपरेमधील पिढ्यान्पिढ्या पाळल्या जात असलेल्या अनिष्ट प्रथा, अज्ञान, समाजातील उच्च-नीचतेबद्दलच्या विकृत कल्पना, लिंगभेद, जातिभेद, अंधश्रद्धा, अविवेकी वर्तन इत्यादी प्रकारच्या समस्यांना उजेडात आणून संघटनात्मक लढा उभा करण्याच्या प्रयत्नात व्यावहारिक (pragmatic) मानवतावादी पुढाकार घेत असतात. यांचा लढा मुख्यत्वेकरून शांततामय मार्गाने जनतेच्या प्रबोधनातून साकारला जात असतो. मानवी मूल्यांची, मानवी अधिकार-हक्कांची, समानतेची, शांततेची, पर्यावरणाची चाड असलेल्या मानवातावाद्यांच्या प्रयत्नामुळे आधुनिक समाजातील जनतेचे जीवन सुसह्य होण्यास नक्कीच मदत मिळते. रूढीशरणता, शब्दप्रामाण्य, अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या तर्हा, गुरू व नेते यांच्या अधिन होण्याची विवशता, भावनांच्या आहारी जाण्याची सहज प्रवृत्ती, सामुदायिक दडपणाखाली मनाचे व सारासार विचार करण्याचे विचारस्वातंत्र्य गमावण्याची सवय, इत्यादी गोष्टी माणसातील विवेकबुद्धीला तडे देतात. सुशिक्षित म्हणविणारेसुद्धा या गोष्टींना बळी पडतात. गंमत म्हणजे हे एका प्रकारचे मानसिक दास्यत्व असते, याचीच कल्पना अनेकांच्यात नसते. म्हणूनच माणसांच्यातील वैचारिक शक्तीला आव्हान देत त्यांना कार्यप्रवण करणे हे वाटते तितके सोपे काम नाही. त्यामुळे मानवतावादाच्या व्यवहार्यतेवर भर देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर हे एक थोर मानवतावादी होते, असे म्हणण्यास भरपूर वाव आहे.
मानवतावादाच्या राज्यशास्त्रीय व्याख्येनुसार सर्व सृष्टीमध्ये माणूस हाच केंद्रस्थानी असून बुद्धी, सद्गुण, सामर्थ्य, संशोधकता आणि प्रायोजकतेचा उद्गाताही माणूसच असतो. सर्व मूल्यांचा कर्ता/निर्माता हा माणूसच आहे, असा विचार मानवतावादाने जगापुढे ठेवला. हा मूलतः कोणत्याही अमानवी श्रद्धेच्या विरोधीच असतो. याचा अर्थ मानवतावाद हा नेहमीच निरीश्वरवादी असतो, असे नव्हे. आपल्या देशातील संतवाङ्मयात मानवतावादाची बीजे आढळतात. आधुनिक महाराष्ट्रातील स्त्रीहक्काचे पुरस्कर्ते व राजकीय स्वातंत्र्याअगोदर सामाजिक स्वातंत्र्य हवे, असे विचार मांडणारे सर्वांगीण सुधारक गोपाळ गणेश आगरकर, तळागाळातील मुलींना शिक्षित करण्यास पुढाकार घेणार्या सावित्रीबाई फुले, शेतकर्यांच्या व बहुजनांच्या वेदनांना वाचा फोडणारे जोतिबा फुले व आधुनिक समाजमूल्ये व लोकशाही मूल्ये यांचा आग्रह धरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर मानवतावादी होते. याच मानवतावाद्यांच्या मालिकेत अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात चळवळ उभे करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेही नाव कोरले जाईल. 20 ऑगस्ट 2013 रोजी 67 वर्षांच्या डॉ. दाभोलकरांची निर्घृण हत्या करण्यात आली. सारा महाराष्ट्र हळहळला. आठ वर्षे उलटून गेली तरी खुन्यांचा व या खुनामागील सूत्रधारांचा शोध चालू आहे. सुमारांचीच सद्दी असलेल्या या कालखंडात डॉक्टरांच्या मानवतावादाविषयीच्या योगदानाचा आढावा घेतल्यास ते अप्रस्तुत ठरणार नाही.
त्यांच्या कर्तृत्वाकडे आणि त्यांनी केलेल्या भाषणांतून व लिहिलेल्या पुस्तकांमधून वेळोवेळी मांडलेल्या विचारांकडे वस्तुनिष्ठपणे पाहिल्यास तरुण वयापासूनच त्यांनी अप्रत्यक्ष/प्रत्यक्षरित्या मानवी मूल्यांची जपणूक करण्यातच आयुष्य वेचले होते, हे लक्षात येईल. जरी त्यांची ओळख 1989 मध्ये स्थापन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष म्हणून असली तरी वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतरचा सुरुवातीचा काही काळ या व्यवसायात घातला असला तरी त्यांचा कल सामाजिक कामांकडेच होता, हे त्यांनी लिहिलेल्या ‘समाजवादी युवक दल’ या लेखातून स्पष्ट होते. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानासुद्धा सामाजिक कामांची कल्पना मनात उसळत असल्यामुळे ‘युक्रांद’ व जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण चळवळीने ते प्रभावित झाले. नावाजलेले कबड्डीपटू असल्यामुळे सहकारी तरुणांची ‘समाजवादी युवक दल’ या नावाची संघटना त्यांनी बांधली. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव-एक पाणवठा’ या चळवळीत सहभाग घेऊन दलितांच्या बरोबर मिरवणुकीत जाऊन पाणी भरले. 1975-77 च्या आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्तीच्या विरोधातील चर्चेत सहभाग घेतला. सातारा शहरात हमाल संघटना बांधण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या गावांत समता मोर्चा काढला. पाणवठा चळवळ, समता मोर्चे, लाँग मार्च इत्यादींतून मिळालेल्या सामाजिक चळवळीच्या अनुभवाच्या शिदोरीमुळे पुढील वाटचालीचा पाया रचला गेला. दलितांची चळवळ हा त्या काळच्या त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनला. देवदासी प्रतिबंधक कायद्याचा आधार घेत महानुभाव पंथाचे मुख्य केंद्र असलेल्या फलटण येथील दलित मुलींचे देवाशी लग्न लावणार्या महंतांच्या विरोधात खटला भरला. जनमानसात पूजनीय असलेल्या शंकराचार्यांना सातारामुक्कामी चातुर्वर्ण्य, दलित इत्यादी विषयांवर बोलते करून त्यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. परंतु या सुरुवातीच्या काळातील हुंडाविरोध, पाणवठा, देवदासी इत्यादी चळवळींना व्यापक स्वरूप लाभले नव्हते. ते मूलभूत लढे नव्हते, याची जाणीव दाभोलकरांना होऊ लागली. परंतु या चळवळीमुळे सामाजिक जाणीव समृद्ध होत गेली. मार्क्सवादी, गांधीवादी, जेपीवादी, लोकशाही समाजवादी आणि इतर अनेक विचारप्रवाहांमधून प्रेरणा घेऊन आयुष्य झोकून द्यावे, असे त्यांना वाटू लागले.
1985च्या सुमारास पुण्यातील लोकविज्ञान संघटनेने तथाकथित चमत्कारांचे प्रात्यक्षिकासहित भाषण देण्यासाठी बी. प्रेमानंद या ‘भटक्या बुद्धिप्रामाण्यवादी’ला आमंत्रित केले. चमत्काराचे प्रयोग बघून डॉ. दाभोलकर प्रभावित झाले. काही समविचारी मित्रांना घेऊन डॉक्टर स्वतः पुण्याच्या अवतीभोवती अशा प्रकारचे प्रयोग करू लागले. लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. खरे पाहता इतर काही ‘ईझी चेअर फिलॉसॉफर्स’प्रमाणे चहा-कॉफीचे घुटके घेत अधून-मधून अशा विषयावर एखाद-दुसरा लेख लिहून आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत ते मजेत आयुष्य काढू शकले असते; परंतु तसे होणार नव्हते. राजमार्गावरील सोयीस्कर, ऐषारामी जीवनपद्धती सोडून समाजसुधाराच्या खडतर पाऊलवाटेने पुढे जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली. त्या क्षणांतील अंतःप्रेरणेमुळे त्यांना अशा प्रकारच्या चळवळीत आयुष्य वेचावेसे वाटले असेल.
लोकांशी संवाद साधण्याच्या अंगभूत कलेमुळे समविचारी तरुण-तरुणींना प्रेरित करत पुढील दोन वर्षे महाराष्ट्रभर फिरून अंधश्रद्धा व चमत्कार यांच्या विरोधात एक लवचिक अशी संघटना बांधण्याचा प्रयत्न ते करू लागले. 1989 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची (अंनिस) त्यांनी रीतसर स्थापना केली. काही महिन्यांत ‘अंनिस’च्या 17-18 शाखा ठिकठिकाणी कार्यरत झाल्या. डॉ. दाभोलकर या समितीचे कार्याध्यक्ष झाले. त्यांच्या मृत्युसमयी या समितीच्या महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील शाखांची संख्या 200 च्या जवळपास होती.
दूरदृष्टी असलेल्या एखाद्या द्रष्ट्याप्रमाणे आपली संघटना कशी असावी, याचे स्पष्ट चित्र त्यांच्या डोळ्यांसमोर होते. स्वतःहून ‘अंनिस’मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचा काहीतरी जुजबी काम करत निष्कारण वेळ जावा वा मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत त्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठी ही संघटना नसून तळागाळातल्यांची व शोषितांची अंधश्रद्धा व इतर प्रकारे फसवणूक होऊ नये; त्याचबरोबर कार्यकर्त्यांना अर्थपूर्ण आयुष्य जगता यावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. जरी हे कार्यकर्ते‘अंनिस’ सोडून गेले तरी ‘अंनिस’ने रुजविलेल्या मूल्यांप्रमाणे ते नंतरचे आयुष्य जगतील, याची खात्री डॉक्टरांना होती. ते एका अर्थाने ‘ट्रेनर्स ट्रेनी’ होते. काही वैयक्तिक कारणांमुळे वा मतभिन्नतेमुळे कार्यकर्ते‘अंनिस’ सोडून इतर संघटना वा संस्थांमध्ये गेले असले तरी डॉक्टरांनी रुजविलेली मानवतावादी मूल्ये ते कधीच विसरू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कार्यकुशलतेचा फायदा इतर संघटनांनासुद्धा मिळत गेला.
डॉक्टरांच्या देहयष्टीकडे पाहिल्यास इतरांपेक्षा वेगळे न वाटता चारचौघांसारखे सामान्य असेच ते वाटत होते. ‘डिसएंचांटिंग इंडिया’ या पुस्तकाच्या जॉन क्वॅक या संशोधक-लेखकाने उल्लेख केल्याप्रमाणे दिसण्यात किरकोळ अंगकाठी, अंगावर अगदीच फिकट रंगाची खादीची साधी पँट, त्यावर साधा खादी कुर्ता वा शर्ट, डोक्यावर पांढरे केस व डोळ्यांवर कालबाह्य वाटणारा चष्मा असे डॉक्टरांचे एकंदरीत बाह्यरूप होते. कदाचित नुसत्या बाह्यरूपावरून त्यांच्यातील व्यक्तिमत्त्वाची ओळख कधीच पटली नसती. परंतु जेव्हा ते बोलत, तेव्हा ऐकणारे मन लावून ऐकत असत. त्यांच्या मांडणीत तर्कशुद्धपणा असे. अधिकारवाणीने ते आपले मुद्दे पटवून देत असत.
आयुष्यातील फार मोठा काळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उभाऱणीसाठी त्यांनी व्यतीत केला. मृत्यूच्या आदल्या रात्रीसुद्धा मुंबई येथील टीव्हीवरील ‘अंनिस’च्यावरील मुलाखतीत ते सहभागी होऊन पुण्याला परतले होते. ‘अंनिस’च्या उभारणीसाठी त्यांनी खालील चतुःसूत्रीवर भर दिला होता –
शोषण करणार्या अंधश्रद्धांना विरोध
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार, प्रसार व अंगीकार
धर्माची विधायक, कृतिशील चिकित्सा आणि
व्यापक समाजपरिवर्तनवादी संघटनांबरोबर सहयोग
या चारी सूत्रांचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केल्यास या सूत्रांचा आशय पन्नास टक्क्यांपर्यंत तरी समाजमानसात रुजविण्यासाठी यातील प्रत्येक सूत्राचे कार्य करणार्या स्वतंत्र अशा चार संघटनांची गरज भासली असती. परंतु डॉक्टरांनी त्यांच्यातील संघटनकौशल्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गाला आकर्षित करून या चारी सूत्रांच्या कार्यवाहीसाठी आपापली जात, धर्म, वर्ग सोडून एकत्रितपणे कार्य करणारे कार्यकर्ते घडविले. एवढेच नव्हे, तर अत्यंत प्रतिकूल वातावरणात कार्यकर्त्यांना जोमाने व मनःपूर्वक काम करण्यास भाग पाडून संघटनेला नावारुपाला आणण्यात डॉक्टर यशस्वी झाले.
मानवतावादाला अभिप्रेत असलेल्या पद्धतीने कुठल्याही प्रकारच्या शोषणांचा विरोध करताना धर्मातील घातक रूढी-परंपरांच्या विरोधांचा सामना करावाच लागतो. धर्माचा व्यापार मांडलेल्यांच्या हितसंबंधांना धक्का बसत असल्यामुळे ‘अंनिस’च्या कामात अडथळे आणले जात होते व त्याची झळ कार्यकर्त्यांना सोसावी लागत होती. डॉक्टरांच्या आश्वासक प्रेरणेमुळे कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली व सर्व विरोधांना तोंड देत अंधश्रद्धेची जळमटं काही प्रमाणात तरी दूर करण्यात ‘अंनिस’ यशस्वी झाली व याचे सर्व श्रेय डॉक्टरांना द्यायला हवे. ‘अंनिस’च्या कामासंबंधी त्यांच्याच शब्दांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हा सतत चर्चेचा विषय ठरत आला आहे. याचे एक महत्त्वाचे कारण असे की, या विषयाचा संबंध श्रद्धेशी येतो आणि जवळपास सर्वांच्या लेखी श्रद्धा याचा अर्थ धर्मश्रद्धा असाच असतो, म्हणूनच धर्म या अत्यंत महत्त्वाच्या संस्थेबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आकलन कालसुसंगत असण्याची गरज आहे. धर्माचा अभिमान, अस्मिता, आग्रह, अहंकार अधिक बलवान करण्याचा प्रयत्न सर्वच धर्मांत चालू आहे. त्याला परधर्मद्वेषाचे रूप देखील अनेकदा येते. धर्मभावनेचे व्यापारीकरण, बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालूच आहे, असे सांगता येईल.
अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य ही तारेवरची कसरत आहे, याची जाणीव डॉक्टरांना होती. मानवातावाद नेहमीच धर्मनिरपेक्षतेला महत्त्व देतो. भारतीय संविधानाप्रमाणे व्यक्तीला स्वतःच्या धर्मश्रद्धा बाळगण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे जरी असले तरी धर्माचरणातील कालबाह्य वाटणारी अर्थहीन कर्मकांडे, धर्माच्या बाजारीकरणातून होणारे शोषण व फसवणूक, अवैज्ञानिक चाली-रीती यांची चिकित्सा करण्याचाही अधिकार व्यक्तीला आहेच. महाराष्ट्रातील यापूर्वीचे समाजसुधारक व संत यांच्याप्रमाणे लोकांच्या धर्मभावनेबाबत विवेकाच्या दृष्टीने कृतिशील संवाद करण्याचाही व्यक्तीला अधिकार आहे व याच अधिकाराचा वापर ‘अंनिस’ करत आहे, याची जाणीव डॉक्टरांनी सर्व संबंधितांना व शासनाला अगदी शांतपणे व निर्धारपूर्वक करून दिली. यासाठी बुवाबाजीच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात लढा दिला, अनेक बुवा-बाबांचा पर्दाफाश केला. त्यासाठी महाराष्ट्रभर स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता, मिळेल ते वाहन पकडून ते रात्रंदिवस फिरले. कार्यकर्त्यांच्या घरी जेवले, त्यांच्या घरी मुक्काम केला. कार्यकर्त्यांना उत्साहाने कार्य करण्यास उद्युक्त केले. लोकशाही मूल्यांवर संघटनाबांधणी केली. ‘अंनिस’च्या शाखांना स्वतंत्रपणे कार्य करण्याची मुभा दिली. त्यामुळे अंधश्रद्धांच्या गतेर्र्त सापडलेल्या या समाजातील तरुण-तरुणींना डॉक्टरांच्या बरोबर काम करावेसे वाटू लागले. हे काम करत असताना भरपूर काही शिकावयास मिळते, अशा कामातून आनंद मिळतो याचीही कार्यकर्त्यांना खात्री होऊ लागली, म्हणूनच डॉक्टर वेगवेगळ्या मोहिमा राबवू शकले, शिबिरं व संमेलनं भरविली, यात्रा काढल्या व व्यापक प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अंधश्रद्धांविरोधी भूमिका पोचविण्यात ‘अंनिस’ यशस्वी झाली.
परंतु ‘अंनिस’चे कार्य फक्त बुवाबाजीचा पर्दाफाश, चमत्कारांना विरोध वा भूत-भानामतीतील खोटेपणा व लबाडपणा उघड करण्यापुरतेच सीमित ठेवण्यात डॉक्टरांना रुची नव्हती. अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ अग्निशामक दलासारखी कुणीतरी बोलवल्यावर बुवा-बाबांना पकडणारी संघटना, असा नावलौकिक मिळवणे एवढ्यापुरतीच मर्यादित ठेवावी, असे डॉक्टरांना वाटत नव्हते. ही चळवळ जनमानसामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक विचार, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता इत्यादी मूल्ये रुजविण्यात परिणामकारक ठरावी, याबद्दल ‘अंनिस’ विचारमंथन करू लागली. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यातून व्यापक परिवर्तनाच्या मूलभूत मुद्द्यावर कार्य केल्यास समाजजीवनाला खरे योगदान मिळेल, या दिशेने डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. ‘अंनिस’ धर्मचिकित्सा करत असल्यामुळे ही संघटना धर्मविरोधी आहे, हा शिक्का बसत होता. त्यामुळे डॉक्टरांना व समितीला भरपूर अडचणींचा सामना करावा लागला. धर्माचे पालन व्यक्तिगत पातळीवर चालेल; मात्र सार्वजनिक जीवनात नको, ही समितीची भूमिका होती. समाजाचे प्रबोधन व कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष आचरण यातून ते साध्य होईल, असेही डॉक्टरांना वाटत होते.
त्यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘अंनिस’ अनेक आघाड्यांवर संघर्ष करत होती. चमत्कार, भूत, भानामती, स्थळमहात्म्य, अंगात येणे, संमोहन, वास्तुशास्त्र, ताईत-गंडेदोरे, जन्मकुंडली, फलजोतिष, परामानसशास्त्र, पर्यायी उपचारपद्धती, आत्मा, पुनर्जन्म, प्लँचेट, दैववाद, नवस, देव-देवी कृपा इत्यादीबद्दल ‘अंनिस’ व्यापक प्रमाणात प्रबोधन करू लागली. त्यामुळे जनमानसात ‘अंनिस’ची एक वेगळी प्रतिमा उभी राहिली. ‘अंनिस’ वैज्ञानिक दृष्टिकोनाची महत्ता पटवून देऊ लागली. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प, विज्ञानबोध वाहिनी, फिरते नभांगण इत्यादीतून शाळांना/गावांना भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्राचे महत्त्व पटवून देण्यासाठी सर्पयात्रा काढली. पर्यावरणपूरक सण-उत्सवांचा पुरस्कार केला. महिलांचे प्रश्न हाती घेतले. त्यामुळे ‘अंनिस’मध्ये महिला सामील झाल्या. महात्मा फुले यांनी चालू केलेल्या सत्यशोधकी विवाह पद्धतीचा पुरस्कार केला. महिलांच्या अंगात देवी-भुतांचा संचार होणे हा एक मानसिक आजार आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. ‘विवेकवाहिनी’च्या माध्यमातून कॉलेजात शिकणार्या तरुण-तरुणीच्यांत विवेकी विचारांचे भान रुजविण्यासाठी ‘विवेकवाहिनी’ मोहीम राज्यभर राबविली. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पास व्हावा, यासाठी सुमारे 18 वर्षे पाठपुरावा केला. त्यासाठी रक्ताची सही, डोळ्यांवर पट्टी, थोबाडीत मारून घेणे, निषेध मोर्चा इत्यादी उपक्रम राबविले. (शेवटी डॉक्टरांच्या मृत्युपश्चात हा कायदा पास झाला). व्यसनमुक्तीसाठी डॉक्टरांनी ‘परिवर्तन’ या संस्थेची स्थापना करून हजारोंना व्यसनमुक्त केले. आघाडीच्या नाट्यकलाकारांचा संच घेऊन नाटकाचे प्रयोग करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले व त्या नाटकांतून मिळालेल्या पैशांतून ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ उभारला व या कायमच्या निधीतून सामाजिक संघटनांतील क्रियाशील कार्यकर्त्यांना अर्थसहाय्य केले. ‘साधना’ साप्ताहिकाची धुरा संभाळत मानवी मूल्यांचे प्रबोधन करू लागले. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर पुस्तकं लिहिली. असे एक ना दोन, आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातून या समाजाला त्यांनी भरभरून दिले. डॉक्टरांनीच एके ठिकाणी उल्लेख केल्याप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे एका वाक्यात सांगायचे तर ‘मूल्यपरिवर्तनाचा कृतिशील संवाद आहे.’अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य हे एका प्रकारे समाजघटकांना परिवर्तनाच्या प्रक्रियेत खेचण्याचे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारातून आलेल्या व्यक्तींच्या जाणिवा परिवर्तनासाठी सक्षम बनाव्यात म्हणून त्यांना विचार व व्यवहार द्यावा लागतो. ही परिवर्तनाची जाणीवच मानवी मूल्ये रुजवू शकते. डॉक्टर शेवटच्या क्षणापर्यंत या मूल्यासाठी झगडत होते, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
अशा या थोर मानवतावाद्याची निर्घृण हत्या करून मारेकर्यांनी या समाजाची फार मोठी हानी केली. त्यांच्या मृत्यूनंतर जगभरातील माध्यमांनी शोक व्यक्त केला. मराठी व इंग्रजी वृत्तपत्रांतील मथळ्यांवर ओझरती नजर टाकली तरी या मानवतावाद्याचे थोरपण कुणाच्याही लक्षात येईल. उदा ः उजेडावर घाला (सकाळ), देव न मानणारा ‘देवमाणूस’ (विश्वसह्याद्री), प्रबोधनकर्त्याचा खून (लोकमत), विवेकाची हत्या (महाराष्ट्र टाइम्स) बुद्धिवादावर घाला (केसरी), अंधश्रद्धेविरुद्ध उभा ठाकलेला संयमी लढवय्या (पुढारी), Battling Superstition, Indian paid with his life (The New York Times), Indian Scientists decry killing of Anti-Superstition activist (The Washington Post), Indian Rationalist Shot Dead (Wall Street Journal), Narendra Dabholkar, fighter against superstition (The Economist), Indian Anti-superstition Activist shot dead (The Guardian and BBC) Indian Anti-superstition campaigner killed by gunmen (The Dawn). अनेक मान्यवरांनीसुद्धा त्यांच्या अकाली मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी मानवतावादी म्हणून स्वतःचा जीव देऊन किंमत चुकविली, असे आता म्हणता येईल.