तीन- तेरा -तेवीस… आणि वीरा द विनर!

अनिल चव्हाण -

कोरोनानंतर शाळा सुरू झाली. दोन वर्षांनी परिसर गजबजला! मुले आणि शिक्षकांमध्ये उत्साह संचारला! पुन्हा एकदा भिंती बोलू लागल्या! फळे रंगू लागले! किलबिलाट, आरडाओरड, धावपळ, आणि पळापळ इमारत अनुभवू लागली.

नव्याचे नऊ दिवस संपले, तसे उत्साहाचे पाणी आटले. अभ्यासाचा दबाव वाढला. दोन वर्षांत खडखडीत झालेले नदीचे पात्र उघडे पडले. खाली सगळे दगडगोटे, खाचखळगे आणि खडक होते.

अभ्यासाच्या सवयी मोडलेल्या, जुनी माहिती विस्मृतीत गेलेली आणि वेळ रिकामा घालवण्याची सवय लागलेली. सोबतीला ‘व्हॉट्सअ‍ॅप’ होतेच!!

नवा अभ्यास समजायचा तर जुने काही आठवले पाहिजे. मग आला सेतू अभ्यासक्रम! जुने शिकवा, नवीनही शिकवा आणि रोजचा रिपोर्ट द्या. शिक्षकांची त्रेधातिरपीट उडाली. मुलांना काही समजेना, पालकांना काही कळेना. असेच झाले वीराच्या शाळेतही.

कडक शिक्षकांनी मुलांना धारेवर धरले. आपला पाठ्यक्रम धूमधडाक्यात सुरू ठेवला. रोज वर्गपाठ, गृहपाठ, पाठांतर, वाचन… वह्यांची पाने भरू लागली.

थोडे गरीब स्वभावाचे, ‘मुलांना समजून घ्या,’ म्हणणारे सर आपला विषय पुढे रेटू शकले नाहीत. इंग्रजीच्या शिक्षकांचा त्यात नंबर लागला. त्या मागोमाग इतिहास शिक्षक होते.

प्रिंसिपॉलनी तारखा दिल्या. रोज एका विषयाची टेस्ट! पहिली तारीख मराठी, दुसरी हिंदी, तिसरी इंग्रजी; पुढे गणित, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, कार्यानुभव!

तीन तारखेला इंग्रजीची टेस्ट झाली. गुण मिळाले, केवळ दहा ते वीस टक्के! सरांनी विचार केला पहिली टेस्ट आहे, पाहूया पुढच्या वेळी! पुढची टेस्ट १३ तारखेला; मग काय अजून वेळ आहे. मध्ये सुट्टी आली. १३ तारीख तर तोंडावर आली! पुन्हा तेच झाले. बहुतेक पोरांची गाडी चुकली २० टक्के मार्कवाले पंधरावर आले; दहा टक्के वाल्यांनी पाचचा आकडा गाठला.

तीच परिस्थिती इतिहासाची झाली! सरांचे धाबे दणाणले! त्यांनी युद्धपातळीवर प्रयत्न केले; पण उपयोग शून्य!

२३ तारखेच्या टेस्टमध्ये दहा टक्के गुण मिळवणारे कोणीही मिळाले नाही!

मग सुरू झाला ऊहापोह! ‘अभ्यासाला वेळ नाही’, ‘पाठांतर होत नाही,’ ‘मुले बेशिस्त झालीत,’ ‘पोर्शन अवघड आहे…’ अशा कारणानंतर मुलांनी खापर सरांच्या वर फोडले, ‘सरांनी शिकवलेले समजत नाही, त्यांना शिकवताच येत नाही…’

सरांनी मुलांच्या चुका काढल्या, पालकांच्या गलथानपणाचा पाढा वाचला. या कलगी-तुर्‍यातून मार्ग काढला, धनश्रीच्या पप्पांनी!

“अहो, इंग्रजीला तारखा मिळाल्यात तीन, तेरा नि तेवीस! तिन्ही अंक अशुभ आहेत!!”

इतरांना पटले. बर्‍याच जणांनी त्यांची री ओढली.

“तर हो! म्हणतात ना, तीन तिघाड आणि काम बिघाड!”

“आमच्या सोनीला डिलिव्हरीची तारीख तेरा दिली होती. आम्ही डॉक्टरला सांगून बारा तारखेला सिझरिंग केले.”

“इंग्लंडमध्ये १३ तारखेला कोणतेही शुभकाम करत नाहीत.” “तर हो! तेथे हॉस्पिटलमध्ये तेरा क्रमांकाचा कॉट असत नाही. हॉटेलला तेरा क्रमांकाची खोली असत नाही!”

शेवटी चर्चेतून तीन, तेरा, तेवीस या तारखा अशुभ असल्यानेच इंग्रजीत मुले मागे पडताहेत, इतिहासात मागे पडतात, हे सर्वांना पटले; मग सुरू झाली अंकांची गंमत, न्युमरॉलॉजी! जन्मतारखेच्या अंकांची एकअंकी बेरीज करा, म्हणजे शुभ अंक मिळेल! १५/०८/२०१२ जन्मतारीख असेल, तर बेरीज होईल १+५+०+८+२+०+१+२ =१९. एक अंकी बेरीज होईल १+९=१०=१.

ए, बी, सी, डी ला क्रमाने एकपासून अंक द्या. आपल्या नावाचे स्पेलिंग लिहा. स्पेलिंगला आकडे द्या आणि करा बेरीज! अंकांची बेरीज शुभ की अशुभ आहे, ते सांगणारे ‘तज्ज्ञ’ होतेच! त्यांनी नावात एक स्पेलिंग वाढवून शुभांक देणारे नाव सुचवले! वेदांतचा ‘वेदांता’ झाला! विराजची वी दुसरी झाली, तर सीमा नाव लिहिताना ‘एस आय’ ऐवजी ‘एस डबल ई’ लिहा. असे सल्ले देण्यासाठी हजारो रुपये फी पालक मोजू लागले. एका वर्गात शिरलेला हा व्हायरस वेगाने शाळेत पसरला. जो-तो एकच चर्चा करतोय, तीन, तेरा, तेवीस आमच्या वाट्याला नको!

आदि आणि स्वराच्या वर्गात याचा उगम होता. त्यामुळे वीराला कळायला वेळ लागला नाही. तिने इरा मावशीशी विचार विनिमय केला आणि प्रिन्सिपल सरांना गाठले!

“सर, हे काही बरोबर नाही. काहीतरी करायला हवे! मला एक संधी द्या. मी प्रयत्न करते!”

तिने प्रस्ताव ठेवला.

“ठीक आहे, दिली परवानगी. येणारी तीन तारीख तुझी!” वीरा झपाट्याने कामाला लागली. स्वराच्या मैत्रिणी तिच्या ओळखीच्या होत्या.

‘पाठांतर होत नाही!’, ‘विषय आवडत नाही!’, ‘आम्हाला खेळायचेय…’ अशी कारणे मिळाली. ३० तारखेला महिनाअखेर! शाळा अर्धीच! आदल्या दिवशी स्वरा आणि आदित्यचे सगळे वर्गबंधू शाळा सुटताच हॉलमध्ये जमा झाले. वीराने जाहीर केले, “उद्या आपल्याला शाळा सुटल्यावर खेळ खेळायचा आहे, प्रत्येकाने डिक्शनरी, पुस्तक किंवा गाईड आणले तरी चालेल. हा शब्दखेळ आहे! लेट अस प्ले अ गेम! उद्या आपण सुरुवात करतो आहोत. फायनल तीन तारखेला होईल!”

मुलांचे पाच गट पडले. महात्मा फुले गट, राजर्षी शाहू, डॉ. आंबेडकर, सावित्रीबाई आणि फातिमा शेख गट!

गटप्रमुखांनी आपल्या गटाच्या महापुरुषाची माहिती दोन ओळीत सांगायची आहेत! महिनाअखेर, शिक्षक वृंद त्यांच्या कामात राहिला. एका वर्गाची मुले हॉलमध्ये जमली.

गुण देण्यासाठी फलकावर टेबल आखले! बरोबर उत्तराला एक गुण, चुकीसाठी शून्य!

निम्मा फलक इराने स्वतःसाठी राखीव ठेवला. सुरुवात केली, सावित्रीबाई फुले गटाच्या प्रमुखांनी. “मुलींची शाळा काढली. ही भारतीयांनी काढलेली मुलींची पहिली शाळा आहे! सनातन्यांनी शेण गोळे मारले, तरी सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत.”

फातिमा शेख गट म्हणाला, “सनातन्यांनी गोविंदरावांना बहिष्काराची भीती घातली आणि जोतिबा आणि सावित्रीला घराबाहेर काढायला लावले! तेव्हा उस्मान शेख आणि फातिमा या बहीण भावंडांनी त्यांना आसरा दिला.”

त्यापुढे, “महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.” “राजर्षी शाहूंनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शाळा बोर्डिंग काढली,” तर आंबेडकरांंनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला! हे सर्वच महामानव वैज्ञानिक दृष्टिकोनाचे होते!” हे सांगण्यास कोणी विसरले नाहीत. समाजसुधारकांचा इतिहास थोडक्यात पुढे आला. प्रत्येकाने आपल्या गटाच्या महापुरुषांची माहिती घेतली होती.

आता इराने फलकावर एक शब्द लिहिला, ेश्रव ओ एल डी या शब्दाच्या सुरुवातीला एकच अक्षर लिहायचे. अर्थपूर्ण शब्द तयार करायचा. त्याचा अर्थ इतर गट सांगतील. आजच्या दिवस पुस्तक, डिक्शनरी, गाईड वापरायला परवानगी आहे. तीन तारखेला मात्र ही सवलत मिळणार नाही. मुलांनी शब्द तयार केले! पहिल्या गटाने ‘ओल्ड’च्या सुरुवातीला ‘बी’ लिहिले. बी ओ एल डी दुसर्‍या गटाने अर्थ सांगितला!

तिसर्‍या गटाने ‘जी’ वाढवला. “जी ओ एल डी” चौथ्या गटाने सांगितले “इट इज द मेटल ऑफ यलो कलर” याप्रमाणे एस ओ एल डी; एच ओ एल डी; एम ओ एल डी; सी ओ एल डी; असे शब्द तयार झाले. मुलांनी पुस्तक उघडले, डिक्शनरी चाळली आणि गुण मिळवले.

“हे सर्व पुस्तकातील तिसर्‍या कवितेतले शब्द आहेत. तीन तारखेला १३ आणि २३ व्या धड्यावर खेळ होईल!”

मुलांनी एकच कल्ला केला.”खेळ खेळूया मजेचे!”

“आम्हाला इंग्रजी आवडते.”

“आम्ही इंग्रजीचा अभ्यास करू.” “इतिहास वाचू!!”

सीसीटीव्ही जोडल्यामुळे पलीकडच्या ऑफिसमध्ये बसलेले प्रिन्सिपॉल, शिक्षक आणि पालकांसह कौतुकाने हे सर्व पाहत होते. प्रिन्सिपॉल म्हणाले, “तारीख, वेळ, वार यात शुभ-अशुभ काही नसते! संत तुकाराम महाराज म्हणतात, सर्व वेळा आम्हाला शुभच आहेत!”

इकडे समारोप करताना मुलांनी जयघोष केला,

“वीरा द विनर! वीरा द विनर!!”

– अनिल चव्हाण, कोल्हापूर

संपर्क ः ९७ ६४१ ४७ ४८ ३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]