धार्मिक दंगलीवर शाहू विचारांचा उतारा

-

राजर्षी शाहू महाराजांची कर्मभूमी असलेल्या कोल्हापूरमध्ये ७ जून रोजी झालेल्या दंगलीत अल्पसंख्याक समाजाच्या व्यवसायांचे व घरांचे मोठे नुकसान झाले. हा केवळ त्यांच्यावरचा आघात नव्हता, तो छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या वैचारिक परंपरेवरील आघात होता. कोल्हापूरमध्ये अशा रीतीने राजर्षी शाहू महाराजांच्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या परंपरेला गालबोट लागले. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांच्या इतिहासाकडे पुन्हा नव्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. शाहू महाराजांच्या ‘बहुजन समाज’ या व्यापक संकल्पनेत दलित, वंचित, महिला यांचा समावेश होता तसाच मुस्लिमांचादेखील होता.

१८९३ साली मुंबईत प्रथम हिंदू मुस्लिमांच्या जातीय दंगली झाल्या. त्याच्या पुढच्या साली पुण्यात गणेश उत्सवाच्या सुमारास त्याचे पडसाद उमटले. पुण्यात दंगली होऊन उभय समाजातील संबंध तणावग्रस्त झाले. लो. टिळकांनी हिंदूंची बाजू घेतली होती. टिळक पक्षीयावर सरकारने खटले भरले होते. या पार्श्वभूमीवर पुण्यात नूतन छत्रपती शाहू महाराजांचा सत्कार सार्वजनिक सभेने घडवून आणला होता. सार्वजनिक सभेच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले यांनी महाराजांना द्यायच्या मानपत्राचे वाचन केले. या सत्काराला उत्तर देताना केलेल्या, छोट्याशा भाषणात, महाराजांनी पुण्यात नुकत्याच झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगलीचा खास उल्लेख करून सार्वजनिक सभेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हिंदू आणि मुसलमान यांमध्ये शांततेचा समेट घडवून आणावा, म्हणून सल्ला दिल्याची नोंद आहे.याचा अर्थ हिंदू मुस्लिम समाजाची परस्पराविषयीची संवादाची भावना ही काळाची गरज असल्याची जाण महाराजांच्या ठिकाणी सुरुवातीपासूनच होती.

१९०२ साली शाहू महाराज इंग्लंडच्या दौर्‍यावरून सुखरूप परतल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील मुस्लीम समाजाने समारंभ आयोजित केला. यावेळी शाहू महाराजांनी मुस्लीम पुढार्‍यांना आवाहन केले की, आपल्या समाजाच्या शिक्षणासाठी जनजागृतीची चळवळ उभारावी, शैक्षणिक संस्था स्थापन कराव्यात. तसे केल्यास दरबाराकडून पूर्ण सहाय्य मिळेल. याला मुस्लीम पुढार्‍यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळाला. परंतु महाराज शांत बसले नाहीत. शिक्षणासाठी इच्छुक मुस्लिम समाजातील १० विद्यार्थ्यांना कोल्हापुरात नुकत्या स्थापन झालेल्या ‘विक्टोरिया मराठा बोर्डिंग’मध्ये प्रवेश देऊन मुस्लिमांच्या शिक्षणास सुरुवात करून दिली.

या १० विद्यार्थ्यांमध्ये कर्नाटकातील अथणी गावचा शेख मोहम्मद युनूस अब्दुल्ला या नावाचा विद्यार्थी होता. या विद्यार्थ्याने राजाराम महाविद्यालयातून पदवी मिळविल्यावर त्याला महाराजांनी आपल्या संस्थानात मामलेदार म्हणून नियुक्त केले.तसेच मुस्लीम समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याचे काम त्याच्यावर सोपवले. सन १९०६ साली शाहू महाराजांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित मंडळींची सभा बोलावून ‘मोहमेडन एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. स्वतः महाराज या संस्थेचे अध्यक्ष झाले व युसुफ अब्दुल्लांना कार्यवाह केले. विशेष म्हणजे विविध जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू केली असली तरी कोणत्याही संस्थेचे पद त्यांनी स्वीकारले नव्हते. केवळ मुस्लीम समाजाच्या शिक्षणाची तळमळ असल्याने शाहू महाराजांनी हा अपवाद केला.ङ्गशेवटी या प्रयत्नांना यश आले. मुस्लीम बोर्डिंग सुरू करण्यात आले. महाराजांनी या समाजाच्या विविध धार्मिक स्थळांचे उत्पन्न मुस्लीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा आदेश काढला. कसबा रुकडी, पेटा हातकणंगले येथील श्री हजरत पीर दर्गा व कोल्हापूरशहरातील निहाल मस्जिद, घोडपीर, बाबू जमाल व बाराइमाम या देवस्थानचे उत्पन्नही मुस्लीम बोर्डिंगला देण्यात आले. या शाळेसाठी शहरात मराठा बोर्डिंग जवळच २५ हजार चौरस फुटांची मोकळी जागा देऊन इमारतीसाठी साडेपाच हजार रुपयांची देणगी व संस्थानातील जंगलातून मोफत सागवान देण्यात आले. ही एकूण मदत मराठा बोर्डिंगपेक्षाही अधिक होती.

पाटगावच्या मौनी बुवांच्या मठाच्या उत्पन्नातून काही रक्कम तेथील मुसलमानांच्या मशिदीच्या बांधकाम खर्चासाठी म्हणून देण्याचा एक हुकूम शाहू महाराजांनी काढला. रुकडीतील पिराच्या देवस्थानच्या उत्पन्नातील काही भाग तेथील अंबाबाईच्या मंदिरातील दैनंदिन सेवेसाठी खर्च होत होता. अशी अनेक उदाहरणे शाहू महाराजांच्या मुस्लीम समाजाच्या उद्धारासाठी असलेल्या धोरणातून दिसून येतील. मंदिरांच्या उत्पन्नातील भाग हा मुस्लीम समाजाच्या शिक्षणासाठी व मुस्लीम धर्म स्थळांच्या उत्पन्नातील वाटा हा हिंदू मंदिराच्या खर्चासाठी देण्याचे हे धोरण आजच्या राजकर्त्यांना व समाजात द्वेष पसरवणार्‍या शक्तींना पुरून उरणारे आहे. शाहू महाराजांच्या कन्या अक्कासाहेब महाराज यांच्या विवाह प्रसंगी मराठा वधू-वरांचे अनेक विवाह लावले गेले, त्यासोबत काही मुस्लिम जोडप्यांचेही विवाह लावण्यात आले. या नवविवाहित जोडप्यांच्या आयुष्यभरच्या उदरनिर्वाहाची व्यवस्थाही करण्यात आली.

मुस्लिम पवित्र धर्मग्रंथ कुराण अरबी भाषेत असल्याने त्याचा अर्थ सामान्य मुस्लिमांना समजत नव्हता. कुराणातील धर्म तत्त्वे सामान्य मुस्लिमांनाही समजली पाहिजेत, यासाठी पवित्र कुराणचे मराठी भाषांतर करण्याचे काम महाराजांनी सुरू केले होते. याकरिता दरबारातील २५ हजार रुपयांची मोठी रक्कम खर्ची घातली होती. पण महाराजांचे अकाली निधन झाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

शाहू महाराजांनी नव्याने वसविलेल्या शाहूपुरी पेठेत मशीद नव्हती. तेव्हा तेथील मुस्लिमांच्या सोयीसाठी महाराजांनी जागा तर दिलीच शिवाय मशीद बांधकामासाठी एक हजारांहून अधिक रक्कम दान केली. बोहरी हे मुस्लीम समाजातील सधन व व्यापारी होते, पण त्यांना समाजासाठी स्वतःची मशीद नव्हती. तेव्हा बोहरींचे पुढारी तय्यबली यांनी महाराजांच्या कानावर ही गोष्ट घातली. महाराजांनी शहराच्या मध्यवस्तीतील पाच हजार चौरस फुटांची जागा बोहरींच्या मशिदीसाठी दिली. महाराजांनी राधानगरी हे नगर नव्याने बसवले होते. त्या ठिकाणी हिंदूंसाठी दोन मंदिरांच्या बरोबरच मुस्लिमांसाठी हजरत पीर गैबी साहेब आणि शहाज महाल ही दोन देवस्थाने निर्माण केली. त्यांना उत्पन्न जोडून दिले व या देवस्थानांना ७५ रुपयांची विशेष देणगीदेखील दिली. त्याकाळी ब्रिटिश इंडियामध्ये इतर भागांत दंगली होत होत्या, पण छत्रपती शाहू महाराजांच्या काळात केव्हाही धार्मिक दंगली झाल्या नाहीत. ही शाहू महाराजांच्या धोरणांना जनतेची पोचपावती होती.

१५ एप्रिल १९२० रोजी नाशिक येथे केलेल्या भाषणात शाहू महाराज म्हणतात, मुंबई, सोलापूर, अहमदाबाद, अमृतसर, लाहोर वगैरे ठिकाणी जे दंगे झालेत त्यात सुशिक्षित पुढारी मागे राहून गरीब लोकांवर प्रसंग आला, याचे कारण त्यांचे अज्ञान आहे. पुढार्‍यांचा कावा त्यांना समजला नाही. लोकांना थोडे जरी शिक्षण असते, तरी असे प्रकार झाले नसते. पुढे ते म्हणतात, आमचे खरे महात्मा बादशहा अकबर शहा हेच आहेत. ज्याने हिंदू मुसलमानांची एकी केली व स्वतः जोधाबाई नावाच्या रजपूत स्त्रीशी लग्न करून तिला हिंदूच राहू दिले व सूर्याला अर्घ्य देण्याकरिता लाखो रुपये खर्च करून व्यवस्था केली. त्याची साक्ष हल्ली आग्र्याचा किल्ला देत आहे. जी गोष्ट विसाव्या शतकात अशक्य झाली आहे ती सतराव्या शतकात यवन बादशहाने शक्य केली होती.

सत्तेच्या व न्याय अन्यायाच्या लढायांना सध्याचे धर्मांध राज्यकर्ते हे धर्माच्या लढाया म्हणून लोकांमध्ये पसरवत आहेत. त्यांनी शाहू महाराजांच्या भाषणातील हा उतारा वाचावा, राज्य संपादन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पूर्वी या देशात लढाया झाल्या. अकबर, शिवाजी महाराज वगैरे महात्म्यांच्या काळी धर्मद्वेषाने किंवा जातीद्वेषाने कोणी लढाया करीत नसत. अकबर बादशहाच्या पदरी मराठी रजपूत इतर हिंदू सरदार व लढवय्ये होते. विजयनगरच्या राजाच्या पदरी किंवा शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमानांची संख्या कमी नव्हती. या सर्वांनी स्वधर्मियांबरोबर किंवा स्वजातीयांबरोबर लढण्याच्या प्रसंगीदेखील आपले इमान कायम राखले. अशा वेळी त्यांचे बंधुप्रेम चांगल्या प्रकारे दिसून येई.

शाहू महाराजांनी मुस्लिम गुणीजनांना आपल्या दरबारात राजाश्रय दिला. यामध्ये शाहीर लहरी हैदर, चित्रकार आबालाल रहमान, गान महर्षी अल्लादिया खां साहेब यांचा समावेश होता. शाहू महाराजांना मल्लविद्या शिकवणारे बालेखान वस्ताद होते. आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मुस्लिमांनी येऊ नये म्हणणार्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, अल्लादिया खान साहेबांचे पुत्र गायक भुर्जीखां हे अंबाबाईच्या मंदिरामध्ये गायन करीत.

मुस्लीम समाजासाठी न्यायव्यवस्थेमध्येदेखील राजर्षी शाहू महाराजांनी तरतूद केलेली दिसून येते. न्यायव्यवस्थेतील उच्चवर्णीयांची मक्तेदारी संपवण्यासाठी बहुजन समाजातील सुशिक्षित तरुणांना वकिलीच्या सनदा दिल्या. त्यात मुस्लिम तरुणांचाही समावेश होता. शेख अली मोहम्मद, मोहम्मद हुसेन मीरा साहेब चिकोडीकर, हुसेन दादाभाई जमादार अशी त्या वकिलांची नावे आहेत.

कोल्हापूर संस्थानात मुस्लिमा शिवाय इतर प्रमुख समाज म्हणजे जैन व लिंगायत हे होत. या दोन्ही समाजांच्या धार्मिक गरजा कडे महाराजांनी लक्ष पुरविले होते. त्यांच्या मठासाठी आणि मंदिरासाठी त्यांनी जागांच्या देणग्या दिलेल्या दिसतात.

मोगल बादशहा अकबर यांनी जगातील सर्व प्रमुख धर्माच्या पंडितांना आपल्या दरबारात आश्रय देऊन त्यांच्याशी धर्मतत्त्वज्ञानाच्या चर्चा केल्या. प्रत्येक धर्मातील चांगल्या तत्त्वांचा त्यांनी बोध करून घेतला आणि शेवटी सर्व धर्मातील चांगल्या तत्त्वांचा स्वीकार करून आपला दिने इलाही हा नवा धर्मपंथ स्थापन केला.

राजर्षी शाहू महाराजांनीही आपल्या धर्म जिज्ञासेपोटी अनेक धर्मांना, पंथाना धार्मिक सुधारणावादी संघटनांना जवळ केले. त्यांना राजाश्रय दिला. त्यांच्या तत्त्वज्ञानाचा परिचय करून घेतला. धर्म समतावादी व्हावा म्हणून त्यांनी वैदिक स्कूल, क्षात्र जगद्गुरु यासारखे प्रयोग धर्माच्या क्षेत्रात केले.ङ्ग ङ्ग शाहू महाराज म्हणतात, “युरोपात अमेरिकेत व जपानात समानतेचे तत्व प्रचारास असल्याने, एकाच कुटुंबात भाऊ- भाऊ, नवरा- बायको वगैरे भिन्न भिन्न धर्मांचे आढळतात. तसाच प्रकार नवरा आर्यसमाजी तर बायको इतर धर्माची, किंवा बायको आर्यसमाजी तर नवरा इतर पंथाचा, असेही एका कुटुंबात सापडणे अशक्य नाही. कुटुंबातील भाऊ भाऊ निराळ्या पंथाचे किंवा धर्माचे राहतील. प्रत्येकास आचार विचार स्वातंत्र्य पाहिजे.

“दया धर्म का मूल है, नरक मूल अभिमान! परोपकार हा पुण्य मार्ग आहे व परपिडा हे पाप आहे. याप्रमाणे विचार केल्यास धर्मभेदाच्या किंवा जातिभेदाच्या सबबीवर एकमेकांचा मत्सर करणे अगदी चुकीचे आहे.”

“शाहू महाराजांचे हे विचार कोल्हापुरात काही प्रमाणात का असेना रुजलेले आहेत. त्यामुळेच हल्लेखोराना दंगली करण्यासाठी तरुणांना बाहेरून पाचारण करावे लागले. कोल्हापुरातल्या पेठा मधले तरुण फारसे सहभागी झाले नाहीत.

शाहू महाराजांनी काढलेल्या शाळा कॉलेजांमधून शाहू महाराजांचे खरे विचार प्रतिपादन केले तर कोणताही धर्मद्रोही, समाजद्रोही, धर्मांध माणूस पुन्हा कोल्हापुरात हिंसा करण्याचे धाडस करणार नाही. त्यासाठीच शाहू प्रेमींनी एकजुटीची वज्रमुठ केली आहे.

संकलक : अनिल चव्हाण

मोबा. ९७ ६४१ ४७ ४८ ३

( संदर्भ : राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ. प्रकाशक – डॉ. जयसिंगराव पवार. पान नंबर १८८ ते १९६)

(राजर्षी शाहू गौरव ग्रंथ : संपादक प्रा. डॉ. रमेश जाधव. प्रकाशक – महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग सचिवालय, मुंबई. पान नंबर ७४३ ते ७५३)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]