गोपाळ गणेश आगरकरांची धर्मचिकित्सा

जगदीश काबरे -

आगरकरांची धर्मचिकित्सा म्हणजे एखाद्या नवीन धर्माची निर्मिती नव्हती, तर धर्माच्या सामाजिक कार्याचे पुनर्मूल्यांकन होते. ते म्हणतात की, जेव्हा धर्म बुद्धीला विरोध करतो, तेव्हा धर्माचे नव्हे तर बुद्धीचे ऐकावे. आगरकरांनी धर्माचे परीक्षण शास्त्रीय निकषांवर केले. त्यांचा आग्रह होता की, प्रत्येक धार्मिक परंपरा तपासली पाहिजे आणि जी परंपरा मानवकल्याणात अडथळा आणते ती नष्ट केली पाहिजे. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणार्‍या प्रथांवर जसे की, बालविवाह, विधवाविवाहबंदी, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीदमन यावर कठोर टीका केली. त्यांना वाटत होते की, धर्माचे मूळ उद्दिष्ट मनुष्याच्या नैतिक आणि बौद्धिक विकासात असावे, परंतु भारतीय समाजात धर्माने केवळ भीती, अंधश्रद्धा आणि अधिपत्य यांचे जाळे निर्माण केले आहे.

गोपाळ गणेश आगरकर हे एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सर्वांत प्रखर तर्कवादी, वैज्ञानिक वृत्तीचे आणि समाजसुधारक विचारवंत होते. त्यांच्या व्यतिमत्त्वात बुद्धिप्रामाण्यवाद, सामाजिक जागृती आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञांची तार्किक दृष्टी यांचा संगम दिसतो. धर्म, समाज, राजकारण आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात त्यांनी प्रस्थापित रूढींना आव्हान दिले. आगरकरांची धर्मचिकित्सा ही केवळ धर्मनिरपेक्ष विचारांची प्रतिके नव्हती, तर ती सामाजिक परिवर्तनाचे माध्यम होती. त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना त्यांच्या काळातील सामाजिक वास्तव, ब्राह्मणी वर्चस्व, त्यांच्यावर पडलेला पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव आणि त्यांची अज्ञेयवादी भूमिकाही समजून घेणे आवश्यक आहे.

आगरकरांच्या काळातील महाराष्ट्र अत्यंत रूढीवादी होता. धर्म आणि जातिव्यवस्था हे समाजजीवनाचे केंद्र होते. समाजातील सर्व प्रश्नांना धार्मिक चौकटीतूनच उत्तरं दिली जात होती. आर्य समाज, प्रार्थना समाज, ब्राह्मोसमाज यांसारख्या चळवळींनी धर्मसुधारणेचा मार्ग स्वीकारला होता, पण त्या सुधारणाही मुख्यतः वैदिक धर्माच्या चौकटीतच राहिल्या. या पार्श्वभूमीवर आगरकरांनी धर्माला समाजसुधारणेचा अडसर मानून त्यावर कठोर प्रहार केला. त्यांनी म्हटले होते की, आपला धर्म हा अंधश्रद्धांचा व रूढींचा साठा झाला आहे; तो समाजाच्या प्रगतीस घातक ठरत आहे. त्यांच्या लेखनात धर्माचे अंधानुकरण न करता, त्याच्या मूल्यमापनाची मागणी आढळते. ते म्हणतात, धर्म मनुष्याच्या हितासाठी असतो; मनुष्य धर्मासाठी नाही. हा दृष्टिकोन धार्मिक गुलामगिरीला नाकारणारा आणि मानवकेंद्रित होता.

‘भीतीपोटी देव, देवापोटी श्रद्धा 
श्रद्धेपोटी अंधश्रद्धा, अंधश्रद्धेपोटी बुवाबाजी 
बुवाबाजीपोटी योग, योगाआडून भोग. 
कसा थांबेल हा रोग?
देवच नाकारला तर...???’

हा विचार आगरकरांच्या मनात अग्रस्थानी होता. म्हणूनच ‘आम्ही, देव ही माणसांनी भीतीपोटी निर्माण केलेली काल्पनिक रचना आहे असे मानतो. तेव्हा त्याचा आधार घेऊन जिथे जिथे शोषण, कुप्रथा आणि अंधश्रद्धा व कर्मकांड केले जाते, त्याच्या विरोधात आमचा लढा आहे’, असे विचार गोपाळ गणेश आगरकर आपल्या ‘सुधारक’ पत्रातून सातत्याने निर्भीडपणे मांडत असत. ते आपले विचार एवढ्या जहाल शब्दात मांडत की, तसे आजच्या पुरोगाम्यांनाही मांडताना दहा वेळा विचार करावा लागतो. आगरकर लेखसंग्रह (इ. स. १८८५ ते १८९५) मधील एका लेखात परंपरावाद्यांचा समाचार घेताना ते म्हणतात, “पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, ही गोष्ट कोपर्निकस व गॅलिलिओ यांनी जगाच्या नजरेस आणून दिल्यास पकी सव्वादोनशे वर्षे होऊन गेली, तरी आमच्या पारंपरिक लोकांच्या मते, सूर्य व चंद्र हे एकाच प्रकारचे ग्रह असून ते पृथ्वीभोवती घिरट्या घालीत आहेत, आमच्या पंचांगात प्रत्येक पानावर चमकणारे, पण शास्त्रज्ञांना मोठमोठे दूरदर्शक यंत्र लावूनही न गवसलेले राहू व केतू द्विजांस विकल करीत आहेत, शनी वगैरे ग्रहांचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नसूनही त्यांची साडेसाती आम्हास अद्यापि छळीत आहे. तात्पर्य, रूढ आचार किंवा विचार खरा असो किंवा खोटा असो, त्याचे जीवित पराकाष्ठेचे चिकट असते. शेकडो वर्षे त्याच्या टाळक्यात आणि पेकाटात सोटे घालावे लागतात तेव्हा कोठे तो आपला पाय काढता घेतो.”

आगरकरांनी केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून असेच परिणामकारक लेखन करून आणि कुशल संपादनाच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली होती. न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेकन एज्युकेशन सोसायटी’च्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी अखेरपर्यंत काम केले. महाविद्यालयीन जीवनातच जेरेमी बॅथम, जॉन स्टुअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी, बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची स्थितिशील अवस्था त्यांना जाचत होती व समाजजागृती करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यत होऊ लागलेली आपल्याला दिसते. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालक मंडळींचे धोरण होते, तर सामाजिक सुधारणांना प्रथम प्राधान्य देऊन सामाजिक सुधारणा वेगाने घडाव्यात असे आगरकरांचे धोरण असल्यामुळे, केसरीत आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला. परिणामतः ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी १८८८ साली ‘सुधारक’ हे पत्र त्यांनी काढले. त्यात राजकीय व अर्थशास्त्रविषयक लेखही येत.

बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय, रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. नीतिमान आणि सदाचरणी समाजाच्या निर्मितीसाठी ईश्वर आणि धर्म याचीही आवश्यकता त्यांना वाटत नव्हती, परोपकारादी सद्गुण धर्माच्या आधी अस्तित्वात आले असून नंतर धर्मात ते गोवले गेले, अशी त्यांची भूमिका होती, बुद्धिवाद, व्यतिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्तसूत्रीने आगरकरांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला आहे. साहजिकच पूर्वजन्म आणि पुनर्जन्म यांसारख्या कल्पनांवर त्यांचा विश्वास नव्हता आणि चातुर्वर्ण्य, जातिसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह, ठरवून केलेले विवाह इ. गोष्टी त्यांना सर्वथैव अमान्य होत्या. मुला-मुलींस समान शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व व्यवसायाभिमुख शिक्षण द्यावे, दुष्ट आचारांचे निर्मूलन करावे, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावे, भूतदया राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते. मनुष्यजातीचे ऐहिक सुखवर्धन हेच त्यांचे ध्येय बनले होते. तथापि, निव्वळ इंद्रियसुखालाच ऐहिक सुख मानण्याइतपत त्यांची दृष्टी संकुचित नव्हती, नीतिमान आणि संयमी जीवनामुळे मनाला लाभणारे समाधानही या ऐहिक सुखात त्यांना अभिप्रेत होते, व्यतिस्वातंत्र्यामुळे स्वार्थ आणि स्वैराचार फैलावण्याऐवजी समाजातील व्यक्ती परोपकारी आणि परहितचिंतकच होतील, असे त्यांना वाटे. उलट व्यतिस्वातंत्र्य न मानणार्‍या व निरुपयोगी परंपरांनी वेढलेल्या समाजाची केव्हाही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्यांची ठाम धारणा होती, परंपरांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन ऐतिहासिक होता. त्यामुळे एखादी गोष्ट समाजाच्या एका अवस्थेत उपयुक्त ठरली असेल, हे ते मान्य करीत; मात्र तीच गोष्ट बदलत्या काळात जाचक ठरल्यास बिनदिकतपणे टाकून द्यावी, असे ते म्हणत. अशा रूढी आणि परंपरा स्वखुषीने सोडून द्यावयास समाज तयार नसेल, तर त्या सरकारी मदतीने कायदेशीररीत्या नाहीशा कराव्यात, असे त्यांचे मत होते. केवळ धर्मच नव्हे, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत सारासार विचार करून आंधळेपणाने गतानुगतिक वर्तन नाकारून जाणीवपूर्वक योग्य त्या मार्गाची निवड करण्याचा पुरस्कार करणारे आगरकर बुद्धिवादी संत किंवा ‘देव न मानणारे देवमाणूस’ मानले जातात.

‘देवाची कल्पना माणसाचीच’ असे आगरकर म्हणतात. “आकाशातून देव येथे कधी आले नाहीत, येथून परत कधी गेले नाहीत. आम्हीच त्यांना येथल्या येथे निर्माण करतो, त्यांच्या गुणांचे पोवाडे गातो आणि वाटेल तेव्हा त्यांस नाहीसे करतो.” असे त्यांनी या संदर्भात नमूद केले आहे. त्यामुळे धर्माच्या नावाखाली चालणार्‍या अमानुष, अघोरी, जुलमी प्रकारांना त्यांनी कडाडून विरोध केला, कोणाला सोवळेओवळे हे निरुपद्रवी प्रकार वाटतात. परंतु त्याविषयी देखील आगरकर ताशेरे ओढतात, सोवळ्याओवळ्याचा बडेजाव करणे म्हणजे व्यवहारात नसत्या अडचणी उपस्थित करणे आणि वर्गावर्गात सलोखा न होण्यासारखी अट घालून ठेवण्यासारखे होय. मात्र, स्वभूमीत, स्वलोकात, स्वधर्मात आणि स्वाचारात राहून अविचारी आणि अज्ञानी देशबांधवांच्या निंदेस किंवा छळास न भिता त्यांच्याशी कधी भांडून, कधी युतिवाद करून, कधी लाडीगोडी लावून अथवा सामर्थ्य असल्यास कधी त्यांना दटावून त्यांची सुधारणा करणे यातच खरी देशप्रीती, खरी बंधुता, खरा देशाभिमान, खरे शहाणपण व खरा पुरुषार्थ आहे. म्हणून ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल तेच करणार’, हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.

भारताबाहेर किती व कसे बदललेले जग आहे, ते जग व ती परिस्थिती सुधारकांना व बुद्धिवाद्यांना दिसलेली होती. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतभर ब्रिटिशांचे राज्य स्थिरस्थावर होऊ लागले. इंग्रजांनी इंग्रजी भाषा व आधुनिक शिक्षणपद्धती आणली आणि सर्व शिक्षण सर्व जातिवर्णांना खुले ठेवले. काही थोडे भारतीय धर्माने घातलेली समुद्र पर्यटनाची बंदी झुगारून समुद्रापलीकडे जाऊ लागले. त्यामुळे भारताबाहेरही काही जग आहे याची जाणीव भारतीयांना नव्याने प्रथमच होऊ लागली. फ्रेंच राज्यक्रांतीने निर्मिलेल्या व नंतर जगभर पसरलेल्या ‘स्वातंत्र्य, समता व बंधुता’ या मूल्यांचे महत्त्व भारतीय नवशिक्षितांना पटू लागले. इकडे भारतभर ख्रिस्ती मिशनर्‍यांनी, हिंदू धर्मातील अंधश्रद्धा, अस्पृश्यता व जन्मजात उच्च-नीचता वगैरे अनेक दोषांवर बोट ठेवून जोरदार प्रहार, प्रचार केला. अशा अनेक कारणांनी भारतातील बुद्धिमंत ‘आत्मपरीक्षण’ करू लागले, त्यामुळे ‘देवभतीभोवती फिरणार्‍या संतांच्या स्थितिप्रिय शिकवणुकीचा प्रभाव कमी होऊ लागून एकोणिसाव्या शतकाने भारताला विशेषतः महाराष्ट्राला मोठे ‘संत’ देण्याऐवजी मोठे ‘समाजसुधारक’ दिले. त्यात म. फुले, लोकहितवादी, आगरकर, न्या. रानडे, प्रबोधनकार ठाकरे अशी कितीतरी नावे आहेत की ज्यांनी भारतीयांच्या आचारविचारांना पुरोगामी दिशा देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे १०० वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आज पूर्णपणे बदललेला दिसतोय. म्हणून प्रवाहपतितांनी जरी सुधारकांच्या कृतिशीलतेकडे दुर्लक्ष केले तरी सुधारक आपले विचार पेरायचे व्रत सोडत नाहीत. ऐतिहासिक सुधारकांनी आजच्या सुधारकांना दिलेला हाच कानमंत्र आहे. तो जपायचा असेल तर सामाजिक समता निर्माण करायला हवी. म्हणून आज आवश्यकता आहे ती सामाजिक समतेची. कारण, त्यातूनच सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. समाजाला ही दिशा सुधारकांनी दाखवून दिलेली आहे.

आगरकरांवर पाश्चात्त्य विचारवंतांचा खोल प्रभाव होता. विशेषतः ऑगस्टे कॉम्टे, हर्बर्ट स्पेन्सर आणि जॉन स्टुअर्ट मिल यांनी त्यांच्यावर प्रभाव टाकला. कॉम्टेच्या ‘पॉझिटिव्हिझम’ म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित समाजविचाराने आगरकरांना प्रेरणा दिली. कॉम्टेचा विश्वास होता की मानवजातीचा विकास ‘धर्मशास्त्र’, ‘आधिभौतिक’ आणि ‘वैज्ञानिक’ या तीन टप्प्यांतून होतो. आगरकरांच्या लेखनातही अशाच विचारांच्या छटा आपणास दिसतात. म्हणूनच धर्म आणि अलौकिक श्रद्धांपासून विज्ञान आणि तर्काकडे जाणार्‍या समाजाची आवश्यकता त्यांना जाणवलेली होती. स्पेन्सरच्या ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या समाजजीवशास्त्रीय तत्त्वाने आगरकरांना सामाजिक उत्क्रांतीची समज दिली. (‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ हे वाक्य प्रत्यक्षात हर्बर्ट स्पेन्सर यांनी १८६४ साली त्यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ बायोलॉजी’ या ग्रंथात वापरले. मात्र त्याची संकल्पनात्मक पार्श्वभूमी ‡म्हणजेच नैसर्गिक निवड ही चार्ल्स डार्विन यांनी ‘ओरिजिन ऑफ स्पिशिज’ या शोध ग्रंथात १८५९ मध्ये मांडली होती.) जॉन स्टुअर्ट मिलच्या ‘लिबर्टी’ या विचारांनी त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान दिले. या सर्वांच्या प्रभावाखाली आगरकरांनी समाज आणि धर्म यांचा तर्कसंगत पुनर्विचार केला.

त्यांची धर्मचिकित्सा म्हणजे एखाद्या नवीन धर्माची निर्मिती नव्हती, तर धर्माच्या सामाजिक कार्याचे पुनर्मूल्यांकन होते. ते म्हणतात की, जेव्हा धर्म बुद्धीला विरोध करतो, तेव्हा धर्माचे नव्हे तर बुद्धीचे ऐकावे. आगरकरांनी धर्माचे परीक्षण शास्त्रीय निकषांवर केले. त्यांचा आग्रह होता की, प्रत्येक धार्मिक परंपरा तपासली पाहिजे आणि जी परंपरा मानवकल्याणात अडथळा आणते ती नष्ट केली पाहिजे. त्यांनी धर्माच्या नावाखाली चालणार्‍या प्रथांवर जसे की, बालविवाह, विधवाविवाहबंदी, जातिभेद, अस्पृश्यता, स्त्रीदमन यावर कठोर टीका केली. त्यांना वाटत होते की, धर्माचे मूळ उद्दिष्ट मनुष्याच्या नैतिक आणि बौद्धिक विकासात असावे, परंतु भारतीय समाजात धर्माने केवळ भीती, अंधश्रद्धा आणि अधिपत्य यांचे जाळे निर्माण केले आहे.

त्यांच्या अशा विचारांची मांडणी ‘सुधारक’ या त्यांच्या साप्ताहिकातून स्पष्टपणे दिसते. तिथे त्यांनी लिहिलेली लेखमालिका “धर्मशास्त्र आणि विज्ञान” ही धार्मिक रूढींच्या विरोधातील जाहीर घोषणा होती. ते म्हणतात, धर्मशास्त्राचे काम लोकांना बंधनात ठेवणे नाही; तर त्यांना स्वातंत्र्य देणे असावे. या विधानातून त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचे आणि बुद्धिप्रामाण्यवादाचे दर्शन होते. त्यांनी धर्माला केवळ देव, पूजापाठ किंवा वेदशास्त्राशी जोडून पाहिले नाही, तर त्याचा सामाजिक परिणामही तपासला. त्यांच्या दृष्टीने धर्माचा अंतिम उद्देश समाजहित होता. म्हणूनच ते धर्माला समाजसुधारणेच्या आड येणारा अडसर मानत.

आगरकर हे स्वतःला अज्ञेयवादी म्हणवून घेत. ते देवाच्या अस्तित्वाबद्दल ठाम नकार देत नसत, पण त्याबद्दल कोणताही पुरावा नाही असे ते मानत. त्यांच्या मते, देव आहे की नाही हे मानवी ज्ञानाच्या पलीकडचे प्रश्न आहेत, त्यामुळे त्यावर वाद करण्याऐवजी समाजाच्या प्रत्यक्ष समस्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यांचा हा विचार थोडासा बुद्ध विचारासारखाच होता. त्यांचा हा दृष्टिकोन शुद्ध तर्कवादी होता. ते म्हणतात, ज्याचा अनुभव नाही, जे प्रयोगात उतरू शकत नाही, त्या सर्व गोष्टी तर्कबाह्य आहेत. त्यामुळे त्यांनी अलौकिक गोष्टींवर विश्वास ठेवण्याऐवजी मानवी बुद्धीच्या शक्तीवर भर दिला. हीच त्यांची अज्ञेयवादी भूमिका होती, जी भारतातील पारंपरिक आध्यात्मिकतेला आव्हान देणारी ठरली.

आगरकरांची धर्मचिकित्सा त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांशी घट्ट जोडलेली होती. सामाजिक क्षेत्रात त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद, आणि स्त्रियांची दयनीय अवस्था यावर अतिशय जहाल शब्दांत टीका केली. तरीही त्यांच्या धार्मिक चिकित्सेवर एक महत्त्वाचा प्रश्न अभ्यासकांनी उपस्थित केला आहे. तो म्हणजे, त्यांच्या सुधारणा आणि विचार हे उच्चवर्णीय वर्गापर्यंतच मर्यादित होते का? खरंच, आगरकरांचे लेखन, वर्तुळ आणि वाचकवर्ग हे प्रामुख्याने शिक्षित ब्राह्मण वर्गातील होते. त्यांनी ज्या समाजसुधारणेची सुरुवात केली ती मुख्यतः नागरी, सुशिक्षित, उच्चवर्णीय स्तरावर केंद्रित होती. त्यामुळे त्यांच्या धर्मसुधारणेचा थेट परिणाम खालच्या जातींवर फारसा झाला नाही. म्हणून अनेक अभ्यासक म्हणतात की, त्यांची धर्मचिकित्सा ब्राह्मणेतर समाजापर्यंत पोहोचलीच नाही. हीच त्यांच्या धर्मसुधारणेची मर्यादा होती असे म्हणायला हवे. मात्र, ही मर्यादा केवळ आगरकरांची नव्हे. तर त्या काळाचीही होती. समाजातील अस्पृश्य वर्गांना शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सहभागाची संधीच नव्हती. अशा वेळी आगरकरांचा प्रयत्न धर्म आणि बुद्धीच्या संघर्षातून विचारमुती आणण्याचा होता. त्यामुळे त्यांनी धर्मनिरपेक्ष, विवेकवादी दृष्टिकोन प्रथम शिक्षित वर्गात रुजवला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे पुढे पेरियार, आंबेडकर आणि इतर तर्कवादी चळवळींना वैचारिक आधार मिळाला. म्हणूनच असे म्हणता येईल की त्यांच्या धर्मचिकित्सेने खालच्या वर्गाला थेट संबोधित केले नसले, तरी त्यांची दिशा व्यापक होती. ते करत असलेली धर्मसुधारणा ही समाजाच्या बौद्धिक मुक्ततेकडे जाणारे पहिले पाऊल होते.

त्याबरोबरच आगरकरांची धर्मचिकित्सा ही त्यांच्या राजकीय विचारांपासूनही वेगळी नव्हती. त्यांनी धर्म आणि राजकारण यांचे स्पष्ट विभाजन केले. त्यांच्या मते, धर्माने राज्यकारभारावर प्रभाव टाकू नये. त्यांना भीती होती की धार्मिक विचारांचा राजकीय वापर झाल्यास समाजात फूट आणि अन्याय वाढेल. त्यामुळे त्यांनी धर्मनिरपेक्ष शिक्षण आणि बुद्धिप्रामाण्याला प्राधान्य दिले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजसुधारणा साधण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विश्वास होता की, जर नागरिक तर्कशुद्ध विचार करतील, तर धर्माधारित भेद कमी होतील. या अर्थाने त्यांचे धर्मचिंतन आधुनिक लोकशाहीच्या विचारांशी सुसंगत होते. (पण आज शिक्षणामुळे माणूस शिक्षित झाला तरीही अंधश्रद्धच राहिलेला दिसतोय, ही खेदजनक गोष्ट आहे.)

आगरकरांनी पारंपरिक धार्मिक अधिकाराला पूर्णपणे नाकारले. ते म्हणाले, “धर्म हे प्रामुख्याने भयावर आधारित असतात. देवाचा कोप, नरक, पाप यांचे भय!” त्यामुळे ते भयमुक्त समाजाची कल्पना करतात. त्यांच्या मते, नैतिकतेचा पाया धर्मात नसून बुद्धीत आहे. ते स्पष्ट सांगतात की, सदाचार धर्मावर नव्हे तर मानवतेवर अवलंबून आहे. हा विचार अत्यंत क्रांतिकारी होता, कारण भारतीय समाजात सदाचार हा धर्माशीच जोडले जात होता. आगरकरांनी नैतिकतेचे अधिष्ठान मानवी विवेकात पाहिले. म्हणून त्यांनी धर्मनिरपेक्ष नैतिकतेचे समर्थन केले. त्यांच्या ‘धर्म आणि नीतिमत्ता’ या लेखात ते म्हणतात, धर्म हे नैतिकतेचे मूळ नाही; नैतिकता स्वतंत्र आहे. हा विचार आधुनिक तत्त्वज्ञानातील ‘सेक्युलर एथिक्स’च्या संकल्पनेशी जुळणारा आहे. ते म्हणतात की, देवावर विश्वास ठेवणारा माणूस अन्यायी असू शकतो, आणि देवावर विश्वास नसलेला माणूसही सज्जन असू शकतो. त्यामुळे माणसाच्या नैतिकतेचा निकष त्याच्या श्रद्धेवर नाही तर त्याच्या कृतीवर असावा. या दृष्टिकोनाने त्यांनी धर्माच्या बाहेर मानवतावादाची एक चौकट निर्माण केली.

आगरकरांचा धर्मनिरपेक्ष आणि अज्ञेयवादी दृष्टिकोन त्या काळी अनेकांना कठोर वाटला. त्यांच्या काळातील इतर सुधारक जसे की, महादेव गोविंद रानडे किंवा दयानंद सरस्वती, हे धर्माच्या चौकटीत सुधारणा शोधत होते. पण आगरकरांनी धर्मालाच प्रश्नांकित केले. त्यामुळे ते समाजात एकटे पडले. ‘केसरी’मध्ये त्यांचे ‘आधी राजकीय की आधी सामाजिक’ या विषयावर टिळकांशी मतभेद झाले. म्हणून केसरीला रामराम ठोकून त्यांनी स्वतंत्रपणे ‘सुधारक’ सुरू केला. टिळकांना धर्म हा समाजाचा नैतिक आधार वाटत होता, तर आगरकरांना तो अंधश्रद्धांचा आणि अन्यायाचा स्रोत वाटत होता. या दोन विचारसरणीतील संघर्ष हा भारतीय आधुनिकतेच्या प्रवासातील पहिला वैचारिक संघर्ष होता. त्यांच्या धर्मचिकित्सेत जरी वैज्ञानिकता आणि तर्काचे वर्चस्व असले, तरी त्यात करुणा आणि सामाजिक संवेदनाही आहे. त्यांनी धर्माचा निषेध म्हणून नास्तिकतेचा प्रचार केला नाही, तर धर्माचा समाजावर होणारा परिणाम तपासला. ते म्हणतात, धर्म नकोच असे नाही; पण तो विवेकाधारित असावा. त्यांच्या दृष्टीने धर्माचा खरा उद्देश होता, समाजात सत्य, नीतिमत्ता आणि मानवहिताचा प्रसार करणे. पण धर्म जेव्हा अंधश्रद्धेचा कारखाना बनतो, तेव्हा त्याला नष्ट करणे हेच कर्तव्य ठरते. (आगरकरांचा हा विचार नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये महत्त्वाचा मानला आणि त्याप्रमाणे त्यांची चतु:सूत्री तयार केली.)

त्यांच्या विचारांची परिणती आधुनिक भारतीय समाजातील धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेत दिसते. भारतीय राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्य, धर्म आणि राज्याचे विभाजन या मूल्यांचा तात्त्विक पाया आगरकरांसारख्या तर्कवादी विचारवंतांनी घातला होता. त्यांनी लोकशाहीसाठी बौद्धिक स्वातंत्र्य आवश्यक मानले. कारण, अंधश्रद्धेने भरलेला समाज राजकीय गुलामगिरीतून कधीच मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच ते म्हणतात, आपल्याकडे स्वराज्य मिळाले तरी मनोधार्मिक गुलामगिरी कायम राहिली तर ते खरे स्वराज्य नाही. ही त्यांची चेतावणी आजही तितकीच अर्थपूर्ण आहे. एवंच आगरकरांची धर्मचिकित्सा ही भारतीय तर्कवादाचे बीज होती, ज्यातून पुढे प्रज्ञा, समता आणि बंधुतेच्या चळवळी निर्माण झाल्या. म्हणूनच भविष्यात त्यांच्याच विचारांचा विजय झाला.

सुधारकांना कोणत्याही धर्मात नाकारलेच जाते तसेच आगरकरांची त्या काळी प्रतीकात्मक जिवंत प्रेतयात्रा काढून सनातन्यांनी निषेध नोंदवला, पण त्यांनी तेव्हा सांगितलेल्या सुधारणा समाजाने आज स्वीकारल्या आहेत. या अर्थाने आगरकर हे द्रष्टे समाजसुधारक ठरतात. समाज स्थितिशील असल्यामुळेच सुधारकांना विरोध पत्करूनही भविष्यातील सकारात्मक बदलांसाठी कार्य करावे लागते, हे त्यांनी मनोमन ओळखले होते. सुधारकांना सनातनी नाकारतात, कारण त्यांचे हितसंबंध त्या सुधारणांमुळे धोक्यात येणार असतात. खरे तर त्यांचा हा कावा सामान्य जनांनी लक्षात घेऊन पाद्री, भट-पुरोहित आणि मुल्ला-मौलवींपासून चार हात दूरच राहायला हवे.

आगरकरांनी बोटचेपा विचार केला असता आणि धारदार शब्द हे आक्रमक वाटतात, म्हणून मवाळ शब्दांत विरोध केला असता तर १०० वर्षांपूर्वीच्या अनिष्ट परंपरांच्या आणि मागासलेपणाच्या गर्तेत इथला समाज अजूनही लोळत पडला असता. पण त्यांनी परखडपणे विचार मांडून समाजाची कानउघडणी केली म्हणून आजचा महाराष्ट्र बदललेला दिसतोय, अनिष्ट प्रथा मोडणे म्हणजेच धर्मसुधारणा करणे असते. कारण धर्माच्या आधारेच ह्या परंपरा निर्माण केलेल्या असतात. समाजसुधारणेसाठी प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे आवश्यक असते, पण प्रवाहपतितांच्या आकलनापलीकडचे हे धाडस असते, म्हणून प्रवाहपतित लोक समूह करून कळपात सुरक्षितता शोधण्याचा सतत प्रयत्न करत असतात. त्यामुळे कुणी कळपाबाहेरचा विचार करू लागला की, त्याला मारून मुटकून कळपाच्या नियमांचा धाक दाखवला जातो आणि कळपात फिट्ट बसवण्याचा प्रयत्न केला जातो. समाजसुधारक हे कळपाच्या विचारांपेक्षा वेगळा विचार करणारे असतात, तेव्हा ते अशा धमक्यांना घाबरत नाहीत. कारण कळपातील काही विचारी माणसांना आणि कुंपणावरच्या लोकांना समाजसुधारकांचा विचार पटत असतो, पण बदलण्याचे धाडस त्यांच्या अंगी आलेले नसते. म्हणून सुधारकांनी सतत विचारांची बीजे पेरत राहिले पाहिजे, म्हणजे अशा परिघावरच्या लोकांना बदल करण्यास धाडस एकवटता येते. आज जरी कळपातील प्रवाहपतित लोक सुधारकांना तुच्छ लेखत असले तरी भविष्यातील चांगल्या बदलांकडे पाहून समाजसुधारक प्रवाहपतितांच्या शिव्यांनाही ओव्या समजून आपले कार्य करत राहतात आणि ते कार्य करताना प्रवाहपतितांकडे करुणेने पाहत असतात. हा विचारच आगरकरांच्या धर्म आणि समाजसुधारणेचा गाभा होता.

शेवटी, आगरकरांच्या धर्मचिकित्सेचे महत्त्व या गोष्टीत आहे की, त्यांनी धर्माला पहिल्यांदा विवेकाच्या कसोटीवर तपासण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या लेखनात विज्ञान हे नवे शास्त्र, तर्क ही नवी पूजा आणि मानवता हा नवा धर्म असा एक आधुनिक दृष्टिकोन दिसतो. त्यांनी धर्माला भावनिक गुलामगिरीतून मुक्त करून विचार आणि नैतिकतेच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या विचारांतून भारतीय समाजाला आत्मपरीक्षणाची प्रेरणा मिळाली. त्यांच्या धर्म सुधारणांना मर्यादा असूनही त्यांची धर्मचिकित्सा ही भारतीयांसाठी आधुनिक बौद्धिक पायाभूत स्तंभ राहिली आहे. आगरकरांची अज्ञेयवादाकडे झुकलेली भूमिका आणि त्यांचा विवेकाधिष्ठित दृष्टिकोन हा आजच्या काळातही तेवढाच सुसंगत आहे, कारण आजही समाज धर्माच्या नावाखाली तुटत आहे आणि विज्ञान व तर्क यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणूनच, आगरकरांची धर्मचिकित्सा ही केवळ इतिहासातील एक अध्याय नाही, तर आजच्या विचारस्वातंत्र्याच्या लढ्याचे अधिष्ठान आहे.

- जगदीश काबरे, सांगली

(लेखक सामाजिक कार्यकर्ते आणि विज्ञान अभ्यासक आहेत.)
jetjagdish@gmail.com

अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]