करवीर महात्म्य नव्हे; अंधश्रद्धा महात्म्य

अनिल चव्हाण - 9764147483

भारत हा पुण्यपावन देश आहे. प्रत्येकाला आपला देश प्रिय असतो, भारतीयही त्याला अपवाद नाहीत; पण इथे इतरांपेक्षा अजून एक गोष्ट जास्त आहे ती म्हणजे इथली धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे. इथे धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. ती धार्मिक स्थळे ‘दुर्लभ भारते जन्म:’ म्हणून झाल्यावर आपल्याच धार्मिक स्थळात जन्मणे, राहणे आणि मरणे किती फायद्याचे आहे, हे पुन:पुन्हा गात राहतात. या फायद्यात पापनाश, नरकापासून सुटका, पुण्यप्राप्ती, स्वर्गप्राप्ती, मोक्ष यांबरोबरच रोगमुक्ती, संकटविमोचन, संपत्ती व संततीप्राप्ती, राज्यप्राप्ती, शत्रुनाश इत्यादींचा समावेश असतो. आपल्याबरोबरच पितरांनासुद्धा स्वर्गप्राप्ती आणि मोक्ष मिळवून देण्याची खात्री इथे असते. हे सर्व ऐकल्यावर वाटते – ‘दुर्लभं भारते जन्म:’

कोणत्या तीर्थक्षेत्रात कोणता लाभ होणार, हे त्यात्या ठिकाणी राहत असलेल्या पुरोहितांना ठाऊक असते, असे समजतात. ते वाणीतून सांगत राहतात. एखादा हुशार पुरोहित ते लिहून ठेवतो. अशा पुस्तकाला ग्रंथ म्हणण्याची प्रथा आहे. बहुतेक धार्मिक क्षेत्रांनी आपल्या इथे मिळणारे लाभ सांगण्यासाठी ग्रंथनिर्मिती केली आहे. ही पद्धत जुनी आहे. पौराणिक ग्रंथ हे त्या कामासाठी रचले आहेत. या ग्रंथांना पायाभूत मानून धार्मिकस्थळे नवे ग्रंथ तयार करतात. आपण लिहिलेले सत्य आहे, हे सांगण्यासाठी एखाद्या पुराणाची साक्ष काढतात. ‘श्री करवीर महात्म्य’ हा असाच करवीर क्षेत्राचे महत्त्व सांगणारा ग्रंथ आहे. या लेखात या ग्रंथाची केलेली चिकित्सा वाचकांना नक्कीच आवडेल..!

जन्मदुर्लभ

भारत हा पुण्यपावन देश आहे. प्रत्येकाला आपला देश प्रिय असतो, भारतीयही त्याला अपवाद नाहीत; पण इथे इतरांपेक्षा अजून एक गोष्ट जास्त आहे – ती म्हणजे इथली धार्मिक स्थळे आणि तीर्थक्षेत्रे. इथे धार्मिक स्थळांची रेलचेल आहे. ती धार्मिक स्थळे ‘दुर्लभ भारते जन्म:’ म्हणून झाल्यावर आपल्याच धार्मिक स्थळात जन्मणे, राहणे आणि मरणे किती फायद्याचे आहे, हे पुन:पुन्हा गात राहतात. या फायद्यात पापनाश, नरकापासून सुटका, पुण्यप्राप्ती, स्वर्गप्राप्ती, मोक्ष यांबरोबरच रोगमुक्ती, संकटविमोचन, संपत्ती व संततीप्राप्ती, राज्यप्राप्ती, शत्रुनाश इत्यादींचा समावेश असतो. आपल्याबरोबरच पितरांनासुद्धा स्वर्गप्राप्ती आणि मोक्ष मिळवून देण्याची खात्री इथे असते.

हे सर्व ऐकल्यावर वाटते – ‘दुर्लभं भारते जन्म:’

क्षेत्रीय ग्रंथ

कोणत्या तीर्थक्षेत्रात कोणता लाभ होणार, हे त्या-त्या ठिकाणी राहत असलेल्या पुरोहितांना ठाऊक असते, असे समजतात. ते वाणीतून सांगत राहतात. एखादा हुशार पुरोहित ते लिहून ठेवतो. अशा पुस्तकाला ग्रंथ म्हणण्याची प्रथा आहे. बहुतेक धार्मिक क्षेत्रांनी आपल्या इथे मिळणारे लाभ सांगण्यासाठी ग्रंथनिर्मिती केली आहे. ही पद्धत जुनी आहे. पौराणिक ग्रंथ हे त्या कामासाठी रचले आहेत. या ग्रंथांना पायाभूत मानून धार्मिकस्थळे नवे ग्रंथ तयार करतात. आपण लिहिलेले सत्य आहे, हे सांगण्यासाठी एखाद्या पुराणाची साक्ष काढतात. ‘श्री करवीर महात्म्य’ हा असाच करवीर क्षेत्राचे महत्त्व सांगणारा ग्रंथ आहे. अलिकडच्या काळात मूलग्रंथाची पहिली आवृत्ती संस्करणासह 1993 साली प्रसिद्ध झाली आणि 2017 पर्यंत त्याच्या पाच आवृत्त्या छापल्या गेल्या. कोल्हापूर परिसरातील देवस्थाने आपला इतिहास सांगण्यासाठी या ग्रंथाचा आधार घेतात.

ग्रंथाचे कर्ते

‘करवीर महात्म्य’ हा ग्रंथ दाजीबा जोशीराव यांनी रचला आहे. त्यांचे घराणे पंडित, कवी आणि ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचा जीवनकाल 1800 ते 1865 असा मानला जातो. त्यांनी एकूण एकवीस ग्रंथ संस्कृतमध्ये, तर ‘करवीर महात्म्या’सह चोवीस ग्रंथ मराठीत लिहिले आहेत. त्यांचे बरेच ग्रंथ ‘आर्या’ वृत्तात रचले असून ते ज्योतिष, ज्योतिर्गणित, व्याकरण, आयुर्वेद, धर्मशास्त्र, काव्यशास्त्र, पुराण इत्यादी शास्त्रांत पारंगत होते.

निर्मितीचा काल

या ग्रंथाच्या शेवटी ‘कविकुलवर्णनम्’मध्ये –

शिवाजीचे पुत्र संभाजी! शहाजी, संभाजीचे पश्चात पृथ्वीमाजी!

शहाजी राज्यकरी तै जोशीराव दाजी। त्यांचा अश्रित ग्रंथ करी ॥46॥

असा निर्देश आहे. शहाजी महाराजांची ऊर्फ बुवासाहेबांची राजवट 1821 ते 1837 या काळात होती. याच काळात ‘करवीर महात्म्य’ची निर्मिती झाली असावी. ग्रंथाचे बहात्तर अध्याय असून ओवीसंख्या सुमारे साडेपाच हजार आणि शब्दसंख्या लाखाच्या जवळपास आहे. ते म्हणतात, करवीर क्षेत्र काशी क्षेत्राहून ‘यवाधिक’ सरस आहे.

ग्रंथनिर्मितीचे कारण

क्षेत्राचे महत्त्व सांगणार्‍या ग्रंथाचा मुख्य उद्देश असतो प्रचार-प्रसार! धर्मक्षेत्राचे महात्म्य लोकांच्या मनावर बिंबवणे, त्या मार्गाने जास्तीत जास्त भाविकांना आपल्याकडे खेचणे, त्यांना पुण्याची, स्वर्गाची लालूच दाखवून दक्षिणा उकळणे; या ग्रंथाचा उद्देशही करवीर क्षेत्राचे महत्त्व बिंबवणे हा आहे. ग्रंथात ग्रंथनिर्मितीचा उद्देश अनेक वेळा विषद केला आहे. लोकांना अनेक तीर्थांची माहिती घेतल्याने श्रेष्ठ कोणते हे कळत नाही. त्यांचा संशय फिटावा म्हणून हा ग्रंथ लिहिला आहे. पहिल्या अध्यायात 38 व्या ओवीत ते म्हणतात –

नाना स्थानी प्रख्यात।

ऐकोनी त्यांच्या महात्म्याते। बहुसंशय होतसे ॥38

यास्तव कदी संशय हानी

43 व्या ओवीत म्हणतात –

जें दे सर्व तीर्थांचे फळ।

ऐसे एकचि क्षेत्र निर्मळ।

सांग करोनी मन निश्चल।

ऐकोनि सूत बोलतसे ॥43

41 व्या अध्यायातील दुसर्‍या व बाराव्या ओवीत हा ग्रंथ ‘लोकशिक्षणार्थ’ असल्याचे म्हटले आहे.

म्हणजे – अधिक महात्म्य असलेले स्थान कोणते, हा संशय दूर करणे, सर्व तीर्थांचे फळ देणारे स्थान सांगणे, लोकशिक्षण करणे असे ग्रंथनिर्मितीमागील उद्देश विविध ठिकाणी ग्रंथात नमूद केले आहेत. स्थानाचे महत्त्व सांगत असतानाच, कोणत्या स्थानी स्नान करून दक्षिणा व ब्राह्मणभोजन घातल्याने कोणत्या प्रकारचे पाप दूर होते, याचीही माहिती भाविकांना दिली आहे.

ग्रंथाची प्रस्तावना

ग्रंथाला प्रा. डॉ. व्यं. वि. द्रविड यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. ते म्हणतात, “पुराणकथा आणि लोककथा यांच्या साहचर्यातून अनेक अद्भुत कथा पिढ्यान्पिढ्या उत्पन्न होत राहतात. कविजनांना आणि भक्तांना त्यामधून काव्यग्रंथ रचण्याची प्रेरणा मिळते.”

या अद्भुत कथा उत्पन्न होतात, त्यामागे कवींना विविध विषय सांगावेसे वाटतात, त्यांचीही त्यांनी नोंद केली आहे. सत्प्रवृत्तीचा विकास, दुष्प्रवृत्तीचा नाश, सदाचाराचे समर्थन, ऐहिक व पारलौकिक जीवनाची समृद्धी, निसर्गप्रेम, दैवीगुणांचा विकास, स्थलमहात्म्य, तपश्चर्या, समाजोपकारक कृती इ.

दाखला खोटा

ग्रंथकर्त्याने प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण देत असलेली माहिती ‘पद्मपुराणा’तील आहे, असे म्हटले आहे.

पद्मपुराण हेचि ब्रह्मांड थोर।

त्यात करवीर खंड पृथ्वीरुचिर।

माजी करवीर महात्म्य रत्नाकर।

त्यातील रत्न प्रथमोध्याय गोड हा ॥87॥

पण प्रा. द्रविड यांनी याला आक्षेप घेतला आहे. ते म्हणतात, ‘पद्मपुराणा’तील करवीर खंडात असलेले, असा उल्लेख जरी ‘करवीर महात्म्या’च्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी येत असला, तरी सध्या उपलब्ध असलेल्या ‘पद्मपुराणा’च्या गौड वा दाक्षिणात्य संस्करणामध्ये ‘करवीर महात्म्य’ आढळत नाही. ‘करवीर महात्म्य’ असलेले पुराण मिळायला हवे.

मार्कंडेयांनी नारदाला, नारदाने सुताला, सुताने ऋषींनाकरवीर क्षेत्र हे काशीक्षेत्राहून सुरस आहे, याचे वर्णन ग्रंथात केले आहे. ‘करवीर महात्म्या’संबंधी ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला! पूर्वी मार्कंडेयास नारदांनी सांगितलेले महात्म्य सुतांनी ऋषींना सांगितले. महर्षी अगस्ति उत्तरेकडील काशीक्षेत्र सोडून दक्षिण काशी म्हणजे करवीरक्षेत्री येण्यामागचा इतिहास सुरुवातीस सांगितला आहे. विविध विषयांचे वर्णन ग्रंथामध्ये आहे.

ग्रंथात स्त्रीदेवतेचे उदात्त, निर्भय, कृपाळू, वरदायी तेजस्वीरूप वर्णन केले आहे. शिव, विष्णू, नृसिंह इ. देवतांनाही देवीचेच रूप मानून प्रत्येक अध्यायाच्या पहिल्या ओवीमध्ये त्यांना वंदन केले आहे.

ग्रंथामध्ये शाश्वत सत्य असे अनेक सुविचारही जागोजागी विखुरले आहेत.

आपल्या गृहा लागुन। येई थोर किंवा लहान।

नम्र होये त्याते पाहुन। तोचि थोर म्हणावा ॥ 4.13

अन्यायी शक्ती न जाणून। करी स्वशक्तीचे प्रसरण।

तो लोभा करवी घेतो हासोन। जेवी हा विंध्याचल॥

एकाचे अधिक उणे बोलणे। किंवा अन्याय चाडी सांगणे।

ऐंशीं कर्मेकरिता उणें। पूर्वाजांदिस येतसे ॥4.36॥

हे युक्त किंवा अयुक्त। हा विचार न करिती शक्तिवंत।

सामर्थ्य हीनाच्या मनात। हा विचार येतसे ॥4.48॥

सामाजिक परिस्थिती

ग्रंथाचा लेखनकाल 1821 ते 1837 असल्याचे प्रस्तावनेत प्रा. द्रविड यांनी म्हटले आहे.

या काळात महाराष्ट्रात नुकतीच ब्रिटीश राजवट सुरू झाली होती. 1818 साली पेशव्यांचा पाडाव झाला. राजकीय स्थिती बदलली, तरी सामाजिक स्थिती झटपट बदलत नाही. चार्तुर्वण्यावर आधारित समाजव्यवस्था बळकट होती. शिवाशिव, सोवळे-ओवळे, जातींची उतरंड, जातीवरून व्यवसाय इ. बाबी जशाच्या तशाच होत्या. स्त्री-शूद्रांना विद्या मिळावी म्हणून प्रयत्न करणार्‍या महात्मा फुलेंना मुलींची पहिली शाळा काढायला 1848 साल उजाडले.

बाल-जरठ विवाह, बालविवाह, विधवा केशवपन, सतीप्रथा, जातीभेद अशा कुप्रथांबद्दल समाज नुकताच विचार करू लागला होता. लोकहितवादींची ‘शतपत्रे’ प्रसिद्ध होऊ लागली होती.

अज्ञानी लेखक

पण भविष्यात सुरू झालेल्या सामाजिक सुधारणांचे विचार ग्रंथकर्त्यांच्या खिजगणतीतही नाहीत. समाजात चाललेल्या घडामोडींबाबत ग्रंथकर्ता पूर्ण अनभिज्ञ दिसतो, त्यापासून अलिप्त दिसतो. करवीरनगरीत राज्य कोणाचे होते, याचा उल्लेख एका ओवीत केला आहे, हाच एक अपवाद आहे. आपल्या भागात घडणार्‍या क्रांतिकारी व खळबळजनक घटनांची माहिती लेखकास नाही. त्या काळी राजाराम मोहन रॉय किंवा लोकहितवादी यांचे विचार करवीर-कोल्हापूर भागापर्यंत पोचवण्याची सोय नसेल. तसे विचार कोल्हापूर परिसरामध्ये कोणी मांडले नसतील. त्याचबरोबर लेखकाला उद्याचे पाहण्याची दृष्टी नसेल. बहुतेक पुरोहितांची परिस्थिती अशीच असते. पुरोहित हा समाजातील सर्वांत शेवटी बदलणारा घटक असतो. त्याला नवे बदल पचवणे कठीण जाते. वाळूत डोके खुपसून बसलेल्या शहामृगासारखी त्याची परिस्थिती असते.

दाजीबा जोशीरावचेही तसेच झाले आहे; शिवाय ग्रंथवाचनाचा अधिकार शूद्रांना नसल्याने डोळ्यांसमोर केवळ ब्राह्मण समाज समोर ठेवूनच लिखाण करावे लागते. ब्राह्मणांच्या हिताचे ब्राह्मणांनी लिहायचे आहे, ब्राह्मणांनी वाचायचे आहे आणि समाजास सांगायचे आहे. त्यामुळे खरे-खोटे तपासण्याची भीती नाही. त्यामुळेच ‘करवीर महात्म्य’ ‘पद्मपुराणा’त असल्याचा खोटा दावा एवढा उघडपणे आणि पुन:पुन्हा लेखकांनी केला आहे.

सामाजिक बदल संथपणे होतात, राजकीय बदल झटकन होतात. पेशवाई जाऊन ब्रिटीश राज्य महाराष्ट्रात आले. त्याचाही संदर्भ अथवा उल्लेख या ग्रंथात नाही. या घटनेची दखल ग्रंथकर्त्यांनी घेतलेली नाही. ब्रिटिशांविरोधी सुरू झालेला असंतोष या काळापर्यंत दखलपात्र झाला नसावा. राजकीय व सामाजिक पातळीवरचे कोणतेही बदल या कालपावेतो कोल्हापूरपर्यंत पोचले नसावेत.

डॉ. रा. चि. ढेरेंचे मत

डॉ. रा. चि. ढेरे यांनी ‘करवीर निवासिनी महालक्ष्मी’ या त्यांच्या ग्रंथात दाजीबा जोशीरावांवर एक प्रकरण खर्ची घातले आहे. त्यात ते म्हणतात- जोशीराव घराण्याचे ज्ञात मूळ पुरुष बल्लाळ जोशी हे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. ते रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे राहत होते. छत्रपती संभाजी राजांच्या निर्वाणानंतर ते कोल्हापूर प्रांती महाराणी ताराबाईंच्या आश्रयास आले. त्यांचे वंशज दाजीबा. 1800 ते 1855 हा त्यांचा काळ. त्यांनी ‘वीरभद्राख्यान’ही लिहिले आहे. त्यातील अनेक ओव्या ‘करवीर महात्म्या’च्या मंगलाचरणात जशाच्या तशा वापरलेल्या आहेत. हा ग्रंथ ‘करवीर महात्म्यम्’ या संस्कृत ‘स्थलपुराणा’चा अनुवाद आहे. या संस्कृत ग्रंथातील दिव्यात्म कथांचा संग्रह बर्‍याच प्रमाणात ‘शाकंभरी महात्म्यम्’ या स्थलपुराणाशी साम्य राखणारा आहे. या दोन्ही संस्कृत स्थलपुराणांचा कर्ता एकच असण्याचीही शक्यता मला जाणवत राहिली आहे. तसे नसेल, तर निदान या दोन्ही ग्रंथांचे कर्ते परस्परांशी संबंधित असतील. ‘शाकंभरी महात्म्यम्’ या स्थलपुराणात बदामी परिसरातील ऐतिहासिक घटितांचा मिथकीय परिवेषात समावेश झालेला आहे. याचा अर्थ धार्मिक ग्रंथात एकातून दुसर्‍यात श्लोकांची, कथांची पुनरावृत्ती केली जाते.

विष्णुपत्नीचा जन्म

पुढे ते म्हणतात – दाजीबा श्री महालक्ष्मीचा उल्लेख ‘लक्ष्मी’ या नावानेही करतात. हा उल्लेख छंद सौंदर्यासाठी केलेला संक्षेप नसून ते श्री महालक्ष्मीला विष्णुप्रिया लक्ष्मीच मानाताहेत. त्याचमुळे ‘रमानाथ’ विष्णू करवीर क्षेत्रात लक्ष्मीसह नांदतो आहे. लक्ष्मीप्रमाणेच तो या क्षेत्राला व्यापून राहिला आहे, अशी श्रद्धा दाजीबांनी नि:शंक शब्दांत व्यक्त केली आहे.

करवीर महात्म्य वरदग्रंथ। याचा कर्ता रामनाथ।

दाजी जोशीराय हे निमित्त। करोनि ग्रंथ वदविला॥35

करवीर महात्म्य ग्रंथ सुंदर। हे बहात्तर गणांचे गोपूर।

लक्ष्मीसह रमावर। क्रीडा करी तयावरी ॥40

अंबाबाई ही स्त्री गणराज्यातली स्त्रीदेवता. तिला पुढे पार्वतीचे रूप देऊन शिवपत्नी बनवले गेले आणि दीड-दोनशे वर्षांपूर्वी दाजीबा जोशीराव यांनी ‘करवीर महात्म्य’ लिहून तिला विष्णुपत्नी लक्ष्मी बनवण्याची प्रक्रिया सुरू केली.

तिकडे, तिरुपती बालाजीला विष्णुरुपात पाहू लागले आणि चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी तिरुपतीहून विष्णुपत्नी या नात्याने अंबाबाईला दरवर्षी शालू येऊ लागला. पण कोल्हापूरच्या अभ्यासू भाविकांनी हे षड्यंत्र उघड करून ‘विष्णुपत्नी लक्ष्मी’ बनवण्याचे कारस्थान हाणून पाडले. ही अलिकडच्या दहा वर्षांतली घटना आहे.

देवळांचे मालक

जोशीराव या घराण्याचे मुख्य आराध्य दैवत श्रीगणेश आहे. अंबाबाई मंदिराच्या महाद्वारातून आत उतरल्यावर डाव्या हाताला सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. ते जोशीरावांचे आहे. महाद्वारातून बाहेर पडल्यावर डावीकडे सुमारे पाच-सहाशे पावलावर चौकामध्ये बिनखांबी गणेश मंदिर आहे, तेही जोशीरावांचेच. त्याशिवाय ओढ्यावरचा गणपती म्हणून परिचित असलेला जयंती नाल्याच्या काठावरचा गणपतीही जोशीरावांचाच. तो पूर्वी गावाबाहेर होता, आता तो गावाचा मध्य बनला आहे. तीनही देवालये सतत भाविकांनी गजबजलेली असतात. भाविक सढळ हाताने दान देत असतात.

रा. चिं. ढेरे ‘पुराणग्रंथा’बद्दल म्हणतात – ‘खरे तर सर्वच पौराणिक प्रकृतीच्या ग्रंथांचा वापर करताना त्यांच्या रचना, काळाचा निर्णय करण्याचे काम अवघडच असते.’ ‘करवीर महात्म्य’ ग्रंथाबद्दल पान नं. 27 वर ते म्हणतात – ‘स्थलकालपुराणकारांनी हा सर्व स्थानीय दैवत संभार श्री महालक्ष्मीशी जिव्हाळ्याने जोडून घेण्यासाठी सर्व स्थानिक दैवतांना महालक्ष्मीचे चरित्रघटक बनविण्यासाठी मिथकांची निर्मिती केलेली आहे. दाजीबा जोशीराव यांनी ‘मिथकांची निर्मिती’ केली असल्याचा निर्वाळा रा. चिं. ढेरे यांनी स्पष्टपणे दिला आहे.

मिथकांची निर्मिती

पहिल्या अध्यायात करवीर क्षेत्राचे महात्म्य सुतांनी ऋषींना सांगितल्याचे म्हटले आहे. अठ्ठ्याऐंशी हजार मुनींनी सुताला करवीर क्षेत्राचे महात्म्य सांगण्याची विनंती केली.

ऐसे अठ्ठ्याऐंशी सहस्रमुनी। भक्षिती वायू शुष्कपर्णी लागुनी।

जे मोठे आत्मसंयमी। ते सूतासि बोलती॥36

तेव्हा सूत म्हणतो –

जें अधिक काशीहून। क्षेत्र करवीरा भिधान।

तयाचे मी करतो कथन। श्री व्यासाते नमोनी ॥45

पुढे अंबाबाई; म्हणजे महालक्ष्मीचे वर्णन आहे. ती करवीरात आहे. करवीरचे वर्णन –

जीमध्ये पिंड दिल्यावाचून। पुत्रास न ये पुत्रपण।

जीमध्ये असे रूद्राचरण। ती रूद्रगया जेथे असे ॥58

पुत्राला पुत्रपण यायचं असेल तर आधी पिंड द्या.

येथे देव राहतात, विशाल तीर्थेआहेत, क्षेत्राच्या चारी बाजूला क्षेत्रपाल देवी आहेत. दुसर्‍या अध्यायात नारद मार्कंडेय ऋषींना क्षेत्रमहात्म्य सांगताहेत. मार्कंडेय ऋषींनी सर्व शास्त्रांचा अभ्यास केला, सुखे भोगली, धन मिळवले. मग नारद भेटले; त्यांना म्हणाले –

जेथे असती सर्व दैवते। प्रयागादि सकल तीर्थे।

ऐसे क्षेत्र सांगा माते। सूत म्हणे या प्रश्नाते।

ऐकोनि नारद तोषला ॥19

मग क्षण एक विचार करून। नारद बोले तया वचन।

ब्रह्माते सांगे नारायण। ब्रह्माही मला सांगे जे ॥20

म्हणजे नारायणांनी ब्रह्माला सांगितले, ब्रह्माने नारदाला, नारदाने मार्कंडेयाला, मार्कंडेयाने सुताला, सुताने ऋषींना सांगितले. ऋषींनी ‘पद्मपुराणा’त लिहिले. तो संदर्भ घेऊन ‘करवीर महात्म्य’ ग्रंथ दाजीबा जोशीराव यांनी लिहिला. कथेचा एवढा लांबलचक प्रवास झाला, तो खरा मानला तरी ‘पद्मपुराणा’त असे काही नसल्याचे तज्ज्ञ अभ्यासक प्रा. द्रविड प्रस्तावनेतच म्हणताहेत.

या मिथकात नारद म्हणे मार्कंडेया। संसारातून सोडवावया।

पूर्व विष्णुकरी क्षेत्र द्वया। काशीस आणि करवीरा ॥31

त्यातही करवीर काशी क्षेत्रापेक्षा ‘यवाधिक’ श्रेष्ठ केलं आहे. त्यामुळे ‘सदाशिव सहगण’ करवीरी राहे येऊन!

तेहतीस कोटी देवांची पंक्ती। जेथे येवोनि करी स्थिती।

इथले वैशिष्ट्य म्हणजे – दान वाढते.

जेथे सत्पात्री स्वल्पही दान। केल्या होते मेरू समान॥

दान किती पट वाढते, याची उदाहरणे दिली आहेत. ‘कोटी गोदान, सहस्त्र अश्वमेध, शतवाजपेययज्ञ, रत्नयुक्त भूमिदान एवढा फायदा; तोही सर्व जातींना होतो.

कोणत्याही जातीस। भक्तीने देवोनि भिक्षेस।

बहुपावले सद्गतीस। करवीरातील नर पै॥67

जे करवीरी ब्राह्मणाप्रती। गृहदानाते करिती।

ते पापापासून मुक्त होती। अंती जाती स्वर्ग लोक ॥69

ब्राह्मणाला ‘गृह’ देऊन पापापासून मुक्त होण्याची आणि स्वर्गलोकी जाण्याची सोय इथे आहे. इतर दाने देणार्‍यांनाही फायदे आहेत. त्यामध्ये ‘द्विमुखधेनू’ दान वैकुंठाला पोचवते. द्विमुखधेनू म्हणजे दोन तोंडांची गाय. मिळणार कुठे, अशी शंका येईल म्हणून ग्रंथकर्त्याने त्याचा अर्थही दिला आहे. ‘गाय प्रसूत होत असताना वासरू अर्धेच मुखाकडून बाहेर आले, त्यावेळी पुढील बाजूला गायीचे मुख आणि मागे वासराचे मुख, अशा रीतीने ती गाय द्विमुख होते. अशावेळी गायीचे दान देणारा दाता हा वैकुंठाला जातो, ऋण फिटते.’

इथे श्राद्ध केले, तर पितृऋण फिटते आणि नाही केले तर

त्याचा जन्मव्यवहार। सर्वही व्यर्थ होय ॥84

तिसर्‍या अध्यायात अगस्ति ऋषींनी काशी सोडण्याचे कारण सांगितले आहे. अगस्ति ऋषी ‘घटोद्भव’ आहेत; म्हणजे त्यांचा जन्म घटापासून झाला आहे. अगस्ति ऋषी तीर्थदर्शने घेत फिरत होता. त्याला पद्मासन घालून बसलेला ‘सुद्युम्न’ दिसला. आपल्यासारखा श्रेष्ठ ऋषी समोर आला तरी तो डोळे उघडत नाही. तो ज्या हरीचे ध्यान करतो, तो हरी ‘ब्राह्मणाते नमस्कारी’ यावरून सुद्युम्न तामसी ठरला. त्याला अगस्तिने शाप देऊन हत्ती केले.

इथे अगस्ति म्हणतो –

जयाचे ध्यानाते हा करी। तोही ब्राह्मण्य देव हरी।

सदा ब्राह्मणाते नमस्कारी। त्याच्या ध्याना अयोग्य हा ॥25

जे सात्विक असती नर। त्यांसच हरी सेवनी अधिकार।

हा तामस आहे पामर। यास अधिकारी नसे हा ॥26

यास्तव हा योग्य शासनी। तस्मात फिरो गज होऊनी।

ऐसा घोर शाप देऊनी। अगस्ति गेला मार्कंडेया ॥27

ब्राह्मण श्रेष्ठ

अगस्ति म्हणतो – देव ब्राह्मणाला नमस्कार करतात. तो सुद्युम्नाला ‘तामसी’ म्हणतो. का? आगंतुक आलेल्या ब्राह्मण अगस्तिची त्याने विचारपूस केली नाही. ब्राह्मणाचे आदरातिथ्य न करणे हा मोठा गुन्हा त्याने केला; परिणामी त्याला शाप मिळाला. देवापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ असतात, त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करा. स्वत:हून विचारा. त्यांना फुलासारखे जपा; नाहीतर तुम्हाला कोणताही मोठा शाप मिळेल, न केलेल्या गुन्ह्याची भयानक शिक्षा मिळेल. सुद्युम्न हा विष्णूचा भक्त आहे. अगस्तिचा दुष्टपणा विष्णूला आवडला नाही. पण अगस्तिकडे साधी नाराजी दर्शविण्याचीही ताकद विष्णूकडे नाही. म्हणून विष्णू नारदास सांगतो –

यास्तव तुवा अगस्ति मुनी। बाहेर काढावा काशीतुनी।

हा दुष्ट विप्र असे म्हणोनी। हाचि दंड योग्य तया ॥57

हा ब्राह्मण दुष्ट आहे, हे ठाऊक असूनही विष्णू त्याला शिक्षा करण्याचे मनातही आणत नाही. भक्ताला त्रास नको म्हणून केवळ काशीतून बाहेर काढायला सांगतो.

नारदापुढे प्रश्न पडला. हा निरोप अगस्तिला सांगावा, तर त्याच्या क्रोधाला, शापाला तोंड द्यावे लागेल. तो क्षणात भस्म करेल. म्हणून त्यानं वेगळी युक्ती केली. ती चौथ्या अध्यायात सांगितली आहे. नारद विंद्य पर्वताकडे गेला. विंद्याचे निसर्गसौंदर्य पाहून तो म्हणतो, ‘संतोष झाला माझ्या मना.’ विंद्याने नारदाला साष्टांग नमस्कार घातला. नारदाने विंद्य पर्वतास कळ लावली. मेरू पर्वताशी उंचीच्या बाबतीत स्पर्धा करायला लावली. विंद्य पर्वत एवढा उंच झाला की, सूर्याचा मार्ग अडला; परिणामी –

एक भागी अंधार पडे। सूर्य ताप पै एकीकडे।

तेणेकरून जन बापुडे। किती मरती, पळतीही ॥88

तेव्हा सकळ मुनीगण, देवगण ब्रह्माला शरण गेले. ब्रह्माने मार्ग सांगितला – अगस्तिकडे जाण्याचा. अगस्ति सामर्थ्यवान होता. त्याने यापूर्वी वातापी, इब्वाल या राक्षसबंधूंना निपटले होते. ब्राह्मण अतिथी घरी आल्यावर वातापी त्यांना ‘इब्वाल’चे – म्हणजे नरमांस खायला घाली. जेवण झाल्यावर तो इब्वालला हाक मारी. इब्वल ब्राह्मणाचे पोट फाडून बाहेर येई; पण अगस्तिने मात्र जेवल्यावर पोटावरून हात फिरवला आणि इब्वलला जिरवले. तेव्हा वातापी भिऊन पळाला आणि समुद्राला मिळाला. वातापीला शोधण्यासाठी अगस्ति समुद्र प्याला आणि त्याने वातापीचा नाश केला.

श्राद्धाला मांस

ग्रंथकार म्हणतात – ‘पल पैतृक’ श्राद्धात ब्राह्मणांना मांसान्न देत असत. कलियुगात ते बंद करून उडीद उपयोगात आणतात. म्हणजे आज स्वत:ला शाकाहारी म्हणून श्रेष्ठ समजणारे पूर्वी मांसाहारी होते. पाचव्या अध्यायात ब्रह्मासोबत इंद्र, वरुण, यम, कुबेर इत्यादी देव अगस्तिकडे गेले. अगस्तिच्या आश्रमात त्यांना पतिव्रता असलेली लोपामुद्राही भेटली. देवांच्या विनंतीला मान देऊन अगस्तिने काशीचा निरोप घेतला आणि लोपामुद्रेसह दक्षिणेला निघाला. तो विंध्य पर्वताजवळ आला.

तेवि त्याच्या भयेच केवळ। विंध्य कापो लागला ॥85

तो लहान झाला. त्याने हात जोडून अगस्तिला नमस्कार केला. अगस्तिने, ‘मी दक्षिणेकडे जात आहे. मी परत येईपर्यंत असाच लहान राहा,’ असा आदेश दिला, विंध्य लहान झाल्याने सूर्याला मार्ग मिळाला, जग स्वस्थ झाले.

इकडे, अगस्ति स्त्रीसह फिरू लागला; पण त्याच्या मनात ‘काशी त्याग दु:खाच्या लहरी’ येत होत्या. तेव्हा त्याला करवीर क्षेत्राची आठवण झाली. तो करवीरक्षेत्री यायला निघाला. त्याने लोपामुद्रेला करवीर क्षेत्राची महती सांगितली- ‘इथल्या विविध तीर्थांत स्नान करून, अनेकजण पापमुक्त झाले. पापिणी वेश्येला सद्गती मिळाली. ब्रह्माला मारणारा रूद्र, वृत्राला मारणारा इंद्र, गुरुस्त्रीचा उपभोग घेणारा चंद्र, ऋण घेतलेला सुशर्मा ब्राह्मण, मातेला आणि क्षत्रियांना मारणारा परशुराम, गोत्रहत्या करणारे पांडव, पितृद्वेष करणारा प्रल्हाद, स्नान करून आणि दान देऊन पापमुक्त झाले आणि स्वर्गाला गेले. सहाव्या अध्यायाला अगस्तिला करवीरची आठवण होते. सातव्या अध्यायात पराशरांनी करवीर यात्रा करून परिसरातील देवतांचा परिचय करून दिला आहे. पराशर स्वस्त्रीसह नैनिपाटण्यातून करवीरला आले. परिसरातील देवालये आणि नद्यांचे त्यांनी वर्णन केले आहे. शेवटी –

मग तेथे स्नान करी। श्राद्ध तर्पणादि कर्मेसारी।

गोभूतली सुवर्णही भारि। ब्राह्मणांसी देतसे ॥50

आठव्या अध्यायात गयातीर्थाचा गौरव व श्राद्धविधीची माहिती आहे. सुरुवातीलाच देवी पराशराने केलेल्या स्तवनाने संतुष्ट झाल्यावर सांगते –

जे द्वेषिती देवद्विज धर्मवेदा। आणि करिती परनिंदा।

क्षेत्रवासिया निंदिती कृतघ्न सदा। त्यांसि येथे राहूं न दे मी ॥11

विरोध नको

‘देव, ब्राह्मण, धर्म आणि वेदांचा द्वेष करणार्‍यांना इथे राहू दिले जात नाही,’ असे देवीच्या तोंडूनच वदवले आहे. विनोदाचा भाग म्हणजे तिसर्‍या अध्यायातील 25 व्या ओवीमध्ये देव (विष्णू) ब्राह्मणांना नमस्कार करतो, असे अगस्ति सांगतो. याला देवाचा द्वेष समजत नाही, अपमान समजत नाहीत. गयेची महती पराशर सांगतो – ‘गयेत अन्नदान करणार्‍यालाच पुत्र म्हणावे. तो सात कुळे पवित्र करतो. इथले विप्र तुष्ट झाल्यावर पितर तृप्त होतात, पिंड देणारा स्वत:ही मुक्त होतो. इथे मिळालेले फल कोटी वर्षे सरत नाही, पुढच्या वंशातही ‘कोणी न पावे प्रेतत्वासी!’ अर्थात, या फायद्यासाठी एक पूर्वअट आहे-

विप्रासि बहु द्रव्य देऊन। करावे त्याचे पूजन।

त्याच्या संतोषे करून। गयाश्राद्ध सार्थक होय ॥68

नवव्या अध्यायात प्रयाग करवीर गयाविधी केल्यानंतर मुनिवर वायव्येला सोमेश्वराला जातात. इथल्या तीर्थात स्नान करणारे – निष्काम मोक्ष – पावतील ॥6॥ आणि पुत्रपौत्रा पावती ॥10॥

इथे पराशराने तप केले, तेव्हा त्याच्या शिरापासून अग्नी निर्माण होऊन सर्व लोक जळू लागले ॥23॥

मग पराशरला तपोभ्रष्ट करण्यासाठी इंद्राने ‘काम’ (मदन) पाठवला. पराशराच्या आश्रमातले हिंस्र प्राणीही जातीवैर सोडून एकमेकांशी प्रेमाने वाढत असल्याचे मदनाला दिसले. दहाव्या अध्यायात मदनाने पतिव्रता सत्यवतीचे गुणवर्णन करताना स्त्रियांवर धर्माने लादलेल्या बंधनांचे समर्थन केले आहे.

शूद्राचा यज्ञ निरर्थक

अतिथीस न करी जो स्वागत। त्याचे पुण्य होय व्यर्थ।

जैसा शूद्राने यज्ञकृत। निरर्थक होतो तेवी ॥26

स्त्रियांची कामे

पतिव्रता स्त्रियांमध्ये सत्यवती श्रेष्ठ का, हे सांगताना स्त्रियांची कामे मदनाच्या तोंडून अगस्ति सांगतो.

परी त्या इलाच सदा वर्णिती। इजसम अन्या नसे म्हणती।

ही तूं जेविल्यावर जेविती। उभा होता उभी राहे ॥42

तू निजल्यावर निजती। तुझ्या अगोदर उठती।

तुझ्या नामातेही न घेती। तुझे आयुष्य वाढावया ॥43

पती समोर उभा राहायचे, पती उठल्यावर उठायचे, तो झोपल्यावरच झोपायचे; याशिवाय अन्य पुरुषाचे नाव घ्यायचे नाही, पतीसमोर येताना आभूषणे घालायची, पती नसताना कोणत्याही कार्यात भूषणे घालायची नाहीत, पती कोपला तरी, कोपायचे नाही, त्याने ‘ताडले’ तरी सदा प्रसन्न वदन ठेवायचे, काही काम सांगितले तर लगेच करायचे, दारात किंवा दाराजवळ उभा राहायचे नाही; पण बोलावले तर कामे टाकून लगेच हजर व्हायचे, आळस त्याजून नियमोदक गंधदर्भापत्र, पुष्पे अक्षताही आणि सत्वर अतिथीला अन्न दिल्यावरच स्वत: पतीचे ‘उच्छिष्ट’ भक्षण करते, आज्ञेशिवाय व्रत करत नाही. पतीला सोडून तीर्थयात्रा करत नाही, त्याच्याशिवाय कोणत्याही समारंभास जात नाही. रजस्वाला झाली असता कोणाशी बोलत नाही – तोंड दाखवत नाही – आणि स्नान करून शुद्ध झाल्यावर आधी पतीला पाहते. पती निजला असेल किंवा स्वेच्छेने सुरती गुंतला तरी कठीण काळातही त्याला उठवत नाही, पती तुष्ट झाल्यावर तुष्ट बनते आणि खिन्न झाल्यावर खिन्न बनते, अशी पतिव्रता एकरूप बनलेली असते. तिला तीर्थस्नान करावे वाटले, तर तिने पतीच्या पायाचे उदक प्यावे, पतीला ‘शिव-विष्णू’हून अधिक मानावे.

कसे वागू नये?

स्त्रियांनी कसे वागू नये, याचेही मार्गदर्शन ‘करवीर महात्म्या’चे रचिते याच अध्यायात 64 व्या ओवीपासून पुढे करतात. पतीस प्रत्युत्तर देणारी स्त्री गावात गाढव किंवा वनात कोल्हीण बनते. पतीचे ‘पादपद्म’ पुजून भोजन करणे, हा स्त्रियांसाठी एकच नियम आहे.

जी दुसर्‍याशी संग करते, ती घुबडी होऊन काटेरी वृक्षांवर बसते; पतीने ताडन केल्यावर जी मारायला धावते, ती व्याघ्री किंवा मांजरी बनते. पती बाहेरून येताच जी त्याला अन्न-पाणी देते, वारा घालते, पाय दाबते, गोड बोलते ती त्रैलोक्याला तोषविते.

विधवा

कोणताही गुन्हा न केलेल्या निष्पाप विधवेबद्दल दाजीबा जोशीराव अत्यंत घाणेरडे गरळ ओकतात – विधवा ही अमंगल आहे, तिला पाहिल्यावर कार्यसिद्धी होत नाही, याला स्वमातेचा फक्त अपवाद आहे. विधवा ‘अकल्याणाची खाण’ आहे. तिचा आशीर्वादही जनानी सर्वापरी त्यजावा ॥76॥

सती समर्थन

सतीप्रथेचे समर्थन करताना दाजीबा जोशीराव म्हणतात-

वीज न सोडी मेघाते। की कांति न सोडी चंद्राते।

छाया न सोडी देहाते। तेवि पतीशी असावे त्वां॥79॥

त्यामुळे मृत पतीबरोबर सहगमन न करणारी पत्नी निंद्यच आहे. पतीला स्मशानी नेताना जी सहगमन करते, तिला ‘अश्वमेधफल’ मिळते. ती यमापासून पतीला वाचवून मोक्षाला नेते. पापी आणि दुर्गती पुरुष असला, तरी सतीला पाहून यमदूत पळून जातात. तिच्या अंगावर केस आहेत, तितकी कोटी वर्षे ती पतीसह स्वर्गात राहते. तिचे माता-पिता-पती पुढे तिच्या पुण्यामुळे स्वर्गात राहतात.

विधवेवर बंधने

विधवा पलंगावर झोपली, तर तिचा पती नरकात जातो, तिने जमिनीवर झोपावे, अंगाला सुगंधलेपन करू नये, आभूषणे घालू नयेत, केस ठेवू नयेत, एक वेळ जेवावे, पान खाऊ नये, नाहीतर ती नरकात जाते. ती तांब्याच्या किंवा कास्याच्या ताटात जेवली, तर तिला पातक लागते. तिने विष्णूला पती मानून पुजावे आणि

जे जे असे पतीला इष्ट। ते ते देवोनि विप्रश्रेष्ठ॥

विधवेने करावा संतुष्ट। मृत स्वपतिप्रीत्यर्थ ॥94

पतीला आवडलेल्या सगळ्या गोष्टी ब्राह्मणाला देऊन त्याला विधवेने संतुष्ट करावे, असा सल्ला जोशीराव देतात. तिचे केशवपन करावे, जोरात बोलू नये, हसू नये, पांडुर वस्त्र नेसावे, वडील, भाऊ, मुलाचे ऐकावे; नाहीतर तिला नरक आहेच! अकराव्या अध्यायात तपात विघ्न आणणार्‍या मदन आणि मदनिकांकडे ऋषी लक्ष देत नाहीत, क्रोधही करत नाही, म्हणून ऋषींचा गौरव या अध्यायात केला आहे. कामक्रोधापासून दूर राहणारे करवीरकरही प्रशंसेस पात्र झाले आहेत.

पन्हाळा

‘पन्नगालय’ म्हणजे पन्हाळा! वैदिकांनी नागवंशाच्या लोकांचे वसतिस्थान असलेला पन्हाळा बळकावण्याचा प्रयत्न केला, आणि उलट आपणच नागांना पन्हाळ्यावर राहण्याची परवानगी दिली, नावही दिले, अशी पुराणकथा रचली. प्रसिद्ध नागझर्‍यावरही असाच अधिकार सांगितला आहे. बाराव्या अध्यायात पराशरांनी सर्वांना तीर्थविधी आणि तीर्थमहात्म्य सांगितले आहे. पराशर मुनींनी नागझरीवर आश्रम केला. इथल्या सर्पांचे विषफुत्कारयुक्त शब्द ऐकून त्यांना सत्यवतीने मुके ठेवण्याचा शाप दिला. सर्पांनी विष नष्ट करण्याचा उपाय पराशर मुनींना विचारला. मुनी म्हणतात – करवीर हे कामक्रोधादी क्षत्रियांचा आणि क्लेशांचा नाश करते, तुम्ही करवीर यात्रा करा. त्याचबरोबर महत्त्वाची अट सांगतो –

तेथे नेदी द्विजांस गोकांचन। ते दरिद्री होतसे ॥18

म्हणजे करवीर यात्रा हात हलवत करायची नाही आहे. ब्राह्मणांना गो आणि कांचन न देता परत आलात, तर आहे ती संपत्ती जाऊन दरिद्री बनाल. ‘जो करवीर तीर्थयात्रा करेल- अर्थात वरील अट पूर्ण करून- तो पापी असला तरी शुद्ध होतो- तो पशु-पक्षी योनीत जन्मत नाही, दुष्काळात जन्मत नाही, तो दु:ख पावत नाही, त्याला स्वर्ग आणि मोक्षही मिळतो. याउलट करवीर यात्रा करणारा अभक्त, सहपातक, संशयी, नास्तिक किंवा सहेतुक असेल, तर मात्र त्याला वरील फायदे मिळत नाहीत. द्विज पुजताना त्याची परीक्षा करण्याची गरज नाही. अन्नार्थी कोणताही पूजावा ॥31॥

गुरू, बंधू, स्त्री, मित्र, माता, पिता इत्यादींचे नाव घेऊन स्नान केले, तर त्यांनाही ‘स्नानफळ’ मिळते. एवढेच नव्हे, तर स्नानासाठी जाताना रस्त्यात मृत्यू पावला तरी ठरल्यानुसार सर्व स्नानफळ मिळते. अध्यात्मातही अशी ‘विमा’ उतरवण्याची सोय दिसते. पुढे, केवळ स्नान करून उपयोग नाही, मनाचा मळही टाकला पाहिजे, असाही उपदेश केला आहे; नाहीतर पाण्यात राहणारे मत्स्यादी जलचरच स्वर्गात जातील, असा दाखला ग्रंथकर्त्याने दिला आहे.

तेराव्या अध्यायात सर्पांनी महालक्ष्मीची स्तुती केली, त्याची माहिती आहे. देवीचे वाहन सिंह, श्रीवाहन बनलेला गरूड, देवीच्या शिरी नाग, चार भुजांत गदा, खेट (ढाल), पानपात्र आणि मातुलिंग म्हणजे म्हाळुंग नावाचे फळ असून ती कृश आहे. नागांनी तिचे गंधपुष्पाने पूजन केले.

स्तोत्राचे फायदे

देवीचे स्तोत्र एक महिना जपल्यास अवदसा जाते, दोन महिन्यात दारिद्य्र जाते, तीन महिने जपल्यास आकाशात गमन इत्यादीप्रमाणे सहा महिन्यांत देवत्व पावतो, असे फायदे वर्णिले आहेत. कोटीतीर्थापासून आरंभ करून नागांनी इतर तीर्थातही स्नान श्राद्ध आणि पिंडदान केले आणि ते शिराळ्याकडे निघाले. बत्तीस शिराळा हे स्थान सर्पयात्रेसाठी प्रसिद्ध आहे.

चौदाव्या अध्यायात त्याची माहिती आहे. नाग जात असताना रस्त्यात जिथे-जिथे त्यांचे विष पडले, तिथे विषकुंड पापनाशक तयार झाले. नाग तिथेच राहिले, महालक्ष्मीला विसरले. तेव्हा त्यांच्यावर गरुडाने हल्ला केला. मग पुन्हा ते ‘अंबेदेवी आम्हा रक्षी’ म्हणू लागले. देवीने त्यांना वर दिला. श्रावण शुद्ध पंचमीस म्हणजे नागपंचमीस जे जन ‘मधु-दुग्धादिंके’ नागांना पूजतील त्यांचे धन, धान्य, वंशवृद्धी होईल, रोगनाश होईल. त्यांना विषबाधा होणार नाही.

पंधराव्या अध्यायात श्रीलक्ष्मीकडून पराशरास पुत्रप्राप्तीचा वर मिळाला आहे. पराशराला पुत्र हवा होता, म्हणून त्याने तप आरंभले, तो हरिभक्ती करू लागला, तेव्हा देवी स्वत: पन्हाळ्यावर आली. तिने आपणच विष्णू असल्याचे सांगून विष्णुरूप दाखवले आणि वर दिला.

वैदिकीकरण

पंधराव्या अध्यायात देवीला विष्णुरूप देऊन अंबेच्या वैदिकीकरणाचा पाया दाजीबा जोशीराव यांनी घातला. सोळाव्या अध्यायात सत्यवती, व्यास आणि श्रीकृष्ण कथांचे वर्णन आहे – सत्यवती ही पराशराची पत्नी. ती नदीवर पाणी आणायला गेली. तिथे मत्स्य-मत्स्यिणीची क्रीडा पाहत बसल्याने तिला वेळ लागला. मत्स्यक्रीडा पाहून ती कामयुक्त झाली, म्हणून पराशरांनी तिला ‘मत्स्योदरी जन्म पावसी’ असा शाप दिला. केवढा मोठा गुन्हा! तिला उ:शापही मिळाला. त्यानुसार भारद्वाज मुनींचे वीर्य मत्स्यगर्भी राहिले. तो मासा कोळ्याने पकडला आणि कापला तेव्हा त्याच्या गर्भातून मुलगी जन्मली. तिचे नाव ‘मत्स्योदरी.’ ती नौका वल्हवण्याचे काम करी. एकदा, मागच्या जन्मातील पती, पराशर, नदी ओलांडण्यासाठी नौकेत बसला. बाजूने धुके असल्याने त्यांना एकांत मिळाला. पराशराशी संबंध आल्यावर व्यासरुपे हरी प्रकटला. पराशराने तिच्या अंगाची माशाची दुर्गंधी जावी आणि राजभोग मिळावा, असा वर दिला. व्यासमुनी मोठे झाल्यावर करवीर क्षेत्री आले. मत्स्योदरीची सुगंधा झाली. तिला शंतनु भूपतीने मागणी घातली.

कालयवन गोकुळावर चालून आला. त्याला लांब नेण्यासाठी श्रीकृष्ण धावत करवीरक्षेत्री आला. तिथे माले-मुडशिंगीजवळ त्याच्या स्पर्शाने गायीचे रूपांतर अप्सरेत झाले. विश्वामित्राचा तपनाश करायला गेल्यावर तिला गाय होण्याचा शाप मिळाला होता. सतराव्या अध्यायात कालयवनच्या वधाचे वर्णन आहे. कालयवन मागे लागल्यावर कृष्ण धावत-धावत मुचुकुंद नृपवर निजला होता, तिथे आला. कृष्णाने आपला शेला नृपावर टाकला व पुढे गेला. कालयवनाला वाटले कृष्णच आहे. त्याने नृपाला लाथ मारली. चिडलेल्या नृपाने नेत्राग्निने कालयवनाचे भस्म केले. अठराव्या अध्यायात पन्हाळ्यावरील तीर्थांची माहिती आहे. पन्हाळ्यावर ब्रह्मकुंड, कृष्णतीर्थ, पराशरतीर्थ, सत्यवती तीर्थ, नागतीर्थ, सिद्धकुंड, नृसिंहतीर्थ, सोमेशतीर्थ, उर्वशीतीर्थ, मदनेश्वर तीर्थ, वसंततीर्थ, वातकुंड, गंधर्वतीर्थ, व्याघ्रतीर्थ, शीलातीर्थ इत्यादी तीर्थे आहेत.

एकोणिसाव्या अध्यायात प्रयाग आणि अन्य तीर्थांचे वर्णन आहे. प्रयागतीर्थ, शुक्लतीर्थ, भैरवतीर्थ, विशालतीर्थ, मयूरतीर्थ, तारकतीर्थ इ. इतकी तीर्थे आहेत की,

ती वदावया शेष नसे समर्थ। ब्रम्ह्याचे आयुष्य न पुरे ॥22

ब्रह्मावर्त देश उत्तम असे अगस्ति मुनी लोपामुद्रेस सांगतात –

उंच-नीच ब्राह्मणादि वर्ण चार। परंपरेने आले जे आचार॥

ज्या देशी त्याते करिती साचार॥ तेच सदाचार तेते ॥44

वर्णव्यवस्था सांभाळतील तोच सदाचार आणि हेच संस्कार, जे संस्कारहीन होतात ते नरकात पडतात. 55

ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तीन वर्णांनी संस्कार समंत्रक करावेत. ते संस्कार गर्भाधान, पुंसवन, सीमंत, जातकर्म, नामकरण, निष्क्रमण, चौल, उपनयन, महानाम्नी, महाव्रत, उपनिषद्वोदान, स्नातक, विवाह, अंत्येष्टी यापैकी शेवटचे चार सोडून उरलेले नाममात्र शूद्रांचे ॥61

संकरजातीसाठी पाच संस्कार आहेत ते – अष्टमांगल्य, नामकरण, अन्नप्राशन, शिखारक्षण आणि विवाह. विसाव्या व एकविसाव्या अध्यायात ‘दशाश्वमेध’ तीर्थाचे महात्म्य व इतिहास आहे. अशी विचित्र नावे काशीमधून घेतलेली दिसतात. सुरुवातीला अगस्तिला- कोल्हा पुढे जातो, मयूरगण उजवे जातात, – असे शुभशकुन होतात.

दशाश्वमेध तीर्थामध्ये ब्रह्मादिदेव वस्त्रे नेसोन।

गंधलेपन करोनि यज्ञ संपवून। पूजन करिती विप्रांचे ॥62

देवच जिथे ब्राह्मणांचे पूजन करतात, ‘चरणक्षालन’ करतात, तिथे मानवांची काय कथा?

दान कधी द्यावे?

उत्तरायण, दक्षिणायन, दिवस, रात्र, कपिलाषष्ठी, अमावस्या, रविवार, चंद्र-सूर्यग्रहण इत्यादी मुहुर्तावर शतगुण, सहस्त्रगुण, लक्षगुण, असंख्यगुण इत्यादी फायदे सांगितले आहेत. या प्रत्येक वेळी विप्रास कोणते दान द्यावे, याचेही मार्गदर्शन आहे. सूर्य-चंद्रग्रहणाच्या वेळी ‘सर्व द्विज ब्रम्ह्यासमान’ आणि गंगाजलासम सर्वजीवन असते. संक्रांतीत जे दान द्याल, ते जन्मोजन्मी परत मिळते. थोडक्यात, म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रत्येक तिथीला, प्रत्येक मासात दान देण्यासाठी असंख्य मुहूर्त असून पुण्य शंभरपट, लाखपट, कोटीपट, अनंतपट करण्याची ‘सोय’ आहे. पितर आणि स्वत:ही कोटी वर्षे स्वर्गात राहण्याच्या स्कीम या अध्यायात आहेत. मरणोन्मुख माणसाने द्विमुखी गाय दान द्यावी, ती नसेल तर सवत्स आणि तीही नसेल, तर अवत्स गाय ब्राह्मणाला दान द्यावी. दान देण्याचा विचार मनात येईल, तेव्हा मुहूर्त न पाहता ब्राह्मणास दान द्यावे. कारण –

जीवित चंचल निश्चयेसी। यास्तव अवधी करू नये ॥73

मूल जन्मताना, नालछेदनापूर्वी, जन्मल्यानंतर दान द्यावे. हे अक्षय्य दान होय! कोणत्या तीर्थात स्नान केल्यावर आणि दान दिल्यावर कोणते फळ मिळते, याचेही वर्णन पानभर आहे; पण आता ते निरुपयोगी बनले आहे. बहुतेक तीर्थे मुजवून ग्राऊंड करण्यात आले आहेत. ‘जयंती’, ‘गोमती’ आता तीर्थांऐवजी नाले तयार झाले आहेत. त्यातून गटाराचे पाणी वाहत असते. पंचगंगेत स्नान करणे काही वेळा शक्य होते. तिथे वरील ‘स्कीम’ लागू आहेत. छत्तिसाव्या अध्यायात ‘भोगावती’चे महात्म्य वर्णन आहे. ‘भोगावती’चे जळ सर्वकाळ श्रेष्ठ असून, सर्व देशांत कोणताही ब्राह्मण दानपात्र असतो, हे सत्य असल्याचे मुनी सांगतात. श्रद्धा आणि भक्तीचे महत्त्व सांगताना मुनी म्हणतात- श्रद्धा नसेल, तर किंचितही फळ मिळत नाही.

श्रीकृष्णाची बदनामी

चाळिसाव्या अध्यायाच्या सुरुवातीला देवीला कृष्णरूप धारण करायला लावले आहे. गोकुळ-शिरगावच्या नावावरून गोकुळ, श्रीकृष्ण आणि सांबाची कथा ओवली आहे. इथल्या ओढ्याला यमुना नदी म्हटले आहे.सांबाच्या कथेत श्रीकृष्णाच्या पत्नीला बदनाम करण्याचे प्रयत्न केले असून स्त्रियांसंबंधीही शेरेबाजी ‘मनुस्मृति’प्रमाणे केली. श्रीकृष्ण पत्नींची बदनामी सांगू नये, अशी आहे.

स्त्रियांचे मन अतिचंचल। न पाहे सूत धन कुलशील।

मदनाने होऊन व्याकुळ। रुपातेच इच्छिते ॥62

एकास वरती, अन्यासी वदती। तिसर्‍याकडे पाहती।

चवथ्यासी हसती। यास्तव अंकी स्थितही युवती।

पुरुषे अहोरात्र रक्षावी ॥69

एकेचाळिसाव्या अध्यायात श्रीकृष्ण करवीरची स्तुती करतो. कृष्णाची पत्नी आणि सांब यांना बदनाम केल्यावर पापक्षालनाही करवीरची शिफारस केली आहे. बेचाळिसाव्या अध्यायात मुनींनी करवीर क्षेत्राचे गुणवर्णन केले आहे – नारायण कल्पांती जळी निजला असता, त्याच्या नाभीतून ब्रह्मा बाहेर आला आणि तप करू लागला, मुनी श्रीकृष्णाला या क्षेत्राचे रहस्य सांगताना त्यावेळी ‘हे न वदावे नास्तिक शठास।’ अशीही सूचना करतात. त्यांनी जप, होम, दान, वेदपाठ याबरोबर अलंकृत कन्यादान आणि दक्षिणायुक्त शय्यासाहित्य सदन इत्यादी सत्कर्मे नोंदवली आहेत. करवीरास पापी, अज्ञ आणि भद्रा विहीनही मोक्ष पावतो.

अनैतिक कथा

क्षेत्राचे महात्म्य सांगण्यासाठी एक अनैतिक आणि किळसवाणी कथा ग्रंथकर्त्यांच्या सडक्या मेंदूतून उतरली आहे. त्या कथेत – एक नाव सागरात बुडते. आई आणि मुलाची ताटातूट होते. दोघे दोन प्रदेशात पुढचे आयुष्य काढतात. आई गणिका बनते. एक दिवस मुलगा त्याच गावी तिच्या घरी येतो व भोग घेतो.

त्रेचाळिसाव्या अध्यायात त्यांना आई व मुलगा हे नाते कळते. मग प्रायश्चित्त घेण्यासाठी करवीरी येतात. मुलगा शरीर त्यागतो आणि शिवलोकात पोचतो, गणिका करवीरात येऊन राहते. मृत्यू पावल्यावर विष्णुगण तिला हरिलोकास नेतात. महत्त्वाचे म्हणजे वेश्या गाव सोडण्यापूर्वी आपले सर्व धन ब्राह्मणाला समर्पित करते. ती वेश्याही –

आपुले सकल धन। ब्राह्मणाते समर्पून आपुले पाप त्याते कथून।

पाप जाण्यास प्रायश्चित्त इच्छी ॥22

चव्वेचाळिसाव्या अध्यायात पांडव, पांचालीसह करवीरात येऊन तप करतात. ‘पंचलेश्वर’ नामे लिंग स्थापतात.

पंचेचाळिसाव्या अध्यायात कात्यायनी आख्यान आहे. इथे

गो, व्याघ्र, सर्प, नकुलादी जाती। एथे वैर सोडोनी खेळती11

शेहेचाळिसाव्या अध्यायात कात्यायनी रक्तबीज राक्षसाचा वध करते.

युद्ध

सुरुवातीला महालक्ष्मी विष्णूच्या अंगातून निघते. कुबेर द्विजांचे स्थापन करतो, चातुर्वर्णाश्रम व्यवस्था आचरतो आणि राज्य करतो. सुकेशी राक्षसाचा पुत्र हेती याच्याशी युद्ध करतो. कुबेराकडे पंधरा कोटी पायदळ, अर्धा लाख हत्ती, वीस हजार रथ आहेत. या युद्धात वीरांच्या मांड्या तुटतात, आतडी लोंबतात, रक्त वाहते, कित्येक मस्तकविहिन बनतात. राक्षस जिंकतात. देवालये फोडतात, तिथे अपवित्र वस्तू टाकतात. वेद, धर्माचा नाश करतात. तेव्हा इतर वेळी बारीक-सारीक कारणाने शाप देणारे ऋषि-मुनी विष्णूकडे जातात. तिथे त्यांना ‘देवद्विपरायण’ कोलनामक असुराकडे जाण्याचा सल्ला मिळतो. कोलगंधादिके विप्रांस पुजून। त्यांचे आशीर्वाद घेऊन युद्धाला निघतो. त्याच्याकडे तीन अक्षैहिणी सैन्य आहे. एक अक्षैहिणी हत्ती, रथ, घोडे, पायदळ मिळून 5 लाख 90 हजार 490 दैत्य आणि राक्षस परस्परांना मारताहेत, हे पाहून काट्याने काटा काढला म्हणत देवनायक हर्ष पावतात. सत्तर ते बहात्तराव्या अध्यायात कोल्हासुराचे 100 पुत्र मारले जातात. सूर्य उपासनेने पुन्हा पुत्र होतो, त्याचे नाव करवीर. त्याच्या राज्याभिषेकाचे वर्णन आहे.

दान द्या, दान द्या

मुले वारली, या पापावर उतारा म्हणून –

सुशाल कृष्ण धेनु त्वरित। उत्तम विप्राते दान द्यावी73-71

गुप्तदानही यथाशक्ती देऊन। ब्राह्मणास धेनू द्यावी77-71

आठ फळे, रत्नेही द्यायची आहेत, असे सतत द्विजा संतुष्ट केल्यानंतर कोलासूर करवीर या पुत्राला राज्याभिषेक करतो.

इथे करवीर महात्म्य ग्रंथाचा समारोप होतो.

सारांश

दैवतांचे महात्म्य सांगण्यासाठी ग्रंथ लिहितात, तसे स्थलाचे महात्म्य सांगण्यासाठी क्षेत्रिय ग्रंथ लिहितात. ‘करवीर महात्म्य’ ग्रंथ करवीरचे महात्म्य सांगण्यासाठी लिहिला आहे, असा दावा केला आहे. या ग्रंथात ‘पुराणकथां’मधील ऋषींची नावे वापरून नव्या कथा गुंफल्या आहेत. लोकप्रिय देव राम, कृष्ण, विष्णू, शिव यांचाही समावेश केला आहे. हे तीर्थस्थळ भुक्ती आणि मुक्ती देते, स्वर्गप्राप्ती करून देते, हजारो-लाखोपट पुण्य मिळवून देते, मोठ्या पापांचाही नाश करते, अशी लालूच दाखवून ब्राह्मणांना दान, दक्षिणा, भोजन, सोने, गायी संपत्ती मिळण्याची ‘सोय’ ग्रंथात केली आहे. ग्रंथात स्त्रिया आणि शूद्रांबाबत अत्यंत अवमानकारक लिखाण केले आहे. ‘मनुस्मृति’मधील पुरुषी वर्चस्व आणि वर्णवर्चस्वाची भलावण केली आहे.

पती कसाही असला, तरी त्याची सेवा करावी, त्याच्या मागे सती जावे अथवा केशवपन करून शरीर सुकवावे, असा आदेश दिला आहे. पितर म्हणजे मृत पावलेले पूर्वज. त्यांचे शरीर नष्ट झाल्यावर ते परत कसे येतील? आत्मा असतो, असे क्षणभर गृहीत धरले तरी शरीर नसताना, तोंड-अन्ननलिका नसताना तो अन्नसेवन कसा करू शकेल, असे प्रश्न ग्रंथकर्त्यास पडत नाहीत. तीर्थात म्हणजे नदी, तलावात डुबकी मारली, तर अंगावरचा मळ निघून जाईल; पण नदीत मळ सोडल्याने पुण्य कसे मिळणार? कथा रचताना देवापेक्षाही ब्राह्मण श्रेष्ठ ठरवले आहेत. त्यांचे ऐकले नाही, तर जबर नुकसान होते आणि दीन होऊन त्यांना दान-दक्षिणा दिली, तर स्वर्गाचे द्वार उघडते, अशा भाकडकथा प्रत्येक अध्यायात आहेत.

धर्म-अर्थ-काम-मोक्ष या सर्वांचा पाया ‘अर्थ’ आहे. दक्षिणा देणे हाच धर्म, तो पाळला तरच स्वर्ग आणि मोक्ष आहे. ‘करवीर महात्म्या’त वर्णिलेली सर्व देवस्थाने वेदपूर्व आणि स्त्रीप्रधान संस्कृतीमधील नाग लोकांची आहेत. पेहराव, पूजाविधी, सण, परंपरा, मूर्ती यावरून हे सिद्ध होते. दैवते शिवगणातील आहेत. पण या ग्रंथात सर्व दैवतांचे वैदिकीकरण करण्यात आले आहे. वैदिक ऋषींनी स्थानिकांची वसतिस्थाने आणि देवालये हडपली आणि ऋषींनीच स्थानिकांवर उपकार केल्याच्या कथा रचल्या.

स्त्रिया आणि शूद्रांना लिहिण्या-वाचण्याचा अधिकार नाकारला. त्यामुळे त्यांना खरा इतिहास लिहिता आला नाही. काही इतिहासप्रतीके आणि कर्मकांडांमध्ये टिकून राहिला आहे. लिहिण्याचा अधिकार नाकारल्याने पुढच्या पिढ्यांना खरा इतिहास कळला नाही. त्यांना वैदिकांच्या भाकडकथाच खर्‍या वाटू लागल्या. हा ग्रंथ ‘पद्मपुराणा’वर आधारित आहे, असे प्रत्येक अध्यायात म्हटले आहे; पण ते असत्य आहे. या क्षेत्रातले अभ्यासक तज्ज्ञ प्रा. द्रविड यांनाही ते प्रस्तावनेतच नोंदवावे लागले आहे. लिहिणार्‍याचे आणि वाचणार्‍याचे हितसंबंध समान असल्याने ‘पुराणग्रंथां’तून काहीही ठोकून दिले जाते; त्याचे अनुकरण ग्रंथकर्त्याने केले आहे.

अशा कथांनी भरलेला, अंधश्रद्धा पसरवणारा हा ग्रंथ अनैतिहासिक, अनैतिक, संविधानविरोधी व ब्राह्मणांच्याच फायद्याचा आहे, म्हणून हा ‘करवीर महात्म्य’ नसून ‘भट महात्म्य’ आहे, असे म्हणावे लागते. पुराण ग्रंथांमधून भाकडकथा कशा रचल्या जातात, हे अभ्यासण्यासाठी ‘करवीर महात्म्य’ ग्रंथ उपयोगी आहे.

परिसरातील देवस्थाने हा ग्रंथ प्रमाण मानून स्वत:चे महात्म्य सांगत असतात, म्हणून त्याचे खरे स्वरूप स्पष्ट झाले पाहिजे. कोल्हापुरातील सर्व तलाव, विहिरी, तीर्थे मुजवून त्यावर मैदाने व इमारती उभ्या आहेत. ओढ्यांची गटारगंगा बनली आहे. कोटीतीर्थ आणि रंकाळा हे दोन तलाव जिवंत आहेत; पण प्रदूषणामुळे त्यात स्नान करणे धाडसाचे ठरेल. तीर्थे मुजली, तसे श्राद्ध, दान व दक्षिणांमागील अंधश्रद्धाही मुजवल्या पाहिजेत. त्यासाठी वाचण्याचा अधिकार वापरून अशा ग्रंथांची चिकित्सा केली पाहिजे, तरच महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी काढलेल्या शाळेचे चीज झाले, असे म्हणता येईल.

संदर्भ :

1) श्री करवीर महात्म्य, -ग्रंथकार कै. दाजीबा जोशीराव

2) करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मी – ले. रा. चिं. ढेरे

3) सार्थ श्री मनुस्मृति (मराठी अनुवाद) – विष्णुशास्त्री बापट

4) परिवर्तनाच्या वाटेवरील काटे – चंद्रसेन टिळेकर

अनिल चव्हाण, कोल्हापूर

संपर्क : 9764147483


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]