मुक्ता दाभोलकर -
१४ जुलै २०२३ रोजी भारताने तिसर्या चंद्र-शोध मोहिमेअंतर्गत अवकाशात यान धाडले. त्या यानाच्या प्रवासाबद्दलची बातमी वाचत असताना एक दृकश्राव्य फीत नजरेस पडली. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत होता. नजिकच्या भूतकाळात घडलेल्या अशा इतर घटना म्हणजे, रायगड जिल्ह्यात पैशांचा पाऊस पाडण्यासाठी एका खासगी शाळेत अघोरी पूजा झाली. सिडकोमध्ये स्टेडियम विस्ताराचे रखडलेले काम चालू करण्यासाठी माजी नगरसेवकांनी स्टेडियमच्या आवारात बोकडाचा बळी दिला. समृद्धी महामार्गावरील अपघातस्थळी एकाने महामृत्युंजय यंत्र बसवले व त्याच्या पाच किलोमीटर अंतरात अपघात होणार नाहीत असा दावा केला. (वरीलपैकी तीन प्रकरणांमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.) चंद्रावर यशस्वी स्वारी करणार्या आपल्या देशाचा एक पाय मध्ययुगीन समजुती व वर्तनात अडकल्याची अशी असंख्य उदाहरणे दिसतात. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विवेकी समाजाच्या निर्मितीसाठी आयुष्यभर काम करणार्या व त्याचसाठी शहीद झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या निर्घृण खुनाला २० ऑगस्टरोजी दहा वर्षे होत असताना भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार, प्रसार, अंगीकारात आपण कुठे उभे आहोत याचा किंचित आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे.
आपल्या पारंपरिक समजुतींपासून नवीन ज्ञानावर आधारित विवेकी वर्तनाकडे जाणारा एक पूल आपल्याला बांधता येतो. विवेकवादी विचार पद्धती ही स्वतःची बुद्धी वापरून पुरावे शोधत विचार करण्याची एक रीत असल्यामुळे हा पूल प्रत्येक व्यक्तीला स्वतः बांधावा लागतो. फ्रेडरीक नित्शे म्हणतो तसे ‘तुम्हाला जीवनाचा प्रवाह ज्या पुलावरून पार करावा लागणार आहे तो पूल तुम्ही स्वतः सोडून इतर कोणीही बांधू शकत नाही.’ भारतीय मन व त्यातही महाराष्ट्रीय मन पारंपरिक समजुतींपासून नवीन ज्ञानावर आधारित विवेकी वर्तनाकडे जाणारा पूल स्वतःसाठी बांधू इच्छिते असा माझा अनुभव आहे. काही साधी उदाहरणं द्यायची झाली तर दिवाळीचा आनंद साजरा करताना फराळ, किल्ला, दिवाळीअंक मजा आणतात, फटाके अनिवार्य नाहीत किंवा गणेशोत्सवात मूर्ती व सजावट पर्यावरणपूरक असावी असे मुद्दे लोकांना पटतात. सण, उत्सव पर्यावरणपूरक केले तर त्यातील आनंद, मांगल्य वाढेल हे ही पटते. त्याला अनुसरून वर्तन घडेलच असे नाही पण हा विचार बरोबर आहे हे त्यांना मनोमन मान्य असते. परंतु पारंपरिकतेपासून जसे अधिक कालसुसंगत वर्तनाकडे जाता येते तसेच एकारलेल्या कट्टरतावादाकडेदेखील जाता येते. हा रस्ता निवडणारे संशयाने पछाडलेले असतात. ते म्हणतात, वाहनांचे, कारखान्यांचे, इतरांच्या उत्सवांतील प्रदूषण आधी बंद करा आणि मग बोला.
अशावेळी डॉ. दाभोलकरांना आठवताना दोन गोष्टी मनात येतात. पहिली गोष्ट जी सर्व समाजसुधारकांनी केली ती म्हणजे समाजाची उदासीनता बघून हतबल वाटून समाजासोबत चालू असलेला संवाद व शक्य तेथे परिस्थितीला भिडणे थांबवायचं नाही. बदल होतात. काही बदल आपल्या हयातीत अनुभवता देखील येतात. विसर्जित गणेश मूर्ती दान करा यासारखा एका गावातून सुरू झालेला उपक्रम महाराष्ट्रमध्ये लोकचळवळ होतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्या एखाद्या तरुण मुलाचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्याला फोन येतो की, ‘मी अभ्यास करताना माझ्या मनात दुसर्या कोणाच्या तरी आवाजात वाचलं जातं. घरचे म्हणतात हे काहीतरी बाहेरचं आहे. माझा यावर विश्वास नाही. मी विज्ञानवादी असल्याने आजूबाजूचे सगळे मला म्हणायचे, तुझी वेळ येईल तेव्हा तुला कळेल. खरंच अशी वेळ येते का? की मला मानसिक आजार झाला आहे?’ याबद्दल बोलण्यासाठी फोन येतो म्हणजे बदल नक्कीच होतोय.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तरुणांशी हे बोलत राहिले पाहिजे कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरणार्याच्या वैयक्तिक आयुष्याचा पोत या विचारपद्धतीमुळे बदलून जातो. तरुणांशी बोलताना डॉक्टर दाभोलकर नेहमी सांगायचे की, ‘या विचारामुळे जग बदलेल की नाही मला माहीत नाही परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विवेकी विचार पद्धती आत्मसात केली तर तुमचं आयुष्य बदलेल याची मी तुम्हाला खात्री देतो.’ वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या हे लक्षात आणून देतो की, स्वतःच्या विचारांनुसार आपण आपले आयुष्य घडवू शकतो. आपला श्रम, वेळ, पैसा कशासाठी वापरायचा हे ठरवू शकतो. जोडीदाराची निवड असो, पालकत्व निभावतानाचे ताणेबाणे असोत की अडचणीतून मार्ग काढणे असो, पारंपरिकता व चंगळवादी बाजार यांनी आखलेले तयार मार्ग नाकारून स्वतःचा रस्ता स्वतः घडवू शकतो. यासाठी इतरांपासून तुटण्याची गरज नाही. हे कळलं की माणसाचं आयुष्य हळूहळू पण ठामपणे बदलू शकते. विवेकी आयुष्य जगण्याचे नियम इसापनीतीच्या गोष्टींप्रमाणे साधे व सोपे वाटणारे पण आशयाने भरलेले असतात. ‘मी रोज अर्धा तास व्यायाम करेन’, ‘अर्धा तास वैचारिक वाचन करेन’, ‘व्यसन करणार नाही’ अशा साध्या संकल्पांचा विचारपूर्वक अंगीकार व समविचारी लोकांची संगत असेल तर आपल्याला हळूहळू वैज्ञानिक दृष्टीने जगण्याचा मार्ग गवसतो.
छद्म विज्ञानाचे आव्हान पुन्हा नव्याने ठळक होतंय. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने याचा विरोध करत असले तरी ‘कौरव हे स्टेम सेल व टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाचा आविष्कार होते’ असा दावा करणारे विद्यापीठ कुलगुरुदेखील आढळतात. आपल्या पूर्वजांना सुचलेल्या कौरवांच्या जन्माच्या व इतर अनेक कथांमागील कल्पकता निश्चित वाखणण्याजोगी आहे. महाभारताबद्दल तर व्यसोच्छिष्टम जगत सर्वम (पाय मोडणे) म्हणायची पद्धतच आहे आणि त्याचा आपल्याला जरूर अभिमान असावा परंतु या कथा हा एखाद्या साधनयंत्राच्या किंवा तंत्रज्ञानाच्या अस्तित्वाचा पुरावा असू शकत नाही. राजकारणी, इंडियन सायन्स काँग्रेससारखे मंच, वर उल्लेख केल्याप्रमाणे काही तज्ज्ञ व्यक्ती यांच्या छद्मविज्ञानाला बढावा देणार्या विधानांचे पडसाद समाजातदेखील उमटतात. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशेषतः शहरी भागात कार्यक्रम करतात तेव्हा त्यांना हटकून सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, तरंग, लहरी, मेनीफेस्टेशन, आधुनिक विज्ञानातील गोष्टी आपल्या पूर्वजांनी शोधून काढल्याचे दावे याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. कोणतेही तथ्य नसलेल्या या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचत आहेत आणि ही माहिती खरी की खोटी हे स्वतः कसे शोधावे, त्यासाठी त्या महितीला कोणते प्रश्न विचारावेत, कोणत्या पुस्तकांत याची वेगळी बाजू समजू शकेल हे या मुलांना माहीत नाहीये. कोणताही पुरावा नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे. त्यानुसार आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेणे हे आता फक्त भूत, भानामती, मंत्र-तंत्र, जारण-मारण यापुरते मर्यादित नाही तर समाजमाध्यमांनी जग कवेत घेतल्यानंतर पुराव्यांशिवाय बेछूट विधाने करणार्या कट-कारस्थान सिद्धांतांचा (कॉन्स्पिरसी थेअरी) सुळसुळाट झाला आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर त्यांच्या भाषणांत सांगत की, एका वाक्यात सांगायचे तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे ‘जेवढा पुरावा तेवढा विश्वास!’ तो पुरावा मागण्याची, शोधण्याची सवय ही आता लोकशाही समाजव्यवस्थेत जगतानाची एक अत्यावश्यक क्षमता ठरणार आहे.
खुनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे मांडताना शेवटी हे लक्षात ठेवले पाहिजे की, डॉक्टर दाभोलकरांचा खून हे दहशतवादी कृत्य आहे, असे तपासयंत्रणांनी म्हटले आहे. संशयित खुनी सापडले; परंतु दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांच्या खुनामागील सूत्रधार अजून मोकाट आहेत. त्यांना जेरबंद करणे ही तपासयंत्रणा आणि सरकारची जबाबदारी आहे.