अंधश्रद्धा निर्मूलनाचे पुढचे पाऊल!

प्रा. प. रा आर्डे -

मानवी मूल्यांसाठी उपयोगी पडणार्‍या धर्मभावनेचा आदर करूनही धर्मापलिकडे विवेकाधिष्ठित समाजरचनेसाठी दाभोलकरांनी तत्त्वज्ञ कान्टप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला हाक दिली होती – ‘निर्भय बना, स्वत:ची अपरिपक्वता टाकून द्या आणि धार्मिक आणि राजकीय कट्टरतावादाला शरण जाण्याचा भित्रेपणा टाकून द्या.’ दाभोलकरांनी सुरू केलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वत: निर्भय होऊन भारतातील मानवमुक्तीच्या लढाईसाठी झोकून देणे, हीच दाभोलकरांना त्यांच्या स्मृतिदिनी भावांजली ठरेल.

मी सातार्‍यात असतानाची घटना. समोर एक स्कूटर उभी होती. तिच्या स्टेफनीवर एक वचन लिहिले होते – ‘निर्भय बनो – महात्मा गांधी.’ या स्कूटरवर बसून डॉ. दाभोलकर माझ्या घरी आले, तेव्हा जाणीव झाली की, दाभोलकर एक वेगळंच रसायन आहे. दाभोलकर गांधीजींप्रमाणे व सॉक्रेटिसप्रमाणे निर्भय होते. फाळणीवेळी जातीय हिंसाचाराच्या वातावरणात गांधीजी शांततेसाठी दंगलग्रस्त भागात निर्भयपणे हिंडले, सॉक्रेटिस चौकाचौकांत तरुणांना सत्याचा शोध घेण्यास शिकवित होते; तर दाभोलकर पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रात विवेकाचा आवाज घुमवीत होते. गांधीजी, सॉक्रेटिस व दाभोलकर तिघांनीही वीरमरण पत्करले; पण विचारस्वातंत्र्यापासून तिघेही कधीही ढळले नाहीत. दाभोलकरांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहताना ते कशासाठी लढले आणि कसे लढले, याचा मागोवा घेणे प्रस्तुत ठरेल.

दाभोलकरांचा संघर्ष कशासाठी?

वरील प्रश्नाचे पटकन सुचणारे उत्तर म्हणजे, ते लढले अंधश्रद्धा निर्मूलनासाठी. पण अंधश्रद्धा निर्मूलन कशासाठी? दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार मांडत होते, एका व्यापक समाजपरिवर्तनासाठी लोकमत तयार व्हावे म्हणून. व्यापक समाजपरिवर्तन म्हणजे विवेकाधिष्ठित, शोषणरहित समाजाची निर्मिती. यासाठी त्यांनी अहिंसक मार्गाने विवेकाची चळवळ उभारली व गतिमान केली. स्वातंत्र्यानंतर भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी दोन महापुरुषांनी अथक परिश्रम केले. हे महापुरुष म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी. दाभोलकरांच्या भाषणांमध्ये या दोन महात्म्यांच्या सुवचनांचा नेहमी उल्लेख येत असे. गांधीजी म्हणत – “परमेश्वर सत्य की सत्य हाच परमेश्वर? मी सत्य हाच परमेश्वर मानतो.” गांधीजी हे धार्मिक होते; पण ते धर्मांध नव्हते. त्यांना मानवी मूल्यांचे वर्धन करणारा धर्म हवा होता. भारतीय समाजाच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्याची फळे पोचावीत, यासाठी ते अहिंसेच्या मार्गाने; पण धार्मिक नीतीचा अवलंब करून आयुष्यभर वाट चालले. दाभोलकर गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने चालले; पण समाजपरिवर्तनासाठीचा त्यांचा मार्ग गांधीजींच्या धार्मिक नीतीबरोबरच विवेकाधिष्ठित नीतीचा होता. हा मार्ग पंडित नेहरूंच्या वैज्ञानिक मानवतावादाशी जुळणारा होता. दाभोलकर नेहरूंच्या एका वचनाचा नेहमी उल्लेख करीत – ‘Scientific temperament is a process of thinking, method of action, search of truth, way of life, spirit of free man – वैज्ञानिक दृष्टिकोन ही विचार व कृती करण्याची पद्धत आहे, सत्यशोधनाचा मार्ग आहे; तो जीवनाचे दिशादर्शन करणारा आहे आणि त्याने व्यक्तीला जाणिवांचे स्वातंत्र्य प्राप्त होते.’

धर्मविवेक

दाभोलकरांच्या तत्त्वविचारांचे विस्तारपूर्वक ज्यात वर्णन आहे, त्या त्यांच्या ग्रंथाचे नाव आहे – ‘तिमिरातून तेजाकडे.’ पण या वाक्याला एक तळटीपही या ग्रंथाच्या मुखपृष्ठावर आहे, ती म्हणजे – ‘समग्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि पुढे.’ हे पुढे म्हणजे कुठे?

दाभोलकरांच्या लेखनात व भाषणात समाजसुधारक महात्मा फुले, आगरकर, बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमी उल्लेख येत असे; तसेच ते संत तुकाराम, गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांच्या धर्मचिकित्सक वचनांचाही उल्लेख करीत. दाभोलकरांना समाजसुधारकांची व संतांची धर्मचिकित्सा मान्य होती. पण दाभोलकर समाजसुधारक आणि संत यांना सोबत घेऊन पुढे पाऊल टाकत होते. हे पाऊल कोणते, हे समजण्याअगोदर धर्मसंस्था, धर्मभावना व धर्मचिकित्सा या मुद्द्यांची नीट ओळख करून घ्यायला हवी.

धर्मभावना, धर्मसंस्था आणि धर्मचिकित्सा

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुणे येथे दि. 9 एप्रिल रोजी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक शरद बावीस्कर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी बावीस्कर यांनी ‘धर्मभावना, धर्मसंस्था आणि धर्मचिकित्सा’ या विषयावर विवेचन केले. त्यांच्या विवेचनाचा सारांश असा – धर्मभावना ही तत्त्वज्ञानातील संकल्पना तार्किकतेच्या अंगाने समजून घेता येत नाही. सण, उत्सव इत्यादींसाठीच्या जीवनप्रेरणा भावनिक असतात; पण धर्मसंस्था ही विज्ञानाच्या तर्कनिष्ठ कसोट्यांनी तपासून पाहता येते. मात्र धर्मभावनेला संस्थात्मक स्वरूप नसते, त्याकडे असंवेदनशीलतेने पाहू नये. पण धर्मभावनेचा जेव्हा स्वार्थासाठी वापर होतो, तेव्हा मात्र त्याचे संस्थाकरण केले जाते, म्हणून धर्मभावना व धर्मसंस्था यातील भेद ओळखण्यासाठी चिकित्सा आवश्यक आहे. धर्म काय किंवा विज्ञान काय, यांचा शोषणासाठी वापर केला जात असेल, तर त्याची कठोर चिकित्सा व्हायलाच हवी.

धर्मसंस्थेची चिकित्सा

धर्मसंस्था म्हणजे धार्मिक संघटना, म्हणजेच Organised Religion. संघटित धर्माचे एक उदाहरण म्हणजे पाश्चात्य कॅथालिक धर्म. या धर्माचा प्रमुख पोप आणि धर्मप्रसार करणारे मठाधिपती आणि मंक यांची एक व्यवस्था तयार झाली. या व्यवस्थेतून एक सत्ताकेंद्र बनले आणि युरोपातील राजसत्तेशी संगनमत करून कॅथालिक धर्मसत्ता उन्मत्त होऊ लागली. पोपसहीत हाताखालचे मठाधिपती व संन्यासी यांनी मूल्याधिष्ठित धर्मभावनेपेक्षा धर्मभीतीचा वापर करून लोकांचे शोषण चालविले. कॅथालिक पुरोहितशाहीचे वर्चस्व वाढले. स्वर्गात जागा मिळावी म्हणून धर्मगुरूंनी सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली. या भ्रष्टाचाराविरोधात बोलणार्‍यांना शिक्षा देण्यासाठी धर्मन्यायालये तयार झाली. अनेक विचारवंतांना या धर्मन्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा दिली. ब्रूनो आणि गॅलिलिओ यांना शिक्षा देणारी हीच ती धर्मन्यायालये होत. गॅलिलिओचे एक वचन आहे – The intention of Holy Ghost is to teach us how one goes to heaven; not how heaven goes. धर्माने नीतीचे धडे द्यावेत, स्वर्गाचा मार्ग दाखवावा; पण स्वर्ग म्हणजे अवकाशातील ग्रहगोल यांचा मार्ग विज्ञानच दाखवेल; पण ख्रिस्ती धर्माने ‘heaven म्हणजे स्वर्ग आम्हालाच माहीत आहे, तो ‘बायबल’मध्ये सांगितला आहे. त्याला कुणी आव्हान देऊ नये,’ अशी भूमिका घेऊन गॅलिलिओला शिक्षा दिली. भ्रष्टाचारी आणि विचारस्वातंत्र्याची गळचेपी करणार्‍या धर्मसंघटनेची कठोर चिकित्सा हवीच; जी पुढे प्रबोधनकाळात झाली आणि युरोपात ‘ज्ञानोदया’चे (एनलायटनमेंट) युग अवतरले. त्यातून मानवी मूल्यांच्या विकासाचा मार्ग गतिमान झाला.

आपल्याकडे लोकहितवादी, प्रबोधनकार ठाकरे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी अशी धर्मचिकित्सा केली. ‘धर्मसंस्थेची व पुरोहितशाहीची अशी कठोर चिकित्सा अंधविश्वास दूर करण्यासाठी व पुढची परिवर्तनाची वाट सोपी करण्यासाठी आवश्यक आहे,’ हा विचार दाभोलकरांना भावला आणि त्यांनी शोषण करणार्‍या धर्मावर प्रहार केले. त्यातून महाराष्ट्रात ‘ज्ञानोदया’साठी वातावरणनिर्मिती सुरू झाली.

धर्मभावना

तत्त्वज्ञानात धार्मिक भावनेबाबत विस्तारपूर्वक मांडणी आहे; पण आपणाला इतक्या खोलात जाण्याची गरज नाही. बुद्धीच्या आविष्काराबरोबरच माणसाला सौंदर्यभावना, धर्मभावना असे आविष्कार असतात. वर्डस्वर्थ किंवा बालकवी यांनी निसर्गाचे जे काव्यात्मक वर्णन केले आहे, त्याला सौंदर्यभावनेचा आविष्कार म्हणता येईल. अशा भावना या उत्स्फूर्त असतात – (Spontanious overflow of powerful feelings). धर्मभावनेचे सुंदर उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’ किंवा तुकोबांचे अभंग. धर्मभावनेत तर्काला महत्त्व नाही. महत्त्व असते, उत्स्फूर्त भावनिक आविष्काराला. मदर टेरेसा यांची रुग्णसेवा हे धर्मभावनेचे उदाहरण आहे. सामाजिक समता आणि करुणा यांनी भारलेले संतसाहित्य म्हणजे धर्मभावनेचा सुंदर आविष्कार होय. दाभोलकरांना पंढरपूरची वारी ही समतेची वारी वाटली. मानवी नैतिक मूल्यांसाठी धर्मभावनेचा आविष्कार दाभोलकरांना मान्य होता. व्यवस्थापरिवर्तनाचा हा समतेचा मार्ग ममतेद्वारे व्यक्त होत होता. त्याला विरोध कशासाठी? पण…

द्वेषमूलक धर्मभावनांचे काय? ‘जिहाद’ हे अशा टोकदार धर्मभावनांचे उदाहरण आहे. ‘मॉब लिंचिंग’ ही सुद्धा अशीच द्वेषमूलक टोकदार भावना. द्वेषमूलक धर्मभावनांची निर्मिती धर्मसंस्था करतात. पुरोहित बुवा-महाराज आणि धार्मिक नेते धर्मभावनेचा गैरवापर करतात. पुरोहित धर्मभावना शोषणासाठी वापरतात; तर धार्मिक नेते धर्मभावना विद्वेषासाठी. आदिमानवाच्या टोळ्या परस्परांवर मात करण्यासाठी जशा आसुसलेल्या असत, तशीच ही धार्मिक संघटनांची दुसर्‍यावर मात करणारी भावना. याला स्टीव्हन पिंकर या मानसशास्त्रज्ञाने ‘जमातवाद’ (Tribalism) असे समर्पक नाव दिले आहे.

धर्म की धर्मापलिकडे?

धर्मभावनेचे दुहेरी रूप आपण पाहिले. एक रूप मानवतेच्या संवर्धनासाठी पोषक; तर दुसरे मानवी शोषण व विद्वेषाकडे नेणारे. धर्माचे हे स्वरूप लक्षात घेऊनच प्रख्यात विचारवंत आ. ह. साळुंखे यांनी धर्म की धर्मापलिकडे, असा प्रश्न विचारला. ‘धर्म की धर्मापलिकडे?’ या त्यांच्या ग्रंथात धर्मविरहित मानवी मूल्यांच्या व त्याद्वारे मानवी विकासाच्या संकल्पना मांडल्या होत्या. समग्र अंधश्रद्धा निर्मूलन व पुढे अशी मांडणी दाभोलकरांनी त्यांच्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या प्रसिद्ध ग्रंथात केली, त्याचे कारण काय? त्याचे कारण हेच की गांधीजींचा, विनोबाजींचा; तसेच विवेकानंदांचा धर्मभावनेतून सामाजिक समतेचा मार्ग एकूण मानवी विकासाला पुरेसा नाही, तर नेहरूंनी स्वीकारलेल्या वैज्ञानिक धर्मातीत मानवतावादाची सामाजिक परिवर्तनाला जोड द्यायला हवी, म्हणून धार्मिक नैतिक मूल्यांबद्दल आदर ठेवूनही दाभोलकर एक पाऊल पुढे टाकू इच्छित होते. ही विवेकाधिष्ठित वाटचाल म्हणजे बुद्धिप्रामाण्य, त्यातून प्रगत झालेले विज्ञान; तसेच बुद्धिप्रामाण्यावर आधारित मानवतावाद आणि या मूल्याद्वारे एकूण विकासाची वाटचाल. ही वाटचाल पाश्चात्य बुद्धिवादी चळवळीवर आधारित आहे. यास ‘युरोपीय एनलायटनमेंट’ असे नाव आहे. या चळवळीने युरोपात मानवी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये स्थापित झाली; पण विज्ञानाचा स्वीकार केल्याने एकूणच मानवी आरोग्य, सांपत्तिक स्थिती, आयुर्मान, सामाजिक न्याय व सुरक्षितता यात सुधारणा झाली. विशेष म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांची फारकत होऊन युरोपीय राष्ट्रांत लोकशाही राज्यव्यवस्था आकाराला आली. धार्मिक कलह आणि जमातवाद (Tribalism) याला आळा बसला.

विवेकाधिष्ठित ज्ञानमार्ग

युरोपमधील प्रबोधनाचे (एनलायटनमेंट) एक शिल्पकार तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट यांचा ‘What is Enlightenment?’ या शीर्षकाचा एक निबंध त्या काळी खूप गाजला. या निबंधाचे ध्येयवाक्य आहे – Dare to understand! (निर्भयपणे समजून घ्या!) ‘एनलायटनमेंट’ किंवा प्रबोधन म्हणजे काय? तर स्वत:च जोपासलेली अपरिपक्वता (Self-incurred immaturity); तसेच धार्मिक आणि राजकीय कट्टरतावादाला शरण जाण्याचा भित्रेपणा यापासून मानवाची मुक्तता म्हणजे ‘एनलायटनमेंट.’

युरोपातील प्रबोधनाने ‘त्या’ मानवी विकासाला प्रचंड वेग आला. मागच्या हजार वर्षांत मानवाला जे साध्य झाले नाही, ते अवघ्या तीनशे वर्षांत साध्य झाले. युरोपातील 18 व्या शतकातील प्रबोधनाची ही चळवळ पुढे जगभर पसरली आणि जगातील बहुतेक देशांत धर्मनिरपेक्ष मानवतावादी राज्यघटना आकाराला आल्या. ही विवेकाधिष्ठित समाजरचना पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारतानेही स्वीकारली. भारतात पंडित नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गठित झालेल्या मसुदा समितीकडून भारताची धर्मनिरपेक्ष राज्यघटना साकार केली. या राज्यघटनेत स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समावेश केला. पंडित नेहरूंच्या हयातीत आणि नंतर विज्ञानाच्या सहाय्याने भारतात सामाजिक समतेचा, न्यायाचा आणि विकासाचा मार्ग सुकर झाला; पण भारतातील जुनी सामाजिक व्यवस्था बदलली का?

बदल घडलाय!

भारतीय राज्यघटनेतील ध्येयानुसार आरोग्य, शिक्षण, सामाजिक समता, जातिभेदाला विरोध, अन्यायाच्या स्थितीत सुधार असे बदल घडत आहेत. चूल आणि मूल एवढ्याच क्षेत्रात जुन्या धर्मव्यवस्थेत बंदिस्त असलेल्या स्त्रिया आता ज्ञानाच्या आणि सेवेच्या क्षेत्रात संचार करीत आहेत. दलितांच्या परिस्थितीत हळूहळू का होईना, बर्‍यापैकी परिवर्तन घडत आहे. हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला आहे; पण भारतातील प्रबोधनाची आणि मानवी विकासाची ही वाटचाल पुरेशी नाही आणि भीती याची आहे की, या वाटचालीला विरोध करणार्‍या धर्मांध जमातवादी शक्ती जोर धरीत आहेत.

पुढची वाटचाल

जमातवाद आणि धर्मांधता यांचा धोका दाभोलकरांनी गंभीरपणे जाणला होता. घटनेने जरी मानवी मूल्यांना आणि त्याद्वारे सर्वांच्या विकासाला स्वातंत्र्य दिले असले, तरी जुन्या शोेषणव्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. अघोरी अंधश्रद्धा सुरूच आहेत. गेल्याच महिन्यात सांगली जिल्ह्यात गुप्तधनासाठी एका कुटुंबाने लाखो रुपयांचे कर्ज काढून मांत्रिकाला दिले. गुप्तधन मिळत नाही म्हणून कुटुंबाने मांत्रिकाला तगादा लावताच त्याने कुटुंबातील सगळ्या नऊ व्यक्तींना विष देऊन ठार केले. सांगलीमधीलच एका तरुण पदवीधर मुलाने शॉर्टकट मार्गाने श्रीमंत होण्यासाठी कोकणातील एका लफंग्याकडून ‘बायंगी’ नावाचे भूत आणण्यासाठी सत्तर हजार रुपये त्या लफंग्याला दिले. आता तो कर्जबाजारी झाला आहे. शोषण करणार्‍या या अघोरी अंधश्रद्धांबरोबरच धर्माच्या नावाखाली विविध प्रकारची कर्मकांडे वाढताना दिसत आहेत. जुन्या क्लृप्त्या चालत नाहीत, म्हणून नव्या वापरून विज्ञानाच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार सुरू आहेत. मात्र यापेक्षाही गंभीर म्हणजे भारतात जमातवादाचा धोका तीव्र होत चालला आहे. भारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असताना भारत हे धर्मराष्ट्र व्हावे, यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. यातून भारतात धर्मकलह वाढण्याची भीती आहे. युरोपात दहाव्या आणि अकराव्या शतकात धर्मयुद्धे झाली. त्यानंतर पुढे ‘कॅथालिक’ आणि ‘प्रोटेस्टंट’ यांच्यात तीस वर्षांचे भयानक युद्ध झाले. यातून युरोपने धडा घेऊन धर्माला राजसत्तेपासून दूर केले आणि अशीच व्यवस्था आपल्या देशात नेहरूंच्या नेतृत्वाखाली आकाराला आली; पण भारत स्वतंत्र झाल्यापासून पुढच्या पन्नास वर्षांत सुरू असलेली विवेकाधिष्ठित वाटचाल संपून या देशात धर्मकलह सुरू होतो की काय, याची चिंता वाटते.

निर्भय बना

मानवी मूल्यांसाठी उपयोगी पडणार्‍या धर्मभावनेचा आदर करूनही धर्मापलिकडे विवेकाधिष्ठित समाजरचनेसाठी दाभोलकरांनी तत्त्वज्ञ कान्टप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला हाक दिली होती – ‘निर्भय बना, स्वत:ची अपरिपक्वता टाकून द्या आणि धार्मिक आणि राजकीय कट्टरतावादाला शरण जाण्याचा भित्रेपणा टाकून द्या.’ दाभोलकरांनी सुरू केलेल्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वत: निर्भय होऊन भारतातील मानवमुक्तीच्या लढाईसाठी झोकून देणे, हीच दाभोलकरांना त्यांच्या स्मृतिदिनी भावांजली ठरेल.

लेखक संपर्क ः 98226 79546


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]