डॉ. टी. आर. गोराणे -
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विज्ञान महोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर शिक्षणाधिकार्यांनी मंगळवारी रद्द केला.
स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांची परिपत्रके महापालिकेच्या शाळेत वितरीत करण्याचा प्रकार अलिकडेच घडला आहे. 28 फेबु्रवारीच्या विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. विज्ञान महोत्सवासाठी त्र्यंबकेश्वराच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे सहकार्य घेण्याचे ठरविले. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्यांना त्यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांना कळाले. त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकार्यांची आणि त्यानंतर निवासी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली. भारतीय संस्कृतीच्या तसेच देवा-धर्माच्या नावाखाली काम करणार्या स्वामी समर्थ केंद्राला शाळांमधून विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्याची परवानगी देऊन वैज्ञानिक मूल्यांना हरताळ फासल्याची तक्रार करीत कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थ केंद्रातील काही अवैज्ञानिक दाव्यांच्या फलकांची छायाचित्रे उपजिल्हाधिकार्यांकडे सादर केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला वेगळा विचार करावा लागला. प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी तातडीने सदरचे परिपत्रक रद्द करून दुसरे परिपत्रक काढत समितीच्या संवैधानिक मूल्यांच्या जपणुकीच्या पाठपुराव्याला अनुकूल प्रतिसाद दिला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आणि इतर दिवशीही कोणत्याही धर्मप्रचारक समुदायाच्या, दैववादाचा फैलाव करणार्या व्यक्ती; तसेच समुदायाला केवळ नाशिकच्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयात प्रवेश नाकारावा, असे महाराष्ट्र अंनिसने आवाहन केले आहे. मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे राज्य सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, अॅड. समीर शिंदे, प्रल्हाद मिस्त्री, रेखा जाधव, प्रमिला जाधव, व्ही. टी. जाधव आदींनी सहभाग घेतला.
तसेच ज्यांचे आजपर्यंतचे वर्तनच पूर्णपणे विज्ञानाच्या मूलतत्त्वाशी विसंगत राहिले आहे. धार्मिकतेच्या नावाने लोकांची दिशाभूल व बुवाबाजीचे वर्तन करणार्या आणि अंधश्रद्धा पसरविणार्या स्वामी समर्थ संप्रदायाच्यावतीने आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, हे भारतीय घटनेशी विसंगत आहे.