डॉ. नरेंद्र दाभोलकर चित्र-शिल्प प्रदर्शनाला कोल्हापुरात उदंड प्रतिसाद!

अनिल चव्हाण -

कोल्हापूरमध्ये एक ते पाच जानेवारी २०२३ या कालावधीत महा. अंनिस कोल्हापूर आणि ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’ यांच्या वतीने दाभोलकरांच्या जीवनावर आधारित ‘कसोटी विवेकाची’ हे चित्र-शिल्प प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे प्रदर्शित करण्यात आले. त्याला कोल्हापूरकरांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.

प्रदर्शनाचे उद्घाटन महा. अंनिसच्या अध्यक्षा सरोजमाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. राजन गवस यांनी केले. या वेळी प्रा. डॉ. मेघा पानसरे, कॉ. चंद्रकांत यादव, तसेच मा. व्ही. बी. पाटील आणि मा. एम. बी. शेख आदी मान्यवर पाहुणे उपस्थित होते.

दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी प्रदर्शनातील चित्रे आणि शिल्पे यांची सुहास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी सुबक मांडणी केली. त्यांना मुंबई, पुणे, सातारा व सांगलीच्या कार्यकर्त्यांनीही मदत केली. सुमारे पंधराशे स्क्वेअर फुटांच्या हॉलमध्ये अनावश्यक गर्दी होऊ नये व प्रेक्षकांना प्रदर्शन पाहता यावे, म्हणून प्रत्येक शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रदर्शन पाहण्यासाठी नियोजित वेळ दिली होती. रोज सकाळच्या सत्रात एकेक मान्यवर प्रेक्षकांबरोबर संवाद साधतील, असेही नियोजन केले होते. डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राध्यापक डॉ. बृहस्पती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशया बिरणगे, शीतल सिंह, अरुनिका विद्वांस, वडणगे गावच्या देवी पार्वती हायस्कूलचे साखळकर सर व विद्यार्थी आदी स्वयंसेवकांनी प्रेक्षकांना चित्रांबद्दलची माहिती दिली.

उद्घाटनप्रसंगी डॉ. राजन गवस यांनी ‘समाजाची जाणीव-नेणीव बदलण्याची शक्यता कलाकृतीतच असल्याचे स्पष्ट केले. “जेव्हा राज्याची कल्याणकारी व्यवस्था ही भूमिका संपताना दिसते, कोणताही पक्ष जनतेचा विचार करत नाही, शब्द निष्प्रभ होतात आणि माणसं बोथट होत जातात, अशा काळात समाजाची जाणीव आणि नेणीव बदलण्याची शक्यता अशा कलाकृतीच करू शकतात”, असे ते म्हणाले. सरोज पाटील (माई) म्हणाल्या, “सध्याची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे. आमच्या पिढीने चांगल्या कामाची बीजे रोवली. या प्रदर्शनातील विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचवावे लागतील.”

प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या, “बदलत्या तंत्रज्ञानाच्या जगात, तरुण पिढीपर्यंत पोचण्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे हे प्रदर्शन आहे.”

कॉ. चंद्रकांत यादव यांनी सदिच्छा पाठवताना – ‘या प्रदर्शनाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सर्वत्र पोचेल,’ अशी आशा व्यक्त केली.

व्ही. बी. पाटील यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. महा. अंनिस कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. डॉ. विलासराव पोवार यांनी प्रास्ताविकामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार शाळाशाळांमध्ये पोचवण्याचे आवाहन केले. उद्घाटन सत्राचे स्वागत सीमा पाटील यांनी केले. पाहुण्यांची ओळख अनिल चव्हाण यांनी करून दिली. सूत्रसंचालन मीना चव्हाण यांनी केले. कार्याध्यक्ष बाळासाहेब मुल्ला यांनी आभार मानले. या वेळी प्रा. डॉ. छाया पोवार, डॉ. हमीद दाभोलकर, रमेश वडणगेकर, संजय सुळगावे, पंडित ढवळे, विजय अकोळकर, किरण गवळी, सुनंदा चव्हाण, अ‍ॅड. अजित चव्हाण, अ‍ॅड. शशांक चव्हाण, संजय अर्दाळकर, अस्मिता चव्हाण, इशा चव्हाण, सुरेश जत्राटकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रदर्शनासाठी मुंबईहून खास आलेल्या ‘फ्रेंड्स ऑफ दाभोलकर’च्या सदस्यांची ओळख करून दिली. या वेळी वैष्णवी पोतदार हिने ‘मी सावित्री बोलते’ या एकपात्री प्रयोगाचा काही भाग सादर केला.

दि. २ जानेवारी रोजी ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी प्रदर्शनास भेट देऊन प्रेक्षकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आपले प्रश्न देव सोडवतात, तर तेहतीस कोटी देवांची ताकद लावू या! एवढे देव शोधायला शास्त्रज्ञ का गेले नाहीत? गाडीला लिंबू-मिरची बांधतात, तरीही कोल्हापूर जिल्ह्यात अपघातात रोज दोन मृत्यू होतात. तेव्हा ‘हे का करायचे?’ असा प्रश्न पडू दे.” आपण लिंबू-मिरची बांधली नाही, तरी दहा वर्षांत अपघात झालेला नाही, असाही अनुभव त्यांनी नोंदवला. चंद्रकांत बागडी यांनी आभार मानले.

‘सकाळ’चे संपादक श्रीराम पवार यांनी ३ जानेवारी रोजी भेट दिली. “विवेकशील समाज निर्माण व्हावा, हा डॉ. दाभोलकरांचा उद्देश होता,” हे स्पष्ट करून ते म्हणाले, “प्रश्न विचारणे, व्यक्त होणे, ही आजची गरज आहे. देशात सगळे सारखे दिसावेत, त्यांचे एक मिलिटंट समाजात रूपांतर करावे, असे प्रयत्न सुरू आहेत; पण हे मानवी समाजाला मानवत नाही.” असा इतिहासाचा दाखला त्यांनी दिला. आभार मानताना प्रा. डॉ. बृहस्पती शिंदे यांनी सहली काढताना सातारा-पुणे मार्गावर असलेल्या नायगावलाही भेट द्या, असे आवाहन केले.

प्रसिद्ध लेखिका सोनाली नवांगूळ यांनी चार जानेवारी रोजी संवाद साधला. सीमा पाटील यांनी त्यांची ओळख करून दिली. “शहाणी माणसे जिवंत राहिली, तर इतरांना शहाणी करतील, म्हणून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि इतरांचे खून पाडण्यात आले”, असे सांगून त्यांनी, चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याचे धैर्य दाखविण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांनी मूल्यविवेक, कृतिशीलता, भावनाशीलता, निर्भयता इ. मूल्यांची ओळख करून दिली. सुप्रसिद्ध रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांनी पाच जानेवारी रोजी सदिच्छा भेट दिली. ते म्हणाले, “कला ही माणसाच्या जगण्याची अपरिहार्य गोष्ट आहे. कलात्मकता हे माणसाचे प्राण्यापासूनचे वेगळेपण आहे. असुरक्षितता आणि स्पर्धांमुळे धर्म, पूजा आणि बुवा-बाबांचा आधार घेतला जातो आहे. त्याने काही काळ बरे वाटते, पण प्रश्न सुटत नाहीत, ते अफूच्या गोळीप्रमाणे आहेत. अफूचा अंमल उतरला की प्रश्न तसाच! माणसांचा खून करायला सांगतो तो धर्मच नव्हे!”

प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक व करवीर अंनिसचे अध्यक्ष संजय आर्दाळकर यांनी समारोप करताना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याची गरज स्पष्ट केली. यावेळी आकाराम कांबळे, बबनराव रानगे, टी. जी. कवडे सर, प्रा. डॉ. छाया पोवार, शर्वील शहा, प्रा. एम. एस. पाटील, प्रा. लक्ष्मण मोहिते, सातारच्या मंगल कदम, शामराव रांगोळीकर, पी. पी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मीना चव्हाण यांनी ग्रंथदिंडीची बाजू सांभाळली.

प्रदर्शनाचे संयोजन रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण, सीमा पाटील, संजय सुळगावे आदी कार्यकर्त्यांनी केले, तर पाहुण्यांशी संवाद साधण्याचे काम अध्यक्ष प्रा. डॉ. विलासराव पोवार आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले.

प्रदर्शनाला अनेक नागरिकांनी भेटी दिल्या आणि चर्चा केली. काहीजणांनी फोटो काढून घेतले, सेल्फी काढले. काहीजणांनी आपल्या प्रतिक्रिया लिखित स्वरूपात दिल्या आहेत.

त्यामध्ये ‘हे प्रदर्शन समाजाचे परिवर्तन घडवेल, अजूनही उषःकाल होणार आहे, याची खात्री देणारे प्रदर्शन! समर्पक माहिती देणारी पोस्टर्स, प्रदर्शन लोकांपर्यंत पोहोचवावे, कार्यकर्त्यांनी दाभोलकरांनंतर चळवळ जिवंत ठेवली आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबाबत जाणीव वाढली,- सनातन्यांनी देशाचेच नव्हे तर जगाचे नुकसान केले आहे, उपक्रम चांगला आहे, समाज जागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज आहे, माणसाचा मेंदू जागा करणारा उपक्रम आहे, प्रदर्शन आवर्जून शाळा, कॉलेज आणि ग्रामीण भागामध्ये आठवडी बाजार अशा ठिकाणी लावावे, विवेकाचा आवाज बुलंद करू या.., या निमित्ताने डॉक्टर दाभोलकरांची आठवण झाली, टीमवर्क करू या, प्रदर्शनाचा प्रसार करू या, स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा, प्रदर्शनाची मांडणी उत्तम आहे, कार्यकर्तेचिकाटीने काम करत आहेत, सामाजिक कार्याला मानाचा मुजरा, जाणीव निर्मितीसाठी उत्तम प्रदर्शन, शिल्प आणि चित्रे खूप छान आहेत. आमच्या मुलांनीही हा मार्ग स्वीकारावा म्हणून प्रयत्न करत आहे… अपूर्व संधी मिळाली… प्रदर्शनामुळे काही लहानपणापासून पडलेल्या प्रश्नांचा उलगडा झाला… दाभोलकरांच्या विचारांचा वारसा जपला जातो आहे.. अप्रतिम अनुभव… माहितीपूर्ण प्रदर्शन.. अविस्मरणीय अनुभूती… पुरोगामी विचारांची बीज पेरण्याचे काम… विविधतेची अनुभूती…पाहून आनंद झाला…’

अशा अनेक प्रतिक्रियांच्या बरोबरच काही जणांनी त्रुटी दाखवल्या. अंधश्रद्धेसंबंधी विविध पदार्थ वस्तू दाखवण्यात आले आहेत, पण त्यामध्ये- हळदी-कुंकू लावलेला, कापलेला लिंबू- सुई- काळा दोरा- लिंबू, मिरच्या लटकवणे – सुया घुसवलेले लिंबू– खिळे –दहीभात आणि हळदीकुंकू– उतारा–लिंबाचा पाला– भंडारा– इ. वस्तूंची भर घालावी!

हे चित्र-शिल्प प्रदर्शन कोल्हापूरकरांना वेगळीच अनुभूती देऊन गेले, त्याबद्दल अनेकांनी धन्यवाद मानले…

अनिल चव्हाण

संपर्क : ९७६४१४७४८३


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]