फसवे विज्ञान – नवी बुवाबाजी या पुस्तकावर प्रतिक्रिया

अंनिवा -

स्वतःला वैज्ञानिक म्हणवणार्‍या अनेक अज्ञानी माणसांना विज्ञान म्हणजे काय, याचे खरे आकलन झालेले नसते. त्यामुळे ‘फसवे विज्ञान’ या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे अनेक जण चमत्कारांना बळी पडतात. यासंदर्भात प्रा. प. रा. आर्डे यांनी या पुस्तकात विश्लेषण केलेले आहे. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग, निष्कर्ष आणि पुन्हा पुन्हा सुधारणा ही विज्ञानाची खरी पद्धती. छद्मविज्ञान मात्र वरील काही न करता आपणास वैज्ञानिक दृष्टिकोनापासून आपणास लांब नेते. देशात; तसेच परदेशात छद्मविज्ञानाचे भयावह परिणाम झालेले आहेत. त्याने आर्थिक नुकसान, मृत्यू अशा आपत्ती ओढवलेल्या आहेत. याच छद्मविज्ञानाची, त्यात विषद केलेल्या अनेक रहस्यांची भांडाफोड आर्डे सरांनी केला आहे. विज्ञान व समाज यासंदर्भात प्रा. आर्डे म्हणतात, चंगळवाद आणि पूर्वापारची दैववादी मनोवृत्ती यातून समाजाला मुक्त करायचे असेल तर विवेकाशिवाय पर्याय नाही. ‘महाराष्ट्र अंनिस’ 30 वर्षे सातत्याने याच विवेकी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने छद्मविज्ञानाशी लढा देऊन त्याचा फोलपणा लोकांसमोर आणत आहे. कारण छद्मविज्ञान हे केवळ शोषणाकरिता निर्माण झाले आहे. ज्योतिष, फेंगशुई, रेकी, अ‍ॅक्युपंक्चर आणि अजून कितीतरी गोष्टी आपण नकळत अमलात आणत असतो ते समाज आणि त्याच्या आहारी गेलेल्या छद्मविज्ञानामुळे, वैज्ञानिक दृष्टीच्या अभावामुळे, एकंदरीत अज्ञानामुळे. छद्मविज्ञानाचा पसारा अमर्याद आहे. ते लोकप्रिय होण्यामागे खरे कारण म्हणजे व्यसन जडते तशी प्रक्रिया. मनाला समाधान देणारी हवीहवीशी झिंग. परावलंबी व्यक्ती या छद्मविज्ञानाच्या जाळ्यात लवकर आणि अधिक ओढल्या जातात. त्याला ‘मार्केटिंग’ने दुजोरा मिळतो. पुस्तकात विज्ञानाची विविध अंगे म्हणजे फिजिकल सायन्सेस पासून लाईफ सायन्सेस, सोशल, पॅरानॉर्मल, आरोग्य, इतिहास, धार्मिक, आधुनिक विज्ञान आणि पौरात्य संकल्पना इत्यादी ठळकपणे मांडली आहे.अशा दिखाऊ छद्मविज्ञानाचा पर्दाफाश हे ‘अंनिस’ पुढील मोठे आव्हान आहे. आरोग्य क्षेत्रात पर्यायी उपचारपद्धतीला अनेक बळी पडतात अक्षरशः मृत्यूच्या दारीही लोटले जातात. ‘प्लॅसिबो इफेक्ट’ आर्डे सरांनी समजावून सांगितला आहे. मेस्मरचे चुंबकत्व, अ‍ॅक्युपंक्चरचे चुकीचे आणि वाढते प्रस्थ, परामानसशास्त्राचा फोलपणा, संमोहनाचे ढोंग, तथाकथित विविध प्रकारचे ज्योतिष हे व इतर छद्मविज्ञानाचे प्रयोग हे त्याच्या बाजारूपणामुळे समाजात आपले पाय रोवून उभे आहे. अज्ञानात या फसव्या विज्ञानाची पाळेमुळे रुजलेली आहेत.या पुस्तकाचे नाव ‘फसवे विज्ञान’ पेक्षाही ‘छद्मविज्ञान’ असे यथोचित ठरले असते. विज्ञान फसवे असत नाही. त्याचा लोकांना फसवण्यासाठी, बनवाबनवी म्हणून वापर म्हणजे छद्मविज्ञान.महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी देशात; तसेच जागतिक पातळीवर छद्मविज्ञानाविरोधात केलेला संघर्ष वाखाणण्याजोगा आहे. या असल्या छद्मविज्ञानाविरोधात आपण सर्वांनी सावध राहणे; तसेच त्यांचा पर्दाफाश करणे किती आवश्यक आहे, ते आर्डे सर सांगतात. बुवाबाजी, अंधश्रद्धा, ढोंग इत्यादी विरोधात पुरावे देऊन त्यांनी योग्य तेथे तिखट भाषेत टीका केलेली आहे. उदाहरणांमुळे हा ग्रंथ अधिक उद्बोधक ठरतो. विज्ञानाचे भगवीकरण या विषयाला ग्रंथात स्पर्श केलेला आहे, परंतु तो या ग्रंथाचा मूळ विषय नाही. अश्विनीकुमारसारख्या प्रस्थाचे बिंग फोडणे, उडत्या तबकड्या, पिरॅमिड इत्यादी संबंधी रहस्यभेद या ग्रंथात आला आहे.थोर विचारवंत जेम्स रँडी, रिचर्ड डॉकिन्स, डॉ. नरेंद्र दाभोलकर; तसेच ‘महाराष्ट्र अंनिस’ च्या कार्यकर्त्यांना हे पुस्तक अर्पण केलेले आहे. याच्या मुखपृष्ठावर नावाप्रमाणेच नव्या बुवाबाजीच्या प्रतीकांचे दर्शन होते, तर मलपृष्ठावर या ग्रंथाचा व लेखकाचा अन्वयार्थ समजून येतो. याचे प्रकाशक अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र असून, स्वागत मूल्य 400/- आहे. आर्डे सरांचे खुद्द अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम असल्यामुळे ‘शहाणे करून सोडावे सकल जना’ हे ध्येय साध्य करण्यात ते या ग्रंथाद्वारे यशस्वी होतील. छद्मविज्ञान ओळखण्यात व पाखंडाचा नाश करण्यात बहुतांश लोक आता सज्ज होतील हा मानस या ग्रंथाद्वारे पूर्ण होईल.

रमा जाधव, कोल्हापूर

अशाच आशयाच्या प्रतिक्रिया डॉ. नामदेव कस्तुरे, श्री. चव्हाण आणि इतर अनेक मान्यवरांच्या मिळाल्या आहेत. मात्र काही चिकित्सक वाचकांनी ‘फसवे विज्ञान’ या ग्रंथात काही उणीवा दाखविले आहेत कोरोनाचं फसवे विज्ञान; तसेच गायीचे पंचगव्य आणि प्राणिक हीलिंग आणि असेच आपल्या समाजात प्रचलित फसव्या विज्ञानाची चिकित्सा या ग्रंथात अपेक्षित होती. पुढच्या आवृत्तीमध्ये या सूचनांचा विचार करू.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]