कृष्णा चांदगुडे -
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन-प्रशासन स्तरावरून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. या परिस्थितीत या जीवघेण्या विषाणूबाबत समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे. या भीतीवर मात करण्यासाठी लवकर व स्वस्तात उपाय कुठून, कसा मिळेल, असं लोकांना वाटू शकतं. मात्र लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा; तसेच भावनांचा स्वार्थासाठी जाणीवपूर्वक उपयोग करून घेणारी काही मंडळी प्रत्येक समाजात कार्यरत असतात. देव-धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली, कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूपासून सुटका करून घेण्यासाठी विविध अवैज्ञानिक उपायांचे खात्रीशीर दावे छातीठोकपणे करून लोकांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे .
काही प्रकारच्या अंधश्रद्धा आढळून येत आहेत. गोमूत्र किंवा शेणापासून कोरोना बरा होतो, गायीच्या शेणाच्या गोवर्यांवर गायीचे तूप किंवा कापूर पेटविल्याने कोरोना दूर पळतो, विविध मंत्र म्हटल्याने कोरोना होत नाही, पिठाच्या कणकेचा दिवा लावल्याने कोरोना घरात येत नाही, दारासमोर तांब्यात पाणी ठेवल्याने कोरोनापासून संरक्षण होते, हाता-पायाला हळद लावल्यास कोरोना होत नाही, अशा विविध प्रकारच्या अंधश्रध्दांचे पेव फुटले आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांचा दाखला देण्यात येत आहे. अशाच प्रकारचा त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथील शिवगोरक्ष धाम आश्रम असे नाव असलेला एक मेसेज दै. ’सकाळ’चे कोलाड प्रतिनिधी अरविंद पाटील यांनी महाराष्ट्र अंनिसचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांच्याकडे चौकशी व खात्रीसाठी पाठवला. त्यामध्ये आयुर्वेदिक औषधी महाकाल पावडर आणि अमृत संजीवनी लिक्विड यांमुळे कोरोनापासून संरक्षण होईल, असा उल्लेख होता. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होऊन अनेकजण कोरोना सारख्या आजाराला बळी पडू शकतात. तसेच विषाणूचा अधिक प्रसार होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन मोहन भोईर, डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे यांनी आश्रमाशी साधला असता सेवेकरी महेंद्र मेटकर यांनी त्यांचा दावा खरा असल्याचे प्रथम सांगितले. मेसेजमधील दावा हा बेकायदेशीर व अवास्तव असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल, असे सांगितले. असा मेसेज पसरवणे हा आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण कायदा व ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अधिनियम, 1954 या कायद्यांतर्गत कारवाई करण्यासाठी आरोग्य विभाग व पोलिस खाते यांच्याशी संपर्क साधला आहे, असे सांगितले, त्यावर त्यांनी माफी मागून ’व्हॉट्स अप’वर माफीनामा पाठवून दिला व वितरण करण्याचे थांबवत आहे, असे सांगितले. डॉ. ठकसेन गोराणे व कृष्णा चांदगुडे यांनी या आश्रमाशी संपर्क करून ते औषध विक्री करण्याचे थांबविली असल्याची खात्री केली. ’अंनिस’च्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे कोरोना संबंधी अवैज्ञानिक औषधाचा प्रचार, प्रसार थांबला. कोरोनावरील विविध प्रकारच्या दाव्यांबाबत कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांतून प्रबोधन केले.