आनंद विंगकर - 9823155768

आपल्या उदारातून जन्माला येणारं बाळ मुलगा नाही तर मुलगीच आहे, अशी मनाशी खूणगाठ बांधून गर्भातील अर्भकासोबत ती बोलत आहे. स्त्रीचं दुःख, तिच्या वेदना, जगण्यासाठी मोजावी लागणारी किंमत, शिक्षणासाठी तिला करावा लागणारा संघर्ष, स्त्री म्हणून तिला मिळणारी सापत्न वागणूक, तिची पदोपदीची अवहेलना, अपमान या सार्या गोष्टी एक स्त्री दुसर्या स्त्रीलाच केवळ सांगू शकते. हे मनोमन कादंबरीच्या नायिकेला माहीत आहे.
गोष्टीची सुरुवात आणि जवळपास तीनशे पानांचा अवघा वृत्तांत सुध्दा एकच आहे; जो नायिकेनं सांगितलेला नाहीच, तर खूप आधीच – अडीच हजार वर्षांपूर्वी – तथागताने राजा प्रसेनजितला उपदेश करताना वदलेला आहे. मुलगी जन्माला येणं, ही दुःख व्यक्त करण्याची बाब नाही, तर अभिमानाची गोष्ट आहे. कारण स्त्री ही पुरुषांपेक्षा नेहमीच सरस असते. कारण ती जीवनदात्री आहे, पृथ्वीसारखे आपल्या संततीचे भरणपोषण करते. नेहमीच पुरुषांच्या श्रमात सहभागी असते. कुटुंबातील सर्व जबाबदार्या सांभाळते; प्रसंगी घरची, समाज, गाव अन् देशाची जबाबदारी स्वीकारते. स्त्री-पुरुष समान आहेत. अंतिमतः तीही माणूसच असते.
कादंबरीभर लेखिकेला हेच नमूद करायचे असावे.
मुलगी म्हणून जन्माला येत असतानाची नकोशी फिन्द्री असल्याने बेवडा, दारूडा, काहीसा बाहेरख्याली बाप तिला फेकून देतो. उकिरड्यावर पडलेला इवलासा जीव मेला, म्हणून घोषित केले जाते. समूहाच्या साक्षीने तिला पुरत असतानाच आपण जिवंत असल्याचा क्षीणसा टाहो फोडते आणि बाप नाईलाजाने उपकार म्हणून जीवन बहाल करतो आणि इथूनच नायिकेच्या यातनांचे, कष्टाचे अन् शिक्षणासाठीच्या संघर्षाचे आत्मकथन सुरू होते.
ऐंशी आणि त्याही अगोदरच्या काळात दलित, उपेक्षित मुलींना शिक्षण घेताना कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, समस्यांना तोंड देत कोणत्या दिव्यातून जावे लागत होते, या लेखाजोख्याचे उत्तम उदाहरण प्रस्तुत कादंबरी आहे.
स्त्रीमुक्ती लढ्याचे अंतिम उद्दिष्ट सर्व तर्हेच्या मानवी शोषणापासून स्त्री आणि पुरुषाची मुक्ती. एक हमसफर, हमसाथी म्हणून स्त्रीला मिळणारी मान्यता, पुरुषप्रधान मानसिकतेतून होणार्या भेदभावास कायमची तिलांजली, हे जरी मान्य असले तरीही दलित अन् भटक्या-विमुक्त समाजातील स्त्रियांचे वेगळे प्रश्न उरतातच. सामाजिकदृष्ट्या या उपेक्षित स्त्रियांचे शोषण दुहेरी स्तरावर होत असते. जात आणि धनदांडग्या व्यवस्थेनं ग्रस्त समाजातील पुरुषांकरवी होणार्या शारीरिक, मानसिक पिळवणुकीला तिला सामोरे जावे लागते, इतकेच नाही तर घरातील पुरुषांच्या अमानुष मारहाणीसही तिला प्रत्येक दिवशी तोंड द्यावे लागते. अशा दुहेरी पिळवणुकीतून दलित आणि मागास समाजातील बाई उभी राहते.
कादंबरीतील नायिकेची आई या दुहेरी शोषणाचे उदाहरण आहे. दारूडा नवरा कमावलेला पगार घरातील मुलेबाळे उपाशी, अर्धपोटी ठेवून बाहेर उधळतो. वर छोट्या-छोट्या गोष्टींतून सततची आदळाआपट, हाताला येईल त्या आयुधाने मारहाण करतो. हे सगळं सहन करीत ही जन्मजात सोशिक स्त्री परत उठून आपल्या लेकरांनी उपाशी राहू नये, म्हणून जेवणखाण आणि बाहेरचा रोजगार करून घर चालवत राहते.
स्वतःला शिक्षण घेता न आल्यामुळे आपल्या आयुष्याची जी परवड, पिळवणूक झाली आहे, ती लेकीला भोगायला लागू नये म्हणून आयुष्यभर ही चिपाड स्त्री कष्ट उपसत राहते. कसलीही हौसमौज तिच्या वाटेला कधीच नसते, तरीही आनंदाने आपली मुले शिकून मोठी व्हावीत, म्हणून चाललेला तिचा संघर्ष संपूर्ण कादंबरीत खदखदताना दिसतो.
नवर्याची कारण नसतानाची ऊठसूट मरणांतिक मारहाण, कुटुंब चालवण्यासाठीचे तिचे दिवसरात्रीचे अथक श्रम हे मुलीने शिकावे म्हणूनच असतात. हे अथक अतिरिक्त श्रम वाचताना पानोपानी दिसून येतात. यात साथ देणारी तिची आई म्हणजे कादंबरीतील नायिकेची आजी; जी सुट्टीला आपल्या नातीला हाताशी धरून मिळेल तो रोजगार करून नातीच्या शिक्षणाचा खर्च उभा करण्याचा प्रयत्न करते.
कष्टात उभे राहून इतरांना सहानुभूतीचा आधार देणार्या स्त्रियांमुळेच नायिका आणि तिच्या आईला जगतानाचा आधार, उभारी मिळत राहते. अंतिमतः एक दुबळी स्त्रिच दुसर्या कष्टी बाईला सहाय्यभूत बनत असते, हे कादंबरी वाचताना अनुभवास येते.
प्रस्तुत आत्मकथनवजा कादंबरी मराठीतील स्त्रीआत्मकथनाहून वेगळं आहे. दलित स्त्री शिक्षणातून उन्नत होताना ती विचारांनी अधिकाधिक सामाजिक होत जाते.
मुळात शिक्षणाची दारे तिच्यासाठी कुणामुळे उघडी झालीत, याची जाणीव ती आदर आणि अभिमानाने व्यक्त करते, ती स्वतःपलिकडे इतरांचा विचार आस्थेनं करते. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स आणि स्त्रियांसाठी काम करणार्यांसाठी नतमस्तक होते. शिक्षण गरीब, खालच्या जातीमधील मुला-मुलींना सहज उपलब्ध व्हावे म्हणून औरंगाबाद येथे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या मिलिंद कॉलेजच्या मुलींच्या होस्टेलला प्रवेश मिळाल्यानंतर कादंबरीची नायिका संगीता नरवडेचं सदगदीत होणं वाचकांना वाचताना भावूक करते. खेड्यापाड्यांत निर्माण झालेल्या अशा कॉलेज, होस्टेल, ‘कमवा आणि शिका’सारख्या योजनांमुळेच सत्तर-ऐंशीच्या दशकातील दलित आणि बहुजन समाजातील तरुण-तरुणी शिक्षित झाल्या. या उपकाराची जाण विदर्भातील खेडेगावातून वर आलेल्या एका दलित लेखिकेला असणे, ही निश्चित गौरवाची गोष्ट आहे.
खेडेगावात आलेल्या जातजाणिवेच्या अनुभवातून तिची लेखणी काहीशी आक्रमक नि टोकदार असली तरीही सुजाण वाचकांना विचार करायला ती भाग पाडते. एका ठिकाणी नायिका म्हणते, “बर्याच ठिकाणी पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त कट्टरतेनं बाट पाळतात.” जेवढं शिक्षणातील अज्ञान जास्त, तेवढीच जातीची कट्टरता जास्त. दलित आणि दलितेतर मुलींच्या शिक्षणाविषयी समाजातील पुरुष वर्गाकडून दाखवलेली अनास्था असेल तर ती प्रश्न विचारते. असे असेल तर बिचार्या बायकांचा काय दोष?
स्त्रीच्या हातात अज्ञानाचा भाला देऊन गावागावांत जातींचे राखणदार म्हणून त्यांना नेमलं. गावगाड्यातील बहुसंख्य स्त्रिया आपल्या जातींचे रक्षण करताना दिसतात. प्रस्तुत मत वाचकांना अधिक अंतर्मुख करते.
म्हणून ‘फिन्द्री’ ही मनोगतात्मक कादंबरी केवळ शिक्षित होऊन स्थिर झालेल्या एका दलित मुलीच्या उत्थानाविषयी बोलत नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारून एकूणच समष्टीविषयी अधिक सजगतेने बोलते. हे या कादंबरीचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे.
फिन्द्री कादंबरीतील भाषाशैली हे एक वेगळेच प्रकरण आहे. मराठवाड्यात बोलत असलेल्या बोलीभाषेचा ही कादंबरी अस्सल ऐवज आहे. आंतरी मायेचा झरा असलेली ही बोलीभाषा तिच्यातील म्हणी, वाक्प्रचार, लग्नातील नावे, अनुभवातून अभिव्यक्त झालेले दृष्टांत आणि स्त्रियांच्यातून उलगडत जाते. सुख-दुःखांच्या नानाविध तर्हा, वर्षाचे सर्व ऋतू आणि हंगामातून बायकांच्या मुखातून मुखर होणारी मार्दवी भाषा. जन्मजात भाषेला उगाच म्हटलेले नाही मातृभाषा. संपूर्ण कादंबरीत स्त्रियांच्या वेदना, आनंदाचा आक्रोश, आकांताचा आणि; प्रसंगी क्रोधाचा आविष्कार सुनीता बोर्डे यांनी वापरलेल्या भाषेतून व्यक्त होतो.
नेहमीसारखेच मनोविकास प्रकाशनाचे हेही पुस्तक छान आहे. विशेषतः पुस्तकाची बांधणी मला आवडली. पुस्तक कसेही दुमडा लहान बाळासारखे आपल्या मूळ आकारात येते.
मानवाच्या विकासातील अनेक टप्प्यातून आजचा प्रगत माणूस जसा आकाराला येतो, तसेच काहीसे स्त्रियांच्या जीवनाचा प्रवास असावा. अहोरात्र कष्ट उपसणारी, सततची अंधारात राहिलेली, पुसट बोलताही येत नसावे, अशी अधोमुख मुखदुर्बळ स्त्रियांतून हातात पुस्तके घेऊन बाहेर पडलेल्या प्रगत, निर्भीड स्त्रियांच्या विकासाचा आलेख अन्वर हुसेनच्या मुखपृष्ठातून मला जाणवतो.आतील रेखाचित्रं प्रसंगांना तेवढीच समर्पक अशी आहेत.
परिघावरील कवी-लेखकांची नातेवाईकासारखी नेहमीच पाठराखण करणार्या रणधीर शिंदे यांच्याविषयी काय बोलावे! नेहमीच सोबतीने राहा. तुमची गरज आहे नवोदितांना.
सुनीता बोर्डे या लेखिकेची फिन्द्री ही कादंबरी शिक्षणाविषयी परत अनास्था निर्माण झालेल्या या धुसर कालखंडात निश्चित उद्बोधक ठरेल.
– आनंद विंगकर, मो. 9823155768
पुस्तकाचे नाव : फिन्द्री
लेखिका : प्रा. सुनीता बोर्डे – खडसे
मो. 7020880931
प्रकाशक : मनोविकास प्रकाशन, पुणे
फोन : 020-29806665
किंमत : 350/-