समीर गायकवाड -
एक काळ होता जेव्हा मी डॉ. नरेंद्र दाभोलकरांविषयी मनात अत्यंत घृणा आणि तिरस्कार बाळगून होतो. कदाचित, त्या काळात त्यांच्यासमोर जाण्याची एखादी संधी मिळाली असती तर माझ्या हातून एखादं अपकृत्य घडलं असतं. त्यांच्याविषयी इतकी चीड असायची की त्यांचं नाव जरी कुठे वाचनात ऐकण्यात आलं तरी संताप यायचा. असं वाटायचं की डॉक्टर जाणीवपूर्वक ही मोहीम राबवतायत, त्यांना हिंदूंना बदनाम करायचे आहे, त्यांचे हेतू वाईट आहेत वा ते कुणाचे तरी हस्तक आहेत; अशा एक ना अनेक पोकळ कल्पनांनी तेव्हा मनात ठाण मांडले होते.
तेव्हा मी अत्यंत कडवट उजव्या विचारांचा निव्वळ सनातनी होतो. सोलापूरमधून बाबरी मशीद पाडायला निघालेल्या लोकांच्या टीममध्ये माझं नाव होतं. उजव्या विचाराच्या विविध संघटनांच्या, पक्षांच्या कार्यक्रमांना हजेरी लावायचो. सोलापूर शहरात घडलेल्या दंगलींचा साक्षीदार आहे मी! आंदोलने, मोर्चे यात भाग घेतला होता.
दरम्यान, आयुष्यात काही घटना अशा घडल्या की अशांची संगत घटत गेली, ज्या विचारांचा दुस्वास करत होतो त्यांचं वाचन वाढत गेलं. कडवटतेमधला फोलपणा उमगत गेला. एक प्यादं म्हणून आपला वापर होत असतो याची प्रकर्षाने जाणीव झाली आणि मग स्वतंत्रपणे सगळ्याच गोष्टींवर विचार करू लागलो. कट्टरतेने कुठल्याच जातीधर्माचे भले झाले नाही या वास्तवाने खडबडून जागा झालो.
डॉक्टर दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवशी फार वाईट वाटलं. माझ्यासारखाच कुणीएक वाहवत गेलेला हत्यारा असणार या विचाराने हादरून गेलो. काही दिवसांनी गोविंद पानसरे अण्णांची हत्या झाली आणि त्या खून प्रकरणाचा आरोपी म्हणून समीर गायकवाड नावाच्या इसमाला अटक झाली. त्या वेळी अक्षरशः भेदरून गेलो होतो. माझ्या विचारांत बदल झाला नसता तर त्या समीर गायकवाडच्या जागी कदाचित मीच असलो असतो या कल्पनेने देखील कासावीस झालो.
कुठल्याही धर्मातील कट्टरता आणि कर्मठपणामुळे माणसाचा विवेक लोप पावू लागतो आणि त्याच्यातली मानवता हळूहळू संपुष्टात येऊ लागते, या विचारापाशी येऊन ठेपलोय.
आता मागे वळून पाहताना गतकाळातील चुकीच्या विचारधारेची, चुकीच्या गोष्टींना समर्थन दिल्याची टोचणी लागते. हे शल्यच अधिक नेटाने सद्सद्विवेक जागृत ठेवतेय हेही खरेच आहे.
एके काळी ज्यांचा आपण अनिवार तिरस्कार केला, त्यांच्याविषयी वाईट चिंतलं त्यांच्याबद्दल आता अतीव आदर आणि करुणा दाटून आहे. माझं हे प्रकटन वाचून तुम्ही मला स्वीकारलंत तर खूप आनंद वाटेल.
– समीर गायकवाड, सोलापूर