राहुल थोरात -
ज्योतिषी अशोक खरात यांच्या भांडाफोडीची खरी सुरुवात होते, शिर्डी पोलीस स्टेशन येथे फेब्रुवारी २०२६ मध्ये एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीच्या उलट तपासणीमुळे…
त्याचं झालं असं… शिर्डीच्या पोलीस स्टेशनमध्ये एका २८ वर्षीय तरुणीने एका विशिष्ट मोबाईल नंबरवरून तिचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठविण्यात आले असल्याचे तक्रार नोंदविली. या तक्रारीत त्या तरुणीने हे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल करण्याची धमकीही दिली गेली असल्याचे तक्रारीत नमूद केले होते. तसेच ही धमकी ती तरुणी शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या गेट नं. ४ वर असताना त्या तरुणाने दिली असल्याचेही तिने लिहिले होते. सध्याच्या वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली व ज्या मोबाईल नंबरवरून फोटो पाठविण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते, त्या मोबाईल नंबरचा शोध घेण्यास सुरुवात केली, पण तो मोबाईल नंबर तीन महिन्यांपूर्वीच बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मोबाईल नंबर तीन महिन्यांपूर्वीच बंद आहेत, तर त्या नंबरवरून फोटो कसे पाठविण्यात आले? पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मग त्यांनी सायबर विभागाकडे ते फोटो पाठवून ‘मॉर्फ’ केले आहेत का? याची शहानिशा केली असता ते फोटो मॉर्फ केले नसल्याचे समजले. मग पोलिसांनी त्या तरुणाने फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याचे त्या तरुणीने सांगितले होते. त्याची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी गेट नं. ४ वरील त्या दिवसाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ती तरुणी आणि तो तरुण दोघेही त्या दिवशीच्या गेट नं. ४ च्या दर्शन रांगेत नव्हतीच.
शिर्डी पोलिसांनी मोबाईलच्या नंबरवरून त्या तरुणाचा पत्ता शोधला. त्या तरुणाला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या नाशिकच्या घरी छापा टाकला. पण तो तरुण घरात सापडला नाही. तो फरार झाला होता. त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्यात पोलिसांना काहीच ‘आक्षेपार्ह’ सापडले नाही.
या प्रकरणामध्ये काहीतरी काळेबेरे आहे अशी दाट शंका चाणाक्ष बुद्धीच्या अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना आली. त्यांनी त्या तरुणीला अधिकच्या चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले. वाघचौरे साहेबांनी तिच्या तक्रारीतील मोबाईल तीन महिन्यांपासून बंद असल्याचे तसेच ते फोटो मॉर्फ केले नसल्याचे सांगितले आणि सांगितलेल्या दिवशी व वेळेत दर्शन रांगेत ती कुठेच दिसत नसल्याचे सांगितले. तिची तक्रार फेक असून अशी खोटी तक्रार करण्यामागचे कारण काय असे विचारले. सुरुवातीला त्या तरुणीने आढे वेढे घेतले, वाघचौरे साहेबांनी पण अधिक खोलवर प्रश्न विचारल्यावर तिने त्या फोटोत दिसत असलेल्या पुरुषाबरोबरचे आपले संबंध ‘स्वखुशी’चे असल्याबद्दल कबूल केले.
पोलिसांना महिला आयोगाची नोटीस
या तरुणीची चौकशी खरे तर महिला पोलिस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत व्हावयास हवी होती; पण ही केस हाय प्रोफाईल असल्याने सीसीटीव्ही लावलेल्या सोमनाथ वाघचौरे साहेबांच्या केबिनमध्ये ही चौकशी झाली होती. पण त्या तरुणीने महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या उपस्थितीत चौकशी झाली नाही आणि माझा विनयभंग झाला अशी खोटी तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली. अशी खोटी तक्रार एका वरिष्ठ पोलीस अधिकार्याच्या विरोधात त्या तरुणीने करण्यामागे तिला एका मोठ्या माणसाचे पाठबळ होते.
आपल्या राज्य महिला आयोगाने अनपेक्षित चपळाईने या तक्रारीची दखल घेतली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेबांना कारणे सांगा नोटीस पाठविली.

तो पेनड्राईव्ह पोलिसांकडे जमा
ही घटना घडत असताना त्या तरुणाने दोन अनोळखी व्यतींकडून अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेबांकडे एक महत्त्वाचा ‘पेनड्राईव्ह’ पोहोच केला. पोलिसांनी तो पेनड्राईव्ह बघितला, त्यात एक पुरुष अनेक बायकांबरोबर करत असलेल्या अश्लील चाळ्यांचे शेकडो व्हिडिओ होते. यात बायका जरी वेगवेगळ्या असल्या, तरी पुरुष मात्र एकच होता आणि हाच पुरुष त्या तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीतील मोबाईलमधील छायाचित्रांमध्ये होता. तो पुरुष होता – प्रशासकीय अधिकारी, भले भले राजकारणी आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचा वरदहस्त लाभलेला, भोंदू बाबा ज्योतिषी ‘अशोक खरात.’
याच भोंदू अशोक खरातने त्या तरुणीला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे साहेबांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यास सांगितले होते. आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार महिला आयोगाने तत्परतेने पोलीस अधिकारी वाघचौरे साहेबांना रात्री दहा वाजता नोटीस बजावली होती.
शिर्डी पोलीस स्टेशनला त्या तरुणीने आपले फोटो मॉर्फ करत असल्याची तक्रार दाखल करण्यापूर्वी दोन-तीन महिने याच ज्योतिषी अशोक खरातने नाशिक जिल्ह्यातील वावी ग्रामीण पोलीस स्टेशनला आपल्याच कार्यालयात काम करणार्या ऑफिस बॉयविरोधात आपले अश्लील फोटो माझ्याकडे असून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार दाखल केली होती. अशी तक्रार पोलिसांनी दाखल करून घेतली असल्याचे कळल्यावर तो ऑफिसबॉय फरार झाला होता. तो ऑफिसबॉय फसविलेल्या अनेक बायकांशी त्यांनी अशोक खरात विरोधात तक्रार करावी म्हणून संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. त्या अनुषंगाने तो ऑफिसबॉय त्या तरुणीला भेटला होता आणि तिला अशोक खरात विरोधात तक्रार करण्यासाठी विनंती करत होता, पण तरुणी अशोक खरातच्या बुवाबाजीत इतकी गुरफटून गेली होती की, तिने त्या ऑफिसबॉयच्याच विरोधात शिर्डी पोलीस स्टेशनला खोटी तक्रार दाखल केली.
ज्योतिषी अशोक खरातच्याच ऑफिसमध्ये काम करणारा हा ‘ऑफिसबॉय’ अशोक खरातच्या विरोधात इतकी जीवघेणी जोखीम का पत्करत होता, त्याची ही थरारक सत्यकथा…
तो ‘ऑफिसबॉय’ खरात बाबाच्या विरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे २१ मार्च २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीत म्हणतो की…
मार्च २०१९ मध्ये मी एका वर्तमानपत्रात ‘ऑफिस कामासाठी मुलगा पाहिजे’ अशी जाहिरात वाचली आणि खरात बाबांच्या ज्योतिष कार्यालयात गेलो. तेथे माझी मुलाखत घेऊन मला दरमहा आठ हजार रुपये पगारावर कामास येण्यास सांगितले. या ज्योतिष कार्यालयामध्ये मला असे समजले की, कॅप्टन अशोक खरात हे मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होते. ते अनेक देशांत फिरले असून त्यांनी अंकशास्त्र, तंत्र-मंत्र आणि भविष्य सांगण्याच्या विद्या अवगत केल्या आहेत. ते लोकांचे अचूक भविष्य सांगतात. अंकशास्त्र आणि तंत्र-मंत्राचा वापर करून आणि तोडगे देऊन लोकांच्या अडीअडचणी सोडवतात.
अशोक खरात यांच्या ज्योतिष कार्यालयात माझी नोकरी सुरू झाल्यानंतर मला सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ड्यूटी असायची. या ड्यूटीमध्ये ऑफिसची साफसफाई करणे, येणारे फोन घेणे, फोनवर अपॉइंटमेंट मागणार्या भक्ताला अशोक खरात यांच्या परवानगीने अपॉईंटमेंट देणे, ऑफिसमध्ये आलेल्या भक्तांच्या बोटांचे अंगठीचे माप व राशी खड्याची किंमत अशोक खरात यांच्या सांगण्यानुसार पेपरवर लिहून देणे. ती चिठ्ठी व अशोक खरात यांनी दिलेला राशीचा खडा असे घेऊन संध्याकाळी एका सोनाराकडे नेऊन देणे, अशी कामे मला करावी लागत.
अशोक खरात यांच्याकडे भविष्य बघण्यासाठी त्यांच्या ‘वोकस प्रॉपर्टी’ या कार्यालयामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्ती येत असत. भविष्य बघण्यास आलेले लोक अशोक खरात या बाबांना दैवी शती प्राप्त असून त्यांच्यामुळे आमच्या अडचणी दूर होत असल्याबाबत ऑफिसमध्ये एकमेकांशी चर्चा करत. तेथे येणारे मोठे लोक बघून माझा देखील अशोक खरात याबाबत विश्वास बसला.
अशोक खरात यांच्या ऑफिसमध्ये काही जोडपीही येत. जोडपी केबिनमध्ये गेल्यानंतर काही वेळाने जोडप्यातील पुरुष व्यतीस बाहेर पाठवले जाई. त्यानंतर खरात हे आतमध्ये असलेल्या महिलांसाठी काहीतरी प्रार्थना करून विधी करत.

माझी पत्नी गरोदर असल्यामुळे ऑफिसमधून संध्याकाळी पाच वाजता घरी जाण्याची विनंती मी अशोक खरात यांच्याकडे केली असता त्यांनी त्यास परवानगी दिली. माझी पत्नी सात महिन्यांची गरोदर असताना तिच्यासाठी आपण एक धार्मिक विधी करू, पत्नीला ऑफिसमध्ये घेऊन ये, असे अशोक खरात बाबांनी मला सांगितले. त्यानुसार मी पत्नीला ऑफिसला बोलावले असता खरात बाबांनी माझ्या पत्नीस त्यांच्या केबिनमध्ये बोलावले. दोघांच्या जन्मतारखा विचारल्या. आम्ही दोघांनीही बाबांना आमच्या जन्मतारखा सांगितल्या. त्यानंतर अशोक खरात यांनी माझे पत्नीला विचारले की, ‘तुला मुलगा हवा की मुलगी?’ तेव्हा माझ्या पत्नीने बाबांना सांगितले की, ‘मुलगा व मुलगी दोन्हीपैकी कोणीही झालेले चालेल, फक्त सर्व सुरळीत व्हायला हवे.’ तेव्हा अशोक खरात यांनी मला सांगितले की, तुझ्या पत्नीसाठी मला प्रार्थना करून विधी करावा लागेल, असे सांगून बाबांनी मला केबिन बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळाने माझी पत्नी बाबांच्या केबिनमधून रडका चेहरा करून बाहेर आली. त्या वेळेस मला काहीही समजले नाही. मी घरी गेल्यानंतर माझी पत्नी मला रागाने रडून बोलली की, “तुमचे अशोक बाबा हे स्त्रीलंपट असून भोंदू आहेत. अशोक या बाबांनी त्यांच्या केबिनमध्ये तुम्हाला बाहेर पाठवल्यावर केबिनमधील लाईट बंद करून मला जवळ बोलावून घेऊन, माझे डोक्यावर त्यांचा हात ठेवला व मला डोळे बंद करायला सांगितले. मी डोळे बंद केल्यावर बाबांनी काहीतरी मंत्र बोलू लागल्याचे ढोंग करून मला अचानक मिठी मारली. बाबांनी मला मिठी मारून त्यांचा डावा हात माझे छातीवरून व पोटावरून फिरवत मी तुझे बाळ तपासत आहे असे बोलले आणि माझी साडी वर करायला सांगितली. त्यानंतर मी त्यांच्यापासून दूर झाले व रडू लागले तेव्हा अशोक खरात यांनी मला सांगितले की, ‘आता तू जा व नंतर पुन्हा ये. मी तुझी नंतर पूजा करेन.’ अशी सर्व हकिकत माझ्या पत्नीने मला सांगितल्यावर माझा माझे पत्नीवर विश्वास बसत नव्हता. अशोक खरात यांच्याकडे अनेक मोठे लोक, अनेक महिला येत असतात. ते लोकांच्या अडीअडचणींवरती तोडगे देतात. लोकांचे भविष्य सांगतात. अशोक बाबा असे करूच शकणार नाहीत, असे मी माझ्या पत्नीस बोलू लागलो. पण माझ्या पत्नीने पोटातील आमच्या बाळाची शपथ घेऊन सांगितल्यावर माझा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्यानंतर माझी पत्नी ही एक महिना डिप्रेशनमध्ये गेली होती. माझे पत्नीबरोबर बाबांनी केलेल्या वाईट कृत्यामुळे माझ्या मनात बाबाविषयीची चीड निर्माण झाली व मी बाबांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी बाबांच्या केबिनमध्ये छुपा व्हिडिओ कॅमेरा माझ्या मित्राच्या मदतीने लावला.
अशोक खरात बाबांकडे अनेक महिला जोडपी येत असत. कार्यालयातून अशोक बाबा घरी गेल्यानंतर मी गुपचुप ते रेकॉर्डिंग पहात असे. त्यामध्ये अशोक खरात बाबा हे व्हिडिओमधील महिलांना काहीतरी खायला देत असल्याचे व पाणी पिण्यास देत असल्याचे दिसते. त्यानंतर त्या महिलेला डोक्यावर ग्लास धरण्यास सांगून पाठीमागून ते त्या महिलेला मिठी मारत असल्याचे दिसते. काही महिलांशी ते लैंगिक संबंध ठेवताना व्हिडिओमध्ये दिसत असे.
अशा प्रकारे अनेक व्हिडिओमध्ये दिसणार्या मुली या अशोक खरात या बाबाच्या मुलीच्या वयाच्या असूनही बाबा त्यांच्यासोबत असे हे अनैतिक कृत्य करीत होते. यावरून त्या महिलांना अशोक खरात बाबा काहीतरी गुंगीकारक पदार्थ खाण्यास व पाणी पिण्यास देऊन त्यांना मोहित करून त्यांच्यावर अनैतिक अत्याचार करीत असल्याचे मला त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमधून समजून आले. माझ्या पत्नीवर खरात बाबांनी खरोखरच अत्याचार केले असतील याची मला खात्री हे व्हिडिओ पाहून मला पटली.

अशोक खरात बाबांना एके दिवशी माझ्याकडे त्यांच्या अनैतिक कृत्यांचे व्हिडिओचा पेनड्राईव्ह आहे असे कुठून तरी समजले. तेव्हा त्यांनी मला केबिनमध्ये बोलावून धमकी दिली की, ‘ते व्हिडिओ, तो पेन ड्राईव्ह मला दे. नाहीतर तुला, तुझ्या पत्नीला आणि तुझ्या लहान मुलांना जीवे ठार मारेन.’ तेव्हा मी बाबांना माझ्याकडे कुठलेही व्हिडिओ नाहीत, असे सांगून तेथून पळ काढला. त्यानंतर अशोक बाबांनी मला मोठ्या प्रमाणात त्रास देण्यास सुरुवात केली. अशोक बाबाने माझ्या विरोधात खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला. तसेच अनेक महिलांना माझ्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यास प्रवृत्त केले.
अशोक खरात उर्फ कॅप्टन यांचे मोठमोठ्या लोकांसोबत संबंध असल्याने व त्यांचे प्रस्थ फार मोठे असल्याने तसेच बाबांनी मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मी प्रचंड घाबरलो. अशोक बाबापासून माझे व माझ्या कुटुंबास धोका असल्याने माझ्या पत्नीवर बाबांनी केलेल्या अत्याचारांची तक्रार मी पोलिसात तेव्हा देऊ शकलो नाही. पण आता मला अशोक खरात बाबांना अटक झाल्याचे समजलेनंतर मी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला उपस्थित राहून माझ्या पत्नीचा शीलभंग अशोक खरात यांनी केला म्हणून वरील तक्रार देत आहे.

भोंदू ज्योतिषी अशोक खरात यांच्या दुष्कृत्याचा पेन ड्राईव्ह हाती पडल्यानंतर हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आणि गंभीर असल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेबांनी हे प्रकरण गृह विभागाकडे सल्ल्यासाठी पाठवले. खरात बाबाच्या दुष्कृत्याचा तो पेन ड्राईव्ह घेऊन ते मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्यांना या प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. महिलांच्या अत्याचाराचा हा गंभीर मामला असल्याने यावर गृह विभागाने तातडीने हालचाली करून कठोर कारवाई करण्याचे आदेश नाशिक पोलिसांना दिले. कारवाई करण्याअगोदर गृह विभागाने पोलीस अधिकार्यांना या व्हिडिओमधील एका तरी महिलेस तक्रार नोंदवण्यासाठी तयार करा असे सांगितले. त्यासाठी या ५०-६० व्हिडिओमधून काही महिलांना पोलिसांनी शोधून काढले. त्या सात-आठ महिलांना वाघचौरे साहेबांकडे समुपदेशनासाठी पाठवले. वाघचौरे साहेबांनी त्या महिलांना सांगितले की, तुम्ही खंबीरपणे आणि निर्भीडपणे अशोक खरात यांच्या विरोधात तक्रार दाखल करा. पोलीस तुमच्या संरक्षणाची आणि गोपनीयतेची काळजी घेतील. तुम्ही जर तक्रार केली तर पुढील अनेक महिला भगिनींच्या इज्जती वाचतील. पण या आठही महिला तक्रार दाखल करण्यास तयार झाल्या नाहीत. यावरही निराश न होता पोलिसांनी पुन्हा एकदा नव्याने तक्रारदार महिलांचा शोध सुरू ठेवला. त्यात एक तक्रारदार महिला तयार झाल्यानंतर खरात बाबा विरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा १७ एप्रिल रोजी सरकारवाडा पोलीस स्टेशनला नोंद झाला. त्या रात्रीच नाशिक पोलिसांनी खरात बाबाला त्याच्या बंगल्यातून नाट्यमयरित्या उचलले. त्यानंतर अजून दोन केसेस खरात बाबावर दाखल झाल्या आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार कायदा विभागाचे आय.जी. मनोजकुमार शर्मा यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ‘विशेष तपास पथक’ (एसआयटी) नेमले. त्याच्या प्रमुख म्हणून डॅशिंग आयपीएस पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक केली. त्यानंतरचा इतिहास आपण वर्तमानपत्रे आणि टीव्ही चॅनेल्सवर पाहिला असेल.
चमत्कार खरात बाबाचे?
चमत्कारांशिवाय नमस्कार नाही. बुवा म्हटले की चमत्कार आलेच. अशोक खरातही त्याला अपवाद नव्हता. त्याला कोणी कॅप्टन म्हणे तर कोणी साहेब!
कॅप्टनबाबांना भेटायचे तर प्रथम नंबर लावायला लागायचा. नंबर यायला दोन महिने लागायचे. नंबर येईपर्यंत भक्ताची माहिती कॅप्टनबाबांच्या टेबलवर आलेली असे. अशा कामासाठी टीम तत्पर असे.
ऑफिस छोटेसेच, समोरासमोर दोन खुर्च्या! मध्ये टेबल! बाजूला वनवे काच! बाहेर वेटिंग रूममध्ये कोणते भक्त बसलेत, ते काय करत आहेत, हे आतून दिसे. त्याच वेळी बाहेर बसलेल्या नवर्याला आत सुरू असलेली बायकोची पूजा आणि ‘भरात आलेले खरात’ पाहता येत नसत. त्याला दिसे काळोख आणि स्वत:चे प्रतिबिंब.
खरात साहेबांसमोर भक्त महिला बसली की, चौकशीला सुरुवात होई. जन्मतारीख विचारली जाई. त्यावरून लगेच वार ऐकून भक्त गार होत. साहेबांची पॉवर किती मोठी आहे, हे समजे. टीमने मिळवलेली माहिती सांगितल्यावर हळूहळू दैवीशक्तीचा प्रत्यय येई.
मग सुरू होई हात पाहणे. बाबा पती-पत्नीमध्ये संशयाचे वातावरण निर्माण होईल, असे प्रश्न विचारत असे. नवर्याशी चर्चा सुरू असेल तर, ‘बायकोला झालेले मूल तुमचे नाही!’ इथपर्यंत संशय वाढवला जाई. बहुतेक ज्योतिषाप्रमाणे थापा मारून समोरच्याला आपल्या कह्यात घेण्यात कॅप्टन तरबेज आहे.
बाईला भविष्यात ‘सहा महिन्यात मुलगा किंवा आठ महिन्यांत नवरा मरण्याची भीती घातली जाई.’ त्यावर उपाय-तोडगाही होता. ‘पूजा! अघोरी पूजा!!’ कॅप्टनवरील पॉवर ट्रान्सफर करणारी ‘योनी पूजा.’ टेबलाच्या दुसर्या बाजूला हा पूजा विधी सुरू होई. त्यासाठी पूरक म्हणून गुंगी आणणारा पदार्थ प्रसादामधून किंवा तीर्थामधून दिला जाई.
आपल्या सांगण्यावर विश्वास बसावा म्हणून, खरात अजून काही चमत्कारांचा वापर करत असे.

अभिषेक पात्राचा कौल –
ईशान्येश्वर महादेवाच्या पिंडीभोवती भक्त गोलाकार बसत. अंधूक प्रकाश, उदबत्तीचा धूर, धुपाचा वास, “आपल्याला उजवा कौल मिळेल का?” याची भीतियुक्त हुरहुर! अशा परिस्थितीत खरातांचे गंभीर मंत्रोच्चार थांबून प्रश्न विचारला जाई, “या वर्षी मुलगा होईल का?”
उत्तर – नाही.
पुढचा प्रश्न “दोन वर्षांत मुलगा होईल का?” उत्तर नाहीच!
पुन्हा प्रश्न – “तीन वर्षांत मूल होईल का?” आणि अंधूक प्रकाशात पिंडीवर टांगलेला अभिषेकाचा गडू हालू लागे. उभा आडवा हलताना तो प्रश्नकर्त्या भक्ताची दिशा दाखवे! “तीन वर्षांत कूस उजवणार! पूजा करा,” असा आदेश आनंदाने स्वीकारून, भक्त पूजेचा खर्च त्यापेक्षाही जास्त आनंदाने सुपूर्द करत असे.
नाग दर्शन-

कधी काठोकाठ ओंजळ भरून तांदूळ धरून भक्त अवघडून बसलेला असे. तांदळाचा एकही दाणा खाली पडू द्यायचा नाही, अशी सक्त ताकीद असल्यामुळे त्याचे सर्व लक्ष ओंजळीवर केंद्रित झालेले असे. अंधूक प्रकाश आणि धुराचे वातावरण तसेच! आणि अचानक वीस फूट लांबीचा नाग डोलत, नागमोडी चालीने हळूहळू पुढे येई! प्रश्न विचारला की, फुत्कार सोडत असे.
हा चमत्कार करण्यासाठी रिमोटवर चालणारा नाग, मोबाईलमधून फुत्काराचा ध्वनी आणि बोटाने ओढण्यासाठी गडूला बांधलेला काळा दोरा एवढ्या भांडवलाची गरज आहे. एका वेळच्या पूजेची फी पाच लाख असे. घाबरून हात थरथरला आणि तांदूळ सांडले तर पूजा वाया जाई! मग पुन्हा वेळ घेऊन नव्या दक्षिणेसह पूजा केली जाई.
वरिष्ठांचा अचानक फोन-
एखाद्याचे काम शासकीय अधिकार्यापुढे असे. तो भक्त आपली समस्या मांडेपर्यंत खरातच्या फोनवर त्या शासकीय ऑफिसमधून प्रमुख अधिकारी फोन करत असे,
“हॅलो! शिक्षणमंत्री साहेब, आपले काम झाले बरं!”
“काय म्हणताय? प्रचिती आली. अहो, सगळी ईशान्येश्वराची कृपा! ठीक आहे, ठीक आहे.”
मग भक्तांना म्हणत-
“तुमची वेळ चांगली आहे; त्याच साहेबांचा फोन आहे!”
प्रत्यक्षात साहेब, मंत्री-संत्री, अधिकारी म्हणजे बाहेर असलेले टीममधील साथीदार!
अकरा देशांची माती-
एकदा अघोरी पूजेसाठी ‘अकरा देशातली माती हवी आहे’, म्हटल्यावर कॅप्टनला अकरा देशांची सहल एका श्रीमंत बिल्डर भक्ताने घडवली आहे.
वास्तुशास्त्रानुसार ‘प्लॉट तुम्हाला शुभ नाही’ म्हणत कॅप्टनने भक्तांचे प्लॉट खरेदी केले आहेत.
“आपण ओशियनालॉजीचा तज्ज्ञ” आहोत, म्हणत त्यांनी खास ओशोजल विकले. त्यामध्ये व्हायग्राचा अंश सापडला म्हणे. नऊ लाखाच्या दैवी-औषधी मधामध्येही व्हायग्रा मिळाले आहे, असे म्हणतात.
ज्योतिषी अशोक खरात यांनी जादूई खडे आणि जादूई चिंचोके विकून लाखो रुपयांची कमाई केली. ओशोजलच्या नावाखाली स्वत:चे मूत्र भक्तांना प्यायला लावले. हे ‘खरातामृत’ खास भक्तांनाच मिळे. अर्थात, पवित्र किंवा औषधी म्हणून गायीचे मूत्र पिणार्या आणि शेण खाणार्यांना यात फारसे वावगे वाटले नसावे. ओशोजल नेण्यासाठी खास गाड्या पाठवल्या जात. एक भक्त तर हेलिकॉप्टर पाठवत असे, असे ऐकायला मिळते. व्हायग्राचा परिणाम भल्याभल्यांना आकर्षित करत होता. या सर्वांवर ताण करणारी पूजा म्हणजे स्त्रीच्या शरीरात पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी लिंगपूजा आणि योनी पूजेचा सल्ला दिला जाई आणि तो अमलातही आणला जाई.
चमत्कार खरे असतात काय?
चमत्काराबद्दल डॉ. अब्राहम कोवूर म्हणतात, “चमत्कार करणारा भोंदू असतो, त्यावर विश्वास ठेवणारा मूर्ख असतो आणि चमत्काराची चिकित्सा न करणारा भ्याड असतो.”
संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगातून चमत्कार करणार्या बुवांवर कोरडे ओढले आहेत.
एवढे चमत्कार करण्याची क्षमता कॅप्टनकडे कशी आली? त्यांनीच त्याचे गुपित सांगितले आहे. “दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए|” असे झुकानेवाले प्रत्येक गावात आहेत. आता भक्तांनीच शहाणे झाले पाहिजे.
खरातवर लैंगिक अत्याचाराची पहिली केस-
पतीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आलेल्या महिलेला दैवी शक्तीचा खोटा दावा करत ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी पतीच्या निधनाची भीती घालून २ वर्षे अत्याचार करणार्या ‘कॅप्टन’ अशोक खरातला नाशिक गुन्हे शाखा १ च्या पथकाने मंगळवार दि. १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता कर्मयोगीनगरमधील बंगल्यातून अटक केली. सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
बड्या नेत्यांसह सेलिब्रिटींचे भविष्य सांगणार्या कॅप्टनच्या पेन ड्राईव्हमध्ये ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ मिळून आल्याच्या चर्चेने राज्यभरात खळबळ उडाली. पीडितेच्या फिर्यादीनुसार खरातने नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टीजच्या ऑफिसमध्ये तिला जाळ्यात ओढले. स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचे भासवून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर, मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधीच्या बहाण्याने तिला गुंगीकारक पदार्थ देऊन संमोहित केले. नंतर ‘तुझे आयुष्य बरबाद करेन,’ ‘तुझ्या पतीचा मृत्यू होईल’ अशी भीती घालून वारंवार बलात्कार केला. आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार रात्री ११.३० वाजता खरातला ताब्यात घेण्यात आले.
अशोक खरातवर बीएनएस कलम ६४ (१), ७४, ३५१, ३५२ (१) नुसार अत्याचार, मानहानी, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. सोबत जादूटोणाविरोधी कायद्याचे कलमही लावले गेले.
‘ती’ फिर्याद भीतीपोटी!
शिर्डी पोलिसांत दाखल फिर्याद बनावट; फिर्यादीने स्पष्ट केली भूमिका
२८ वर्षीय पीडितेने १३ मार्चला शिर्डी पोलिसांत खरातच्या कार्यालयातील एका कर्मचार्याविरुद्ध मॉर्फ व्हिडीओप्रकरणी दाखल केलेली फिर्याद भीतीपोटी नोंद केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘त्या’ कर्मचार्याने खरात व पीडितेचा व्हिडीओ पाठवून खरातचे बिंग फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, खरातने हा व्हिडीओ ‘एआय’ आधारित असल्याचा दावा करून पीडितेचा गैरवापर केला. गंभीर बाब म्हणजे, स्वतःचे पाप लपविण्यासाठी कर्मचार्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास सांगितले होते. खरातच्या कुकर्मांचे पाढे वाढत असताना पीडितेने पुन्हा कुटुंबीयांना विश्वासात घेत माहिती दिली. नाशिक शहर पोलिसांत पीडिता पोहोचल्यानंतर प्रकरणाची शहानिशा करून आता खरातविरुद्ध अत्याचाराचा सातवा गुन्हा नोंदवला.
शिर्डी येथील ही पीडिता कुटुंबासह सन २०२१ मध्ये सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिरात गेली होती. तिथे खरातबद्दल तिला माहिती मिळाली. फेब्रुवारी २०२१ मध्ये पीडितेसह तिच्या पालकांची खरातची कार्यालयात भेट झाली. जुलै २०२४ मध्ये शैक्षणिक सल्ल्यासाठी गेलेल्या पीडितेला खरातने मंतरलेले पाणी प्यायला दिले. गुंगीच्या नशेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
सोशल मीडियातून होणार्या अंधश्रद्धा प्रसाराला अटकाव :
सोशल मीडियातून बाबा-बुवा, ज्योतिषी, मंत्र-तंत्र यांच्या रील्सचा लोकांवर अक्षरशः भडिमार होत आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या या संदर्भातील निर्णयाला अनुसरून शासनाने अंधश्रद्धा पसरवणार्या जाहिरातींचे नियमन करणारी स्वतंत्र यंत्रणा तातडीने तयार करायला हवी, अशी मागणी या प्रेसनोटमध्ये करण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने या सर्व मागण्यांची मांडणी करणारे पत्र मा. मुख्यमंत्र्यांना देखील पाठवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, नीता सामंत, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, फारुख गवंडी यांच्या वतीने देण्यात आली.
***
राजकारणाचा प्रभाव
समाजातल्या सर्व घटकांवर राजकारणाचा प्रभाव असतो. त्यात सर्वांत जास्त प्रभाव बुवाबाजीचा दिसून येतो. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अस्थिरता, अशावेळी जगण्याचा संघर्ष तीव्र होतो आणि समाजाला आधाराची गरज वाटते तेव्हा बुवा काल्पनिक आधार देतात.
आज समोर दिसणारे राजकारणी म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक, असे लोकप्रतिनिधी. पदरचं खाऊन समाजसेवा करणारे कम्युनिस्ट किंवा समाजवादी राजकारणी म्हणून कुणाच्या खिजगणतीत नाहीत. समाजाची सेवा करणार्यांऐवजी मेवा खाणार्यांनाच आज राजकारणी म्हणून मान्यता आहे. त्यांच्यासमोर आपले पद आणि संपत्ती टिकवण्याची काळजी आणि अधिक सत्ता, संपत्ती मिळवण्याचा लोभ त्यांना बुवाकडे घेऊन येतो.
काही राजकारणी बुवाच्या भक्तांकडे वोट बँक म्हणून पाहतात आणि बुवाला प्रोत्साहन देतात, संरक्षण देतात.
खरातच्या बाबतीत वरील तिन्ही गोष्टी सत्य आहेत. त्यांना मदत करणार्या, तसेच अडकलेल्या राजकीय पुढार्यांची नावे टीव्हीवर महिनाभर ऐकायला मिळत आहेत.
कॅप्टन खरातच्या बाबतीत चौथ्या राजकारणाचा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. अडचणीचे ठरणार्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी खरात प्रकरण वापरले जात आहे. लोकांना एखाद्या विषयात गुंतवून ठेवण्यासाठीही या प्रकरणाचा वापर केला जात आहे.

तुजवीण ईशान्येश्वरा मज कोण तारी| – खरात बाबा
नाशिकचा कुप्रसिद्ध खरात बाबा प्रकरणाचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट करण्यासाठी मी आणि अहिल्यानगरचे अंनिसचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप आलो आहोत…
भोंदू खरात बाबा जेथे नाना भानगडी करायचा त्या मीरगावच्या ईशान्यश्वेर मंदिरात…
आम्ही उभे आहोत ईशान्येश्वर मंदिराच्या गाभार्याच्या प्रवेशद्वारावर. त्याच्यावर खरातने लिहिलेले आहे.. “तुजवीण ईशान्येश्वरा मज कोण तारी?” अशी म्हणण्याची गत स्वतः खरातवरच आता आलेली आहे.
ईशान्येश्वराचे महात्म्य?
ईशान्येश्वर-या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने भगवान शंकराशी (महादेव) जोडलेला आहे. हा शब्द ‘ईशान्य’ आणि ‘ईश्वर’ या दोन शब्दांच्या संधीतून तयार झाला आहे. याबद्दलची अधिक माहिती अशी की, ईशान्य ही उत्तर आणि पूर्व या दोन दिशांच्या मधली दिशा आहे. वास्तुशास्त्र आणि अध्यात्मात ही दिशा अत्यंत पवित्र मानली जाते म्हणे. ईश्वर याचा अर्थ स्वामी किंवा देव असा होतो. ईशान्य दिशेचा स्वामी किंवा त्या दिशेला स्थित असलेला देव म्हणजेच ‘ईशान्येश्वर.’ हिंदू धर्मात आठ दिशांना आठ रक्षक (दिक्पाल) असतात. ईशान्य दिशेचे अधिपती स्वतः भगवान शिव आहेत, म्हणून त्यांना ‘ईशान्य’ असेही म्हटले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य कोपरा हा ‘देव कोपरा’ मानला जातो. या ठिकाणी सात्विक ऊर्जा सर्वाधिक असते, म्हणून या कोपर्याला ईशान्येश्वराचे स्थान मानून तिथे पूजाघर किंवा ध्यानाची जागा बनवली जाते.
भारतात अनेक ठिकाणी ‘ईशान्येश्वर’ नावाची शिवमंदिरे आहेत. असे धार्मिक महात्म्य ईशान्येश्वराचे असल्यामुळे भोंदू अशोक खरात यांनी ईशान्येश्वर मंदिर आपल्या खर्चातून मीरगावी बनवले. त्यासाठी त्याने करोडो रुपये खर्च केलेला दिसतो. मंदिरास संपूर्ण दगडी बांधकाम केले आहे. मंदिराचा गाभारा ६० फूट उंच आणि ४० फूट रुंद आहे. सध्या मंदिराची रया गेली आहे बाहेरचा सभागृह धुळीने माखला आहे. मंदिरात कोणीही भाविक आता येत नाहीत.
कॅप्टन अशोक खरात बाबाने या प्रयोगातून ईशान्य दिशेसंबंधी कल्पना या अंधश्रद्धा आहेत, हे सिद्ध केले. त्यांनी अनेक ठिकाणी फिरून ईशान्य वाहिनी नदीचा काठ ईशान्येश्वराच्या मंदिरासाठी मिळवला. वास्तुशास्त्राप्रमाणे देवालय स्थापन केले. सर्व पूजा शास्त्रानुसार केल्या. आता त्याच्या अटकेने या प्रयोगाची सांगता झाली. थोडीशी बुद्धी असणार्या भक्ताने ‘ईशान्य दिशा’ आणि ‘ईश’ यांचा काही संबंध नाही. एवढा निष्कर्ष काढायला हरकत नाही. व्यक्तीची ‘प्रगती’ त्याच्या ‘कर्तृत्वावर’ अवलंबून आहे. घराचे दार किंवा संडासची दिशा यावर अवलंबून नाही.

जेथे मुख्यमंत्र्यापासून वरिष्ठ अधिकार्यांनी पूजा घातल्या त्या गाभार्यातील पिंडीजवळ आम्ही जाऊन बसलो. चमत्काराने पिंडीवरील अभिषेकपात्र कसे हलेल याचा अंदाज आम्ही बांधला. अघोरी पूजेसाठी अनामिका कापलेल्या ठिकाणी भेट दिली तसेच चमत्काराने नागदर्शन ज्या जागी दिले जात असे ती जागाही पाहून घेतली.
तेथे उपस्थित असणार्या एक दोन गावकर्यांशी आम्ही संवाद साधला असता त्यावेळी गावकर्यांनी सांगितले की, अशोक खरात यांच्यामुळे मिरगावाची बदनामी झाली आहे. या भोंदूबाबाला कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खरातच्या कृष्णकृत्याविरोधी संताप व्यक्त करतानाच ग्रामस्थांनी खरातवर अतिक्रमणासह गावचा निधी पळविल्याचाही आरोप केला आहे. या ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सिन्नर तालुक्यातील मूळ कहांडळवाडी येथील रहिवासी असलेल्या खरात याने २००८-०९ च्या सुमारास मिरगाव येथे जामनदीच्या काठावर जमीन विकत घेऊन ईशान्येश्वर मंदिर उभारले होते. या मंदिराच्या परिसरात त्याने सुमारे ४० ते ५० एकर जमीन विकत घेतल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. मिरगाव शिवारात मंदिराच्या पाठीमागे खरात याने गेल्यावर्षीच नव्या आलिशान बंगल्याची उभारणी केली आहे. या दगडी चिरेबंदी बंगल्याची किंमतही कोट्यवधी रुपयांच्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खरातमुळे गावाची प्रतिमा मलिन झाल्याचे सांगत येत्या काही दिवसांत ग्रामसभा घेऊन त्याचा निषेध नोंदविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ईशान्येश्वर मंदिराचा ताबा ग्रामस्थांकडे देण्याची मागणी करण्यात येत आहे.
खरात याने शासकीय योजनांचा लाभ शिवनिका संस्थानच्या नावाखाली घेतल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. हिंगे वस्तीसाठी असलेली पाण्याची टाकी मंदिराजवळ बांधल्यामुळे नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मिरगावात कोणीही जमीन विक्रीस काढली तर ती जमीन वाढीव दराने खरात स्वतःच खरेदी करत आणि जमीन खरेदीसाठी काही गावकर्यावर दबाव टाकल्याचाही आरोप खरातवर ग्रामस्थांनी केला आहे.
मंदिराच्या उत्तर बाजूस असलेल्या शेतकर्यांचा रस्ता तारेचे कुंपण घालून बंद केल्यामुळे काही शेतकर्यांना रस्त्याअभावी शेती पडीक ठेवावी लागत असल्याचे ग्रामस्थ म्हणतात. मंदिर जामनदीच्या पात्रात बांधल्यानंतर खरात याने आपले पाय आणखी पसरल्याचे ग्रामस्थ सांगतात. नदीपात्रात दोन मजली इमारत व मोठे कंपाऊंड हे अतिक्रमण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
अशाप्रकारे खरातचे गाववाले आता त्याच्या विरोधात गेले आहेत.
असहाय्य महिलांचे शोषण
असहाय्य, असुरक्षित महिलांना दैवी शक्ती ची भीती दाखवून आणि त्यांच्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांचे लैंगिक शोषण करणार्या अशोक खरात याला खरे तर आसाराम किंवा रामरहीम यांचा महाराष्ट्रातील उत्तराधिकारी म्हणूनच गौरवले पाहिजे. महिलांवरील अत्याचार, काहीशे कोटी रुपयांची माया, हडपलेल्या जमिनी आणि – बड्या धेंडांकडून मिळवलेले गुरुस्थान, असे नवनवे कारनामे समोर आल्याने ‘पुरोगामी’ म्हणून स्वतःलाच गौरवणार्या महाराष्ट्राची मान क्रमाक्रमाने खाली जात आहे. या खरात बाबासोबतचे सर्वच पक्षांतील नेते-सरकारी अधिकार्यांची छायाचित्रे-व्हिडिओ पाहता हे प्रकरण आणखी कोणाकोणावर शेकणार, हा प्रश्न पडतो. त्याच्या गैरकृत्यांचे शंभर व्हिडिओ कर्नाटकातील प्रज्वल रेवण्णा प्रकरणाची आठवण करून देतात; तर महिलांचे लैंगिक शोषण थेट एपस्टीन फाईल्स प्रकरणाला साजेसे आहे.
राजकीय नेते आणि भोंदू बाबा-बुवा यांची अभद्र युती अन् त्यातून स्त्रियांचे शोषण हा ‘खरात पॅटर्न’च महाराष्ट्रात बनला आहे. राजकीय नेत्यांनी अशा नराधमाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, त्याबद्दल त्यांना किंवा बाबाच्या कच्छपी लागलेल्या सर्व नेत्यांना होणारी कोणतीही शिक्षाच कमीच होईल. ज्योतिष कार्यालयातील ऑफिसबॉय मार्फत हे प्रकरण उघडकीस आले नसते, तर आणखी किती काळ हे प्रकार सुरू राहिले असते, आणखी किती महिला त्यास बळी पडल्या असत्या आणि आणखी किती बडी धेंडे ‘आम्हाला माहितीच नव्हते,’ असे सांगून अशा बाबा-बुवांची पत समाजात वाढवत राहिली असती, याची कल्पनाच केलेली बरी.
सध्या देशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत अशा बाबा-बुवांचे पेव फुटले आहे. संतांची आणि सुधारकांची भूमी असणार्या महाराष्ट्रात त्याची लागण अनर्थाला निमंत्रण ठरेल. नागरिक बाबा-बुवांकडे गर्दी करतात, म्हणून नेते त्यांच्या दरबारात जातात आणि नेते त्यांच्या चरणी लीन झाल्याने आणखी नागरिक गर्दी करतात. आपल्या बड्या शिष्यांकरवी हे बुवा संपत्तीत भर घालतात आणि प्रशासनातही ढवळाढवळ करतात, असे हे दुष्टचक्र आहे. या अशा बुवा-बाबांकडे आपली बुद्धी गहाण ठेवणे, ही या शोषणाची सुरुवात आहे, याची खूणगाठ बांधलेली बरी.
(लेखन सहकार्य : अनिल चव्हाण, राजीव देशपांडे, बाळासाहेब पाटील, मधुकर अनाप, व्ही. टी. जाधव)

