रूपाली आर्डे -
आणि वैज्ञानिक दृष्टीकोनाचे दोन जाहिरनामे
–रूपाली आर्डे–कौरवार, प्रभाकर नानावटी
या लेखात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ या संकल्पनेच्या मांडणीचा भारतीय दृष्टिकोनातून परामर्श घेऊन त्यातील बारकावे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या देशात, जेथे असंख्य रूढ समजुती आणि अंधश्रद्धा एखाद्याच्या तथाकथित हितासाठी स्पर्धा करतात, तेथे वैज्ञानिक मानसिकतेच्या प्रामाणिक आणि परखड भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हे केवळ विज्ञानापुरते मर्यादित नसून विविध सामाजिक मुद्यांवर योग्य निर्णय घेण्यासाठी सामान्य लोकांच्या हातातले एक अमूल्य साधन आहे.
पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा केलेला पुरस्कार, भारतीय राज्यघटनेतील वैज्ञानिक दृष्टीकोन, वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या प्रसारासाठी देशातील नामवंत शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन मुंबई आणि पालमपूर येथे प्रसिद्ध केलेले वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जाहीरनामे यासंबंधी एक वेगळी माहिती या लेखात अंनिवाच्या वाचकांसाठी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. ‘विज्ञान प्रसार’ या मासिकातील सुबोध मोहंती यांच्या लेखाचे हे स्वैर भाषांतर आहे.
भारतातील जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी केलेल्या चर्चेची सुरुवात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या १९४६ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या पुस्तकापासून करायला हवी. नेहरूंनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मूळ कल्पना पहिल्यांदा या त्यांच्या पुस्तकात मांडली. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर नेहरूंनी विविध मंचांवर आणि विशेषत: वैज्ञानिकांना केलेल्या संबोधनात वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब करणारा समाज निर्माण करण्याची गरज वारंवार सांगितली.
१९५८ मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी स्वीकारलेला भारत सरकारचा वैज्ञानिक धोरण ठराव (Scientific Policy Resolution, 1958) नेहरूंच्या वैज्ञानिक विचारसरणीवर आधारित राष्ट्रीय आकांक्षा प्रतिबिंबित करतात. भारत सरकारच्या वैज्ञानिक धोरणातून भारताच्या त्या वेळच्या राजकीय नेत्यांची विज्ञानावरील अढळ श्रद्धा दिसून येते. विज्ञान आणि तंत्रज्ञान राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते, यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
नेहरूंच्या मृत्यूनंतर, भारत सरकारने सुधारित आणि पुन्हा एकदा तयार केलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणांनी देशात वैज्ञानिक मनोवृत्ती जोपासण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला. १९७६ मध्ये नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद तसेच चिकित्सक आणि सुधारणावादी वृत्ती विकसित करण्यासाठी, सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत एक समिती स्थापण्यात आली. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) या समितीचे काम होते नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तयार करणे. त्यानंतर पुन्हा १९८१ मध्ये शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत यांच्या एका गटाने सखोल चर्चेनंतर राष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक द़ृष्टिकोन जोपासण्याच्या दृष्टीने काही विचार मांडले होते.
स्वातंत्र्यानंतरच्या साधारण ३० वर्षांच्या कालखंडात सरकारच्या इतक्या प्रयत्नांनंतरही, वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रीय जनमानसामध्ये म्हणावा तेवढा रुजला नाही. डॉ. जयंत नारळीकरांनी म्हटल्याप्रमाणे, आज आपण आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करत असलेल्या स्वतंत्र भारतात राहतो, तरीही नेहरूंनी आपल्या भविष्यातील कल्याणासाठी अत्यंत आवश्यक मानलेला वैज्ञानिक दृष्टिकोन गाठण्यापासून आपण अजून खूप लांब आहोत. अशीच चिंता पी. एम. भार्गव यांनी देखील व्यक्त केली होती. देशाच्या मागासलेपणाची किंवा अनेक क्षेत्रांतील अपयशाची काही महत्त्वाची कारणे शोधून काढली तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव हा त्यापैकी एक आहे. भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये लक्षणीय प्रगती होऊनही देशात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करण्याचे नेहरूंचे स्वप्न बहुतांशी प्रत्यक्षात उतरलेच नाही.
प्रारंभिक प्रयत्न
‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा शब्द तर्कशुद्ध चिकित्सक विचारपद्धतीचा गाभा असलेला शब्दप्रयोग असून तर्कशुद्ध चिकित्सेची विचारपद्धती भारतीय तत्त्वज्ञानाला नवीन नाही. भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळातील ग्रंथांची पाने उलटल्यास तर्कशुद्ध वृत्तीचे प्रोत्साहन कसे केले जायचे याचे एक मार्मिक उदाहरण गौतम बुद्धाच्या ग्रंथात सापडते. “तुम्हाला केवळ काही सांगितले गेले म्हणून किंवा तुम्ही स्वतःच त्याची कल्पना केली म्हणून, कशावरही विश्वास ठेवू नका. शिक्षकांबद्दल केवळ आदर आहे म्हणून तुमचा शिक्षक तुम्हाला जे सांगतो त्यावरही विश्वास ठेवू नका…” – गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३– इ.स.पू. ४८३)
अगदी अलीकडच्या काळात राजा राममोहन रॉय (१७७२-१८२३) यांनी भारताच्या आधुनिकतेच्या संक्रमण काळात महत्त्वपूर्ण योगदान दिले. नारळीकरांच्या मते, अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात राजा राममोहन रॉय यांच्या सामाजिक सुधारणांमुळे भारत आणि युरोप यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयीच्या दृष्टिकोनातील अंतर कमी झाले. रॉय यांनी त्यांच्या सामाजिक सुधारणांद्वारे अनेक प्रसंगी तर्कनिष्ठ दृष्टिकोनाच्या आवश्यकतेवर विचारमंथन करण्याचा मार्ग मोकळा केला. राममोहन रॉय यांच्या वैज्ञानिक मनोदृष्टीच्या समर्थनार्थ भाष्य करताना डॉ. जयंत नारळीकरांनी लिहिले आहे : आजच्या काळातला ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हा शब्दप्रयोग त्या काळात वापरला जात नव्हता, परंतु राजा राममोहन रॉय त्यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये आणि कार्यांमध्ये त्याचा पुरस्कार केलेला आहे. वैज्ञानिक मनोदृष्टी आपल्याला उपलब्ध पुरावे वस्तुनिष्ठपणे हाताळायला शिकवते ज्यामुळे आपण केलेल्या कृती तर्कसंगत दृष्टिकोनावर आधारित राहतात. रॉय हे तर्क आणि विचारस्वातंत्र्याचे समर्थन करणारे बुद्धिवादी होते.
पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितले होते की, रॉयनी केलेल्या सामाजिक सुधारणा भारतीयांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या. भारतीय विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञानाने सुसज्ज व्हावे अशी रॉय यांची इच्छा होती, त्यामुळे कलकत्ता येथे संस्कृत महाविद्यालय सुरू करण्याच्या ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावाला त्यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी ब्रिटिश गव्हर्नर जनरल लॉर्ड अॅमहर्स्टला लिहिले, ‘संस्कृत शिक्षण पद्धती या देशातील जनतेला कायम अंधारात ठेवेल. भारतीयांची सुधारणा हा उद्देश ठेवून, इतर उपयुक्त विज्ञानांसह गणित, तत्त्वज्ञान, रसायनशास्त्र आणि खगोलशास्त्र स्वीकारून अधिक उदार आणि प्रबुद्ध शिक्षण पद्धतीला चालना मिळेल असे शैक्षणिक धोरण असले पाहिजे.’
रॉय यांच्या लक्षात आले होते की, त्या वेळचे हिंदू पाळत असलेला धर्म त्यांच्या सामाजिक विकासासाठी आणि बदलत्या जगाशी ताळमेळ राखण्यासाठी अजिबात अनुकूल नाही. १८२३ मधील एका लेखात जातींमध्ये असंख्य जाती व उपपोटजाती सुरू करणार्या भेदांमुळे लोकांची देशभक्तीची भावना पूर्णपणे वंचित राहिली आहे. धार्मिक विधी, समारंभ आणि शुद्धीकरणाच्या कायद्यांनी त्यांना कोणताही कठीण उपक्रम हाती घेण्यास पूर्णपणे अपात्र केले आहे असे नमूद केले होते. रॉय यांनी धार्मिक प्रथांवर केलेल्या या टीकेतून त्यांचा धर्माला आधुनिकतेशी सुसंगत बनवण्याचा प्रबळ उद्देश दिसून येतो.
राजेंद्रलाल मित्रा हे (१८२२/२३-१८९१), भारतीय वंशाचे पहिले आधुनिक इंडॉलॉजिस्ट (भारतीय साहित्य, इतिहास, तत्त्वज्ञान याचा अभ्यास असणारे) आणि बंगालच्या पुनर्जागृतीसाठी प्रयत्न करणारे एक प्रमुख व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी तर्कशुद्ध विचारांद्वारे सामाजिक सुधारणांना चालना देण्यासाठी दंड थोपटले. मित्रा हे १८५१ मध्ये स्थापन झालेल्या ब्रिटिश इंडियन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते. ते बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय अध्यक्ष देखील होते. बंगाली इतिहासकार सरसी कुमार सरस्वती यांच्या मते, मित्रा हे पहिले भारतीय होते की ज्यांनी रूढी-परंपरा यांच्या पवित्रतेला आव्हान दिले आणि लोकांना जुनाट परंपरांच्या जोखडातून दूर जाण्यास प्रवृत्त केले. त्यांनी लोकांच्या विचारांमध्ये वैज्ञानिक वस्तुनिष्ठतेची आवश्यकता स्थापित केली. प्रख्यात लेखक अमिताव घोष यांनी ‘बंगालमधील विज्ञानाची लोकप्रियता : राजेंद्रलाल मित्रांची अग्रगण्य भूमिका’ या शीर्षकाखालील लेखात लिहिले आहे की, राजेंद्रलाल यांचा विज्ञानावरचा विश्वास हा इतिहास आणि सामाजिक उत्क्रांतीच्या अद्भुत प्रमाणांवर आधारित होता. प्रबळ सामाजिक समजुती नाकारून त्यामागचे सत्य शोधण्यासाठी अनेक ऐतिहासिक ग्रंथांचा शोध ते घेत असत, असे मत व्यक्त केले आहे. भारतीय पुरातन वास्तूमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा एक लेख, ‘प्राचीन भारतातील गोमांसभक्षण’ हा क्रांतिकारक होता. आपल्या बहुसंख्य देशवासीयांसाठी हे शीर्षक अप्रिय वाटू शकते, हे मित्रा चांगलेच ओळखून होते. प्राचीन साहित्यातून जुन्या ग्रंथांचे काळजीपूर्वक विश्लेषण करून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, सर्वसमावेशक हिंदू धर्माच्या दृष्टीने गोमांस खाणे अगदीच काही वर्ज्य नव्हते, असे लिहिले आहे. मित्रा यांनी त्यांच्या लोकप्रिय लेखांमध्ये देवदासी प्रथा, बालविवाह, बहुपत्नीत्व, गंगायात्रा आणि सतीप्रथा ही सर्व क्रूर दुष्कृत्ये आहेत म्हणून टीका केली. आपल्या ‘नेक्रोमन्सी’ (नेक्रोमन्सी म्हणजे भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी मृतांशी संवाद साधण्याचा दावा करण्याची प्रथा. उदा. प्लंचेट नावाच्या लेखात, त्यांनी पारलौकिक शक्तींवरील विश्वासामुळे युरोपमध्ये ‘चेटकिणीची शिकार’ (डायन हंटिंग) कशी होते याचे वर्णन केले आहे. त्या वेळी भारतामध्ये देखील चेटकीण प्रथा होती आणि दुर्दैवाने देशातील काही भागात आजही आहे.
राजेंद्रलाल मित्रा यांनी बंगाली अराजकता नाकारली आणि तर्कशुद्ध दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. आपल्या विनोदी शैलीने संवाद साधत, त्यांनी बंगाली उचभ्रू भद्र वर्गाला आठवण करून दिली की झिंगे-कोळंबी सारख्या लहान किटकांचे पुंजके आमच्या ताटात असतात, तेव्हा आम्ही बेडूक खाणार्या इतरांना तुच्छ लेखू शकत नाही. तरीदेखील मित्रा हे आगळेवेगळे समाजसुधारक नव्हते हे नमूद करायला हवे; कारण काही सामाजिक प्रश्नांवर त्यांची मते पुराणमतवादी होती.
अमिताव घोष यांच्या निरीक्षणानुसार, राममोहन रॉय आणि राजेंद्रलाल मित्रा यांच्या विज्ञान शिक्षणाच्या पाश्चात्त्य प्रारूपांचा पुरस्कार करण्यास प्रवृत्त करणार्या विचारांचा प्रफुल्लचंद्र रे यांच्यावर प्रभाव पडला. प्रफुल्लचंद्र रे, एक कट्टर राष्ट्रवादी आणि भारतीय आधुनिक रसायनशास्त्र स्कूलचे संस्थापक व वैज्ञानिक दृष्टिकोनाचे जोरदार समर्थक… १९२० मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले होते, “विज्ञानाचा अभ्यास आपल्या भौतिक प्रगतीसाठी आवश्यक असला, तरी भारतीय तरुणांना सुसंस्कृत बनवण्यासाठी देखील त्याची विशेष गरज आणि महत्त्व आहे.” समाजाच्या मोठ्या घटकाची बौद्धिक प्रगती दीर्घ कालावधीसाठी खुंटल्यामुळे आपल्यामध्ये शास्त्रांच्या अधिकारावर अवलंबून राहण्याची सवय निर्माण केली होती. कारण, हे श्रद्धेच्या चाकाला बांधलेले होते आणि सर्व तर्क हे गृहीत धरून पुढे चालले होते की प्रश्न किंवा टीका करणे कोणालाही खुले नव्हते. या परिस्थितीत बौद्धिक प्रगती अपंग झाली होती आणि ब्रिटीश राजवटीच्या आधीच्या हजार वर्षांत भारत या क्षेत्रात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी दर्शवू शकला नाही यात आश्चर्यकारक काहीच नाही. यासाठी अशा प्रकारच्या बंधनांपासून मुक्त होणे आवश्यक आहे आणि हे साध्य करण्यासाठी विज्ञानाचा उपयोग करणे निर्विवाद आहे. विज्ञान कोणतेही अनुमान भरवशावर घेत नाही, परंतु त्याला तपासण्याच्या सर्व पद्धती लागू करते. आपल्या लोकांच्या बुद्धीची कवाडे खुली करण्यासाठी आपल्या देशात या वैज्ञानिक भावनेच्या वाढीसाठी मी उत्सुक आहे, असा उल्लेख केला होता.
अमिताव घोष यांनी प्रफुल्लचंद्र रे यांच्या जातिव्यवस्थेचा नकारात्मक परिणामाच्या संकल्पनांवर भाष्य करताना लिहिले आहे, ‘प्रफुल्लचंद्र रे यांना उमगले होते की तंत्रज्ञ, कारागीर आणि इतर हातकामगारांच्या सामाजिक स्थितीचे विनाशकारी अध:पतन करणारा आणि जातींमध्ये अडकलेला समाज, हेच भारतातील वैज्ञानिक भावनेच्या र्हासाचे मुख्य कारण आहे.’ रे यांच्या निरीक्षणानुसार मायावादासारखे अवैचारिक आणि तत्त्वहीन घटकदेखील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा क्षय होण्यास कारणीभूत ठरत आहेत.
पंडित नेहरूंनी आपल्या धार्मिक आणि तात्त्विक वारशाचा विज्ञानाशी असलेल्या विसंगतींचा फार सूक्ष्मपणे अभ्यास केला होता. त्यांनी कबूल केले की, धर्मांनी मानवी जीवनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मूल्ये आणि तत्त्वे स्थापित करून मानवतेच्या विकासात खूप मदत केली. परंतु त्यांनी असेही ठामपणे सांगितले की धर्मांनी सत्याला ठरावीक साच्यात आणि कट्टरतेमध्ये कैद केले. धर्माने असे समारंभ आणि प्रथा यांना प्रोत्साहन दिले, त्यामुळे त्यांचे सर्व मूळ अर्थ गमावून निव्वळ नित्यक्रमाच्या गोष्टींना जन्म दिला गेला. धर्मांनी जिज्ञासा आणि इच्छाशक्तीला प्रोत्साहन दिले नाही; उलट त्यांनी त्यांच्या अनुयायांना जुनाट परंपरांच्या आधीन केले. धर्मांनी मानवाला अज्ञात गोष्टींपासून घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि मानवातील सतत बदल आणि प्रगती साधण्याच्या मूळ प्रवृत्तीला परावृत्त केले.
नेहरूंचा असा विश्वास होता की मानवी कृती नियंत्रित करण्यासाठी वैज्ञानिक मनोदृष्टी हेच मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा असाही आग्रह होता की मानवाने नैतिक, आध्यात्मिक आणि आदर्शवादी संकल्पनांवरही अवलंबून असणे आवश्यक आहे. अशा संकल्पनांच्या अनुपस्थितीत, जीवनाचा कोणताही पाया, कोणतेही उद्दिष्ट अथवा हेतू राहणार नाहीत. नेहरूंचे असे निरीक्षण होते की, आपला देवावर विश्वास असो अथवा नसो, आपण अशा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवू इच्छितो, ज्याला आपण एक सर्जनशील जीवन प्रेरणा देणारी शक्ती म्हणतो किंवा पदार्थात अंतर्भूत असलेली महत्त्वाची ऊर्जा म्हणतो, जी त्याला स्वत:ची हालचाल, बदल आणि वाढ करण्याची क्षमता देते. ही अशी गोष्ट आहे जी वास्तविक असली, तरी आभासी आहे. आपले जीवन मात्र पूर्णतः वास्तविक आहे, कारण त्याला मृत्यू नावाचा शेवट आहे.
नेहरूंनी सर्वप्रथम ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या संकल्पनेची व्याख्या करताना विस्ताराने पुढील ठळक मुद्दे मांडले.
*वैज्ञानिक मनोदृष्टी येण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा केवळ उपयोग पुरेसा ठरणार नाही, कारण, त्याच्या अनुप्रयोगांमध्ये अपरिहार्यतेचा एक घटक आहे. गरज आहे ती वैज्ञानिक दृष्टिकोनाची, विज्ञानाचा साहसी आणि तरीही निर्णायक स्वभाव, सत्य आणि नवीन ज्ञानाचा शोध, पुरावा आणि पुराव्याशिवाय काहीही स्वीकारण्यास नकार, नवीन पुराव्यांसमोर पूर्वीचे निष्कर्ष बदलण्याची क्षमता, पूर्व-कल्पित सिद्धांतावर नव्हे, तर निरीक्षण केलेल्या वस्तुस्थितीवर अवलंबून राहणे, आणि मनाची कठोर शिस्त यांची. खरे तर हे सर्व केवळ विज्ञानाच्या वापरासाठी नाही तर जीवनासाठी आणि त्याच्या अनेक समस्यांच्या निराकरणासाठी आवश्यक आहे.
*वैज्ञानिक मनोदृष्टी हा एका मुक्त माणसाचा स्वभाव आहे.
*वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या सामाजिक संवादांचा अविभाज्य भाग असला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन हा जीवनाचा मार्ग असू शकतो. विचार करण्याची प्रक्रिया, कृती करण्याची आणि जीवनाशी एकरूप होण्याची, तसेच सहकार्यांशी संवाद साधण्याची पद्धत असू शकते.
*आपण वैज्ञानिक युगात जगत असताना, लोकांमध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कोणताही पुरावा दिसत नाही.
*विज्ञानाचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञांचा देखील मानवी जीवनाच्या प्रत्येक बाबतीत वैज्ञानिक दृष्टिकोन असेलच असे नाही.
नेहरूंच्या दूरदृष्टीनुसार, भारतीय संसदेने १९५८ चा वैज्ञानिक धोरण ठराव (Scientific Policy Resolution – SPR) स्वीकारला, ज्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची वाढ कोणत्या तत्त्वांवर आधारित असेल हे स्पष्ट केले. वैज्ञानिक धोरण ठराव – १९५८ अधोरेखित करते की त्या वेळच्या भारत सरकारने आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञान याकडे सामाजिक परिवर्तनाचे प्रमुख साधन म्हणून पाहिले. त्या वेळच्या समकालीन जगाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या आणि प्रखर प्रमाणावर विज्ञानाची उभारणी आणि देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर. अशा प्रकारच्या सामाजिक परिवर्तनाने मानवाच्या इतिहासात प्रथमच, विज्ञानात प्रगत देशांमधील सामान्य माणसाला जीवनमानाच्या, तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक सुविधा दिल्या आहेत, ज्या एके काळी लोकसंख्येच्या अगदी लहान विशेषाधिकारप्राप्त अल्पसंख्याकांपर्यंत मर्यादित होत्या. केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक पद्धती आणि वैज्ञानिक ज्ञानाचा वापर करून समाजातील प्रत्येक सदस्यासाठी वाजवी भौतिक आणि सांस्कृतिक सुविधा आणि सेवा पुरवल्या जाऊ शकतात.
नेहरूंच्या मृत्यूनंतर केंद्रातील काँग्रेस सरकारांनी नेहरूंचा वारसा पुढे चालू ठेवला. अगदी अलीकडच्या म्हणजे २००३ च्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरणातून भारत सरकार असा आग्रह करते की, विज्ञानाचा संदेश भारतातील प्रत्येक नागरिक, स्त्री-पुरुष, तरुण आणि वृद्धांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपण वैज्ञानिक वृत्ती वाढवू, ज्याच्या जोरावर एक प्रगतीशील आणि प्रबुद्ध समाज म्हणून उदयास येऊ. आपल्या देशातील सर्व थरातल्या लोकांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये आणि मानवी कल्याणासाठी त्याचा वापर करण्यात पूर्णपणे सहभागी होणे शक्य झाले पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्रीय क्रियाकलापांच्या सर्व क्षेत्रांशी पूर्णपणे जोडले गेले पाहिजे.
सतीश धवन, अब्दुर रहमान आणि पी. एम. भार्गव यांनी हाती घेतलेल्या पुढाकारानंतर, १९६४ मध्ये ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ सायंटिफिक टेम्पर (SPST)’ नावाची संस्था सुरू करण्यात आली. तिचा एकमेव उद्देश समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे हा होता. दुर्दैवाने, ही संस्था फार काळ टिकली नाही. त्यावेळेस भार्गव यांनी लिहून ठेवले आहे की, सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ सायंटिफिक टेम्परचा नैसर्गिक मृत्यू झाला… देशातील वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विकासाचा हा अध्याय बंद झाला, परंतु त्यातून बरेच धडे शिकायला मिळाले. त्यापैकी एक म्हणजे, वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ सामाजिक आणि आर्थिकच नव्हे, तर आपल्या देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीसाठी एक महत्त्वाचा घटक आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनावरील पहिला जाहिरनामा :
नेहरू सेंटर, मुंबई
नेहरू सेंटर, मुंबईने १९ जुलै १९८१ रोजी ‘अ स्टेटमेंट ऑन सायंटिफिक टेम्पर’ नावाचे एक निवेदन जारी केले. त्यावर अनेक प्रख्यात विचारवंत, वैज्ञानिक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या स्वाक्षरी होत्या. पी. एन. हक्सर यांनी आशा व्यक्त केली की हे निवेदन देशव्यापी चर्चा करण्यास प्रवृत्त करेल आणि देशात अत्यंत आवश्यक अशा पुनर्जागृतीसाठीची चळवळ निर्माण करेल. या निवेदनात वैज्ञानिक दृष्टिकोनाची कल्पना व्यक्त केली असून त्याच्या केंद्रस्थानी वैज्ञानिक पद्धत होती. वैज्ञानिक पद्धत हे सर्व मानवी ज्ञानाचे सार असते. वैज्ञानिक पद्धतीमध्ये नैसर्गिक विज्ञान आणि सामाजिक विज्ञान यांना जोडून त्यांचा खोलात जाऊन अभ्यास केला जातो. त्याचे मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे चिकित्सेची भावना जागृत ठेवणे. तसेच प्रश्नांची उत्तरे शोधणे आणि प्रश्न विचारण्याचा अधिकार मान्य करणेही होते. ज्ञानाला कोणत्याही कक्षेत संकुचित न ठेवता त्याला विकसित होत असल्याचे पाहता, या निवेदनाने निःसंदिग्धपणे नमूद केले की, वैज्ञानिक दृष्टिकोन धार्मिक आणि पारलौकिक किंवा दैववादी विश्वासांशी सुसंगत नाही. विज्ञान सार्वत्रिक आहे, तर धर्म आणि कट्टरता विभागणी करणारे आहेत.
या निवेदनाला शैक्षणिक क्षेत्रातून सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे प्रतिसाद मिळाले. त्या वेळच्या आघाडीच्या मासिकांमध्ये अनेक लेख आणि पत्रे प्रकाशित झाली. आशिष नंदी यांनी ‘ए काउंटर स्टेटमेंट ऑन ह्युमॅनिस्टिक टेम्पर’ असा प्रतिवाद करणारा लेख लिहिला आणि त्यांनी घोषित केले की ‘वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतिम तर्क हा सामान्य माणसासाठी एक असभ्य अवहेलना आहे.’ त्यांच्या या विधानाची अपेक्षेप्रमाणे देशव्यापी चर्चा झालीच नाही.
या निवेदनावर भाष्य करताना मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्राच्या प्रोफेसर असलेल्या गीता चढ्ढा यांनी लिहिले होते. ‘हे एक लक्षणीय सत्य आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निवेदनावरील प्रकाशित मसुद्यावर स्वाक्षरी करणारे बरेच लोक होते ज्यांनी भारतातील विज्ञान धोरणाच्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. असे असताना देखील अशा निवेदनात नैतिकतेसारखा महत्त्वाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित केला नाही. त्याऐवजी ते मूलत: एक अखंड स्व-प्रशंसनीय दस्तावेज बनले आहे. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रातील समीक्षकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
मद्रास ग्रुप ऑफ पॅट्रिओटिक पीपल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी (PPST) ने ‘द स्टेटमेंट ऑन सायंटिफिक टेम्पर : द एज्युकेटर्स इन नीड ऑफ एज्युकेशन’ या शीर्षकांतर्गत वैज्ञानिक दृष्टिकोनावरील विधानाचे विश्लेषण करताना खालीलप्रमाणे निष्कर्ष काढला…
वैज्ञानिक दृष्टिकोनावरील निवेदन तर्क किंवा तर्कशुद्धतेला फारसा दुजोरा देत नाही. वसाहतवादी राज्यकर्त्यांकडून मिळालेला दृष्टिकोन आणि भूमिका सोडून देण्यास ती हरकत घेते. सामाजिक न्याय आणि परिवर्तन याकडे दुर्लक्ष करत, वसाहतवादी वर्चस्वातून स्वतःला मुक्त करण्यास नकार देते. अनेक दशकांपासून विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाच्या नावाखाली जे काही केले जात आहे त्याचा बचाव करण्याचा हा प्रयत्न आहे. अशा धोरणातून आमच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांच्या मुख्यस्थांच्या भूमिकेचे संरक्षण केले जात आहे. शहरीकरण केंद्रित आणि पाश्चिमात्य-प्रेरित विकासाच्या मार्गांचे संरक्षण केले जात आहे. त्यामुळे आपल्याला आपत्तीजनक परिणामांना तोंड द्यावे लागेल. आपल्या सर्व अडचणींचे, आजार-व्याधींचे खापर अंधश्रद्धेवर फोडले जात आहे. संपूर्णपणे पाश्चिमात्य-प्रेरित, शहर-केंद्रित, उच्च तंत्रज्ञानाने साधलेला विकासाचा हा मार्ग आहे. आताच्या शेतकरी आंदोलने आणि आदिवासी चळवळींमुळे वातावरण अधिकाधिक ज्वलंत होत असताना, एवढा सखोल बचाव तंतोतंत खोडून काढला जात आहे, हा निव्वळ योगायोग आहे का?
वैज्ञानिक मानसिकतेवरील निवेदनावर आणखी काही आक्षेप घेण्यात आले होते…
*निवेदन सुस्पष्टरित्या मांडले गेले नाही.
*निवेदनात एका विशिष्ट ज्ञान-प्रणालीवर म्हणजेच विज्ञानाच्या पद्धतीवर विशेष भर दिला आहे.
*निवेदनामध्ये भारताच्या भूतकाळातील प्रत्येक परंपरा आणि संस्कृतीचा निषेध करण्यात आला आहे.
*निवेदनाने मांडलेली वैज्ञानिक दृष्टिकोनाची कल्पना देशातील सामान्य नागरिकांबद्दल उदासीनता दाखवते.
*भारतीय परंपरा आणि सामाजिक संरचना यांच्याशी वैज्ञानिक वृत्तीचा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न केला नाही. निवेदनामध्ये विज्ञानाला धर्माच्या विरोधात उभे केले आहे.
*काही उच्चस्तरीय जबाबदार लोकांचा हवाल्याने ही दृष्टी विकसित करताना समतावादी क्रम कायम ठेवण्याची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत आहे.
*हे निवेदन समाजवादी क्रांतीशी वचनबद्धता लागू करणारे दिसून येत आहे.
*या निवेदनाने स्वीकारलेल्या विज्ञानाच्या पद्धतींपुढे भारतीय लोकांच्या एकत्रित खर्या विद्वत्तेच्या श्रेष्ठतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
*वैज्ञानिक दृष्टिकोनावरील वादविवाद हे अशा विचारधारांचे वाहक बनले आहे, ज्यांचा विज्ञानाशी फारसा संबंध नाही.
*शहरी-केंद्रित आणि पाश्चात्य-प्रेरित विकासाच्या मार्गांचे संरक्षण केले जात आहे, ज्याचे घातक परिणाम होऊ शकतात.
*वैज्ञानिक दृष्टिकोनासारखा महत्त्वाचा विषय हाताळताना या निवेदनामध्ये भाषणबाजीचाच जास्त अवलंब केलेला दिसतो.
खरे तर ही टीका निवेदनाच्या मर्यादित आकलनावर आधारित आहे. वैज्ञानिक मनोवृत्तीचे समर्थक इतिहास काळातील परंपरेचा निषेध करत नाहीत, उलट ते त्यावर टीकात्मक आणि तर्कशुद्ध दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला देतात. राजा राममोहन रॉय हे पाश्चिमात्य शिक्षणाचे आंधळे समर्थक किंवा भारतीय इतिहासाचा अपमान करणारे मुळीच नव्हते. रॉय यांनी अनेक प्रसंगी ख्रिश्चन मिशनर्यांच्या हल्ल्यांना दृढपणे तोंड दिले. राजेंद्रलाल मित्रा हे देखील भारतीय इतिहासाचे आणि परंपरेचे मोठे अभिमानी प्रशंसक होते. प्रफुल्लचंद्र रे हे एक महान देशभक्त होते, ज्यांनी एकदा घोषित केले होते की एक वेळ विज्ञानाला थांबवणे परवडेल, परंतु स्वराज्याची प्रक्रिया थांबू शकत नाही. त्याचबरोबर त्यांनी भारताच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथांवरील नकारात्मक आणि प्रतिगामी घटकांवर टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही.
ज्योतिषशास्त्र किंवा इतर परंपरांमधून आलेल्या अंधश्रद्धा यांसारख्या आपल्या सामाजिक-धार्मिक वारशाच्या काही पैलूंशी आपली नाळ तोडण्याची नितांत गरज आहे. नेहरूंनी म्हटल्याप्रमाणे, भारताने त्याच्या भूतकाळाचा बराचसा भाग तोडला पाहिजे आणि त्याला आपल्या वर्तमानावर वर्चस्व गाजवू देऊ नये. आपले जीवन या भूतकाळातील मृत लाकडाने भरलेले आहे; जे काही मृत आहे आणि ज्याने त्याचा उद्देश पूर्ण केला आहे त्याला जावे लागेल. पण याचा अर्थ, त्या भूतकाळातील महत्त्वाच्या आणि जीवन देणार्या गोष्टींशी कायमचा संबंध तोडणे किंवा विसरणे असा होत नाही.
युगानुयुगे आपल्या भारतीय वंशाला दिशा देणारे आदर्श आपण कधीही विसरू शकत नाही. भारतीय लोकांची स्वप्ने, प्राचीन लोकांचे शहाणपण, त्यांची विद्वत्ता, त्यांची उत्फुल्ल ऊर्जा, त्यांचे जीवनावरील तसेच निसर्गावरील प्रेम, त्यांची उत्सुकता आणि मानसिक साहसदेखील आपण कधीही विसरू शकत नाही. नेहरूंनी स्पष्टपणे सांगितले की, भारतीयांची पारंपरिक शिकवण विज्ञानाशी विसंगती दर्शवते, जी अनिवार्य आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन विरुद्ध जुन्या शिकवणीमधून आलेली आणि आदर्शांच्या आडून लादलेली धार्मिक आणि पारलौकिक किंवा दैववादी वृत्ती, यांच्यात भली मोठी दरी आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संवर्धन करताना या दरीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सैद्धांतिक शिकवणी आणि पूर्वकल्पित समजुती या वैज्ञानिक पद्धतीशी नेहमीच पूर्णपणे विसंगत असतात.
१९८१ चे वैज्ञानिक दृष्टिकोनाविषयीचे निवेदन समता, मानवाचा आत्मसन्मान, न्यायव्यवस्थेतील समानता, श्रमप्रतिष्ठा आणि एखाद्याच्या कृतीची सामाजिक जबाबदारी यांसारख्या सकारात्मक, सामाजिक मूल्यांचे पालनपोषण आणि संवर्धन करण्याची आवश्यकता अजिबात नाकारत नाही. उलट या मूल्यांना बळकटी देण्याची गरज प्रतिपादित करते. विषमतावादी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढूच शकत नाही, असे ते ठासून सांगते. १९८१ च्या निवेदनाचा अर्थ वसाहतवादी मानसिकता कायम ठेवण्याचा प्रयत्न म्हणून मुळीच केला जाऊ नये. किंबहुना, या विधानाचे कर्ते-धर्ते आणि समाजाच्या सर्व स्तरातून एकत्र येऊन आपल्या भूमी आणि मनावरील वसाहतवादी वर्चस्व उलथून टाकण्यासाठी अपार संघर्ष केला होता अशा पूर्वजांकडून प्रेरणा घेतलेल्या मान्यवरांनी त्यावर स्वाक्षर्या केल्या आहेत. हे निवेदन आपल्या समाजात अजूनही टिकून राहिलेल्या वसाहतवादी वारशाचे प्रत्येक अंश काढून टाकण्यावर जोर देते.
ज्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या निवेदनाला विरोध केला ते कोणत्या ना कोणत्या तरी हेतूने आधुनिक विज्ञानालाही विरोध करत होते. उच्च कोटींचा शैक्षणिक वादविवाद करून आणि ‘सामान्य लोकाभिमुख’ दृष्टिकोनाचे भलते कारण देत, त्यांनी तर्कशुद्धतेने प्रेरित नागरिक बनविण्याच्या प्रक्रियेला खीळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच समाजाला समता, समानता आणि आत्मसन्मान यांसारख्या सामाजिक मूल्यांकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. वैज्ञानिक वृत्ती एक आदर्शवादी कल्पनारम्य परंतु अव्यवहार्य गोष्ट वाटू शकते. काही लोकांना असे वाटू शकते की केवळ समाजवादी समाजात वरील गुणधर्म असू शकतात आणि ते सध्याच्या आहे त्याच सामाजिक रचनेत आनंदी आहेत. परंतु बर्याचदा असा दृष्टिकोनच परंपरावादी किंवा पुरातनवादी किंबहुना फुटीरतावादी शक्तींना कारणीभूत ठरतो. वैज्ञानिक वृत्तीचे सिद्धांत मांडण्याचा कोणताही प्रयत्न केवळ भाषणबाजी म्हणून किंवा समाजवादी क्रांतीला सुरुवात करण्याचा डाव म्हणून मांडणे हे नकीच एक मागासलेले पाऊल आहे. या संदर्भात मीरा नंदा यांचे म्हणणे उद्धृत करणे उचित ठरेल. ‘दीर्घकाळापर्यंत, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधकांनी धर्मनिरपेक्षतेचे बरेच नुकसान केले आहे आणि दुर्दैवाने ते लोकप्रिय विज्ञान चळवळीतील धर्मनिरपेक्ष घटकांना बचावात्मक मार्गावर आणण्यात यशस्वी झाले आहेत.’ मीरा नंदा या प्रख्यात लेखिका असून विज्ञान इतिहासकार म्हणून ओळखल्या जातात.
१९८० च्या दशकात देशाच्या विविध भागांमध्ये लोकविज्ञान चळवळींचा उदय झाला. केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखालील आणि नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशनने समर्थन दिलेल्या या चळवळींचा परिणाम भारत जनविज्ञान जथा-१९८२ आणि भारत ज्ञान विज्ञान जथा- १९८७ या दोन मोठ्या संचलनात झाला. नंतरच्या काळात लोकविज्ञान चळवळ, पंजाबची तर्कशील सोसायटी, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ब्रेक-थ्रू नेटवर्क, All India People’s Science Network (AIPSN) इत्यादींनी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न केला व करत आहेत.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दुसरा जाहिरनामा : पालमपूर जाहीरनामा
२०११ मध्ये, १९८१ च्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या जाहीरनाम्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सखोल चर्चेनंतर तयार केलेला आणि स्वीकारलेला दस्तावेज वैज्ञानिक टेम्पर स्टेटमेंट रिव्हिजिटेड-२०११ : पालमपूर जाहीरनामा म्हणून ओळखला जातो. जानेवारी २०१२ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत याचे पुन: प्रमाणीकरण करण्यात आले. ती परिषद भारत सरकारच्या चार प्रमुख एजन्सीज – वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेस (CSIR-NISCAIR), राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद (NCSM), नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) आणि विज्ञान प्रसार यांनी मिळून आयोजित केलेली होती.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम व्यक्त केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या कल्पनेचा पुनरुच्चार करूनच पालमपूर जाहीरनाम्याची सुरुवात होते. त्यात पुढे म्हटले आहे की नास्तिकवादाची आणि मानवतावादाची परंपरा भारतीय बौद्धिक विश्वामध्ये नवीन नाही आणि ती प्राचीन काळापासून येथे अस्तित्वात आहे. पारलौकिक आणि पारंपरिक ज्ञानाचा आधार न घेता, विज्ञानाद्वारे आपण जीवन, मन आणि विश्व सहजपणे समजून घेऊ शकतो. वैज्ञानिक ज्ञान हे सार्वत्रिक आहे, म्हणजेच संपूर्ण विश्वासाठी ते एकसारखे, एकसमान आहे ही वस्तुस्थिती जाहीरनामा अधोरेखित करते.
पालमपूर जाहीरनाम्यामध्ये, केवळ पारंपरिक आहे म्हणून व्यावहारिक आणि उपयुक्त अशा पारंपरिक ज्ञानाला बाजूला केले जात नाही. वैज्ञानिक ज्ञानाचा भकम पाया आणि त्याचा आवश्यक पाठबळ नसेल, तर अति प्रमाणात होऊ दिलेल्या तांत्रिक घुसखोरीने समाजाच्या पारंपरिक संज्ञानात्मक संरचनांमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक विकृती येऊ शकते. (गेल्या दशकातील मोबाईल फोन क्रांती आणि त्याने केलेले सामाजिक परिणाम हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण होऊ शकते). मोठ्या लोकसंख्येला आवश्यक अशा पूरक वैज्ञानिक ज्ञानाचा आधार प्रदान करण्याच्या प्रयत्नांच्या अभावामुळे या विकृतींचे दृढीकरण होत आहे आणि परिणामी लोकशाही संरचना नष्ट होत आहे. शिवाय, तंत्रज्ञानावर आधारित आधुनिकीकरणामुळे पारंपरिक ज्ञान नष्ट झाल्यामुळे समाजामध्ये एक जाणीवपूर्ण अंतर निर्माण होते, जे नवीन स्वरूपात धार्मिकतेने भरून काढले जाऊ शकते. २०११ च्या पालमपूर जाहीरनाम्यामध्ये मांडलेले उपरोक्त विचार आजच्या घडीला किती तंतोतंत लागू पडतात हे इथे नमूद करावेसे वाटते.
या लेखात वैज्ञानिक दृष्टिकोन या संकल्पनेच्या मांडणीचा भारतीय दृष्टिकोनातून परामर्श घेऊन त्यातील बारकावे उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतासारख्या देशात, जेथे असंख्य रूढ समजुती आणि अंधश्रद्धा एखाद्याच्या तथाकथित हितासाठी स्पर्धा करतात, तेथे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रामाणिक आणि परखड भूमिकेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन हे केवळ विज्ञानापुरते मर्यादित नसून विविध सामाजिक मुद्यांवर योग्य निर्णय घेण्यासाठी सामान्य लोकांच्या हातातले एक अमूल्य साधन आहे.
आजच्या घडीला भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि देशाची अर्थव्यवस्था त्यावर पूर्णपणे अवलंबून आहे. तरीदेखील वैज्ञानिक दृष्टिकोन आजही आपल्याला हुलकावणी देत आहे. अजूनही आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच अंधश्रद्धा व रूढ समजुती पसरवल्या जात आहेत, हे किती विडंबनात्मक आहे, याची जाणीव आपल्याला नाही. समाजामध्ये चुकीच्या सामाजिक गोष्टी कायम ठेवण्यात हितसंबंध असलेले वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूलभूत तत्त्वांना विरोध करत आहेत.
वैज्ञानिक चिकित्सेच्या भावनेने भारलेल्या अशा समाजाकडे वाटचाल करणे सोपे काम नाही. लोकांना केवळ संकल्पनेची जाणीव करून देऊन ते साध्य होणार नाही. लोकशाहीने युक्त अशा राजकीय प्रक्रियेतूनच ते साध्य होईल.
संदर्भ :
1. A Perspective on Scientific Temper in India
by Subodh Mahanti, Jan 2013
2. Mainstream, July 1981
– रूपाली आर्डे : ७६६६७४५४४६
– प्रभाकर नानावटी : ९५०३३३४८९५
‘अ स्टेटमेंट ऑन सायंटिफिक टेम्पर’ या निवेदनावर सह्या करणार्या मान्यवरांची नावे
१. प्रो. अमित भादुरी, Jawaharlal Nehru University, New Delhi
२. डॉ. पी. एम. भार्गव, Centre for Cellular and Moleculer Biology, Hyderabad
३. प्रो. बिपिन चंद्र, Jawaharlal Nehru University, New Delhi
४. प्रो. व्ही. के. दामोदरन, Regional Engineering College, Calicut
५. पी. एन. हक्सर, New Delhi
६. व्ही. जी. कुलकर्णी, TIFR Bombay
७. डॉ. दिनेश मोहन, IIT, New Delhi
८. डॉ. एम. एन. व्ही. नायर, IIM Bangalore
९. प्रो. आर. नरसिंहय्या, IISc Bangalore
१०प्रो. एच. नरसिंहय्या, National Education Society, Bangalore
११. बकुल पटेल, Nehru Centre, Bombay
१२. रजनी पटेल, Nehru Centre, Bombay
१३. पी. के. रवींद्रनाथ, Nehru Centre, Bombay
१४. मोहित सेन, CPI, New Delhi
१५. बी. व्ही. सुब्बरायप्पा, Nehru Centre, Bombay
१६. प्रो. वाय. नायुडम्मा, Jawaharlal Nehru University, New Delhi
१७. तारा अली बेग, International Union for Child Welfare, New Delhi
१८. श्याम बेनेगल, Bombay
१९. डॉ. सतीश धवन, IISc Bangalore
२०. अशोक पार्थसारथी, Electronics Commission, New Delhi
२१. डॉ. के. एन. राज, CDS, Trivendrum
२२. डॉ. आर. रामण्णा, TIFR, Bombay
२३. डॉ. आर. रामसेशन, IISc Bangalore
२४. प्रो. सी. एन. आर. राव, IISc Bangalore
२५. डॉ. आनंद साराभाई, Biocentre, Ahmedabad
२६. डॉ. ए. के. एन. रेड्डी, IISc Bangalore
२७. प्रो. बी. एम. उदगावकर, TIFR, Bombay
२८. सुरेंद्र झा, Editor, Science Today
(या निवेदनाला पाठिंबा दर्शविणार्यात डॉ. एम. जी. के. मेनन, डॉ. यशपाल व डॉ. रोमिला थापर होते.)
भारतीय समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी…
*वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारासाठी विज्ञानविषयक अद्ययावत माहिती त्वरेने पोचेल यासाठी प्रयत्न करणे. परंतु विज्ञानाबद्दलची माहिती म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हे, हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
*सर्वेक्षणाद्वारे केलेल्या अभ्यासातून जनसामान्य नेहमीच वैज्ञानिक गोष्टीबरोबर अतिवैज्ञानिक (वा अवैज्ञानिक) गोष्टीवरही भर देतात. *या गोष्टी एकमेकांस पूरक आहेत, असे समजले जाते. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यवहारात ते एकमेकांवर कुरघोडी करत असतात. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसारकांनी वेळीच सावध होऊन वैज्ञानिक अवकाशाचा विस्तार करण्यास प्रोत्साहन द्यावे.
*वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचार व प्रसारासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे.
*धार्मिक चिन्हांचा वापर, धर्माचे उदात्तीकरण करणारे सण-समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे सरकारी कार्यालयात व सरकारी खर्चाने आयोजित करणे त्वरित थांबवावे.
*प्रसारमाध्यमं, शाळा, कॉलेज इत्यादीमध्ये अवैज्ञानिक गोष्टींना नियंत्रण करणारी राष्ट्रीय स्तरावर व्यवस्था हवी व त्यासाठी प्रयत्न करणे.
*वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी प्रयत्न करणारे वैज्ञानिक व वैज्ञानिक संस्था आपल्या व्यवहारात पारदर्शक असल्यास वैज्ञानिक मनोवृत्ती वाढविणे शक्य होते. त्यामुळे विज्ञाननिष्ठेला धका पोचू शकेल असे कुठलेही वर्तन करू नये.
*वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सरकारी निधीतून एक स्वतंत्र टीव्ही चॅनेल असल्यास विज्ञानाविषयीच्या गोष्टींचा प्रचार करणे सुलभ होईल. त्याचप्रमाणे हे चॅनेल विवेकवाद, चिकित्सक वृत्ती इत्यादींना प्रोत्साहन देऊ शकेल.
– वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या पालमपूर जाहीरनाम्यावरून