वैज्ञानिक प्रबोधनातील आव्हाने

सौरभ बागडे -

वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान उद्घाटन परिषद विवेक सावंत यांचे भाषण -भाग 1

उपस्थित बंधुभगिनींनो,

मी 1979 सालापासून ‘लोकविज्ञान चळवळी’चा एक कार्यकर्ता आहे. त्या नात्याने मी इथे आलेलो आहे. आमचे जे विज्ञान चळवळीचे कार्यक्रम असायचे, त्यात आम्ही आमचा पत्ता ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ आहे, असं सांगायचो; म्हणजे कोल्हापूर ते गोंदिया, गोंदिया ते कोल्हापूर प्रवास करत राहायचा. प्रत्येक स्टेशनवर उतरून विज्ञानप्रसाराचे कार्यक्रम करायचे आणि पुढच्या स्टेशनवर जायचं. आज आपल्या कार्यक्रमाचा प्रारंभ कोल्हापुरातून होतोय, म्हणजे कार्यक्रम गोंदियापर्यंत नक्की जाणार, याची मला खात्री आहे. आम्ही ‘लोकविज्ञान चळवळी’चे कार्यक्रम करताना आम्हाला माहीत नसायचं की, तिथे कोण आम्हाला स्वीकारेल; पण बुद्धाचा एक संदेश बरोबर असायचा. बुद्धाने त्याच्या अनुयायांना सांगितलं, “तुम्ही काहीही बरोबर न नेता गावामध्ये जा.” अनुयायी म्हणायचे की, “तिथे गेल्यावर जेवायला, खायला मिळेल का नाही?” त्यावर बुद्ध म्हणाला, “प्रत्येक गावात चार शहाणी माणसं आहेत यावर विश्वास ठेवा.” आता हे अभियान जेव्हा महाराष्ट्रभर जाईल तेव्हा चार काय, चाळीस काय; तर चार लाख शहाणी माणसे सहज भेटतील, यावर खात्री बाळगा. त्याच्यामुळे या अभियानाला लोकसहभाग मिळेल, याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. याचं कारण म्हणजे यामागे डॉक्टरांची खूप मोठी तपश्चर्या आहे. स्वतः अभ्यास करायचा आणि इतरांना शिकवायचं, या अर्थाने तपश्चर्या. डॉ. दाभोलकरांनी जो व्यासंग केला, जो लोकसंग्रह केला, त्यामुळे या अभियानाला फार मोठं अधिष्ठान आहे, या आत्मविश्वासाने आपण लोकांमध्ये जाऊया.”

“आज या अभियानाची सुरुवात करण्याची परिषद आहे आणि त्यानिमित्ताने विचार मांडण्याचा प्रयत्न करायला मी उभा आहे. आता मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, हे प्रबोधनाचे अभियान हे कृतिनिष्ठ आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. हे केवळ शब्दनिष्ठ नाही. मुक्ताने आपल्याला अनेक कृती उलगडून दाखवल्या. एकदमच बुवा-बाबाचे चमत्कार उघडे करून दाखवण्याचे कारण नाही, असं मुक्ता म्हणाल्या. मला त्याबद्दल निरीक्षण नोंदवायचं आहे. मुक्ता दाभोलकरांनी तुमच्यासमोर कृतीचे पर्याय मांडले आणि ज्ञानरचनावादी पद्धतीने आपल्याला खूप काही नवीन गोष्टी करता येतील, हेही मांडलं. मला एक सांगायचंय, डॉ. दाभोलकरांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी अव्याहतपणे जे काम केलं, त्यामुळे मला जे आठवतं, 80 च्या दशकात जेवढ्या प्रमाणात चमत्कार वगैरे व्हायचे तसे आता महाराष्ट्रात करायला लोक घाबरतात. ही गोष्ट पण महत्त्वाची आहे. त्यामुळे जाहीररित्या चमत्कारांच्या गोष्टी कोणी करत नाही. पण जे करतात ते दोन अपराध करतात. एक ते अंधश्रद्धा तर पसरवतातच; पण आपण जे करतोय ती अंधश्रद्धा नाही, हे विज्ञानाचा आधार घेऊन सांगतात, हा विज्ञानाचा सर्वांत मोठा दुरुपयोग आहे. अशा लोकांचं बिंग आपण फोडलं पाहिजे. अवैज्ञानिकता समाजात कशी पसरते, याच्या विज्ञानावर आपण प्रभुत्व मिळवलं पाहिजे. त्या दृष्टीने आजची आपली परिषद विलक्षण मोठ्या उद्दिष्टाने भरलेली आहे, असं मला वाटतं. संपूर्ण देशात, जगात अवैज्ञानिक प्रलोभनांचा सुळसुळाट असताना तुम्ही वैज्ञानिक प्रबोधनाचा विचार करता, ही खूप मोठी गोष्ट आहे. वैज्ञानिक जाणिवा, त्याविषयीचे प्रबोधन; प्रबोधन म्हणजे तरी काय? तर प्रकर्षांने जे बोधन होतं, त्याला प्रबोधन असं म्हणतात. हे प्रबोधन करताना जाणिवांचे विज्ञान काय आहे, ते पण समजावून घेतलं पाहिजे. जे जे धोके निर्माण झाले आहेत, ते आपल्यासमोर आणले पाहिजेत.”

“आपला मेंदू हा फार मोठ्या प्रमाणात माहिती घेत राहतो. गेली दोन वर्षे सगळ्या जगामध्ये तिसरं महायुद्ध पार पडलं. या महायुद्धाचं नायकत्व एका अदृश्य विषाणूनं केलं. आता ते महायुद्ध संपतं आहे. दुसर्‍या महायुद्धानंतर जगात प्रचंड मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचे कारखाने उभे राहिलेले होते. त्याची मोठी स्पर्धा तयार झाली. या तिसर्‍या महायुद्धानंतर काय झालं? हा विषाणू आपला मारेकरीच नव्हता, तर तो चिफ डिजिटायझेशन ऑफिसर म्हणून काम करत होता. जगात ज्यांच्या आसपास डिजिटल तंत्रज्ञान गेलं नसतं, त्यांना त्याच्या आहारी जायला भाग पाडलं. तिथून आपल्याला जाणिवांच्या विज्ञानाकडे बघायचं आहे. त्यातून वैज्ञानिक प्रबोधनातील आव्हाने आपल्या समोर येतील. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय किती वेगळ्या पातळीवर गेला आहे, ते आपल्या समोर येईल. अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम आता किती वेगळ्या पातळीवर गेलं आहे, याचा आपल्याला अंदाज येईल.”

“आतापर्यंत जाणिवा बदलण्याचं काम व्यक्तिगत पातळीवर किंवा छोट्या समूहात शक्य होतं. आता एका ‘मास स्केल’वर आव्हान निर्माण झालं आहे. कारण डिजिटायझेशनच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांना तुम्ही संमोहित करू शकता. त्यामुळे आपलं काम किती जिकिरीचं झालं आहे, याची कालसुसंगत जाणीव होणं आवश्यक आहे. 1932 साली अल्ड्स हक्सले यांनी Brave New World कादंबरी लिहिली, त्यामध्ये एका ठिकाणी भाष्य केलं होतं, अत्यंत लवकरच माहितीची विपुलता निर्माण होईल आणि एकाग्रतेचा दुष्काळ तयार होईल. आता असंच झालं आहे. जाणिवांचे विज्ञान आपल्याला काय सांगते? जेव्हा तुम्ही माहिती घेता आणि त्यावर प्रक्रिया करता. ज्या मनाने तुम्ही प्रक्रिया करता, त्याच मनानं तुम्ही त्याकडे बघता. मुक्ताने छान शब्द वापरले की, मनात डोकावून बघा. म्हणजे काय मनोव्यापार चालू आहे, त्याकडे मनाने बघता येतं आणि साक्षीभावाने तुम्ही याकडे बघता की मी कसा विचार करतो आहे. मी कुठल्या विचारांच्या आहारी तर जात नाहीये ना? माझ्या भीती कुठल्या आहेत? चिंता कुठल्या आहेत? द्वेष कुठले आहेत? विद्वेष कुठले आहेत? हे सर्व साक्षीभावाने बघू शकणे, याला मी जाणीव असे म्हणतो. माणसाच्या ज्या अनेक कृती आहेत, बुद्धिमत्तेचे, तज्ज्ञतेचे अनेक पैलू आहेत. ते मूलतः त्यांच्या नेणिवेतून तयार होतात. पण माणूस जाणिवेत असतो, तेव्हा स्वतःच्या वर्तनाकडे, विचारांकडे, भावनांकडे तो तटस्थपणे बघू शकतो. तुम्ही तुमच्याकडे कसं बघावं, हे तुम्हाला प्रभावित करणार्‍या काही शक्ती ठरवत आहेत आणि तिथेच खरी लढाई आहे.”

“आपल्याला माहीत आहे की, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा मोठ्या प्रमाणात वापर मोबाईलच्या माध्यमातून होत आहे. तुम्ही एखादा कुठलाही ‘यू ट्यूब’वरील व्हिडिओ बघितला की, तुम्हाला पुढच्या शिफारशी यायला सुरुवात होते. तुम्ही त्यात गुंतता. ही कृती तुमच्या जाणिवांना बदलण्याचा प्रयत्न करते आहे. तुमच्या जाणिवा बदलण्याचा प्रयत्न होत आहे. एका ‘प्रोगॅमेबल सिव्हिलायझेशन’चा जन्म होतो आहे. या दृष्टीने आपण या अभियानात काय करू शकू, असा विचार करण्याची गरज आहे. आपण नक्की कसे आहोत, कोण आहोत, हे समजून घेण्याची प्रक्रिया लहानपणापासून करण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाने पूर्वी बँक अकाऊंट किंवा मोबाईल फोन, कॉम्प्युटर ‘हॅक’ करता येत होते. आता तुम्हाला ‘हॅक’ केलं जातंय. माणसं कशी ‘हॅक’ होणार नाहीत, या दृष्टीने प्रयत्न करणे हे वैज्ञानिक जाणिवांचे प्रबोधन करणार्‍यांचे काम आहे. हे आपल्यासमोरच आव्हान आहे. जेवढ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, तेवढ्या प्रमाणात हे आव्हान जटिल होत जाईल. कारण ‘मास स्केल’वर हे होईल, असं सिद्ध झालं आहे.”

“तुम्ही किती व कुठून कर्ज घ्यावं, काय खरेदी करावं, कुणाशी विवाहबद्ध व्हावं, कुणाला मतदान करावं, हेही हेच तंत्रज्ञान ठरवत आहे. आपल्याला असं वाटतं की, मी निर्णय घेतलाय. आपल्याला असं भासवलं जातं की हे सगळे निर्णय तुम्ही घेताय बरं. तुमच्यासमोर वेगवेगळे पर्याय निर्माण केलेत. पण प्रत्यक्षात तुम्ही त्या निर्णयांच्या खोलवर गेलात की तुमच्या लक्षात येतं की, हे निर्णय मी घेतलेले नसून आमच्या तंत्रवैज्ञानिक भाषेत ‘अल्गोरिदम्स’ घेत आहेत. पायरी-पायरीने एका निष्कर्षाप्रत येणं, एखादी समस्या सोडवणं, याला आपण ‘अल्गोरिदम’ म्हणतो. हे ‘अल्गोरिदम’ पूर्वी माणसं लिहायची; म्हणजे तुम्ही ‘गूगल’वर एखादा शब्द टाकता आणि ‘सर्च’ करता. ते शोधून देणारी पद्धती आहे, ती सर्जी ब्रीन या नवोन्मोषकाराने लिहिली. खरं आहे. पण ते जे ‘सर्च इंजिन’ लिहिलं, सॉफ्टवेअर लिहिलं गेलं, याच्यापुढे लोक जे ‘सर्च’ करतील त्यातून ते शिकते. मग ते सॉफ्टवेअर अधिक चांगलं सॉफ्टवेअर लिहिते. अधिक चांगला नेमका ‘सर्च’ होतो. सॉफ्टवेअरच्या पुढच्या पिढ्या (‘म्युटंन्ट्स’) निर्माण होतात. त्यातून जे सॉफ्टवेअर तयार होतं, ते तुम्हाला ‘सर्च’ करतं. त्यामुळे त्या सॉफ्टवेअरमधला मानवी बुद्धिमत्तेचा अंश आता तुम्ही शोधू शकत नाही. ती एक नवी मानवी बुद्धिमत्ता तयार होत आहे आणि ही नवी मानवी बुद्धिमत्ता आता आपल्या सर्वांचे नियंत्रण करत आहेत. ‘हॅकिंग’ म्हणजे काय? तर मला मी जो समजतो, त्यापेक्षा त्या ‘अल्गोरिदम्स’ला मी जास्त चांगला समजतो.”

“मला असं वाटतं, मला मी चांगला समजतो; पण माझ्या शाळेने लहानपणापासून मला स्वतःला ओळखायला शिकवलेलं नाही. माझे मनोव्यापार कसे चालतात, याचं साक्षीभावाने अवलोकन करायला, त्याचे अन्वयार्थ लावायला शाळेनं आम्हाला शिकवलं नाही. मला शिक्षणात कुठे वावच नाही. ‘21 अपेक्षित’ प्रश्नांना अपेक्षित वेळेत अपेक्षित उत्तरं दिली असता अपेक्षित गुण मिळतात, एवढंच मला माहीत आहे आणि त्यामुळे मी स्वतः समजून घेणं हा एक आध्यात्मिक प्रश्न म्हणून आपण सोडून दिला होता. ‘कोऽ हम.’ आता तो एक व्यावहारिक प्रश्न झालाय. मी स्वतःला समजून घेण्यामध्ये तुमचा एक स्पर्धक तयार झालाय. तुम्ही एकतर स्वतःला लवकर समजून घ्या, नाहीतर ‘अल्गोरिदम’ तुम्हाला समजून घेईल आणि तुमचं संपूर्ण नियंत्रण तो करू लागेल. मग ज्या अवैज्ञानिक अशा अंधश्रध्दा पसरवण्याचे काम असतं ते तितकं सहज असेल. या ‘अल्गोरिदम’ची मालकी कोणाकडे जाईल. याचे तीन पर्याय आणि त्याचे काही उपपर्याय. एक, सरकारांच्या हातात असेल आणि सरकार नागरिकांकडून आपल्याला हवं ते करून घेईल. दोन, ‘अल्गोरिदम्स’ बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातात जाईल. कारण यामध्ये गुंतवणूक ते करू शकतात. याच कारण तुम्ही प्रत्येक ‘क्लिक’ करत आहात, त्या ‘क्लिक’मधून तुम्हाला जास्त समजून घेणारा अधिकाधिक चांगला ‘अल्गोरिदम’ तयार करतात. तो ‘अल्गोरिदम’ तयार करण्यासाठी सुद्धा तुम्ही हातभार लावत आहात, म्हणजे ग्राहक हा उत्पादन करत आहे. त्यामुळे याची मालकी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे जाऊ शकते. तिसरा पर्याय We can create people`s republic on cloud, लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले एक संघटन निर्माण होऊ शकतं; म्हणजे याच्यावर लोकांची मालकी. ही शक्यता शक्य-कोटीतील आहे.”

“आता युवाल हरारींनी यासाठी एक नवा शब्द तयार केला आहे, ते म्हणतात, ‘अल्गोरिदम’ हे 21 व्या शतकातील स्टॅलिनच्या हातात असेल. स्टॅलिन म्हणजे माणूस नसेलच पण तो ‘डिजिटल डिक्टेटर’ असेल. आणि त्या डिक्टेटरच्या हातात कारभार दिला की, त्याच्या हातातून सुटका होणं हे नजीकच्या भविष्यात शक्य नसेल. त्यामुळे लहानपणापासून वैज्ञानिक जाणिवांचा परिपोष करणे, हे किती मोठं आव्हान आहे. या परिषदेचे प्रयोजन किती सखोल आहे, असं मला वाटतं ते मी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.”

“पूर्वी हे आव्हान त्या मानानं सोपं होतं. कारण मुलांवर प्रभाव गट किंवा दबाव गट तुलनेने क्षीण होते. आता तसं नाही. गेली दहा हजार वर्षे मोठी माणसं लहान मुलांना शिकवत होती. आता घरोघर काय होतंय ते बघा. आता हे तंत्रज्ञान लवकरात लवकर हस्तगत करून मोठ्यांना सल्ले देताहेत; म्हणजे मुलांना अतिशय वेगाने प्रभावित केलं जातंय. त्यासाठी अतिशय परिणामकारक user interface निर्माण होईल. जर या मुलांमध्ये अवैज्ञानिकतेचा परिपोष केला तर पुढे काय घडेल, हे मी सांगण्याची गरज नाही. त्यामुळे आपलं काम जे आहे ते अशा एका विस्तृत पटावर चालू आहे, याची जाणीव आपल्याला असणं आवश्यक आहे आणि मग हे ‘अल्गोरिदम’ आपल्याला प्रभावित करायचे आहेत. कारण जोपर्यंत आपण ‘अल्गोरिदम’ प्रभावित करत नाही तोपर्यंत आपल्याला दुसरे सोपे मार्ग नाहीत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांमधून, मुलांमधून वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रतिक्रिया व प्रतिसाद निर्माण करावे लागतील. मुक्ता दाभोलकरांनी अतिशय छान सांगितलं की, सामान्य लोकांमध्ये एखाद्या विचारांची जागृती होते, तेव्हा सत्ताधार्‍यांचे कान टवकारले जातात. ‘अल्गोरिदम’ला प्रभावित करावयाचे असेल तर सुरेश भटांनी त्यांच्या कवितेत सांगितल्याप्रमाणे ‘साध्याच माणसांचा एल्गार येत आहे.’ हे घडणे गरजेचे आहे. हे एल्गार आणण्याचे काम आपल्या वैज्ञानिक प्रबोधनातून होऊ शकतं.

(क्रमश🙂

शब्दांकन ः सौरभ बागडे, राहुल माने

(परिषदेचे उद्घाटक विवेक सावंत यांचे संपूर्ण भाषण आम्ही तीन भागामध्ये प्रसिद्ध करीत आहोत. – संपादक मंडळ)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]