डॉक्टरांच्या संयत उत्तराने प्रभावित झालो

उदयकुमार कुर्‍हाडे - 9623065405

माझे वडील हे संगमनेर पोस्टात नोकरीला असल्याने आमचे वास्तव्य संगमनेर येथेच होते; परिणामी शिक्षणही संगमनेर परिसरातच पूर्ण झाले. अशातच इसवी सन 2000 या वर्षी डी. एड. पूर्ण केले. आता पुढे काय? तर प्रा. चौधरी यांच्या सल्ल्यानुसार बी. एस. टी. कॉलेज, संगमनेर येथे बी. ए.च्या प्रथम वर्गाला प्रवेश घेतला. मोकळा वेळ अधिक असल्याने कॉलेजमधील वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागलो. त्यातच एन. सी. सी व एन. एस. एस. या दोन दलाचा सदस्य झालो. त्याचबरोबर ‘कमवा आणि शिका’ योजनेंतर्गत ग्रंथालयात काम करत होतो. त्यामुळे सर्वच प्राध्यापक महोदयांच्या परिचयाचा झालो होतो.

एके दिवशी नरेंद्र दाभोलकर यांचे व्याख्यान असल्याचे कळाले. या व्याख्यानासाठी 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी एका सभागृहातून जमा झाले. त्यावेळी नरेंद्र दाभोलकर हे नाव नुसते ऐकिवात होते. मात्र त्यांचे प्रकाशित होणारे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र अनेकदा वाचनात आले होते. या चळवळीबद्दल मनात कुतुहूल आणि जिज्ञासा होतीच. त्यातच या चळवळीचे सर्वेसर्वा आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार, हा आनंद होता.

व्याख्यान सुरू झाले. कानात जीव एकवटून सर्वजण नरेंद्र दाभोलकर यांचे व्याख्यान ऐकत होते. व्याख्यानाचा मूळ विषय ‘श्रद्धा आणि अंधश्रद्धा’ हा होता. मात्र विषय शनी शिंगणापूर देवस्थानाभोवती फिरत होता. या देवस्थानासंबंधीच्या तीन घटकांना धरून दाभोलकर बोलत होते. पहिला, देवस्थानाला वाहत असलेले हजारो लिटर तेल कसे वाया जाते, हे ते स्पष्ट करत होते. येथील चोरीविषयीची अंधश्रद्धा सांगत होते आणि शनीच्या चौथर्‍यावर दर्शनासाठी स्त्री-पुरुष भेद मानून स्त्रियांना कशी आणि का बंदी आहे, याचे विवेचन करत होते. व्याख्यान सुरू असताना मनात नानाविध प्रश्न तयार होत होते. मात्र प्रास्ताविकात संयोजकांनी, ‘कितीही प्रश्न असले तरी ते प्रश्न विचारण्यास शेवटची तीस मिनिटे राखीव ठेवली आहेत, त्यावेळी तुम्हाला प्रश्न विचारता येतील, मध्येच कोणीही प्रश्न विचारू नये,’ असे सांगितले होते.

दाभोलकर शनी शिंगणापूरसंबंधीच्या चित्तथरारक कथा सांगून त्यासंबंधीच्या अंधश्रद्धांबाबत मुद्देसूद विवेचन करत होते. तेलाबाबत व स्त्रियांच्या शनी चौथर्‍यावरील प्रवेशबंदीबाबत आम्हाला काहीसे पटत होते; मात्र शनी शिंगणापूर येथे चोरी होत नाही. त्यामुळे कोणत्याही घराला खिडक्या, दरवाजे, कडी, कोयंडा नाही. त्याच्या पाठीमागे अंधश्रद्धा अशी की, चोरी झालीच तर चोराचे डोळे तरी जातात किंवा त्याला मतिमंदत्व तरी येते. यावर उपाय पण होता. चोर जर शनी शिंगणापूर देवस्थानाच्या चरणी शरण आल्यास त्याची शिक्षा सौम्य होत होती. त्यांच्या या मांडणी व वक्तव्यावर मात्र आक्षेप वाटत होता.

आम्ही सर्व तरुण म्हणजे एफ. वाय. ते टी. वाय. बी. ए., बी. एस्सी. आणि बी. कॉम. या सर्व शाखांचे विद्यार्थी होतो. आमचे वय 19 ते 21 च्या दरम्यान होतं, म्हणजे वैचारिकदृष्ट्या ना आम्ही सरीला होतो ना ओळंब्याला. मध्येच. आमची वैचारिक प्रगल्भता कच्ची होती. त्यामुळे दाभोलकर जे सांगत होते, ते काहीसे पटत असले तरी परंपरेने जे संस्कार आमच्या मेंदूमध्ये रुजवले होते, त्यानुसार दाभोलकर खोटे सांगत आहेत, असेही वाटत होते.

शेवटी एकदाचे व्याख्यान संपले आणि प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला. माझ्या नावाची चिठ्ठी संयोजकांनी वाचली आणि मला प्रश्न विचारण्यास सांगितले. मी उभा राहून दाभोलकरांना प्रश्न केला की, ‘शनी शिंगणापूर येथे चोरीबद्दल अंधश्रद्धा आहे. आपले म्हणणे खरे मानले तरी, या अंधश्रद्धेचा फायदाही मोठा आहे.’ दाभोलकर म्हणाले, ‘तो कसा?’ मी सांगितले, ‘शनी शिंगणापूर येथे घरांना लाकडी दरवाजे खिडक्या व कडी-कोयंडे नाहीत; परिणामी अनेक टन लाकडाची बचत झाली आहे. यामुळे अनेक वृक्षांची कत्तलही वाचली आहे. या भागातील लोकांची हजारो रुपयांची बचत झाली आहे. मग अशावेळी अशी श्रद्धा किंवा अंधश्रद्धा समाजात असणं योग्य आहे. किमान देवाच्या भीतीने तरी चोरी होत नाही. ही श्रद्धा किंवा अंधश्रद्धा समाजहिताची नाही का? अशा वेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला विरोध का करत आहे?’ दाभोलकरांनी माझे प्रश्न आणि उपप्रश्न अगदीच शांत व स्थिर मनाने ऐकून घेतले. यावेळी सभागृहांमध्ये देखील शांतता होती. आता सर्वांना आतुरता होती ही दाभोलकरांच्या उत्तराची आणि मलाही विजयी झाल्यासारखं वाटत होतं की, आपण एवढ्या मोठ्या विचारवंताला कोंडीत पकडलं.

परंतु पुढील काही मिनिटांतच माझे अवसान गळाले. याचे कारण दाभोलकरांनी प्रत्येक उपप्रश्नाचे व मूळ प्रश्नाचे अगदी सखोल आणि पुराव्यानिशी उत्तर दिले. उत्तर देत असताना त्यांनी माझ्या म्हणण्याचे खंडन अजिबातच केले नाही. मात्र या अंधश्रद्धांचे काय दुष्परिणाम होतात, श्रद्धाच कशी अंधश्रद्धा बनते व ती कशी घातक होत जाते, याचे विस्तृत विवेचन केले. त्याचबरोबर आजपर्यंत शनी शिंगणापूर येथील पोलीस ठाण्यामध्ये चोरीच्या गुन्ह्यांच्या नोंदींचा तपशीलही दिला. एवढंच नाही, तर हे सापडलेले चोर आजही ठणठणीत आहेत, हेही पुराव्यानिशी सांगितले. शनी शिंगणापूर येथे नेहमीच चोर्‍या होत आलेल्या आहेत; मात्र याची वाच्यता करायचे नाही, यासाठी दबाव असतो, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे दरवाजे, खिडक्या नसल्या तरी रात्रीच्या वेळी ही सर्व जागा व्यवस्थित झाकलेली असते, म्हणजेच सहजासहजी ढकलून कोणी आतमध्ये येणार नाही, याची काळजी घेतलेली असते. असे का? असा प्रश्न केला, तर कुत्रे, मांजरी, गुरे येऊ नयेत म्हणून; म्हणजे कुत्र्याने भाकर चोरली, मांजराने दूध पिले किंवा गुराने धान्य खाल्ले तर या चोरीसाठी शनिदेव शिक्षा करत नाही. तसेच गावातल्या सर्वच दुकानांना दरवाजे नसले, तरी ती रात्री व्यवस्थित बंद केलेली असतात आणि त्यांच्या गल्ल्यात मात्र फक्त चिल्लर ठेवतात. नोटा स्वतःच्या खिशात किंवा बँकेत असतात; म्हणजे गावकर्‍यांचा या सत्तेवर विश्वास आहे की नाही? दाभोलकर पुढे म्हणाले की, या गावात वीज आणि पाण्याची चोरी होते; मात्र शनी शिंगणापूर येथील जागृत देवस्थान या चोरांना कधीही शिक्षा करत नाही. हे सर्व गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. यावर कळस म्हणजे येथील ट्रस्टची जाहिरात. ती म्हणजे – यात्रेला येणार्‍या भाविकांनी पैसे किंवा वस्तू ऑफिसात देऊन पावती घ्यावी व पैसे सीलबंद पेटीतच टाकावेत आणि खरोखर येथे चौथर्‍यासमोर कडी-कोयंडा नसलेली मात्र सीलबंद पेटी आहेच. हे उदाहरण शनी शिंगणापूरच्या चोरीबद्दलची अंधश्रद्धा स्पष्ट करणारे होते.

वरील विवेचन ऐकून मी पराभूत झालो होतो; मात्र विचारांचे काहूर डोक्यात उठले होते. प्रश्नोत्तराचा तास कधी संपला, हे कळलेच नाही आणि मी सायकल काढून घराकडे निघालो होतो, इतक्यात प्रा. तुळशीराम जाधव यांचा निरोप आला, मला ऑफिसमध्ये बोलावले होते. कदाचित मी काही चुकीचा प्रश्न विचारला आणि त्याचा राग संयोजकांना आला असावा आणि म्हणून मला रागावण्यासाठी ऑफिसमध्ये बोलावले आहे, असे वाटले. ऑफिसमध्ये पोहोचलो तर तेथे प्राचार्य, इतर प्राध्यापक व नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते. दाभोलकरांनी माझी चौकशी केली. ‘पूर्ण नाव काय? कोणत्या शाखेला शिकतो? कुठे राहतोस?’ अशी घराची पार्श्वभूमी थोडक्यात विचारली आणि मला घरी जाण्याची परवानगी दिली. माझी खरडपट्टी काढली जाणार, असे वाटत होते; मात्र दाभोलकरांनी माझी प्रेमाने चौकशी का केली असेल, हा प्रश्न डोक्यात घोंगावत होता आणि याचे उत्तर लवकरच मिळाले.

उदयकुमार श्रीराम कुर्‍हाडे

संगमनेर येथे प्रा. तुळशीराम जाधव व प्रा. अशोक गवांदे आणि अजून काही शिक्षक वृंद एकत्र येऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य चालवत होते. प्रा. जाधव हे कार्याध्यक्ष, तर प्रा. गवांदे हे सचिव होते. ते माझ्यासारख्या काही विद्यार्थ्यांना साप्ताहिक बैठकीला पाचारण करू लागले. आमच्या आठवडानिहाय बैठक होऊ लागल्या. या बैठकांमध्ये, प्रा. तुळशीराम जाधव हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची गीते गात, तर प्रा. गवांदे काही प्रबोधनात्मक माहिती सांगत. त्याचप्रमाणे आजूबाजूला घडणार्‍या बुवाबाजीच्या घटनेविषयीही चर्चा करत. अचानक एक दिवस माझ्या हाती पत्र मिळाले की, संगमनेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शाखेचा युवा संघटक म्हणून माझी नेमणूक झाली होती. आम्हा सर्व तरुण-तरुणींची पुणे येथे प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली होती.

प्रा. तुळशीराम जाधव, प्रा. गवांदे यांच्या नेतृत्वाखाली मी, गणेश सांगळे, ऊर्मिला तांगडकर आणि अजून काही मित्र पुणे येथे युवा प्रशिक्षण शिबिरासाठी पोचलो आणि तेथे चक्क पुन्हा एकदा दाभोलकरांची भेट झाली. दोन्ही दिवस पूर्णवेळ ते आमच्या सहवासात होते. आमची बर्‍यापैकी मानसिक बैठक तयार करण्यात आमचे प्राध्यापक यशस्वी ठरले होते. परंतु इमारत पक्की उभी करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज होती. हे प्रशिक्षण नरेंद्र दाभोलकरांनी त्यावेळी दिले. एवढे मोठे विचारवंत आपल्या सोबत राहतात, स्वतःचे जेवणाचे ताट स्वतः धुतात. आपले स्वतःचे अंथरूण स्वतः करतात. जवळजवळ प्रत्येक कार्य स्वतःचे स्वतः करून आमच्यासमोर ते स्वावलंबनाचा नवा धडा घालून देत होते. एवढंच नाही, तर आमच्या खांद्यावर प्रेमाने हात टाकत. आमचे विचार, मत पूर्ण ऐकून घेत. आमच्या विनोदाला हसत. आमच्या शंकेचे सखोल व पुराव्यानिशी स्पष्टीकरण करत. कोणताही विचार मांडताना किंवा शंका-समाधान करताना ते कधीच रागावलेले दिसले नाही किंवा त्यांच्या कपाळावर कधीच आठ्या पडलेल्याही दिसल्या नाहीत. समोरच्या व्यक्तीबद्दल दया, करुणा हे भाव मनात ठेवून ते शंका-समाधान करत होते. त्यामुळे दाभोलकरांविषयी एक वेगळाच भाव मेंदूत निर्माण झाला होता. आम्ही मनोमन नरेंद्र दाभोलकरांचे अनुयायी झालो होतो. एक नवा आदर्श आमच्यासमोर उभा राहिला होता. त्यावर पाऊल टाकून आम्ही चालण्यास सज्ज होत होतो. हे सर्व आकाश ठेंगणे झाल्यासारखे होते. त्यामुळे युवा प्रशिक्षण शिबीर कसे असावे? प्रशिक्षक कसा असावा? त्याचप्रमाणे कार्यकर्ता कसा घडवावा? या घटकांची प्रचिती प्रत्यक्षात या दोन दिवसीय शिबिरात आली आणि या वेळेपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक सक्षम व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून उदयास आलो आणि आजही ही वाटचाल सुरू आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]