डॉ. राम पुनियानी -

भारत देश सध्या कुटिलपणे तयार केल्या गेलेल्या द्वेषाच्या सापळ्यात अडकला आहे. त्यामुळे समाजातील असुरक्षित घटक; विशेषत: धार्मिक अल्पसंख्याक आणि दलित यांच्या विरोधात हिंसाचार होतो. आपल्या पारंपरिक समजुतीनुसार प्रेम ही एक नैसर्गिक संकल्पना आहे आणि द्वेष ही सहसा समाजातील आक्रमकपणे लक्ष्य केल्या गेलेल्या घटकांबद्दलच्या गैरसमजांभोवती जाणूनबुजून निर्माण केली गेलेली संकल्पना आहे. हिंसाचाराचा फटका समाजातील या वर्गांना सहन करावा लागतो. इतिहासाचे चुकीचे आकलन हा गैरसमजांचा प्रमुख स्रोत आहे, ज्यामध्ये धर्माच्या नावाखाली राष्ट्रवादाचा अर्थ लावणे हा सोयीस्कर राजकीय अजेंडा आहे.
सध्या प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हे भारतीय इतिहासाचे तीनही प्रमुख कालखंड अशा विकृत पद्धतीने, मोडतोड केलेल्या परिप्रेक्ष्यात दाखवून सादर केले जातात. या सर्वांत मोठी कडी म्हणजे इतिहासकारांनी तर्कशुद्ध, वैज्ञानिक पद्धतीने इतिहासाचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला तर ताकदवान राजकीय प्रचारतंत्राच्या आधारे ते सर्व बदनाम केले जाते. एरिक हॉब्सबॉम यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘ज्याप्रमाणे अफूच्या व्यसनासाठी अफू महत्त्वपूर्ण आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादासाठी इतिहास काम करतो.’ आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की, एका बाजूला भारतीय राष्ट्रवाद्यांचे भूतकाळाबद्दलचे आकलन आणि दुसर्या बाजूला जातीयवादी राष्ट्रवाद्यांचे इतिहासाचे आकलन, यात कमालीचे अंतर आहे. इतिहासाची जातीयवादी मोडतोड रोखण्यासाठी अनेक इतिहासकारांनी लढा उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. त्याद्वारे आपल्या सामूहिक इतिहासाचे सर्वसमावेशक आकलन करण्याचे त्यांनी ठरवले आहे. जातीयवादी, धार्मिक विद्वेषवादी शक्तींच्या विरोधात जाणार्या या आकलनासाठी या सर्व इतिहासकारांना बर्याच वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आणि इतर धोक्यांचा सामना करावा लागतो.
दिल्ली विद्यापीठाचे माजी इतिहास विभाग प्रमुख प्रा. डी. एन. झा, हे अशा काही प्रख्यात अभ्यासकांपैकी एक होते. डॉ. झा यांनी प्राणघातक धमक्यांचा सामना केला व जातीयवादी प्रवाहविरुद्ध संघर्ष केला. प्रा. झा यांचे 4 फेब्रुवारी 2021 रोजी निधन झाले. व्यावसायिक इतिहासकारांच्या जगाचेच नव्हे, तर आपल्या देशाचे बहुविध, सर्वसमावेशक स्वरूप व वारसा टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चळवळीचेही त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. लोकशाहीवादी, बहुविध अशा भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीच्या विचारसरणीच्या चळवळीच्या ते एक महान स्तंभ होते. धार्मिक विविधता टिकवणे आणि अल्पसंख्याकांकरिता आवश्यक न्यायपूर्ण असा बंधुभाव विकसित करणे, हे या विचारधारेचे उद्दिष्ट आहे. त्यांनी त्यांचे लिखाण आणि संशोधनातून ज्या-ज्या विषयांना स्पर्श केला, त्यातील सर्व मुद्दे आजही आपल्या समाजाला त्रास देत आहेत आणि त्यात सुद्धा धार्मिक अल्पसंख्याक लोकांना याची झळ बसत आहे, हे गंभीर आहे.
जेव्हा त्यांचे ‘मिथ ऑफ होली काऊ’ (पवित्र गायीचे मिथक) हे पुस्तक प्रकाशित झाले, तेव्हा त्यांना नियमितपणे फोन कॉल येऊ लागले आणि लोकांनी त्यांना धमक्या दिल्या. ‘पवित्र गायी’चा मुद्दा जाणूनबुजून समोर आणला जात होता. कारण याद्वारे मुस्लिमांवर दहशत बसवली जाऊ शकते. याद्वारे पुढे जाऊन मुस्लिमांना मॉब लिंचिंग (झुंडहिंसा) मुळे जीव गमवावा लागला. गुजरातमधील ऊना गावात मृत गायीचे कातडे काढण्यासाठी तेथील दलितांना जो हिंसाचार सहन करावा लागला, हे त्याचे एक ठळक उदाहरण आहे.
पुराणे, वेद यांच्या सखोल अभ्यासावर प्रा. झा यांची निरीक्षणे आणि निष्कर्ष आधारित होते. वैदिकपूर्व आणि वैदिकोत्तर काळामध्ये गायीचे मांस हे भारतीयांच्या आहाराचा भाग होते, हा एक निष्कर्ष त्यापैकी होता. त्यांचे संदर्भ, संशोधन हे विस्तृत होते आणि आहाराचा भाग असलेले गोमांस हे त्यांनी अतिशय तपशिलात नोंदवून ठेवले होते. इतर ठिकाणी याआधी एका वेगळ्या पातळीवर हे संशोधन, निरीक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा त्यांच्या ‘शूद्र कोण होते?’ या पुस्तकात उल्लेख करून प्रमाणित केले होते. तसेच स्वामी विवेकानंद यांनीसुद्धा याचा उल्लेख केला होता. स्वामीजी म्हणाले होते, “गोमांस न खाणारी व्यक्ती एक चांगला हिंदू असू शकत नाही आणि कधी-कधी त्यांनी गोमांस खाल्ले पाहिजे.” संदर्भ : विवेकानंद पासाडेना, कॅलिफोर्निया, यूएसए येथील शेक्सपिअर क्लबमध्ये ‘बौद्ध भारत’ या विषयावर बोलताना, 2 फेब्रुवारी 1900, (संदर्भ : स्वामी विवेकानंद ः समग्र वाङ्मय, खंड 3, कलकत्ता : अद्वैत आश्रम, 1997, पृ. 536.)
प्रा. झा यांच्या विद्वत्तापूर्ण कार्यामुळे विविधता असलेल्या खाद्यसंस्कृतीला मोठी शक्ती मिळाली, ज्यामुळे आहार आणि खाद्यसंस्कृती-परंपरा यांच्यातील विविधता जपून ठेवण्यासाठी ऐतिहासिक पुराव्याचा आधार मिळाला. जेव्हा काही काळापूर्वी राजस्थानातील हिंगोनियामध्ये उपासमार आणि आजारांमुळे शेकडो गायी गो-शाळांमध्ये मरण पावल्याची बातमी कळाली, तेव्हा हे दिसून आले की, जातीयवादी शक्ती याबाबत गंभीर नाहीत. यासंबंधात विजय त्रिवेदी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चरित्रामध्ये (‘हार नहीं मानूंगा’) लिहिलेल्या आठवणीप्रमाणे, जेव्हा वाजपेयी यांनी अमेरिकेत गोमांसचे सेवन केले होते, तेव्हा ते म्हणाल्याचे त्या पुस्तकात सांगितले आहे, “कमीत कमी मी भारतीय गोमांस तर खात नाही.”
राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधानांनी केले असून राम मंदिरासाठी निधी संकलनासाठी आता आक्रमकपणे धमकावण्याची मोहीम चालू आहे. हे चालू असताना राम मंदिर या विषयावर इतिहासकारांनी लिहिलेला ‘राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद : देशासाठी इतिहासकारांचा अहवाल’ हा अहवाल आठवतो. या अहवालात असं नमूद आहे की, तथाकथित रामजन्मभूमी येथे मंदिर असल्याचे कोणतेही पुरावे नव्हते किंवा राम जन्मल्याचे कोणतेही पुरावे नव्हते की ज्यामुळे मशीद तोडून टाकावी. जरी सर्वोच्च न्यायालयाने हा अहवाल फेटाळला असेल, तरी त्यांचा निर्णय त्याच दिशेने जाणारा होता. ही गोष्ट वेगळी आहे की, ज्यांनी मशीद उद्ध्वस्त केली आणि जो सर्वोच्च न्यायालयाने एक गुन्हा म्हणून नोंदवला होता, त्यांनाच मंदिर बांधकामासाठी जमिनीचे वाटप केले गेले.
नालंदाच्या विनाशाचा दोष बख्तियार खिलजीला देण्याचा प्रयत्न नेहमी केला जातो. या प्रकारचा जातीय इतिहास हा समाजाच्या मनोवैज्ञानिक पातळीवर उतरवण्याचा आणि त्याद्वारे ऐतिहासिक मिथक लोकांच्या अंतर्मनात उतरवण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे त्या काळच्या मुस्लिम राजांची कृत्ये ही आजकालच्या मुस्लिम नागरिकांशी जोडण्याचा प्रयत्न असतो. खिलजीने वेगवेगळ्या ठिकाणी विनाश घडवलासुद्धा असेल; पण नालंदामध्ये झालेला विध्वंस हा बौद्ध धर्माच्या उदयाला ब्राह्मण समाजाने दिलेली प्रतिक्रिया, हीच कारणीभूत होती. यासाठी विविध दस्तऐवजांचा दाखल देताना प्रा. डी. एन. झा म्हणतात की, “बुद्धिस्ट आणि ब्राह्मण भिक्षेकरी यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि त्यामुळे ब्राह्मणांनी सूर्यदेवाची पूजा केली आणि यज्ञ केला; तसेच ज्वाळांनी भरलेले कोळसे त्यांनी बौद्ध मंदिरात टाकले आणि नालंदातील महान ग्रंथालय ‘रत्नबोधी’ हे जाळून टाकले.” यासाठी विविध ऐतिहासिक पुराव्याच्या स्रोतांचा हवाला देताना प्रा. झा असे म्हणतात की, “बौद्ध आणि ब्राह्मण्यवादी चळवळी आणि नंतरच्या लोकांमधील भांडणामुळे ब्राह्मण भिक्षेकरू लोकांनी राग धरून बारा वर्षे सूर्यदेवाची आराधना केली, अग्नी-यज्ञ केले आणि पेटलेल्या निखार्याचे कोळसे बौद्ध मंदिरात फेकले आणि अखेरीस नालंदा येथील ‘रत्नबोधी’ नावाच्या ग्रंथालयाचा नाश झाला. नालंदातील विनाशासाठी खिलजीला जबाबदार ठरवणे, हे लक्ष भटकावण्याचे धोरण आहे आणि यामध्ये बुद्ध आणि ब्राह्मण यांच्यातील वाद लपवून ठेवण्याचे कारस्थान आहे.” (संदर्भ : हिस्ट्री ऑफ इंडियन लॉजिक, The Antiquarian Remains in Bihar, पृ. 327, लेखक : डी.आर. पाटील यांनी उध्दृत केल्याप्रमाणे).
अलिकडच्या काही वर्षांत घडलेली आणखी एक लज्जास्पद घटना म्हणजे मंगलोरमधील नाईट पबमध्ये मुलींवर झालेला हल्ला. ‘आरएसएस’चे माजी प्रचारक प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वात श्रीराम सेने या संघटनेने हे कृत्य केले होते. महिलांनी मद्यपान करणे हे भारतीय परंपरेच्या विरोधात आहे, या कारणावरून हा हल्ला झाला होता. प्रा. झा यांनी केवळ या कपोलकल्पित मिथकाचा भांडाफोड केला नाही, तर त्यांनी यावर Drink of Immortality (2020) हे एक पुस्तक लिहून महत्त्वाचे योगदान सुद्धा दिले. या पुस्तकाद्वारे दारू तयार करण्याच्या विविध पद्धतींचे विवेचन केले आहे आणि त्यानंतर पुरुष आणि स्त्रिया याचे सेवन कसे करत होते, याचे वर्णन सुद्धा केले आहे. याव्यतिरिक्त वेद, रामायण आणि महाभारतामध्ये दारूच्या सेवनाचा उल्लेख कसा केला गेला होता, त्याचा सुद्धा संदर्भ प्रा. झा यांनी पुस्तकात दिला होता.
झा हे समाज प्रगतिशील करण्यासाठीच्या प्रयत्न करणार्या शिक्षणतज्ज्ञांच्या प्रवाहाशी संबंधित होते. हे करताना त्यांनी संघर्ष केला आणि समाजातील विविधता, अनेकतावाद जपण्यासाठी काम केले. ते अशा एका समाजाच्या उभारणीसाठी काम करत राहिले, ज्यामध्ये वंचित आणि मागास लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणे त्यांनी कर्तव्य मानले. या महान इतिहासकाराला नम्र अभिवादन !
मूळ लेखक : राम पुनियानी
मराठी अनुवाद : राहुल विद्या माने