समाजबदलाची लढाई आणि आपली संवादपद्धती

डॉ. हमीद दाभोलकर -

आपली भाषा कशी असावी बोलणे, कसे असावे, याचे खरे म्हटले तर कोणतेही प्रशिक्षण आपल्याला नसते. या पार्श्वभूमीवर डॉ. नरेद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी करताना व्यक्ती आणि सामाजिक मूल्यपरिवर्तनाचा संवाद करताना वापरलेली भाषा आणि पद्धती यांचा विचार करणे आणि त्यामधून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणे हे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्ती आणि समाजपरिवर्तनाचा मूल्यसंवाद कसा केला, यामधून आपण काही शिकणे, हे डॉ. दाभोलकरांचे कृतिशील स्मरण ठरेल.

आजकाल घराघरांत, सोशल मीडियावर, समाजात सगळकडेच आपल्याला विनाकारण एकमेकांशी जोरजोराने भांडणारी माणसे दिसत असतात. सामाजिक चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना देखील अशी जोराची वादावादी आणि भांडणे काही नवीन नाहीत. काही वेळा ती वैचारिक स्वरुपाची असतात, तर काही वेळा अगदी क्षुल्लक म्हणाव्या अशा कारणावरून झालेली वैयक्तिक स्वरुपाची असतात. कारण कोणतेही असते, त्यांचे ठसे आपल्या मनावर उठत असतात. समाजबदलाची लढाई लढू इच्छिणार्‍या कार्यकर्त्याला तर अशा स्वरुपाच्या मतभेदाला अनेक वेळा सामोरे जायला लागते. देव आणि धर्म अशा संवेदनशील गोष्टींच्या बाबतीत संवाद करताना तर असे प्रसंग अनेक वेळा येतात. अशा वेळी आपली भाषा कशी असावी बोलणे, कसे असावे, याचे खरे म्हटले तर कोणतेही प्रशिक्षण आपल्याला नसते. या पार्श्वभूमीवर डॉ. नरेद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभी करताना व्यक्ती आणि सामाजिक मूल्यपरिवर्तनाचा संवाद करताना वापरलेली भाषा आणि पद्धती यांचा विचार करणे आणि त्यामधून आपण काही महत्त्वाच्या गोष्टी शिकणे हे महत्त्वाचे वाटते. त्यांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्ती आणि समाजपरिवर्तनाचा मूल्यसंवाद कसा केला, यामधून आपण काही शिकणे, हे डॉ. दाभोलकरांचे कृतिशील स्मरण ठरेल.

‘अंधश्रद्धा निर्मूलन करताना क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची अधिक गरज आहे,’ हे डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे वाक्य या भूमिकेचा गाभा आहे.

बुद्धिवादी चळवळीमध्ये काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्यात तर एक बुद्धिवादी असल्याचा अहंगंड निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. ज्या कुटुंबात आणि समाजात आपल्याला समाजपरिवर्तनाचे काम करायचे आहे, त्याला दुखावून झोडपून आपले काम कधीही यशस्वी होणार नाही; उलट अवघडच होणार आहे, हा साधा कार्यकारण भाव आपण अनेकदा समजून घेत नाही. मात्र डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी त्यांच्या कौटुंबिक, संघटनात्मक आणि सामाजिक आयुष्यात आपल्या उक्ती आणि कृती दोन्हींमधून ही भावना आपल्या सर्वांच्या पर्यंत सातत्याने पोचवली.

सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा दिसून येणारी दुसरी सवय म्हणजे दुसर्‍याचे शांतपणाने ऐकून न घेता स्वत:चे घोडे रेमटत राहणे. आपले विचार कितीही चांगले असले, तरी दुसर्‍याचे म्हणणे ऐकूनच न घेणे, त्यावर विचार न करणे आणि तरीदेखील आपण उदारमतवादी आहोत, असे म्हणणे यामध्ये एक अंतर्विरोध आहे. हे बदलायला हवे. समोरच्याचे विचार बदलायचे असतील तर त्याच्यावर जहरी टीका करणे, हा एक दुसरा मार्ग खूप वेळा अवलंबला जातो. अशी जहरी टीका करून किंवा समोरच्याला स्वतःविषयी कमीपणा वाटायला लावून माणूस बदलू शकत नाही. यशस्वी नातेसंबंधात ‘विन-विन’ पद्धत असते; म्हणजे दोघांचाही फायदा व्हायला हवा. आपल्याकडे नातेसंबंधात बहुतेक वेळा ‘विन-लूझ’ किवा ‘लूझ-लूझ’ पद्धत वापरली जाते; म्हणजेच एकाचा विजय आणि दुसर्‍याचा पराजय, किंवा दोघांचाही पराजय. या पद्धतींमधून बदल घडून येत नाहीत; अपयश मात्र येते. ‘विन-विन’ हे फक्त व्यावसायिक यशाचे सूत्र नाही. याला विवेकाचा आधार आहे. कारण यामध्ये दोघांचे मुद्दे विचारात घेऊन, योग्य-अयोग्याचा विचार करून मार्ग ठरविलेला असतो. त्यातून समाज जास्त पुढे जाण्याची शक्यता निर्माण होते. हे दैनंदिन जीवनात कसे करता येते, ते डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या वागण्यातून आपल्यातील अनेक जणांनी बघितले आहे.

जरा खोलात जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येऊ शकेल की, ‘महाराष्ट्र अंनिस’ची देव आणि धर्मविषयक भूमिका ही देखील या संवादी पद्धतीचा एक मूलभूत आधार आहे; ज्यामध्ये तुम्ही देव आणि धर्म मानता की नाही, यापेक्षा तुम्ही देव आणि धर्माच्या भूमिकांची तपासणी करण्यास तयार आहात का नाही, याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. त्यामधून संवादाचे मार्ग खुले राहतात. देव आणि धर्म हे मुद्दे एकमेकांना विरोध करण्याचे राहत नाहीत, तर चर्चेचे होतात, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे.

बहुतांश वेळा आपल्या भांडणात कुठला मुद्दा अधिक योग्य, असा विचार करण्यापेक्षा कोणती व्यक्ती अधिक योग्य, असा विचार केला जातो. बहुतांश वाद हे आपण दुसर्‍या व्यक्तीपेक्षा अधिक शहाणे कसे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी खेळले जात असतात. या वादांच्या मध्ये हरून काही वेळा आपल्या विचारांतील काही कमतरता लक्षात येणार असतात. अशा वेळी, ‘तुझा हा मुद्दा मला पटला,’ असे म्हणाल्याने आपल्याला काहीही कमीपणा येत नाही. आपल्याला मान्य नसलेल्या प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक वेळी व्यक्त होणे आवश्यक असते, असे देखील नाही. काही वेळा त्या वेळेपुरते शांत राहून थोड्या कालावधीने त्याविषयी परत विचार करणे, हे देखील फायद्याचे ठरू शकते. डॉ. नरेंद्र दाभोलकर अनेक बैठकांच्या मध्ये या पद्धतीने मतभेद हाताळत असल्याचे देखील आपल्यातील अनेक लोकांनी अनेक वेळा बघितले आहे.

प्रत्येक वेळा आपल्यामधील मतभेद हे सुटू शकणारे असतातच, असे देखील नाही. काही मतभेद हे टोकाचे असू शकतात. अशा वेळी आपण भांडत राहण्यापेक्षा चांगलेपणाने वेगळे होणे, हे देखील एक कौशल्यच आहे. वैयक्तिक आयुष्याप्रमाणे सार्वजनिक आयुष्यात वाद हे होतच असतात. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना देखील त्यांच्या आयुष्यात अशा वादविवादांना सामोरे जावे लागले; पण हे मतभेद सुटण्याची शक्यता नाही, हे लक्षात येताच त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात त्याविषयी सार्वजनिक काय, तर खाजगी मध्ये देखील चकार उल्लेख केले नाहीत.

हे साध्य करण्यासाठी एका बाजूला मानवी जीवनाविषयी अपार आस्था आणि दुसर्‍या बाजूला मानवी स्वभावाच्या मर्यादांचे भान या दोन्ही गोष्टींचे संतुलन आपल्याला साधावे लागते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नवव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांची आठवण काढताना त्यांच्यामधील या संवादकौशल्याचा काही अंश आपल्यामध्ये आपण बनवण्याचा प्रयत्न करूया!

hamid.dabholkar@gmail.com


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]