‘कोविड-19’वरील गुणकारी औषधनिर्मितीची बिकट वाट!

प्रभाकर नानावटी - 9503334895

संपूर्ण जगाचे लक्ष वेधत असलेल्या ‘कोविड-19’च्या रोगजंतूना थोपवणार्‍या औषधाची व/वा लसीची आता नितांत गरज आहे. परंतु नेहमीच्या औषधनिर्मितीच्या वेळखाऊ व खर्चिक मार्गाने जात औषध शोधण्याची चैन आता या क्षणी कुठल्याही देशाला परवडणारी नाही. त्यामुळे या आजारासाठी काही पर्यायांचा विचारही केला जात आहे.

रोगाणूविरुद्धचा लढा

‘कोविड – 19’ या महामारीवर जालीम उपाय शोधण्यासाठी (किंवा ते न जमल्यास किमान या संसर्गजन्य रोगाला काही प्रमाणात तरी आटोक्यात आणण्यासाठी!) जगभरातील एकूण एक राष्ट्रे रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. कोस्टारिकासारख्या छोट्या राष्ट्रापासून चीन, अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांपर्यंत बहुतेक राष्ट्रे कोरोनावर अक्सर इलाज शोधून जगाला रोगमुक्त करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. बाजारीकरणाच्या या कालखंडात औषधं वा लसीकरणाच्या मक्तेदारीतून जबरदस्त किंमत वसूल करून त्यांना श्रीमंतही व्हायचे आहे. त्यासाठी सर्व सत्ताधार्‍यांनी त्या-त्या देशातील संशोधक, मोठमोठ्या (व अगदी लहानातल्या लहान) औषधी कंपन्या, त्यांच्या लॅब्स, विद्यापीठातील रसायनशास्त्राचे व/वा वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक, ‘स्टार्ट अप’चे नवे उद्योजक, व्हेंचर कॅपिटलिस्ट इत्यादींना या कामासाठी जुंपले आहे. ते जीवाचे रान करत लवकरात लवकर औषध/लस शोधून या दुर्धर रोगापासून जगाला मुक्त करण्याचे स्वप्न वास्तवात आणणार आहेत. या संबंधात आपापसांतील मतभेद विसरून जागतिक सहयोगाची भाषासुद्धा बोलली जात आहे. कोरोनाची लक्षणं ओळखणे, त्याचे निदान करण्यासाठीची सुटसुटीत पद्धत, त्यावरील नेमका रोगोपचार, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी लस व ही महामारी पसरू नये, यासाठी उपाय इत्यादी आघाड्यांवर प्रयत्न चालू आहेत. औषधावरील संशोधन आणि विकसन या बाबतीतील कडक नियमावली, प्रदीर्घ, गुंतागुंतीची, खर्चिक आणि संशोधकांच्या संयमाची परीक्षा पाहणारी औषधनिर्मितीची प्रक्रिया इत्यादीमुळे बाजारात अचानक एखादे औषध आणणे किचकट गोष्ट ठरू शकते.

जगभरातील हजारो-लाखोजण अलीकडील कोरोना महामाऱीला बळी पडलेले आहेत. त्यामुळे या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी निदान करू शकणार्‍या किट्सपासून संपूर्ण जगातील मानवी प्राण्याच्या श्वासोच्छ्वासालाच अडथळा करणार्‍या कोरोना व्हायरसला आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती अटकाव करू शकेल, अशा लसीपर्यंत वेगवेगळे साधन-सुविधा, उपचारपद्धती इत्यादी शोधण्यासाठी सर्व राष्ट्रे रात्रंदिवस अहर्निश काम करत आहेत. परंतु व्हायरसमुक्त जग कायमच स्वप्नवत राहील, असा अनेक तज्ज्ञांचा कयास आहे. कारण आज कोरोनापासून कदाचित मुक्ती मिळेलही; परंतु अजून एखादा व्हायरस कुठे तरी टपून बसलेला असल्यास त्याचा मुकाबला कसा करणार? रोगाणूविरुद्धचा हा लढा मानव उत्क्रांत होऊ लागला त्या दिवसापासूनचा आहे व या लढ्यात काही प्रमाणात यश मिळविण्यात विज्ञानाचा वाटा फार मोठा आहे.

रोगोपचार

रोगाणूंच्या इतिहासाकडे एक धावती नजर टाकल्यास प्रत्येक रोगजंतू/विषाणू/रोगाणू यांची रचना, मानवी शरीरातील रोग प्रतिकारक शक्तीला मात करून त्यांची शरीरात प्रवेश करण्याची रीत, शरीर पोखरून टाकण्याची त्यांची क्षमता, शरीरात गेल्यांनतर त्यांची कमीत कमी वेळेत होत असलेली गुणोत्तर वाढ, मानवी शारीरिक क्रिया-प्रक्रियांवर ते करत असलेले दुष्परिणाम इत्यादीमुळे प्रत्येक रोगजंतू हा एकमेवाद्वितीय असू शकतो. त्यामुळे सर्व प्रकारच्या विषाणूंसाठी एकमेव ‘मॅजिक पिल’ किंवा एका दमात दोन-चार रोग बरे करणारी ‘पॉलिपिल’ अजूनपर्यंत शोधता आलेली नाही. मुळात कुठल्याही रोगावरील कुठलेही नवीन औषध शोधणे, हे नेहमीच आव्हान ठरू शकते. आजाराचा सर्व बाजूने अभ्यास, त्यावरून काही रासायनिक घटकांची जुळणी, त्यांचे विश्लेषण, प्राथमिक प्रयोग, त्याची क्लिनिकल चाचणी, उत्पादन प्रणाली, नियामक समितीकडून मान्यता, उपदुष्परिणामांचा मागोवा इत्यादीसाठी फार मोठ्या प्रमाणात पैसाही ओतावा लागतो व वेळही द्यावा लागतो. प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल असलेल्या औषध निर्मितीतील स्वामित्व हक्काच्या (Patent Rights) गुंतागुंतीमुळे प्रत्येक देशाला फार मोठी किंमत मोजावी लागत आहे.

परंतु अशा प्रकारे वैज्ञानिकरित्या रोगजंतूंचा सामना करता येऊ शकतो व त्यातून आजार बरा होऊ शकतो, हे मानवी समाजाला कळण्यासाठी औद्योगिक क्रांतीनंतरचे 19 वे शतक उजाडावे लागले. आधुनिक वैद्यकशास्त्राचा जन्म औद्योगिक क्रांतीनंतर झाला, असे म्हणावयास भरपूर वाव आहे. त्यापूर्वीच्या काळात एकूण आजारपण व मृत्यू यांच्याबद्दलच्या चित्र-विचित्र कल्पना मानवी समाज बाळगून होता. जसजशी कार्यकारण संबंधाबद्दलची समजूत वाढू लागली, तसतशी सर्दी-पडशासारखे आजार काही जडी-बुटी खाल्ल्यामुळे बरे होतात, हे त्यांच्या लक्षात येऊ लागले. काही ठोकताळ्यांवरून विशिष्ट अन्नपदार्थांच्या सेवनातून काही आजार बरे होऊ शकतात, हेही त्यांना कळू लागले. काही झाडांच्यामध्ये औषधी गुण आहेत, हे त्यांना उमजले. विषारी वनस्पती कोणत्या व औषधी गुण असलेले वनस्पती कोणत्या, यांची समज त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या आवाक्यातील आजारावर या औषधी वनस्पती गुणकारक ठरत होत्या. अशा प्रकारचा पारंपारिकरित्या वापरात असलेला ‘आजीचा बटवा’ अनेक काळ रोगोपचारात कामी येत होता. अजूनही अशा प्रकारच्या जडी-बुटीवरील विश्वासाला तडे गेले नाहीत. त्यालाच ‘हर्बल मेडिसिन’ या गोंडस नाव देऊन त्याचा मोठ्या प्रमाणात धंदा केला जात आहे.

आजारपण व मृत्यू यांचा एकमेकाशी संबंध असू शकतो व ते नैसर्गिक आहे, हे त्या काळी त्यांच्या लक्षात आले नव्हते. सर्दी-पडसे, खोकला, हगवण, अपचन इत्यादी लहान-सहान आजार घरगुती उपायाने बरे होतात, याबद्दल त्यांची खात्री होती. परंतु जीवघेण्या आजाराबद्दल त्यांची कल्पना अगदीच वेगळी होती. या प्रकारच्या आजारामागे काही अतींद्रिय शक्ती असावी वा दैवी प्रकोप असावा, असे त्यांना वाटत होते. आपल्या हातून काही तरी वाईट कृत्य घडल्यामुळे परमेश्वर वा भूतयोनीतील काही अतृप्त आत्मे आपल्यावर रागावतात व अदृश्यरित्या मानवी शरीराचा ताबा घेऊ शकतात, वेदना देतात व प्रसंगी मारूनही टाकतात, याबद्दल त्यांच्या मनात शंका नव्हती व त्यासाठी तांत्रिक-मांत्रिक (वा विच-डॉक्टर्स) यांचा त्यांना आधार वाटत होता. मग हे मांत्रिक शरीराचा ताबा घेतलेल्या भूत-पिशाचाला घालवून देण्यासाठी कित्येक प्रकारचे अघोरी उपाय करत होते व त्याला समाजमान्यता होती. ब्रिटन, फ्रान्स, पेरू इत्यादी देशात मानववंशशास्त्राच्या अभ्यासकांनी केलेल्या उत्खननात हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी सांगाड्यात भोक पाडलेले मेंदूच्या कवट्या सापडल्या आहेत. यावरून आजार बरे करण्यासाठी कवटीला भोक पाडत असावेत, असे तज्ज्ञांचे निष्कर्ष आहेत.

मानवी समाजातील धर्माच्या जादूई चमत्कारावरील गाढ श्रद्धासुद्धा आजारपणातील औषधोपचारांचाच फार मोठा भाग होता. तोंडावाटे कुठले तरी वनस्पती औषध घेत असताना मोठमोठ्यांदा मंत्रोच्चार, वेडेवाकडे हातवारे, बेधुंद नाच-गाणे यांची रेलचेल होती. जादूगारासारखी काहीतरी हातचलाखी दाखविल्याशिवाय औषध घेतले जात नव्हते. म्हणूनच विच-डॉक्टर्स व तांत्रिक-मांत्रिकांचा धंदा तेजीत होता. मंतरलेले गंडे, दोरे, तावीज, ताईत यासारखे प्रकारसुद्धा रोगोपचाराचेच होते व आजसुद्धा तीच परंपरा आपल्यासारख्या देशात रूढ आहे.

प्लॅसिबो परिणाम

ओरखडणे, चावणे, पडणे, आघात होणे वा किरकोळ अपघातामुळे हाडाला चीर पडणे व/वा हाड मोडणे इत्यादीवर काही घरगुती उपचार वगळता पूर्वीच्या काळातील रोगोपचार हा नेहमीच शरीर व मन यांच्याभोवती फिरत होता. जी काही औषधं दिली जात होती व उपचार केले जात होते, त्यातील बहुतेक भाग मानसिक समाधानावर भर देणारा होता. प्लॅसिबो परिणामावर निर्भर होता. प्लॅसिबो उपचार हा शरीरातील मूळ आजार बरा न करता रोग बरा झाल्याचा व वेदनामुक्त झाल्याचा भास निर्माण करत असतो. मानसिक समाधान मिळत असल्यामुळे हाच प्लॅसिबो परिणाम पर्यायी रोगोपचार पद्घतीत मोठ्या प्रमाणात अजूनही वापरला जात आहे. शरीरशास्त्राचा नीटपणे अभ्यास नसल्यामुळे रोगोपचारात नेमके काय होते, याची कल्पना त्याकाळी नव्हती. ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीने रोगोपचार विकसित होत गेला. काही वेळा अपघाताने वा योगायोगाने आजारावर अत्यंत गुणकारी व सहजपणे उपलब्ध असणारी औषधं सापडलेली उदाहरणं आहेत. ‘स्कर्व्ही’ या जीवघेण्या आजारासाठी मुबलक प्रमाणात ‘क’ जीवनसत्व असलेला लिंबाचा रस अत्यंत गुणकारी असतो, हे योगायोगाने कळले व त्यानंतर केलेल्या वैज्ञानिक व नियंत्रित चाचणीत ते सिद्धही झाले. परंतु जसजसे शरीरशास्त्र, जीवशास्त्र व इतर संबंधित ज्ञानशाखांबद्दलच्या ज्ञानात भर पडू लागली, तसतसे रोगोपचार पद्धतीतील अनिष्ट प्रथा नाहीशा होऊ लागल्या. ठोकताळ्यावर आधारलेले रोगनिदान व रोगलक्षण ओळखण्याच्या डॉक्टराच्या निव्वळ अनुभवावर आधारलेल्या पद्धतीऐवजी वैज्ञानिकरित्या सिद्घ झालेल्या पद्धती रूढ होऊ लागल्या.

आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धती

काही दशकांपूर्वी औषधं बाजारात येण्यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षा चाचण्या केल्या जात नव्हत्या व तेव्हा ते सक्तीचेही नव्हते. औषधांना किंवा त्यात वापरलेल्या घटकांचे दुष्परिणाम असू शकतात, हे फारसे लक्षात आले नव्हते. सारा फोकस औषधाच्या आजार बरा करण्याच्या गुणवत्तेवर होता; सुरक्षिततेवर नाही. त्यामुळे काही वेळा औषधाचे दुष्परिणाम दिसू लागले. या औषधामुळेच रुग्ण दगावल्याचे प्रमाण वाढल्यामुळे नंतरच्या काळात कोणत्याही नवीन औषधाच्या चाचण्या प्राण्यांमध्ये करून त्याची सुरक्षितता तपासणे अनिवार्य केले. मानवी आरोग्यासाठी तो प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. प्राण्यांवर चाचण्या केल्यानंतर हळूहळू माणसांमध्येही औषधाच्या चाचण्यांना परवानगी मिळू लागली.

अशा प्रकारे आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीला हळूहळू का होईना समाजमान्यता मिळू लागली. या उपचार पद्धतीतील अत्यंत महत्त्वाचा वाटा अचूकपणे निदान केलेल्या आजारासाठी लागणार्‍या गोळ्या, कॅप्सुल्स, इंजेक्शन्सला लागणारे डोजेस व लसीकरणाची औषधं यांचा आहे. ही औषधं बाजारात येण्यापूर्वी विविध प्रकारच्या चाचण्यांच्या टप्प्यातून त्यांना जावे लागते. औषधांना मान्यता देणार्‍या त्या-त्या देशातील नियामक समितीने ठरवून दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यानंतरच रोगोपचारासाठी त्यांच्या वापरास अनुमती दिली जाते. ही समिती औषधाची गुणकारकता व त्याच्या वापरामुळे रुग्ण सुरक्षित राहून त्याच्यावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत, याची कटाक्षाने काळजी घेत असते.

औषधनिर्मिती

औषधी निर्माण क्षेत्रात संशोधन व विकास करणार्‍या कंपनीतील संशोधक गटाला जेव्हा एखाद्या रोगावर परिणामकारक औषधाचा शोध लागल्याची चाहूल लागते, तेव्हा नियामक समितीला आपला प्रस्ताव पाठविण्यापूर्वी प्रयोगशाळेच्या स्तरावर त्याची चाचणी घेतली जाते. या टेस्ट ट्यूब स्टेजला क्लिनिकलपूर्व संशोधन व औषधाला प्रायोगिक औषध असे म्हटले जाते. या टप्प्यात प्रायोगिक औषधातील रासायनिक घटक, त्यांची संयुगे, रासायनिक विश्लेषण, संश्लेषणाचे विवरण, वापरलेल्या घटकांची विषाक्तता (toxicity), माणूस सोडून इतर प्राण्यांवर त्याचे होत असलेले परिणाम इत्यादी गोष्टींचा अभ्यास केलेला असतो. औषधाला मान्यता मिळाल्यास त्याची उत्पादन प्रक्रिया कशी असेल, याबद्दलची प्राथमिक माहिती गोळा केली जाते. या सर्व माहितीचा अहवाल त्या-त्या देशातील औषध नियामक समितीकडे मंजुरीसाठी पाठविला जातो. ही समिती या प्रायोगिक औषधाचे रुग्णावर प्रयोग करावेत की नाही, हे ठरवते. औषधामुळे रुग्णावर काही दुष्परिणाम तर होणार नाही, याची खात्री करून माणसांवर प्रयोग करण्याची अनुमती देते. साधारणपणे टेस्ट ट्यूब स्टेजवरील 1000 औषधांपैकी एखादेच औषध या चाचणीत उत्तीर्ण होते.

डबल ब्लाईंड क्लिनिकल चाचण्या

नियामक समितीच्या अनुमतीनंतर या प्रायोगिक औषधाचे परिणाम आजमावण्यासाठी माणसावर चाचण्या घेतल्या जातात. त्यासाठी प्रायोगिक औषधाला तीन टप्प्यांना सामोरे जावे लागते. पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या वयोगटातील 20 ते 80 निरोगी स्वयंसेवकावर या प्रायोगिक औषधाचे उपचार वर्षभर केले जातात. या टप्प्यात प्रायोगिक औषधाच्या सुरक्षिततेचा लेखाजोखा, चयापचयावर होणारे परिणाम, औषधाची उत्सर्जन प्रक्रिया इत्यादी गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते. काही त्रुटी असल्यास पुन्हा एकदा औषधात योग्य सुधारणा करण्यासाठी मूळ ठिकाणी परत पाठवले जाते. दुसर्‍या टप्प्यात ज्या आजारासाठी प्रायोगिक औषधाची चाचणी घेतली जात आहे, त्याच आजाराने पीडित असलेल्या रुग्णावर त्यांच्या संमतीने औषध देऊन त्याची गुणकारकता तपासली जाते. हा टप्पा पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. अशाच प्रकारच्या आजाराने त्रस्त असलेल्या अजून एका गटाला वरवरून प्रायोगिक औषधासारखे रंग-रूप असणारे; परंतु त्यात प्रायोगिक औषधाचे कुठलेही घटक नसलेले औषध दिले जाते. यावरून हे औषध खरोखरच गुणकारी आहे की रुग्णाला मानसिक समाधान देणारे, केवळ प्लॅसिबो परिणाम काम करत आहे, हे कळू शकते. औषधाच्या सुरक्षिततेविषयीच्याव औषधाच्या उपदुष्परिणामांच्या नोंदी या टप्प्यात ठेवल्या जातात. तिसर्‍या टप्प्यात हॉस्पिटलमधील हजारो रुग्णांना हे प्रायोगिक औषध देत त्याच्या परिणामकारकतेचे मोजमाप केले जाते. प्रत्येक रुग्णाच्या आरोग्य स्थितीची निरीक्षणं नोंदविली जातात. वेगवेगळे डोज देऊन त्याच्या रुग्णावरील परिणामाची नोंद ठेवली जाते. या प्रकारच्या चाचण्यांना ‘स्वैर डबल ब्लाइंड क्लिनिकल चाचण्या’(ठरपवेाळीशव र्ऊेीलश्रश इश्रळपव उश्रळपळलरश्र ढीळरश्री) या नावाने ओळखले जाते. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी किमान 3 वर्षे लागतात.

एक मात्र खरे की, अगदी नवीन औषधासाठी हे सर्व टप्पे पूर्ण केल्याशिवाय मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यास कंपनीला अनुमती मिळत नाही. या सर्व टप्प्यातील बारीक-सारीक नोंदी व निष्कर्षांचा अभ्यास समितीने नेमलेल्या एका वेगळ्या तज्ज्ञ गटासमोर ठेवले जाते. औषधाचा हा अहवाल हजारेक पानांचा असू शकतो. तज्ज्ञगट औषधाच्या गुणवत्तेचा अभ्यास करून औषध बाजारात आणायचे की नाही, याबद्दल आपले मत व्यक्त करते. अनुकूल मत असल्यास औषधाचे उत्पादन करून बाजारात आणले जाते; प्रतिकूल मत असल्यास औषध बाजारात येत नाही. काही वेळा वापरात असलेले औषध वा त्यात काही बदल करून अनुमतीसाठी नियामक समितीकडे कंपनी पाठवू शकते. आपत्कालीन परिस्थिती व तातडीच्या औषधासाठी यातील काही गोष्टींची सूट समिती देऊ शकते. परंतु क्लिनिकल चाचणीविना कुठलेही औषध बाजारात येत नाही. एवढेच नव्हे, तर ही समिती उत्पादन प्रक्रिया व जाहिरातीवरही पाळत ठेवते व कंपनी काहीतरी भलते-सलते सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्यास समिती त्या कंपनीवर कारवाई करू शकते. औषधं बाजारात आणण्यासाठी या सर्व गोष्टी करूनसुद्धा काही औषधांचे विपरीत परिणाम थोड्याशा कालावधीनंतर लक्षात आल्यामुळे ती औषधं बाजारातून बाद केली गेली व त्यांच्या वापरावर मनाई करण्यात आली.

औषधाबद्दल जागरूकता

क्लिनिकल चाचण्या यशस्वीपणे पार केल्यांनतरसुद्धा पुढील काही वर्षे समिती त्या उत्पादनाच्या दुष्परिणामाविषयी जागरूक असते. ग्राहकांची तक्रार असल्यास समिती कडक कारवाई करू शकते व बाजारातून औषधाची हकालपट्टी करू शकते. बहुतेक देशांत अशा प्रकारच्या तक्रारींची दखल स्वतंत्रपणे एखाद्या संघटनेतर्फे घेतली जाते. कंपनी/प्रशासनावर दबाव आणून संघटना ग्राहकांचे हित जपण्याचा प्रयत्न करत असते. अमेरिकेत ‘मेडवॉच’ नावाची संघटना याविषयी सक्रिय आहे. आपल्या येथेसुद्धा ‘फार्माकोव्हिजिलन्स’ ही संघटना अशा प्रकारच्या तक्रार निवारणाचे कार्य करते. क्लिनिकल चाचणीतील सर्व गोष्टींच्या मागे गुप्ततेचे वलय असल्यामुळे त्याचा फायदा कंपनी घेऊ शकते व अफाट दावे करत सामान्य जनतेची दिशाभूल करू शकते. ‘कोक्रेन कोलॅबरेशन’ या 14 हजार तज्ज्ञ सभासद असलेल्या संघटनेने ‘रोश’ या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या ‘टॅमीफ्ल्यू’ या औषधातील क्लिनिकल चाचणीतील खोटेपणा उघड केल्यामुळे ही कंपनी चांगलीच गोत्यात आली.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधत असलेल्या ‘कोविड-19’च्या रोगजंतूना थोपवणार्‍या औषधाची व/वा लसीची आता नितांत गरज आहे. परंतु नेहमीच्या औषधनिर्मितीच्या वेळखाऊ व खर्चिक मार्गाने जात औषध शोधण्याची चैन आता या क्षणी कुठल्याही देशाला परवडणारी नाही. त्यामुळे या आजारासाठी काही पर्यायांचा विचारही केला जात आहे. या रोगलक्षणांच्या जवळपास असलेल्या ‘इबोला’ वा ‘झायका’सारख्या साथीच्या आजारावरील औषधं या आजारासाठी वापरता येतील का, याचा शोध घेताना अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस (Gilead Sciences) या कंपनीने ‘इबोला’साठी विकसित केलेले रेम्डेसिविर (remdesivir) व जपानच्या ‘फुजिफिल्म’ कंपनीचे पीत ज्वरासाठीचे फेविपिराविर (favipiravir) ही दोन होतकरू औषधं सापडली आहेत. या औषधांचे जगभर उत्पादनही होत असल्यामुळे सुधारित औषधांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून जगभर वितरण करण्यात काही अडचण येणार नाही, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. परंतु या सुधारित औषधांची मर्यादित क्लिनिकल चाचणी केल्याशिवाय त्यांच्या सुरक्षिततेची हमी देता येत नाही, हेही तितकेच खरे. त्यामुळे घाई-गडबडीत असली वा कुठली तरी औषधं बाजारात आणून अगोदरच भेदरलेल्या रुग्णांच्या माथी मारणे योग्य ठरणार नाही. रुग्णांना आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटू नये, एवढी काळजी मायबाप सरकार घेईल, हीच किमान अपेक्षा!

विषाणूंचे स्रोत

‘सार्स’चा विषाणू; तसेच ‘कोविड-19’चा विषाणू हे दोन्ही प्राण्यांकडून माणसांकडे संक्रमित झाले आहेत. या दोन्ही बाबतीत संशयाची सुई वटवाघूळ व मार्जर कुलातील काही प्राण्यांकडे झुकलेली आहे; पण नेमका स्रोत अजून कळलेला नाही. ‘इन्फ्ल्युएंझा’प्रमाणेच या आजारांमध्येही विषाणूचा मूळ स्रोत असलेले प्राणी व माणसे यांचे सान्निध्य असलेली ठिकाणे ही या आजारांची उगमस्थाने आहेत. या दृष्टीने चीनमध्ये विविध प्रकारचे जंगली प्राणी खाद्यपदार्थ म्हणून विकले जात असलेल्या बाजारपेठांकडे बोट दाखवले जाते. ‘कोविड-19’च्या साथीची सुरुवात चीनच्या वुहानमधील अशाच एका बाजारपेठेतून झाली, यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे विविध प्रकारचे जंगली प्राणी खाण्याच्या चीन व इतर आग्नेय आशियाई देशांच्या सवयीविरुद्ध बराच ओरडा केला जात आहे.

कोणत्याही भूप्रदेशातील खाण्या-पिण्याच्या सवयी या स्थानिक भौगोलिक व हवामानीय परिस्थिती, स्थानिक पातळीवर विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची उपलब्धता व ऐतिहासिक कारणांमधून निर्माण झालेले सांस्कृतिक संदर्भ या सार्‍यांशी जोडलेल्या असतात. उदा. कंबोडियामध्ये खूप वर्षेदुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला, तेव्हा नाईलाजाने लोक कोळी आणि रात्री दिव्यांभोवती जमा होणारे कीटक गोळा करून खाऊ लागले; पण आता हा त्यांच्या पारंपरिक खाद्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे कोणत्याही अशा प्रकारच्या आजाराचा संबंध थेट विशिष्ट समाजांच्या खाण्या-पिण्याच्या सवयींशी जोडण्याबाबत आपण संवेदनशील असायला हवे.

वन्य प्राणी आणि माणसे यांचे सान्निध्य केवळ खाण्याच्या सवयींमधूनच येते, असे नाही. शहरीकरणाच्या रेट्यामुळे; तसेच शेती, कारखानदारी, खाणी इ. साठीही आपण मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक अधिवासांवर अतिक्रमण करत आहोत. परिणामी विविध प्रकारचे वन्य प्राणी आपल्याला आता भारतातही लोकवस्त्यांच्या आसपास वावरताना दिसतात. उदा. मुंगूस, वटवाघळे, मोर, गिधाडे, साप इ. लोक कौतुकाने अशा प्राण्यांची छायाचित्रे समाजमाध्यमांवर डकवतही असतात; म्हणजेच हे प्राणी आपल्या जेवणाच्या ताटांमध्ये येत नसले, तरी आपल्या खूप जवळपास वावरत आहेत. त्यांच्या सान्निध्यामुळे काही नवे विषाणू मानवात संक्रमित होऊ शकतात व पुढे जाऊन भारतही एखाद्या विषाणूजन्य रोगाचे उगमस्थान ठरू शकतो.

याशिवाय पशुपालनाचा व्यवसाय भारतात जिथे-जिथे चालतो, तिथे माणूस आणि विविध प्राणी यांच्यात अतिसान्निध्य येतेच आहे. काही लोक एकीकडे चिनी लोकांना नावे ठेवत, दुसरीकडे गोमूत्र प्या, गायीचे शेण खा आदी प्रकारचा प्रचार करत असतात आणि यातली विसंगती व धोका त्यांच्या लक्षातही येत नाही.

तेव्हा मुद्दा फक्त खाण्याच्या सवयींपुरताच मर्यादित नसून एकंदरीतच वन्य जीवांचे अधिवास सुरक्षित ठेवण्याशी व कोणत्याही कारणांमुळे प्राण्यांबरोबरचा संपर्क होत असताना आवश्यक काळजी बाळगण्याशी जोडलेला आहे, याची आपण सर्वांनी जाणीव ठेवायला हवी.

. दि. कर्वे आणि प्रियदर्शिनी कर्वे (सौजन्य ः शैक्षणिक संदर्भ)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]