अमृतशुद्धीची कथा

ह.भ.प. देवदत्त परुळेकर - 9422055221

समाजप्रबोधनासाठी संतांनी सुंदर कथात्मक आख्यान काव्याचीही रचना केलेली आहे. आबालवृद्धांना कथा ऐकायला आवडते. महत्त्वाची तत्त्वे कथेच्या माध्यमातून सांगितली तर ऐकणार्‍याच्या मनात ठसतात, हे संतांना चांगले माहीत होते. त्यामुळे ज्ञानेश्वर माउलींपासून सर्व संतांनी ‘कथा’ या माध्यमाचा उत्कृष्ट वापर केलेला आपल्याला पहायला मिळतो.

संत एकनाथांनी सांगितलेली ‘अमृतशुद्धीची कथा’ अशीच लोकविलक्षण आहे. नाथांचा आणि एकूणच वारकरी संतांचा सामाजिक दृष्टिकोन काय होतो, हे या कथेतून आपल्याला सहज लक्षात येऊ शकेल.

अमृतासी रोग स्वर्गी जाहला पाही ।

अमरनाथा तेंही गोड नसे ॥

नारदाते प्रश्न करी अमरनाथ ।

शुद्ध हे अमृत कोठें होंय ॥

नाथांनी कथेची सुरुवातच मोठी विलक्षण केली आहे. अमृत प्राशन केल्याने सर्व रोग नष्ट होतात. अमृत पिल्याने अमरत्व प्राप्त होते, मृत्यूचा रोग नष्ट होतो, तर इतर रोगांची काय कथा? पण नाथ सांगतात, “एकदा या अमृतालाच रोग झाला. तो सुद्धा स्वर्गात. आता स्वर्ग ही सुखोपभोग भोगण्याची भूमी. तिथे कुणालाच कोणताही रोग कसा होईल? पण या स्वर्गात एकदा अमृताला रोग झाला. अमृत हा अत्यंत गोड, मधुर पदार्थ. पण रोग झाल्याने अमृत कडू झाले. तेव्हा ते अमृत इंद्राला गोड लागेनासे झाले. इंद्राला मोठी काळजी वाटू लागली. असुरांना बरोबर घेऊन सागर मंथन करून मोठ्या प्रयासाने अमृत मिळवले खरे, पण आता काय करायचे? या अमृताचा रोग कसा बरा व्हायचा? देवांना संकट पडले की संतांनाच शरण जावे लागते. देवांचा राजा इंद्र नारदमुनींना शरण आला व त्याने नारदांना प्रश्न केला, “आता हे अमृत कोठे शुद्ध होईल?”

सांगे तयेवेळीं ऐका हे भूतळी।

सांगेन नव्हाळी तुम्हांपाशी ॥

पंढरी वैकुंठ आहे भूमीवरी ।

पुंडलीकाचे द्वारी देव उभा ॥

अनाथाचा नाथ विटेवरी उभा ।

एका जनार्दनीं गाभा लावण्याचा ॥

त्या वेळी नारद इंद्राला म्हणाले, “पृथ्वीवर अपूर्वता आहे ती तुम्हाला सांगेन. पृथ्वीवर पंढरी नगरी हे प्रत्यक्ष वैकुंठ असून पुंडलिकाच्या द्वारी देव उभा आहे. लावण्याचा गाभा, अनाथांचा नाथा, पंढरीनाथ तिथे विटेवरी उभा आहे.”

नारदांनी पुढे इंद्राला पंढरीचे माहात्म्य सांगितले.

पंढरीची मात सांगे नारद मुनी ।

संतांचे कीर्तनी नाचे देव ॥

नामाच्या नजरें नाचताती संत ।

सुरवरांचा तेथे काय पाड ॥

तिहीं लोकीं पाहतां ऐसें नाही कोठें।

कैवल्याची पेठ पंढरी देखा ॥

ऐकोनि अमरनाथ संतोषला मनी ।

एका जनार्दनी नारद सांगे ॥

नारदांनी इंद्राकडे पंढरीचे वर्णन केले. ते असे की, इथे देव संतांच्या कीर्तनात नाचत आहे, संत नामाचा गरज करून जेथे नाचतात ते देवादिकांची काय थोरवी? स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांत पाहिले असता पंढरी सारखे कोठे आहे? पंढरी ही मोक्षाची पेठ आहे. नारदमुनींचे हे सांगणे ऐकून इंद्राला मनोमन मोठा आनंद झाला.

पंढरीचे माहात्म्य वर्णन करून नारदांनी इंद्राला पुढे अमृत शुद्धीचा उपाय सांगितला.

तया ठायीं जातां शुद्ध होय अमृत ।

नारदें ही मात सांगितली ॥

तेंव्हा एकादशी आली सोमवारी ।

विमान पंढरीं उतरलें ॥

पंढरीला गेले असता तिथे हे रोग झालेले अमृत शुद्ध होईल, असे नारदाने इंद्राला सांगितले. तेव्हा सोमवारी जेव्हा एकादशी आली त्या दिवशी इंद्राचे विमान पंढरीत उतरले.

अमृताचे ताट घेऊन आला इंद्र।

गर्जती सुरवर जयजयकारें ॥

देव सुरवर आले पंढरीसी ।

नामा कीर्तनासी उभा असे ॥

सुरवर देव बैसले समस्त ।

कीर्तनी नाचत नामदेव ॥

एका जनार्दनी देव कीर्तनासी

सांडोनीं स्वर्गासी इंद्रराव ॥

इंद्र ते अमृताचे ताट तेथे घेऊन आला आणि देव जयजयकार करून गर्जना करू लागले. स्वर्गातील देव पंढरीत आले तेव्हा पंढरीत नामदेवराय कीर्तनाला उभे होते. सर्व देव आणि इंद्र नामदेवरायांच्या कीर्तनात येऊन बसले. नामदेवराय तल्लीन होऊन कीर्तनात नाचत होते. स्वर्ग सोडून देवांचा राजा इंद्रही कीर्तनाला येऊन बसला होता.

हा संत व देवांचा समुदाय पंढरीला नामदेवरायांच्या कीर्तनात जमला असता इकडे चोखोबांच्या घरी काय चालले होते?

ऐसा सर्वसमुदाय चंद्रभागे तीरीं

तेव्हा आपुलें घरीं चोखा होता ॥

एकादशी व्रत करिती दोघे जण

उपवास जाग्रण निशीमाजीं ॥

तीन प्रहर जाहले उपवास जाग्रण

चोखा मेळा म्हणे स्त्रीसी तेंव्हा ॥

तुझिया घरासी येऊं पारण्यासी

सांगून मजशीं गेला देव ॥

एका जनार्दनीं चोखा करी करुणा

तेव्हां नारायणा जाणवलें ॥

असा सर्व समुदाय चंद्रभागेच्या काळी वाळवंटात होता. तेव्हा चोखोबा आपले घरी होता. नवरा-बायको दोघेही एकादशीच्या उपवास करून रात्री जागरण करीत. तीन प्रहर झाले तेव्हा उपवास जागरण करीत असलेला चोखामेळा आपल्या बायकोला म्हणाला, “तुझ्या घरी उपवास सोडण्याकरीता आम्ही येऊ असे मला सांगून देव गेला आहे.” चोखोबाने देवाची करुणा भाकली तेव्हा ते नारायणाला जाणवले.

चोखामेळीयाची ऐकोनी करुणा

चालिले भोजना देवराव ॥

नामदेवासहित अवघे गण गंधर्व

इंद्रादिक देव चालियेले ॥

जाऊनी नारद सांगे चोखियासी

तुझीया घरासी येती देव ॥

ऋद्धि सिद्धी आल्या चोरियाचें घरीं

जाहली ते सामोग्री भोजनाची ॥

रुमिणीसहित आला पंढरीनिवास

चोखियाचे घरास आलें वेगीं ॥

चोखामेळा गेला पुढे लोटांगणी

उचलोनि देवांनी आलिंगीला ॥

एका जनार्दनीं ऐसा चोखियाचा भाव

जाणोनी आले देव भोजनासी ॥

चोखामेळ्याची करुणा ऐकून देवांचे राजे पंढरीनाथ भोजनाकरिता चोखोबाच्या घरी चालले. नामदेवांसहित सर्व गणगंधर्व व इंद्रादिक देव चोखोबांच्या घरी चालले. इतक्यात नारद पुढे येऊन चोखोबांना म्हणाले, “चोखोबा, तुझ्या घरी देव येत आहेत.” चोखोबांच्या घरी अठराविश्वे दारिद्य्र, सर्व देवादिकांचे स्वागत कसे करणार? इतक्या सर्व मंडळींना भोजन कसे देणार? पण चोखोबाच्या घरी ऋद्धी सिद्धी आल्या आणि भोजनाची सामग्री सज्ज झाली. पंढरीनाथ रुमिणीमातेसह चोखोबाच्या घरी त्वरेने आले. चोखोबांनी समोर जाऊन लोटांगण घातले. देवाने त्याला उचलून आलिंगन दिले. नाथ म्हणतात, “चोखोबांचा भतिभाव पाहून देव त्यांच्याघरी भोजनाकरिता आले.”

चोख्याचें अंगणी बैसल्या पंगती

स्त्री ते वाढीती चोखियाची ॥

अमृताचें ताट इंद्रे पुढें केलें

शुद्ध पाहिजे केले नारायणा ॥

तेंव्हा देवराव पाचारी चोखियासी

शुद्ध अमृतासी करी वेगीं ॥

चोखोबाच्या अंगणात पंगती बसल्या आणि चोखोबाची बायको पंगतीला वाढू लागली. तेव्हा इंद्राने अमृताचे ताट पुढे केले आणि म्हणाला, “हे नारायणा, हे अमृत शुद्ध केले पाहिजे.” तेव्हा देवाने चोखोबांना हाक मारली आणि म्हणाले, “हे चोखोबा, अमृताला लवकर शुद्ध कर.”

चोखामेळा म्हणे काय हें अमृत

नामापुढे मात काय याची ॥

चोखोबा म्हणतात, हे अमृत बापुडे काय? अत्यंत अपवित्र, अशुद्ध पदार्थाला शुद्ध करण्याचे सामर्थ्य नामामध्ये आहे. असे नाम ‘अमृताला’ शुद्ध करू शकणार नाही काय?”

अमृताचे ताट घेऊनि आला इंद्र

हे तु गा पवित्र करि वेगीं ॥

चोखियाची स्त्री चोखा दोघे जण

शुद्ध अमृत तेणें केले देखा ॥

चोखियाच्या घरीं शुद्ध होय अमृत

एका जनार्दनी मात काय सांगू ॥

तू देव चोखोबाला म्हणाले, “इंद्र अमृताचे ताट घेऊन आला आहे ते त्वरित पवित्र, शुद्ध कर.” त्या वेळी चोखोबांची बायको आणि चोखोबा या दोघांनी ते अमृत शुद्ध केले.

नाथ म्हणतात, “चोखोबाचे घरी अमृत शुद्ध झाले. त्या प्रसंगाचे वर्णन काय करू?”

बैसल्या पंगती चौखियांचे अंगणी

जेवी शारंगपाणी आनंदाने ॥

नामदेवासहित अवघे गण गंधर्व

इंद्रादिक देव नारदमुनी ॥

चोखोबाच्या अंगणात नामदेवासहित सर्व गणगंधर्व, इंद्रादिक देव, नारदमुनी यांच्या पंगती जेवायला बसल्या. सर्वांसहित पंढरीनाथ आनंदाने जेवीत आहेत.

चोखामेळा म्हणे दोन्ही जोडोनि कर

मज दुर्बळा पवित्र केलें तुम्ही ॥

यातीहीन मी अमंगळ महार

कृपा मजवर केली तुम्ही ॥

पंढरीचें ब्राह्मण देखतील कोणी

बरे मजलागुनी न पहाती जन ॥

ऐसे ऐकोनियां हांसती सकळ

आनंदे गोपाळ हास्य करी ॥

विडे देऊनियां देवे बोळविलें

इंद्रादिक गेले स्वस्थानासी ॥

पंढरीचें ब्राह्मणीं चोख्यासी छळीलें

तेही संपादिलें नारायणे ॥

एका जनार्दनीं ऐशी चोखियाची मात

जेवी पंढरीनाथ त्याचे घरी ॥

चोखोबा दोन्ही हात जोडून म्हणाले, “मला दुर्बळाला आपण पवित्र केले. मी यातिहीन अमंगळ महार असून तुम्ही माझ्यावर कृपा केली. पंढरीचे कोणी ब्राह्मण हे पाहतील तर काय होईल! हे लोक मला चांगल्या नजरेने पहात नाहीत.” चोखोबांचे बोलणे ऐकून सर्व जण हसू लागले. पंढरीनाथही हसू लागले. विडे देऊन देवाने इंद्रादिकांना निरोप दिला आणि ते आपल्या स्वस्थानी परतले. ज्या चोखोबांना ब्राह्मणांनी छळले, त्रास दिला त्या चोखोबाला देवाने मात्र आपलेसे केले. नाथ म्हणतात, “चोखोबाची कथा, श्रेष्ठत्व काय सांगू? प्रत्यक्ष पंढरीनाथ त्याचे घरी जेवले.”

चोखियाची भक्ति कैसी प्रेमे आवडे देवासी ॥

ढोरें वोढी त्याचे घरी नीच काम सर्व करी ॥

त्याचें स्त्रीचे बाळंतपण स्वयें करी जनार्दन ॥

ऐसी आवड भक्ताची देखा देव भुलले तया सुखा ॥

नीच याती न मनी कांही एका जनार्दनी भुलला पाहीं ॥

चोखोबांची भक्ती कशी आहे पहा की, ज्या भतिप्रेमाने देवाला त्यांनी मोठी आवड निर्माण झाली. त्याच्या घरी ढोरे ओढण्यापासून सर्व नीच कामे स्वतः जनार्दन करीत होता. चोखोबा परगावी गेले असता त्यांच्या पत्नीचे बाळंतपण देवांनी स्वतः चोखोबांच्या बहिणीचे रूप घेऊन केले. देवाला भक्ताची मोठी आवड असून देव भतिसुखाला भुलला आहे. नीच याती काहीही न मानता देव भक्तीला भुलला पाहा.

लेखक संपर्क : ९४२२० ५५२२१


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]