मारू नये सर्प संताचिया दृष्टी।

सर्पमित्र ज्ञानेश्वर गिराम - 9823984433

नागपंचमीनिमित्त विशेष लेख..

साप म्हटलं की प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते. साप हा शब्द जरी उच्चारला तरी सुद्धा लगेच आपण अरे बाप रे..! असे म्हणतो. कारण, प्रत्येकाच्या मनात सापाबद्दल भीती आहे. प्रत्येकाला असं वाटतं की, सर्पदंश झाला म्हणजे आपण मरणारच. कारण, सापाविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत किंवा गैरसमज आहेत. त्याचे कारण असे आहे की, सापाबद्दल असलेले अज्ञान आणि या अज्ञानापोटीच आज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरामध्ये अनेक साप मारले जातात. आपण आपल्या महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर जवळपास ५४ प्रकारचे साप आढळतात. त्यापैकी फक्त चारच साप हे विषारी आहेत. त्यामध्ये ज्याला आपण ‘बिग फोर’ असे म्हणतो. त्यात नाग, मण्यार, फुरसे, घोणस या सापांचा समावेश होतो. या विषारी सापाचा दंश झाला, तर आपण मरतोच असे नाही. कारण प्रत्येक वेळी त्या व्यक्तीची प्रतिकारक्षमता आणि त्याला तात्काळ मिळालेला प्रथमोपचार हा अत्यंत महत्त्वाचा असतो. सर्पमित्र म्हणून गेल्या २० वर्षांचा माझा अनुभव सांगतो की, बहुतेक साप हे अज्ञानापोटीच मारले जातात आणि ज्या व्यक्तीला सर्पदंश झालेला आहे त्याला योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे ती व्यक्ती दगावते. सर्प दंश झालेल्या व्यक्तीला वेळीच दवाखान्यात नेणे अत्यंत आवश्यक असते. त्यावर कोणतेही अंगारे धुपारे न करता त्याला प्रति सर्प विष (रपींळर्-ींशपेा)औषध एकमेव असे उत्तर आहे; परंतु अनेक वेळा काही कारणांमुळे दवाखान्यात जाण्यास उशीर होतो आणि काही अघोरी उपचार केल्याने सुद्धा सर्पदंश झालेला व्यक्ती दगावतो. अशावेळी आपण काहीच करू शकत नाही याची खूप खंत वाटते. बर्‍याच वेळेस सर्पमित्र हे आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून साप वाचवतात; परंतु अनवधानाने काही चुका त्यांच्याकडून होतात आणि त्यांना देखील सर्पदंश होतो. कारण चुकीला माफी नसते, अशा वेळी त्यांना देखील तत्काळ दवाखान्यात नेण्याची गरज असते. बर्‍याच वेळी या सर्व मित्रांना साप पकडल्यानंतर ते जेव्हा निसर्ग अधिवासात सोडतात तेव्हा अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते. काही नवशिके सर्पमित्र हे साप निसर्ग अधिवासात सोडताना त्याचे छायाचित्रण करतात किंवा त्याला हाताळण्याच्या नादात त्यांना सर्पदंश होतो आणि ते आपल्या जिवाशी खेळतात, असे अनेक प्रकार आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनुभवलेले आहेत. त्यामुळे सर्पमित्र यांनी देखील काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. साप पकडल्यानंतर तत्काळ त्याला निसर्ग अधिवासात सोडणे अत्यंत गरजेचे आहे. बर्‍याच वेळा माझा अनुभव असा सांगतो की, आम्ही ज्या वेळेस साप पकडण्यासाठी एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा त्या सापाला संबंधित व्यक्तीने अगोदरच जखमी केलेले असते त्यामुळे तो चवताळलेला असतो. सर्पमित्राने अगोदर सर्वप्रथम खात्री करून घेणे आवश्यक आहे की, त्याला काही जखम तर नाही ना किंवा तो चवताळलेला तर नाही ना? तो कोणत्या जातीचा आहे याची ओळख करूनच त्याने त्याला सुरक्षितरीत्या पकडणे आवश्यक आहे. सापही वाचला पाहिजे आणि सर्पमित्र देखील वाचला पाहिजे हेच त्यांचे खरे कौशल्य आहे; परंतु कधी कधी घाई गडबडीत अनेक प्रकारच्या घटना घडल्याचे आपण ऐकतो.

लोकांच्या मनात सापाबद्दल अनेक प्रकारचे गैरसमज आहेत. जसे की साप डूक धरतो. साप चावल्यास कडूलिंबाचा पाला किंवा मिरची खायला देतात, साप उलटल्याशिवाय विषबाधा होत नाही, सापाचे विष मंत्राने उतरते, कोंबडीचे गुद्दार सर्प दंश झालेल्या जागेस लावल्याने विष उतरते, दोन सापांतील एक साप मारल्यास दुसरा बदला घेतो किंवा साप धनाचे रक्षण करतो. त्याच्या डोक्यावर दिवा असतो किंवा सापाला केस असतात. नागाच्या पूजेने तो प्रसन्न होतो. नागाला नागमणी असतो, साप दूध पितो. साप मुंगसाला चावल्यास त्याच्यातील अमृताने विष मरते, साप माणसांना एकटक बघतो, साप अति वेगाने पळतो, रात्री शिट्टी वाजवल्यास साप घरात येतो, मांडूळ सापाला हाडे नसतात, मांडूळ सापाचा उपयोग काळ्या जादूसाठी होतो, धामण जनावराच्या पायाला विळखा घालून दूध पितो, धामण व म्हशीची नजरानजर झाल्यास मरते, धामण सापाने शेपटी मारल्यास नपुंकसत्व येते, सापाची कात विषारी असते, रॉकेलने साप जिवंत होतो, साप मारल्यास त्याच्या रक्तातून साप निर्माण होतात, सापाला चावल्यास विष उतरते, सापाला केवडा व रातराणी यांचे निवास आवडतात, हरणटोळ साप टाळू फोडतो, अजगर भक्ष्य श्वासाद्वारे ओढून घेतो व झाडाला विळखा घालून मारतो, सर्पमित्र साप विकतात किंवा विष विकतात? सर्पमित्र सापाचे काय करतात? सर्पमित्र सापाचे विष दंत काढतात? साप कोणीही पकडू शकतो? अशा प्रकारचे समज-गैरसमज लोकांमध्ये आहेत. या सर्व समज गैरसमजाचे आम्हाला वेळोवेळी निरसन करावे लागते. तरी देखील लोक ऐकत नाहीत. त्या वेळेस मात्र आमची पंचायत होते ते त्यांच्या मतावर ठाम असतात. अशावेळी त्यांना आम्हाला अनेक प्रकारचे दाखले देऊन समजावून सांगावे लागते. या सर्वांना कारणीभूत आहे आपली चित्रपटसृष्टी आणि आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या अनेक प्रकारच्या कथा. यातून आपल्या मनामध्ये एक प्रकारची सापाबद्दल भीती निर्माण झालेली आहे.

गेल्या वीस वर्षांत मी अनेक प्रकारच्या सापांना जीवदान दिले आहे. यात विशेष बाब म्हणजे, मला आतापर्यंत कोणत्याही विषारी सापाचा सर्पदंश झालेला नाही; पण बरेच सर्पमित्र असे सांगतात की, मला विषारी सापाचा किमान चार-दोन वेळेस सर्प दंश झालेला आहे. त्यामध्ये ते त्यांचा मोठेपणा मिरवतात. आपल्याला सापही वाचवायचे आहे आणि सर्पमित्र देखील वाचवायचे आहे. यामध्ये विविध प्रकारच्या साधनांचा वापर सर्पमित्रांनी आवश्यकपणे केलाच पाहिजे. त्यामध्ये कसल्याही प्रकारचा कमीपणा नाही.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दरवर्षी नागपंचमी निमित्त किमान एक आठवडा अगोदर ‘सर्प प्रबोधन यात्रा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या प्रबोधन कार्यक्रमात आतापर्यंत जवळपास ५० हजार विद्यार्थी आणि एक हजार शिक्षकांना या कार्यक्रमाचा लाभ देण्यात आलेला आहे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयात जाऊन पोस्टर आणि चित्राद्वारे हे प्रबोधन कार्यक्रम दरवर्षी नियमितपणे राबवले जातात. शाळा, कॉलेज तसेच शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना देखील या सर्व प्रबोधन कार्यक्रमाचा फायदा झालेला आहे. यामध्ये साप आणि मानव यांचा जीव वाचविण्यात आलेला आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, तरुण सर्पमित्र यांनी कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी न करता सापांना सुरक्षितरित्या पकडून निसर्ग अधिवासात मुक्त करावं आणि पर्यावरण रक्षण करावं तरच खर्‍या अर्थाने जगद्गुरू संत तुकोबारायांनी त्यांच्या गाथ्यात पाचशे वर्षांपूर्वी सांगितल्याप्रमाणे –

मारू नये सर्प संताचिया दृष्टी ।
होतील ती कष्टी व्यापकपणे ॥

ही गोष्ट सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही.

– सर्पमित्र ज्ञानेश्वर गिराम
कार्याध्यक्ष, अंनिस जिल्हा जालना
संपर्क : ९८२३९ ८४४३३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]