-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इचलकरंजी आणि ‘विवेकवाहिनी’, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमानेसाने गुरुजी विद्या मंदिरमध्ये ‘जोडीदाराची विवेकी निवड’ संवादशाळा उत्साहात पार पडली. हल्ली तरुणाईमध्ये प्रेमाच्या निखळ नात्याकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन आणि त्यातून घडणारे अविवेकी प्रकार या परिस्थितीचा विचार करायला प्रवृत्त करणारी आणि आपला जोडीदार आपण विवेकी पद्धतीने कसा निवडावा, नात्यातील सुरेल संवाद कसा घडवावा, याबद्दल अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने तरुणाई आणि त्यांचे पालक यांना बोलतं करणारी ही संवादशाळा ठरली. या संवादशाळेच्या उद्घाटन सत्रासाठी मनोरंजन मंडळ, इचलकरंजीचे संजय होगाडे व पदन्यास नृत्य कला अकादमी, इचलकरंजीच्या सायली होगाडे या विवेकी सहजीवन जगणार्या दांपत्याची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ‘अंनिस’ इचलकरंजी शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमर कांबळे हेही उपस्थित होते. प्रेमाच्या झाडाला पाणी घालून संवादशाळेचे उद्घाटन झाले.
जोडीदाराची विवेकी निवड करणं का गरजेचं आहे, या उपक्रमाची पंचसूत्री काय आहे, हे समजावून सांगत प्रेम आणि आकर्षण यातील फरक, अॅडजस्टमेंट-कॉम्प्रमाईज, संसार-सहजीवन या मुद्द्यांबद्दल पहिल्या सत्रामध्ये विभावरी नकाते यांनी संवाद साधला.
दुसर्या सत्रामध्ये जोडीदाराची विवेकी निवड कशी करावी, यावर सुनील स्वामी यांनी चर्चा घडवून आणली. परिचयोत्तर विवाह पद्धती म्हणजे काय? पत्रिका मीलन गरजेचं की मनोमीलन? जोडीदार निवडताना डोळस, विवेकी दृष्टिकोन कसा ठेवावा, या मुद्द्यांवर 12 गुणांच्या आधुनिक पत्रिकेसह सुनील स्वामी यांनी संवाद साधला. ‘सहजीवनातील समानता’ या तिसर्या सत्रामध्ये जोडीदार निवडल्यानंतर सहजीवनामध्ये समता असणं का गरजेचं आहे आणि समतेवर आधारित सहजीवन कसे घडवावे, याबद्दल संजय रेंदाळकर यांनी मार्गदर्शन केले. याच विषयावर आधारित अशी ‘पॉवर वॉक’ ही अॅक्टिव्हिटी या सत्राच्या शेवटी घेण्यात आली.
‘जोविनि’ संवादशाळेचे स्वागत ‘विवेकवाहिनी’चे अमित कोवे यांनी केले. प्रास्ताविक सौरभ पोवार यांनी केले. सूत्रसंचालन राधिका शर्मा यांनी केले. संवादशाळेचे शेवटचे आभार प्रदर्शन आणि प्रतिक्रियांचे सत्र वैभवी आढाव व स्नेहल माळी यांनी घेतले. यावेळी तरुण मुला-मुलींनी आणि पालकांनी दिवसभराच्या संवादशाळेबद्दल भरभरून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी दामोदर कोळी, रोहित दळवी, पवन होदलूर, कोमल माने, श्रेयस बदडे, अक्षय कांबळे, किरण यादव आदींसह पालक आणि विद्यार्थी मिळून 50 जणांची उपस्थिती होती.