डॉ. अस्मिता बालगावकर -
मानसशास्त्रात मानसिक आणि भावनिक समस्यांवर उपचार करण्यासाठी विविध मनोवैज्ञानिक मार्गांचा वापर करणे म्हणजे सायकोथेरपी किंवा मानसोपचार पद्धती होय. यात मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॉलॉजिस्ट मानसिक समस्या सोडविण्यासाठी रुग्णांशी संवाद साधतात. रुग्णाच्या वर्तणुकीमागील कारणे समजून घेऊन त्यावर उपचार करण्यासाठी थेरपीचा वापर होतो. रुग्णाला नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी नवीन कौशल्ये शिकवली जातात. यामुळे रुग्णाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनण्यास आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत होते. या सायकोथेरपीचे असंख्य प्रकार असतात. ही थेरपी एका व्यक्तीला न देता एकत्रितपणे अनेक लोकांना गटात देणे म्हणजे ग्रुप थेरपी.
सर्वसामान्यपणे समाजात मानसशास्त्रातील अनेक गोष्टींबद्दल गैरसमज आढळतात. त्यातील सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ज्यांना वेड लागलेले आहे तेच लोक सायकॉलॉजिस्टकडे जातात. आणि म्हणून अनेक लोक मानसिक व भावनिक समस्या असूनही ते उपचार घेत नाहीत. का तर मग लोक मला वेडा समजतील. अनेकदा समाजाने हे एक लावून दिलेले लेबल असते जे अत्यंत चुकीचे आहे. आता हळूहळू मानसिक आजारांबद्दल जागरुकता येत असली तरी अजून बरेच समाजप्रबोधन होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर शहर शाखेत कार्य करीत असताना अनेकदा मानसोपचाराची आवश्यकता भासते. अनेक शारीरिक व मानसिक आजार असणार्या व्यक्तींना अंधश्रद्धेमुळे उपचार न मिळता फसवणूक व अत्याचार होताना दिसून येतात. त्यांना मानसोपचार घ्यायची गरज आहे, असे अनेकदा सांगूनही लोक ते घेण्यास जात नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत ती म्हणजे मानसिक आरोग्याबद्दल जागृती नसणे, ग्रामीण भागात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता, अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा. मग जर छोट्यामोठ्या मानसिक आजारांसाठी लोक सायकॉलॉजिस्टकडे येत नसतील, तर आपण लोकांपर्यंत जावे आणि त्या छोट्या छोट्या मानसिक आजारांसाठी मूलभूत कार्य करावे या संकल्पनेतून मानसिक आरोग्यावर हजारो कार्यक्रम मी घेतले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये मानसिक आरोग्यावर तसेच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य करीत असताना मानसोपचार पद्धतींचा वापर करता येईल, असा विचार करून अनेक मानसोपचार तंत्रे वापरण्यास सुरुवात केली. अनेक मुद्दे जसजसे सुचतील तसतसे नोंद करत जाऊन त्यावर गृहितके/हायपोथेसिस मांडत गेले. ग्रुप थेरपीचा समाज प्रबोधनासाठी कसा वापर करता येईल, या विचारातून लिखाण करत गेले.
या सर्व कामांचा संशोधन गोषवारा (अॅबस्ट्रॅक्ट) लिहून ठेवला. युनायटेड किंगडम येथे ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी’मध्ये ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन रिसर्च इन सायकॉलॉजी’ यासाठी तो पाठवला आणि तो त्या परिषदेसाठी निवडला पण गेला. २२, २३, २४ ऑगस्ट रोजी ही कॉन्फरन्स ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पार पडली, ज्यात ‘द रोल ऑफ ग्रुप सायकोथेरपी इन डेव्हलपिंग सोशल अवेअरनेस’ या विषयावर सदर संशोधन सादर करण्यात आले. अमेरिका, युरोप, आशिया खंडातील नामवंत क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट यांचा यात सहभाग होता. सदर संशोधन ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध होणार आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनचे काम करत असताना साधारण १५ ते ५० लोकांच्या गटात सदर ग्रुप थेरपी देण्यास सुरवात केली. हे लोक तात्पुरते काही कार्यक्रमासाठी एकत्रित आलेले असतात. यात काही उपचारात्मक तत्वे किंवा घटक असतात. त्यांचा कार्यक्रमात प्रामुख्याने समावेश करण्यात आला. इतर लोकांना आलेले अनुभव, अडचणी यांचा आपल्या अनुभवाशी तुलना केली जाते. एकमेकांचे विचार ऐकून समस्येची व्याप्ती आणि स्वरूप कळते. म्हणून सर्वप्रथम विषयाला सुरुवात करून असे अनुभव कोणाला आले आहेत का? आणि काय काय कसे अनुभव आले? याबद्दल चर्चा घडवून आणली जाते. जसे की महिलांचा गट असेल, तर मग आपण कोणकोणते उपवास करता? कशासाठी करता, तो उद्देश सफल होतो का, त्रास काय होतो इत्यादी प्रश्न विचारून गटात खुली चर्चा करण्यात येते. एक-दोन महिला बोलायला लागल्यावर बाकीच्या महिला पण बोलायला लागतात आणि या प्रश्न उत्तरामधूनच महिलांच्याच तोंडून व्रत-वैकल्ये, उपवास करणे कसे योग्य नाही, हे यायला लागते. इथे थेरपिस्ट अनेकदा फक्त स्ट्रायकरचे काम करतो. जर चर्चा चुकीच्या दिशेने जात असेल तर ती पुन्हा योग्य मार्गावर वळवावी लागते. अशा चर्चेमुळे अनेकदा लोकांच्या मनातील दु:ख, अपराधी भाव, ताणतणाव कमी होतो.
इतर लोकांना आलेल्या अनुभवातून सुद्धा गटातील अनेक लोक नवीन गोष्ट शिकतात, आपल्या चुका सुधारतात. गटात लोकांना एकमेकांचा आधार वाटतो. एक सुरक्षित खेळीमेळीचे वातावरण तयार होते. त्यात झालेल्या चुका आलेले अपयश पचवून त्यावर काय करता येईल या बाबत थेरपिस्टमध्ये मध्ये मार्गदर्शन करतात. तसेच योग्य आणि सुधारणात्मक गोष्टींचे समर्थनसुद्धा करतात. जेणे करून इतर लोकांना त्यातून एक दिशासुद्धा मिळेल. त्यामुळे अनुकरणीय बाबी काय आहेत, हे गटातील लोकांना कळतात. अंधश्रद्धेमुळे फसवणुकीची उदाहरणे सुद्धा ऐकून आपण एकटे नाही, समदु:खी अनेक लोक आहेत हे कळल्यावर एक सार्वत्रिकता समजते. यापुढे काय काळजी घेता येईल, याची कल्पना येते. अशा पद्धतीने या ग्रुप थेरपीमध्ये परोपकार, समाजीकरण तंत्रांचा विकास, अस्तित्वाचे घटक, गट एकात्मता, माहिती देणे, अनुकरणीय वर्तन, आशा निर्माण करणे, सुधारात्मक पुनरावृत्तीकरण, आंतरवैयक्तिक शिक्षण, सार्वत्रिकता इत्यादी घटकांचा समावेश होतो.
कार्यक्रमांची सुरुवात ही नेहमी गीताने केली जाते. गटातील उपस्थित सर्वच लोक सुद्धा हे गीत म्हणत असतात. त्या गीताद्वारे अंधश्रद्धांबद्दल जाणीव, जागरूकता आणण्यासाठी विशेष काव्यरचना केलेली असते.
गीतासोबत संगीतासाठी काही डफलीसारखी वाद्येसुद्धा वापरण्यात येतात. याचा म्युजिक थेरपीसारखा वापर करता येतो. त्यामुळे मानसिक ताण कमी होतो, मूड चांगला राहतो, संवाद सुधारतो, एक खेळीमेळीचे कंफर्टेबल वातावरण तयार होते.
वैज्ञानिक जाणिवा जागृती कार्यक्रम सादर करीत असताना उपस्थित प्रेक्षकांमधून काहींना बोलावले जाते आणि ते एका भोंदू बाबाला भेटले आहेत आणि समस्या सांगत आहेत आणि अंनिस कार्यकर्ता भोंदू बाबासारखे काही चमत्कार करून दाखवत असतात, असे नाटकीय रुपांतर केले जाते. यात विविध प्रकारचे चमत्कार कार्यकर्ते करून दाखवत असतात आणि त्या मागील वैज्ञानिक कारण सांगून हा चमत्कार नसून विज्ञान आहे किंवा हातचलाखी आहे, हे पटवून देत असतात. जेणेकरून लोकांना कळावे की, भोंदू बाबा-बुवा विज्ञानाचा आधार घेऊन कसे लोकांना मूर्खात काढतात, फसवतात. हे प्रयोग उपस्थितांनासुद्धा करण्यास दिले जातात. ग्रुप थेरपीमध्ये हाच भाग आपण सायकोड्रामासारखा वापरू शकतो. सायकोड्रामाचा वापर नॉन-क्लिनिकल आणि क्लिनिकल अशा दोन्हीही क्षेत्रात करता येतो. भूमिका-खेळ आणि कथाकथन वापरून, सहभागी व्यक्ती स्वतःला भावनिकरित्या व्यत करू शकते आणि त्यांच्या अनुभवांबद्दल अनेक गोष्टी समजू शकतात. अनेकदा थेरपिस्टशी उघडपणे चर्चा करीत असताना काही गोष्टी सांगता येत नाहीत; पण अशा नाटकीय रूपांतरामध्ये त्या गोष्टी कळतात. महिलांच्या एका कार्यक्रमात एक प्रात्यक्षिक करताना मी एका महिलेला तो प्रयोग शिकवून करायला दिला. तर ती तो प्रयोग दाखवत असताना त्या सायकोड्रामामध्ये तिने दुसर्या महिलेच्या कमरेत हात घातला आणि पाठीवरून हात फिरवू लागली. मला हे जाणवल्यावर मी फक्त तिला ऐकू जाईल, अशा बारीक आवाजात विचारलं की, तो बुवा असा बायकांच्या अंगाला हात लावत होता का? तर तिने फक्त होकारार्थी मान हलवली. ती या बाबत काहीही बोलण्यास तयार नव्हती. अशा पद्धतीने सायकोड्रामामध्ये व्यक्तीचा अभिनय, हालचाली, बॉडी लँग्वेज यांचे बारीक निरीक्षण व नोंद करून अनेक गोष्टींचा ऊहापोह होतो. अशा पद्धतीने अनेकदा लैंगिक शोषणाबद्दल लोक बोलायला तयार नसतात, त्या गोष्टीसुद्धा ग्रुप थेरपीमध्ये अशा काही युक्त्यांनी समोर येतात.
अशा पद्धतीने ग्रुप थेरपीमध्ये म्युजिक थेरपी, सायकोड्रामा या सोबतच मोठ्या प्रमाणात जी मानसोपचार पद्धती वापरता येऊ शकते ती म्हणजे अत्यंत प्रचलित अशी असलेली कॉग्निटिव्ह बिहेविअर थेरपी (सीबीटी), तसेच रॅशनल थेरपी. सदर संशोधनात गट मानसोपचाराद्वारे, सहभागींना त्यांच्या भावनिक गरजा ओळखण्यास, विविध दृष्टिकोन समजून घेण्यास आणि वैज्ञानिक विचार करण्याची त्यांची क्षमता बळकट करण्यास प्रोत्साहित केले जाते. संवाद आणि चिंतनासाठी जागा निर्माण करून, गट मानसोपचार अंधश्रद्धेच्या हानिकारक परिणामांबद्दल जागरूकता वाढवते. हे व्यक्तींना तर्कहीन विश्वासांवर प्रश्न विचारण्यास, सहानुभूती आणि सहिष्णुता जोपासण्यास आणि अधिक तर्कसंगत, न्याय्य आणि पुराव्यावर आधारित समाज निर्माण करण्यास मदत करते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये कार्य करीत असताना अशा अनेक मानसोपचार पद्धती वापरून आपण अजून चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो.
– डॉ. अस्मिता बालगावकर, सोलापूर
संपर्क : ९०२११ ०८६८६
