राजीव देशपांडे -
केवळ महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशालाच संत समाजसुधारकांची मोठी परंपरा आहे. या संतांनी संपूर्ण समाजाला समता, बंधुता, परोपकार, प्रेम, माया, भूतदया, परस्परधर्मसमभाव अशा उच्च मानवी मूल्यांची जाणीव आपल्या आचरणातून आणि शिकवणुकीतून दिलेली आहे. प्रस्थापितांच्या निर्घृण छळाला सामोरे जावे लागले, प्रसंगी जीव गमावण्याची पाळी आली तरी आपला समाजसुधारणांचा वसा या संतसुधारकांनी सोडलेला नाही. पण ह्या वारशाला काळिमा फासण्याचे काम अलीकडच्या काळात अनेक स्वयंघोषित संत करताना दिसत आहेत. नुकतीच स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसारामबापूला बलात्कारप्रकरणी गुजराथमधील एका न्यायालयाने दुसर्यांदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हा बापू राजस्थानातील त्याच्या आश्रमात एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणात सध्या जोधपूर तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. रामरहीम बाबाही तुरुंगाची हवा चाखत आहेच.
देशात दर वर्ष-सहा महिन्यांतून असा एखादा नवीन स्वयंघोषित बुवा, बाबा, महाराज, गुरूच्या रूपात दैवी चमत्काराचे दावे करत त्याला सनातन धर्माचे आवरण चढवत आपला बाजार भरवताना दिसतो. अनेक समस्यांनी, दुःखाने ग्रासलेली जनताही आपल्या दुःखातून सुटका करून घेण्याच्या आशेने अशा चिल्लर चमत्कार करणार्याच्या भक्तिजालात मोठ्या प्रमाणात अडकतात. आत्तापर्यंत अशा बुवा, बाबांना चमत्कार सिद्ध करून दाखवा, असे आव्हान देणे एवढेच कार्यकर्त्यांच्या हातात होते. ही आव्हान प्रक्रिया प्रत्यक्ष व्यवहारात उतरणेही अवघडच. पत्रकबाजीला वाव देणारी.
महाराष्ट्रात डॉ. दाभोलकरांचे अथक प्रयत्न आणि त्यांच्या शहीदत्वानंतर झालेल्या जादूटोणा विरोधी कायद्याचे हत्यार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या हातात आले. त्याचा नेमका वापर करत कार्यकर्त्यांनी गेल्या पाच-सहा वर्षांत शेकडो सर्वधर्मीय बुवा, बाबा, मांत्रिकाविरोधात पोलिसांना या कायद्याच्या आधारे गुन्हे नोंदविण्यास भाग पाडले आहे. तसेच अनेक संवेदनशील पोलीस अधिकार्यांनी स्वत:हूनही अशा गुन्ह्यांची दखल घेत गुन्हे नोंदविले आहेत. तसेच कोणतीही शासकीय मदत न घेता केवळ कार्यकर्त्यांच्या बळावर या कायद्याच्या प्रसार, प्रचारासाठीच्या मोहिमा, परिषदा आयोजित करत हा कायदा जनतेच्या तळागाळापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. देशातील इतर राज्यांतील विवेकवादी कार्यकर्तेही अशा प्रकारचा कायदा आपल्या राज्यात व्हावा, म्हणून जोरदार प्रयत्न करीत आहेतच.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बागेश्वर धाम सरकार उर्फ धीरेंद्र शास्त्री सरकार नावाचा बाबा नागपूरला आला. ह्या बाबाचे प्रस्थ मोठे. त्याला विश्व हिंदू परिषद, रामदेवबाबांसह सत्ताधारी भाजपच्या बड्या नेत्यांचा आशीर्वाद. सनातन धर्माचा प्रचारक अशी ख्याती. दिव्य दरबार भरवून रामकथा सांगत असल्याने त्याच्या दरबारात प्रचंड गर्दी. चमत्काराचे अफाट दावे. एखाद्या बुवाने आपल्याकडे दैवी शक्ती आहे आणि चमत्कार करतो असा दावा करत आर्थिक प्राप्ती केली, दहशत पसरविली. तर जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा होत असल्याने खरे तर पोलिसांनीच आपणहून गुन्हा दाखल करायला हवा होता, पण तसे झाले नाही. त्यामुळे नागपूरच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांच्या विरोधात पोलिसांकडे निवेदन दिले. तसेच त्याच्या चमत्कारांना आव्हानही देण्यात आले. परिणामी, बाबाने विविध कारणे सांगत नागपुरातून काढता पाय घेतला आणि छत्तीसगढमध्ये जादूटोणाविरोधी कायदा नसल्याने तेथे दिव्य दरबार भरवत प्रती आव्हाने देऊ लागला. या सगळ्या प्रकरणाला सोशल मिडीयातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली. टी. व्ही. वाहिन्यांनी त्याच्या चमत्काराचे अक्षरश: मार्केटिंग केले. या प्रकरणानंतर आता नाशिक येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा अशी मागणी राज्य सरकारकडे तथाकथित साधू महंतांनी केली आहे. मागणी मान्य न केल्यास आंदोलन उभारण्याचे त्यांनी ठरविले आहे.
अशा प्रकारच्या समाजसुधारणांच्या कायद्यांना जगभरातच विरोध होत आलेला आहे. जादूटोणा कायदा होण्यापूर्वी त्या कायद्याला प्रखर विरोध झालेला आहे. हा कायदा होत असताना ज्यांचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक हितसंबंध धोक्यात येणार होते अशांचाच विरोध या कायद्याला होता. त्यांनी या कायद्याविरोधात नियोजनबद्धरीत्या विखारी प्रचार चालविला होता. हा कायदा देव आणि धर्मविरोधी आहे, लोकांच्या श्रद्धांवर आघात करणारा आहे, फक्त हिंदू धर्माविरोधात आहे, कायदा संमत झाला तर सत्यनारायण करणे, उपवास करणे, वारीला जाणे, कीर्तन करणे यावर बंदी येईल असा धादांत खोटा प्रचार या कायद्याविरोधात करण्यात आला होता. पण अशा सर्व आक्षेपांना उत्तरे देत जादूटोणाविरोधी कायदा करण्यात आला आणि आज यापैकी कोणत्याही आक्षेपात तथ्य नाही, हे सिद्ध झाले आहे. तरीही पुन्हा तेच आक्षेप उभे करत कायदा रद्द करण्यासाठी आंदोलनाची भाषा बोलली जात आहे. त्यामुळे या बदलत्या परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी निर्धाराने काम तर करावयास हवेच, पण अशा स्वरूपाचा अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन करणारा कायदा संपूर्ण देशभर लागू करण्याची मागणी जोरदारपणे लावून धरली पाहिजे.
आदरांजली
म. अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते, हितचिंतक व शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे मनोहर जांभेकर यांचे (वय ९१ वर्षे) काल निधन झाले. अंनिस पिंपरी चिंचवड शाखेची अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी अनेक उपक्रमात सक्रिय पाठिंबा दिला होता.
मुलांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित व्हावा व यात शाळा कॉलेज व शिक्षकांचे योगदान कशाप्रकारे असावे यावर त्यांचे मार्गदर्शन अनुकरणीय व प्रेरणादायी असं आहे. वयाच्या अगदी शेवटपर्यंत अतिशय उत्साही व तळमळीने अंनिसच्या कामांविषयी ते विचारपूस करून मार्गदर्शन करत. अंनिस आधारस्तंभ व मानपत्र देऊन त्यानां गौरवण्यात आले होते.
जांभेकर सरांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विनम्र अभिवादन.
– महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती