प्रश्न आणि प्रश्नचिन्ह? : विवेकी भानाचे चिंतनीय लेखन

डॉ. विलास देशपांडे - 9960031148

आज समाजजीवनात आर्थिक, धार्मिक, जातीय, राजकीय कारणांनी अस्वस्थता पसरलेली आहे. अशा परिस्थितीत समाज भ्रामक अवस्थेत वावरतो आहे. अशा परिस्थितीमुळे लेखकांच्या समोर प्रामुख्याने अनेक सामाजिक प्रश्न उभे ठाकले आहेत. अशा विषयातील प्रश्नांच्या उत्तराच्या शोधाचा मागोवा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न सहज शब्दांमधून ‘प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?’ या पुस्तकातून मुक्त पत्रकार नरेंद्र लांजेवार यांनी केला आहे. लेखकाची विवेकी, चिंतनीय भूमिका समाजाला त्याच्या प्रश्नांचे भान आणून देणारी तर आहेच; तसेच ती वाचकाला अंतर्मुख करून बेचैन करून सोडणारी आहे.

गावाकडच्या काळ्या मातीशी जोडलेली माणसं, पशु-पक्षी आणि निसर्ग; त्याचप्रमाणे राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक घटक प्रामुख्याने या लेखनाची सामग्री आहे. हा लेखक या सामग्रीचाच एक भाग असल्याने या पुस्तकातील विषयाला स्वप्नसृष्टीपेक्षाही वास्तवाचे प्रखर अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळेच ग्रामीण व शहरी जीवनावर परिणाम करणारे सर्व घटक प्रश्नातून त्यातील रंगरुपासह लेखकाच्या अंत:करणाचा अदमास घेता येतो. लेखकाच्या व्यक्तिमत्त्वापेक्षाही या पुस्तकातील विविध विषय विविध भावभावनांसह वाचकांना सुन्न करून सोडतात. कारण या लेखांमधून मांडलेले आजचे वास्तव, त्याचा रोख, आशय समृद्ध असल्याचा प्रत्यय पानोपानी येत असतानाचा अनुभव वाचक घेत असतो.

लेखक नरेंद्र लांजेवार यांचा हा सातवा लेखसंग्रह आहे. याआधी त्यांचे ‘अभिव्यक्तीची क्षितिजे,’ ‘अभिव्यक्तीची स्पंदने,’ ‘नाचू आनंदे-मिळवू परमानंदे,’ ‘एकाच नाण्याची तिसरी बाजू,’ ‘शिक्षणावर बोलू काही-शिक्षणावर बोलू काही’ व ‘सल-उकल’ असे काही लेखसंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. या लेखसंग्रहाशिवाय त्यांचे पुस्तकरुपाने व इतर लेखनप्रकारांतून अनेक विषयांवर इतरत्र लेखन प्रसिद्ध झाले आहे. एकूणच, त्यांच्या सार्‍या लेखनप्रकारांतून त्यांची सामाजिक, सांस्कृतिक कार्यातील बांधिलकी, कळकळ आणि तळमळ प्रकट झालेली आढळते. ‘प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?’ हे लेखनही त्याला अपवाद नाही. ‘ग्रंथाली’ या ख्यातकीर्त प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात एकूण 50 लेखांचा समावेश असून त्यातील बहुतेक लेख याआधी विविध वृत्तपत्रांतून व इतरत्र प्रकाशित झालेले आहेत.

‘आपण विवेकी समाजाची निर्मिती करण्यामध्ये का अपयशी ठरतो?’ लेखकाला पडलेल्या या प्रश्नाभोवती या पुस्तकाची रचना झालेली आहे. या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्यासाठी समाजातून अशा प्रकारच्या प्रश्नांची चर्चा झाली पाहिजे, असा लेखकाचा आग्रह आहे. या चर्चेतून विवेकवादी भूमिका वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा लेखक बाळगून आहे. त्यासाठी लेखक नरेंद्र लांजेवार साने गुरुजींच्या विचारांचाही आसरा शोधतात. ‘जगाला प्रेम अर्पावे…’ अशी साने गुरुजींची प्रार्थना नमूद करून आता ‘खरा तो एकच धर्म’ अशा भिडे गुरुजींच्या गर्जनेचा दाखला देत, अशा परस्परविरोधी विचारधारेचे वारे देशातच नव्हे, तर जगभर वाहत आहे, हे उलटे वाहणारे वारे वाहणे बंद व्हावेत, जगात कोणाच्याही वाट्याला अमानवी श्रम येऊ नयेत… धर्म, जात, भाषा, वर्णभेद दूर व्हावेत, हीच आधुनिक मानवाची प्रार्थना असावी, अशा वैचारिक बैठकीतून हा लेखसंग्रह आकाराला आला आहे.

‘विटाळणार्‍या देवाची भक्ती कशाला?’ या लेखातून गाडगेबाबांच्या कीर्तनातून जनसामान्यांना संदेश देणार्‍या विचारांची आठवण होते, तर ‘आहे रे’च्या मागे जग उभे, ‘नाही रे’चे काय? या लेखातून सामाजिक व्यवस्थेतील भीषण वास्तव दृग्गोचर होते. ‘संस्थांची उभारणी आणि विक्री एक गोरखधंदा’ या लेखातून आजच्या संस्थात्मक जीवनावर जळजळीत आसूड ओढण्याचे काम नरेंद्र लांजेवार करून जातात. ‘ज्ञानाचे वाण वाढू या,’ ‘गुणवंत विद्यार्थ्यांचा जातीय सत्कार,’ ‘भूमिका न घेणे हीच भूमिका,’ ‘बालकांचे हक्क वार्‍यावर,’ ‘हा तर शेतकर्‍यांच्या शवपेटीवरील शेवटचा खिळा’ अशा कितीतरी विविध विषयांवर लेखकाने आपले चिंतन मांडले आहे. शेवटी ‘माना है की सब तरफ अंधेरा है, मगर दिया जलाना कहा मना है।’ या शब्दांतून समाजातील प्रश्नांवर तोडगा निघू शकतो. बस, समाजमानसाने खडबडून जागे व्हायला हवे, असा आशावादही लेखक व्यक्त करून जातो.

डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी या विचारवंताची या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावना या पुस्तकातील लेखनाचे मोल व्यक्त करते. जागतिकीकरण, बाजारू, बेफिकीर वृत्तीने समाजाच्या सर्वच अंगावर विपरीत तेवढा परिणाम झाला आहे, त्यातून चांगले काही अनुभवायला आले नाही, असे लेखकाचे थोडक्यात म्हणणे आहे, असे पुस्तक वाचताना जाणवते. तथापि नरेंद्र लांजेवार यांनी गोळा केलेले व संजीवन देणारे हे अमृतकण संवेदनशील वाचकाला खडबडून जागे करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत. सतीश भावसार यांचे मुखपृष्ठ, पुस्तकातील विषयांचा विचार करता अधिक गंभीर प्रवृत्तीचे असायला हवे होते, असे वाटते. विविध विषयांवरचे प्रश्न उपस्थित करून ते प्रश्न सोडविण्याबाबतचे उपयुक्त पर्यायसुद्धा नरेंद्र लांजेवार यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!

पुस्तकाचे नाव : प्रश्न आणि प्रश्नचिन्ह?

लेखक : नरेंद्र लांजेवार (संपर्क : 9422180451)

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.

पृष्ठे : 154, मूल्य : 180 रुपये.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ]