प्रभाकर नानावटी -
२०२६ हा प्रो. यश पाल यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. प्रो. यश पाल यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख वार्तापत्रांच्या वाचकांना प्रेरणादायी ठरेल.
तुम्हाला असा एखादा शास्त्रज्ञ आठवतो का की, विज्ञान लोकांना समजण्यासाठी शिकवले पाहिजे? ते आपापल्यातच राहावे म्हणून नाही तर सर्वांपर्यंत पोचविलेले विज्ञान शिकवल्याने आपण एक राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकतो?
प्रो. यश पाल हे एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते, जे केवळ वैज्ञानिक समुदायातच नव्हे, तर सामान्य जनतेतही त्यांच्या असंख्य योगदानासाठी ते ओळखले जातात. त्यांना ‘द पीपल्स सायंटिस्ट’ म्हणून प्रेमाने आठवले जाते यात आश्चर्य नाही. एक गतिमान व्यक्तिमत्त्व असलेले प्रो. यश पाल एक शास्त्रज्ञ, व्यवस्थापक, शिक्षक, संवादक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी प्रयत्न करणारे द्रष्टे होते.
प्रो. यश पाल यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२६ रोजी आता पाकिस्तानमध्ये असलेल्या झांग येथे झाला. त्याचे बालपण बलुचिस्तानमधील वेट्टा येथे गेले. त्याच्या वडिलांची बदली झाल्यामुळे ते मध्य प्रदेशातील जबलपूरला आले. तेथेच त्यांना विज्ञान आणि गणित या विषयात अभिरुची निर्माण झाली. त्या कालखंडात चौफेर वाचन केल्यामुळे स्वतःहून शिक्षणातील बर्याच बारीक सारीक गोष्टी ते शिकू लागले. त्यात युक्लिडियन भूमितीचा समावेश होता. भौमितिक समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेल्या तर्काने त्यांना भुरळ घातली होती. शालेय जीवनात, गणित, भूगोल आणि भौतिकशास्त्र शिकत असताना तोंडपाठ करण्यापेक्षा समजून घेण्यावर ते भर देत असत. हा गुण प्रो. यश पाल यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत जोपासला.
प्रो. यश पाल एका सरकारी महाविद्यालयात शिकले. त्यांना तेथे वाचनाची सवय लागली. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, लिओ टॉल्स्टॉय, थोरो आणि टागोर यांच्यावरील पुस्तके लवकरच त्यांच्या टेबलावर आली. जेव्हा ते या पुस्तकांमध्ये बुडून जात होते तेव्हा त्यांनी स्वतःला विचारले – मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे?
१९४७ मध्ये भारताची फाळणी झाली. प्रो. यश पालने नुकतेच बी.एस्सी पूर्ण केले होते आणि दिल्लीत एम. एस्सी करत होते. हिंदू-मुस्लीम दंगली आणि उग्र आंदोलनामुळे दिल्ली येथील जीवन अस्ताव्यस्त झाले होते. या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य लोक तगून होते. प्रो. यश पाल यांना तो काळ आठवत होता. तो एक मोठा शोकांतिकेचा काळ होता. पण त्याचबरोबर प्रचंड आशेचा काळ होता. काहीतरी नवीन घडू शकेल यावर सामान्यांचा, दंगलीत होरपळलेल्यांचा विश्वास होता.
त्यांचे दिल्ली विद्यापीठातील एम. एस्सीचे शिक्षण संपत आले होते. त्या काळच्या इतर अनेक गाजलेल्या वैज्ञानिकांप्रमाणे प्रो. यश पालसुद्धा प्रगत संशोधन करणार्या मुंबई येथील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ (टीआयएफआर) येथून आपल्या वैज्ञानिक कारकिर्दीची सुरुवात केली. या संस्थेमधील नोकरी निःसंशयपणे ही त्यांच्या दीर्घ संशोधन कारकिर्दीची सुरुवात ठरली. ते मुंबईत आले आणि त्यांनी न्यूक्लिअर इमल्शन या छायाचित्रण तंत्रांचा अभ्यास केला. या छायाचित्रण तंत्रामुळे शास्त्रज्ञांना वैश्विक किरणांमधील उच्च ऊर्जा कणांचा इतर विशिष्ट कणांशी होणार्या परस्परसंवादाचा अभ्यास करता येतो.
टीआयएफआर मध्येच प्रो. यश पाल यांना वैश्विक किरणांच्या संशोधनामध्ये मध्ये रस निर्माण झाला. आणि त्यांनी बलूनच्या उड्डाणांच्या साहाय्याने असंख्य प्रयोग करून वैश्विक किरणांचा अभ्यास केला. खरे पाहता, अशा प्रकारचे प्रयोग यापूर्वी या संस्थेत कुणीही केले नव्हते.
मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) मधून पीएच. डी. करत असताना, त्यांनी वैश्विक किरणांचा सखोल शोध घेतला आणि कण मिश्रण सिद्धांतांवर संशोधन केले. डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर ते भारतात परतले. त्यांच्या स्वतःच्या संशोधक व विद्यार्थ्यांच्या टीमसह टीआयएफआर सोबत न्यूक्लिअर इमल्शनवर काम करू लागले.
१९७२ मध्ये प्रा. सतीश धवन यांनी अहमदाबादमध्ये स्पेस अॅप्लिकेशन्स सेंटर (एसएसी-SAC) स्थापन करण्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी प्रो. यश पाल यांच्याशी संपर्क साधला. प्रो. यश पाल यांना आपण ही जबाबदारी घेऊ शकू याची खात्री पटली आणि त्यांनी टीआयएफआरमधून पाच वर्षांसाठी एसएसी बांधण्यासाठी प्रतिनियुक्ती स्वीकारली. हे एक प्रचंड काम होते आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रो. यश पाल यांनी अथक प्रयत्न केले.
भारतासाठी तो काळ अवकाश, अणुऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक्स यांच्या विकासाच्या प्रारंभीचा काळ होता. १९७० च्या दशकात अवकाश तंत्रज्ञानाचा विकास होऊ लागला. टीव्ही प्रक्षेपणासाठी अत्यंत गरजेच्या अशा मानलेल्या सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरिमेंट (SITE) या विशेष प्रकल्पाचे नेतृत्व प्रो. यश पाल यांनी यशस्वीपणे केले. याची मूळ कल्पना साराभाईंची होती. परंतु अकाली निधनामुळे साराभाई (१९१९-१९७१) यांना तो बघता आला नाही.
“मी कधीच इतके कष्ट घेतले नव्हते. मला माहीत नव्हते की नेमके काय होत आहे. सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरिमेंटला खूप उशीर झाला होता. खरं तर, मला आठवते की मी तिथे पोहोचताच मला अनेक जण भेटायला आले आणि सांगितले की जे SITE टीममध्ये सामील झाले आहेत त्यांनी जहाज बुडण्यापूर्वीच उतरावे!” प्रो. यश पाल यांचा याविषयीचा अनुभव.
पण त्यांच्या दृढनिश्चयाने त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि सततच्या प्रयत्नांमुळे विक्रम साराभाईंच्या स्वप्नातील प्रकल्प – सॅटेलाईट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरिमेंट यशस्वी झाला.
SITE चा मुख्य उद्देश सामान्य जनतेला शिक्षित करण्याचा होता आणि यासाठी प्रो. यश पाल यांना लोकांमध्ये मिसळून त्याचा लोकांना कसा फायदा होत आहे, याचे सर्वेक्षण करावे लागणार होते. यासाठी त्यांना गावोगावी प्रवास करावा लागला. याच काळात प्रो. यश पाल यांना लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची किती गरज आहे याची कल्पना येऊ लागली.
या निमित्ताने दूरदर्शनवर मुलांसाठी विज्ञानविषयक कार्यक्रम बनवण्याची संधी प्रो. यश पाल यांना मिळाली. संधी मिळाली म्हणून प्रो. यश पाल उत्साहित झाले होते. परंतु त्यांना या संधीचे सोने कसे करावे याची अजिबात माहिती नव्हती. टीव्ही हे एक प्रसारमाध्यम होते व प्रो. यश पाल हाडाचे वैज्ञानिक होते. याबद्दलच्या जबाबदारीची जाणीवसुद्धा त्यांना होती.
“मी खेड्यांमध्ये जात होतो. तोपर्यंत मला असे वाटत होते की, विज्ञान केवळ प्रयोगातूनच शिकता येते. आणि विज्ञान योग्यरित्या शिकण्यासाठी प्रयोग करायला हवेत. पण खेड्यांमध्ये एक-दोन खोल्यांच्या शाळा होत्या, तेथे कोणतेही उपकरण नव्हते; काही शाळांमध्ये लिहिण्यासाठी फळाही नव्हत्या.” असे प्रो. यश पाल त्यांच्या चरित्रात उल्लेख करतात. जर आपल्याला त्यांच्यासाठी विज्ञान कार्यक्रम बनवावे लागले व खेड्यातील विद्यार्थ्यापर्यंत पोचवायचे असल्यास नेमके काय करायला हवे? हा त्यांच्यासमोरचा प्रश्न होता.
त्यांनी या कार्यक्रमासाठी टीआयएफआर आणि एमआयटी येथील मित्रांकडून सूचना मागवल्या आणि कार्यक्रमाची रूपरेषा तयार करून दूरदर्शनच्या निर्मात्यांसमोर सादर केले. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. लवकरच, ‘टर्निंग पॉईंट’ हा कार्यक्रम टीव्हीच्या पडद्यावर झळकू लागला. बघता बघता देशाच्या कानाकोपर्यातील दूरदर्शनच्या प्रेक्षकांनी तो उचलून धरला.
या कार्यक्रमाचा उद्देश लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे हा होता. आवतीभोवती थोडेसे लक्षपूर्वक पाहिल्यास विज्ञानाच्या खुणा स्पष्ट दिसतात. मुलांना शिकण्यासाठी, त्यांच्या जवळच्या वातावरणातील वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून प्रश्न विचारता येतात, समजून घेता येतात, समजावून सांगता येतात. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, विज्ञान शिक्षण म्हणजे केवळ माहितीची घोकंपट्टी नसून वैज्ञानिक पद्धती वापरून शिक्षण देणे यावर जास्त भर देणे हा होता.
या कार्यक्रमामुळे प्रो. यश पाल प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. या कार्यक्रमात ते स्वतः दर आठवड्याला लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असत. उत्तरं देण्याची त्यांची पद्धत फारच वेगळी होती. अशा पद्धतीने ते गोष्टी समजावून सांगत असत की, ऐकणार्यांच्यात कुतूहल निर्माण होईल आणि विज्ञानाचे आदानप्रदान सुरळीत होईल. प्रो. यश पाल उत्तर देत असताना काही प्रश्नांची उत्तरं ‘मला माहीत नाही’ अशी कबुली देण्यास ते घाबरत नव्हते. परंतु तशा प्रश्नांची उत्तरं कशी सापडतील याचे मार्गदर्शन ते करत होते. त्यांची ही अंतर्दृष्टी आणि बुद्धिमत्ता यांचा नवीन पिढीवर प्रभाव पडला. १९९० च्या दशकात दूरदर्शनवरील विज्ञान कार्यक्रम ‘टर्निंग पॉइंट’चे सूत्रसंचालन ते करत असत आणि प्रेक्षकांनी पाठवलेल्या प्रश्नांची उत्तरे देत असत. ते अशा पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देत असत की, प्रेक्षकांना थेट उत्तरे देण्याऐवजी विचार करायला लावतील आणि अधिक ज्ञान मिळवायला लावतील.
१५० एपिसोडपर्यंत चाललेली ‘टर्निंग पॉईंट’ ही मालिका भरपूर लोकप्रिय झाली. या कार्यक्रमाचे सादरीकरण प्रो. यश पाल आणि गिरीश कर्नाड यांनी केले. कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी नसीरुद्दीन शाह, मल्लिका साराभाई, कबीर बेदी, महेश भट्ट या कलाकारांनी भाग घेतला. या मालिकेच्या इंग्रजी आवृत्तीचे सादरीकरण अमेरिकन व क्रिश्चियन टीव्हीवर करण्यात आले. अमेरिकन आवृत्तीचे सादरीकरण पीटर ग्रेव्हज व जॅक पर्किन्स व क्रिश्चियन टीव्हीसाठी डेव्हिड जेरेमी यांनी केले. व्हिएतनामसाठी नेटफ्लिक्सवर डॉक्युसीरीज म्हणून ही मालिका दाखविण्यात आली.
त्यांनी ‘भारत की छाप’, ‘तुर-रम-तू’ आणि ‘रेस टू सेव्ह द प्लॅनेट’ या दूरदर्शन मालिकांचे मुख्य सल्लागार म्हणूनही काम केले. १९९५ आणि १९९९ मध्ये खग्रास सूर्यग्रहण आणि २००४ मध्ये शुक्राच्या अधिक्रमण या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपणाचे ते प्रमुख चेहरे होते. प्रो. यश पाल हे विज्ञानाचे एक उत्तम संवादक होते. विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांना विज्ञान समजावून सांगणारे म्हणून ते लोकप्रिय झाले.
१९७६ मध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना भारत सरकारने ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. १९८० मध्ये, ‘भारतातील दुर्गम ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आधुनिक संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या त्यांच्या मानवतावादी नेतृत्वाबद्दल’ त्यांना ‘मार्कोनी फेलोशिप’ देण्यात आली.
प्रो. यश पाल यांचा संबंध मोठ्या प्रमाणात भारतातील शिक्षण व्यवस्थापनाशी होता. त्यांच्या मते, शिक्षणातून केवळ ज्ञान देणे नव्हे तर ज्ञान मिळवणे, बांधणे आणि निर्माण करणे हे होते. चांगल्या शिक्षणाची त्यांची कल्पना “अनावश्यक माहितीचे प्रमाण कमी करणे आणि आकलन आणि समजुतीवर भर देणे आणि समजून घेण्याचा आनंद वाटून घेणे” यावर होती.
इतर अविकसित देशातील रूढ असलेल्या अत्यंत खर्चीक पद्धतीप्रमाणे शास्त्रज्ञांना प्रशिक्षणांसाठी नासा (NASA) सारख्या विकसित देशातील संस्थेला शिकण्यासाठी पाठवणे किंवा त्यासाठी लागणार्या महाग उपकरणे आयात करणे यासारख्या पर्यायांकडे जाण्याऐवजी, प्रो. यश पाल यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले आणि पृथ्वीभोवती स्थिर अंतरावरील उपग्रह स्टेशन आणि संप्रेषणासाठीचे (communication) स्वदेशी तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले. यामुळे केवळ SITE यशस्वी झाला नाही तर येणार्या दशकांमध्ये उपग्रह दूरदर्शन आणि संप्रेषण क्रांतीचा पायाही त्यांनी घातला. नियोजन आयोगाचे सल्लागार म्हणून त्यांनी नंतरच्या काळात संप्रेषण क्षेत्रात मोठे बदलही घडवून आणले.
त्यांना आपला देश विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे अशी इच्छा होती. त्यासाठी शिक्षणाच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च शिक्षण या प्रत्येक पायरीवर आधुनिक विज्ञान शिक्षण देण्याची व त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आकांक्षा त्यांनी मनात बाळगली होती. विज्ञान शिक्षणाला अर्थपूर्ण बनवण्यातील त्यांची तीव्र आवड लक्षात घेता, सरकारने त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष बनवले. यूजीसी आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांचे काम प्रसिद्ध होते.
त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायच्या होत्या. एका वेळी तर त्यांनी सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठे एका वर्षासाठी बंद करून सर्व संबंधितानी आत्मचिंतन करावे अशी भन्नाट सूचना केली होती. यापूर्वीचा वसाहत देश म्हणून भारतावर लादलेल्या शिक्षण पद्धतीची जोखड उतरवून नंतरच्या पिढीला प्रगत बनवू शकतील असे त्या आत्मचिंतनाचे स्वरूप होते. त्यांनी विद्यापीठांना ‘ज्ञानाकडे पाहण्याचा सार्वत्रिक दृष्टिकोन’ असलेले ठिकाण म्हणून पाहिले. तेथे “विद्याशाखांच्या सीमा लवचीक असतील आणि तज्ज्ञ म्हणवून घेणार्यांनी प्रत्येक ज्ञान शाखेला बोजड करण्याच्या प्रवृत्तीपासून सतत सावधगिरी बाळगलेले असतील.” त्यांना अशी विद्यापीठे हवी होती जिथे मानवीयता आणि विज्ञान एकत्र येतील आणि भौतिकी, रसायनशास्त्र, जीवशास्त्र यांसारखे विज्ञान, विद्याशाखा व इतिहास, साहित्य, तत्त्वज्ञानासारख्या मानव विद्याशाखा सुटे सुटे न राहता सह-अस्तित्वात असतील. संवाद, चर्चा आणि उदारमतवादी देवाण-घेवाणीसाठी संस्थात्मक स्थळ निर्माण करणार्या उच्च शिक्षणाच्या भूमिकेवर प्रो. यश पाल जास्त भर देत होते.
खर्या अर्थाने सामान्य लोकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा म्हणून त्यांना शक्य होईल त्या त्या पातळीवर प्रो. यश पाल शेवटपर्यंत प्रयत्नशील होते. एक शास्त्रज्ञ, एक कुशल विज्ञान प्रशासक, प्रसारक, प्रचारक, शिक्षण तज्ज्ञ व विज्ञानविषयक उत्कृष्ट संवादक म्हणून त्यांचा थोडक्यात परिचय करून देता येईल. प्रो. यश पाल हे सर्व आणि त्याहूनही बरेच काही होते.
प्रो. यश पाल यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी, त्यात त्यांनी ताजेपणा आणला. त्याच्या कार्यशैलीत नावीन्य होते. मूलगामी विचारांचे वातावरण निर्माण करणारे होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्या सोनेरी कालखंडात विक्रम साराभाई, सतीश धवन यांच्यासारखे भारतातील विज्ञानविषयक धोरणांचे धुरा सांभाळणार्या टेक्नोक्रॅट्स बरोबर कार्य करत असताना त्यांच्या विज्ञान-तंत्रज्ञानविषयक धोरणांची अंमलबजावणी करून शेवटच्या माणसापर्यंत त्यांची फळं पोचविण्यासाठी जिवाचे रान करत धडपड करणारे प्रो. यश पाल होते. तसेच त्या काळचे पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी सोपवलेले प्रत्येक काम अत्यंत गांभीर्याने आणि समर्पक वृत्तीने त्यांनी पार पाडले. अर्धशतकाच्या कारकिर्दीत त्यांनी ज्या ज्या पदांवर काम केले त्या त्या पदावर प्रो. यश पाल यांनी आपली अमीट छाप सोडली.
शालेय शिक्षणाच्या बाबतीतही प्रो. यश पाल तितकेच चिंतन करत होते. मुलांनी शाळेत जाताना वाहून नेलेल्या पुस्तकांच्या ओझ्याचा संदर्भ देत, त्यांनी सरकारला दिलेल्या एका अहवालात असे निरीक्षण नोंदवले होते: “शाळेच्या दप्तराच्या ओझ्याबद्दल, गेल्या काही वर्षांत परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. तथापि, शाळेच्या दप्तराचे वजन समस्येचे फक्त एक परिमाण दर्शवते; अधिक घातक ओझे म्हणजे समजूतदारपणा नसणे.”
अनेकांना त्याच्या नावाबद्दल कुतूहल आहे. प्रो. यश पाल यांनी त्यांचे मूळ आडनाव वगळले होते. काही वर्षांपूर्वी त्याचे चरित्रकार बिमान बसू यांना या आडनावाची संपूर्ण कहाणी त्यांनी सांगितली. जातिव्यवस्थेवर विश्वास न ठेवणार्या प्रो. यश पालच्या कुटुंबाने आधीचे त्यांचे आडनाव (भूतानी) वापरणे सोडून दिले होते. परंतु जेव्हा प्रो. यश १३ वर्षांचे होते व त्यांना त्यांची शाळा बदलावी लागली तेव्हा त्याने ‘आर्य’ हे आडनाव धारण केले आणि याच नावाने त्यांनी मॅट्रिकची परीक्षा दिली. १९४२ मध्ये, वयाच्या १५ व्या वर्षी, जेव्हा ते कॉलेजमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी विद्यार्थी चळवळ आणि स्वातंत्र्यलढ्यातून प्रभावित होऊन आपले आडनाव ‘भारती’ असे ठेवून घेतले. वैज्ञानिक प्रबंध प्रकाशित करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने पाल हे आडनाव मिळवले व नंतर ते प्रो. यश पाल म्हणूनच ओळखले गेले.
२४ जुलै २०१७ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी प्रो. यश पाल यांचे निधन झाले. भारताने विज्ञान-तंत्रज्ञानविषयक केलेल्या विकासात त्यांचा वाटा फार मोठा आहे.
ज्ञान देण्याच्या त्यांच्या प्रेमाबरोबरच, प्रो. यश पाल हे निश्चितच एक सामान्यासाठींचे वैज्ञानिक म्हणून ओळखले जातील. त्यांनी विज्ञानाबद्दलच्या लोकांच्या मनातील दृष्टिकोन बदलण्याचा प्रयत्न केला, हे आपण विसरू शकत नाही.
-प्रभाकर नानावटी
