संजीव चांदोरकर -

मुळात कर्जच का काढतात किंवा कर्जाची हाव सुटली आहे ही तुच्छता भाव बाळगणारी टीका एका बाजूला तर दुसर्या बाजूला कर्ज कधी काढू नये अशा नैतिक दृष्टिकोनातील मांडणी दुसर्या बाजूला. अशा सर्व मांडण्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत कर्जाबाबतचे निर्णय घेण्यास काही मार्गदर्शक तत्वे असू शकतात का यावरची चर्चा आता आपण करणार आहोत.
कर्जाबाबतचे निर्णय घेताना खालील गोष्टींवर विचार केला पाहिजे (१) कशासाठी कर्ज काढायचे, (२) कोणाकडून कर्ज काढायचे, (३) कर्जाच्या अटी काय असतील आणि (४) किती कर्ज काढायचे
कशासाठी कर्ज काढायचे
कर्जाचा हेतू किंवा काढलेले कर्ज कशासाठी वापरले जाणार हा खूप मूलभूत मुद्दा आहे. कर्ज जर कोणत्या तरी उत्पादक कामासाठी वापरले, उदा. शेतजमीन, जमिनीची उत्पादकता वाढवणे, छोटा मोठा धंदा, व्यवसाय, यंत्रसामुग्री तर त्यातून नवीन उत्पन्नाचे स्रोत तयार होऊ शकतात. कर्ज काढल्यामुळे जे नवीन ईएमआय भरावे लागतात, ते भरण्यासाठी अंशतः का होईना, अधिकचे पैसे हातात येऊ लागतात. त्यामुळे कर्जाचे ओझे वाटत नाही. अर्थात कर्जाची रक्कम पूर्णपणे उत्पादक कामासाठी वापरली जाणे, त्यातून किमान ईएमआय एवढा परतावा मिळेल हे पाहणे, या त्यासाठी पूर्वअटी आहेत. म्हणून शेती, धंदा, व्यवसाय यासाठी काढावयाच्या कर्जाची रक्कमदेखील वाजवी असली पाहिजे.
काढलेल्या कर्जामधून कोणताही उत्पादक माल तयार होणार नसेल, तर वाढीव ईएमआय, आधीच डोक्यावर असणार्या खर्चात भर घालतात. ईएमआय भरण्यासाठी आपले ऐच्छिक खर्च अनिच्छेने कमी करावे लागतात. काढलेल्या प्रत्येकच कर्जातून उत्पनांची साधने उभी राहतील, असा आग्रह धरणे अवाजवी आणि अव्यावहारिक आहे; पण एक गोष्ट नक्कीच आपल्या हातात आहे, ती म्हणजे अशी कंझम्पशन लोन्स कमी घेणे. याला अपवाद आहेत. उदा. घरातील कोणी व्यक्ती आजारी पडली किंवा मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून तातडीने फिया भरायच्या असतील तर आवश्यक त्या रकमांचे कर्ज काढावेच लागते.
कोणाकडून कर्ज काढायचे
बर्याचवेळा कोणाकडून कर्ज काढायचे याचा चॉईस गरिबांकडे नसतो, जो कर्ज द्यायला तयार आहे, त्याच्याकडून कर्ज घेतले जाते. पण होता होईतो थोडा वेळ लागला तरी, औपचारिक बँका, कर्ज कंपन्यांकडूनच, आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून कर्ज घेतले पाहिजे. खासगी सावकाराकडून पटकन, कागदपत्रे लागत नाहीत म्हणून कर्ज घेणे टाळले पाहिजे.
कर्जाच्या अटी काय असतील
कर्ज काढताना कर्जाच्या अटी काय आहेत याची पूर्ण शहानिशा केली पाहिजे. वेळ पडली तर दुसर्या कोणाकडून तरी त्या अटी समजावून घेतल्या पाहिजेत. या अटींमध्ये व्याजदर, ईएमआय, परतफेडीची मुदत, वसुलीच्या पद्धती, आणि काही छुप्या किमती (अप फ्रंट फी, विमा हप्ता इत्यादी) मोडतील. बाजारात कर्ज काढण्याचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती घेऊन, त्यांची तुलना केली पाहिजे.
किती कर्ज काढायचे?
कर्ज काढायचे की नाही काढायचे हा प्रश्न दुय्यम, कर्ज किती काढायचे हा कळीचा प्रश्न एका काल्पनिक उदाहरणावरून आपला मुद्दा समजावून घेऊ या. उदाहरण क्लिष्ट होऊ नये म्हणून अगदी साधी गृहीतके केली आहेत. एका प्रातिनिधिक गरीब कुटुंबाचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये असे मानू या. या कुटुंबाला या १५,००० रुपयांशिवाय दुसरा कोणताही उत्पन्नाचा स्रोत नाही. या कुटुंबाचा मासिक खर्च देखील १५,००० रुपयेच आहे. म्हणजे हे कुटुंब सध्यातरी कोणत्याही बचती करू शकत नाही. या १५,००० रुपये खर्चापैकी ७,५०० रुपये अनैच्छिक खर्च आहे आणि ७,५०० रुपये ऐच्छिक. काही छानचौकीसाठी, कर्ज सहजपणे मिळत आहे म्हणून या कुटुंबाने १०,००० रुपये कर्ज घेतले. ज्यावर त्यांना दर महिन्याला, पुढचे बारा महिने १००० रुपये ईएमआय भरायचा आहे.
हे लक्षात ठेवू या की कुटुंबाला ७,५०० रुपयांचे अनैच्छिक खर्च करावेच लागणार आहेत. आधीच्या अनैच्छिक खर्चात आता भर पडणार आहे अतिरिक्त १००० रुपये खर्चाची. कुटुंबाला आता ठरवायचे आहे अतिरिक्त १,००० रुपये ईएमआय भरण्यासाठी लागणारे पैसे कोठून आणायचे. उत्पन्नाचा दुसरा नवीन स्रोत उपलब्ध होणार नसल्यामुळे हे १००० रुपये कुटुंबाला आहे तेच ऐच्छिक खर्च कमी करूनच उभे करावे लागणार. म्हणजे ऐच्छिक खर्चासाठी कुटुंबाकडे ६,५०० रुपयेच उपलब्ध असणार आहेत. आधी चर्चा केल्याप्रमाणे कुटुंबाच्या हातात आहार आणि आरोग्यावरचे खर्च कमी करणे एवढेच असते. समजा त्याच कुटुंबाने काही कारणांसाठी १०,००० रुपयांऐवजी २०,००० रुपयांचे कर्ज काढले. तर १००० रुपयांचा नाही तर २००० रुपयांचा ईएमआय बसेल आणि ऐच्छिक खर्चासाठी ६५०० रुपये नाहीत तर आता ५,५०० रुपयेच हातात राहतील.
उदाहरणातील आकडे महत्त्वाचे नाहीत. या उदाहरणातील नाट्यपूर्णतादेखील सोडून द्या. मुद्दा हा आहे की कर्जाचा मासिक हप्ता जेवढा जास्त, त्याप्रमाणात कुटुंबाकडे ऐच्छिक खर्च करण्यासाठी उपलब्ध रक्कम कमी पडणार. किंवा असे म्हणता येईल की, कर्जाची रक्कम कर्जदाराच्या राहणीमानाची गुणवत्ता निर्णायकपणे ठरवत असते. स्वतःच्या किंवा माहितीतल्या आयुष्यातील अनेक प्रसंग आठवता येतील. त्यातून कर्ज काढताना नक्की किती कर्ज काढायचे, केव्हा काढायचे हे निर्णय घेताना अधिक स्पष्टता आणि ताकद मिळेल.
कमीत कमी कर्ज घ्या यातून काही अर्थबोध होत नाही. कर्जाचा हप्ता आपल्याला झेपेल एवढाच ठेवणे यातून अर्थबोध होतो. तुम्ही महिन्याला ३००० रुपये हप्ता भरू शकत असाल तर, खरेतर एव्हढेच कर्ज काढा, की त्याचा हप्ता २००० किंवा २५०० रुपयांपर्यंतच बसेल. उरलेल्या १०००-५०० रुपयांचे कुशन ठेवले पाहिजे. आपल्याला आहार, आरोग्यावरचे ऐच्छिक खर्च कमी करावे न लागता आपण किती ईएमआयचे ओझे सहन करू शकतो याचा ढोबळ आकडा आधी काढायचा. त्यावरून बॅक कॅल्क्युलेट करून कर्ज किती काढायचे हे ठरवायचे. स्वतःचे अंथरूण पाहून हातपाय पसरा, या गरीब स्त्रियांनी स्वतःच शेकडो वर्षे विकसित केलेल्या शहाणपणाची आठवण जागवण्याची गरज आहे.
कर्ज काढणे तत्त्वतः वाईट नाही. ते प्रमाणाबाहेर काढणे वाईट आहे. हे वित्त तत्त्वज्ञान रुजवावे लागेल. न झेपणारे कर्ज काढले तर कर्जबाजारीपणा येतो. दिवसाचे २४ तास चिंतेचा भुंगा मन पोखरत राहतो. जिणे हराम होते. आत्महत्यांचे विचार घोंगावू लागतात. अशी ती शृंखला आहे. त्याचा पुढचा गंभीर टप्पा असू शकतो कर्ज सापळ्यात अडकण्याचा (डेट ट्रॅप). आधीच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी नवीन, एखाद्या दुसर्या धनकोकडून कर्ज काढायला लागणे. याची चर्चा आपण करणार आहोत पुढील अंकात!
-संजीव चांदोरकर