अंनिवा -
अंनिसच्या प्रयत्नाने मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याचेवर गुन्हा दाखल
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील आर्यन दीपक लांडगे हा १४ वर्षीय शाळकरी मुलगा कर्नाटकातील मांत्रिकाच्या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना शनिवारी २० मे रोजी त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य ओळखून कवठेमहांकाळ अंनिसचे कार्यकर्ते फारुक गवंडी, सचिन करगणे, दिगंबर कांबळे, भगवान सोनंद यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी गावातील त्या कुटुंबातील नातेवाईकांची भेट घेतली. त्यांना आधार देऊन मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यास तयार केले.
त्यावेळी नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, आर्यनला ताप येत होता. तो लवकर बरा होत नव्हता. म्हणून आर्यनच्या एका नातेवाईक महिलेने आर्यनला कर्नाटकातील कुडची जवळील शिरगूर या गावातील आप्पासाहेब कांबळे या मांत्रिकाकडे उपचारासाठी नेले होते. त्या मांत्रिकाने सांगितले की, मुलाला बाहेरचा वसा बाधा झाली आहे, त्याच्या अंगात भूत शिरलं आहे, ते बाहेर निघत नाही. म्हणून त्या मुलाची भूतबाधा बाहेर काढण्यासाठी मांत्रिकाने त्या मुलाला अमानुषपणे मारहाण केली. यात त्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, उपचार सुरू असतानाच त्या मुलाचा मृत्यू झाला.
मांत्रिकाच्या अमानूष मारहाणीमुळे आर्यनचा मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, त्यामुळे या मांत्रिकावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे सहा. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्याकडे केली. त्यांनी तात्काळ मुलाच्या आईला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन तिची फिर्याद दाखल करून घेऊन मांत्रिक आप्पासाहेब कांबळे याचेवर खझउ ३०४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
आजच्या विज्ञान युगात आजारांवरील उपचारासाठी मांत्रिकाकडे जाणे हे अज्ञानपणाचे लक्षण आहे. मांत्रिकाच्या अघोरी कृत्यामुळे अशा घटना घडतात, तेव्हा मांत्रिकाच्या पासून सावध रहावे, असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते डॉ. संजय निटवे, राहुल थोरात यांनी केले आहे.