राजीव देशपांडे -
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या शहिदत्वाला या 20 ऑगस्टला 9 वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या 9 वर्षांत ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांचा एकही दिवस असा गेला नसेल की, दाभोलकरांची आठवण आली नसेल. डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर कार्यकर्त्यांनी गेल्या नऊ वर्षांत अतिशय चिकाटीने काम सुरू ठेवत चळवळीची कक्षा अधिकाधिक व्यापक केलेली आहे. त्यांच्या खुनाच्या खटल्यासंदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया अजूनही चालूच आहे. साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्याच्या टप्प्यावर खटला आला आहे. हा खटला जलदगतीने चालवावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने सीबीआयला केली आहे.
या ऑगस्टमध्ये भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना एकूणच संवैधानिक पुरोगामी मूल्यांवरचे संकट अधिकाधिक गहरे होत आहे; तसेच आजच्या सत्ताधारी पक्षाकडून अंधश्रद्धांचे उघड-उघड समर्थन केले जात आहे. परंपरागत ज्ञानाच्या नावाखाली फलज्योतिष, मंत्र-तंत्र, वास्तुशास्त्र यांसारखे छद्मविज्ञान विद्यापीठीय अभ्यासक्रमात घुसवले जात आहे. धार्मिक-जातीय द्वेषाची परिणती माणूस क्रूरपणे जाळण्या- मारण्यात होत आहे. त्याचबरोबर अगदी सुशिक्षित लोकांतही गुप्तधनासाठी नरबळी, पैशांचा पाऊस अशांसाररख्या अंधश्रद्धांच्या प्रकरणांतही वाढ झाल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती जरी आजची असली तरी अशा परिस्थितीचे वेध घेणारे व त्याची कारणमीमांसा स्पष्ट करणारे ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’ हे पुणे विद्यापीठात डॉ. दाभोलकरांनी फेब्रुवारी 2010 मध्ये केलेले प्रदीर्घ भाषण आम्ही या विशेषांकात देत आहोत; तसेच सुप्रसिद्ध लेखक अनिल अवचट यांचेही नुकतेच निधन झाले. दाभोलकरांचे उत्कृष्ट संघटनकौशल्य उलगडून दाखविणारा अनिल अवचट यांचा लेखही वाचनीय आहे. या विशेषांकात सिनेअभिनेते किरण माने यांनी डॉ. दाभोलकरांच्या आठवणी जागवल्या आहेत.
आजच्या राजकीय, सामाजिक नेत्यांची संवादाची भाषा घसरली आहे. त्यानिमित्ताने डॉक्टरांच्या संवाद पध्दतीवर डॉ. हमीद दाभोलकर यांनी लिहिले आहे; तसेच प. रा. आर्डे यांनी डॉ. दाभोलकरांच्या विचारांच्या अंगाने धर्मभावना, धर्मसंस्था, धर्मचिकित्सेचा वेध घेतला आहे. सुभाष थोरात यांनी भारतीय संस्कृतीतील अवैदिकांच्या धर्मचिकित्सेचा ऊहापोह केला आहे; तर उमेश सूर्यवंशी यांनी सत्याग्रही दाभोलकर उभे केले आहेत. राजा कांदळकर यांनी डॉक्टरांच्या आठवणी जगविलेल्या आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा हा नववा डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती अंक डॉक्टरांच्या स्मृती जाणविणारा; त्याबरोबर वैचारिक साहित्याने भारलेला झाला आहे. वाचक याचे नक्की स्वागत करतील, असा विश्वास आहे.