रेड लाईट डायरीज – अंधारात लुप्त झालेल्या ज्योती!

समीर गायकवाड -

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक देवदासींना भेटलो; पण शांतव्वा आणि नलिनीला कधीही विसरू शकलो नाही, किंबहुना त्यांच्यासारख्या कुणी भेटल्याच नाहीत. कारण त्या प्रत्येकीची कथा वेगळी होती, पार्श्वभूमी वेगळी होती. क्वचित काहीजणी यातून सुटल्या होत्या; पण गतपिढीतल्या जेवढ्या म्हणून भेटल्या त्यांच्या लुगड्यात केवळ आणि केवळ अंधारच सापडत गेला, तो ही भोगवादाचा शाप लागलेला! देवदासींच्या आयुष्याचा पट मांडताच सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल कणव दाटून येते, आता कायद्याने बंदी घातलेल्या या प्रथेत डोकावताना दुःख वाटण्याआधी आपली आणि आपल्या समाजाची किळस वाटू लागते. या बायकांची जिंदगानी बरबाद करून आपल्या अभद्र विकृत संस्कृतीची सूक्ते रचून त्याचा कथित सात्त्विक आनंद आपण अनुभवत राहिलो. केवळ देवदासींच्या आयुष्याची परवड मांडून त्यातली जीवघेणी बोच उमगणार नाही त्यासाठी देवदासींच्या प्रथेचा, रिवाजाचा धांडोळा घेणं अनिवार्य ठरतं.

समीर गायकवाड


शांतव्वा

देवदासींच्या वेदनांचा झंकार

‘रेड लाईट डायरीज’ हे केवळ अरण्यरुदन वा करुणाष्टक नाहीये, त्यातल्या प्रत्येक शब्दशृंखलेत समाजाने आपल्या पोलादी टाचेखाली रगडलेल्या स्त्रियांचे श्वास दफन आहेत. समाजाने त्यांना कधीच आपलं मानलं नाही, कसलाही मान दिला नाही की, कधी आस्था दाखवली नाही; परंतु त्यांचं अव्याहत अखंड शोषण जारी ठेवलं. ही गाथा केवळ वेश्यांची नाहीये तर, देहविक्रयाच्या बाजारात उभ्या राहणार्‍या हरेक वंचितांची आहे. यात वेश्या आहेत, देवदासी आहेत आणि किन्नरही आहेत! अनंत काळापासून हक्काने ज्यांचं शोषण होत राहिलं आणि जग तमाशबीन बनून बघत राहिलं असे हे तिन्ही घटक खर्‍या अर्थाने त्रिकाळ वंचित राहिले. पैकी देवदासी आणि किन्नरांच्या आयुष्यावरचा हा कटाक्ष वाचणार्‍याच्या काळजाला बाभळीच्या काट्याचा सल देतो. तरीही त्या काट्याचा नासूर झाकून ठेवण्याकडेच समाजाचा कल आहे, घाणीचा कधी सुगंध येणार नाही तिचा वास घेऊन काय फायदा? अशी ही मनोवृत्ती. ही घाण आपणच निर्मिलेली आहे याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. यांना विसरू शकत नाही. यांच्या आठवणींनी आकाश व्यापले आहे.

प्रत्येकाच्या अनेक तर्‍हेच्या पाऊसआठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिच्या आठवणीने डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह; पण काळजातली धग म्लान चेहर्‍यावर निखार्‍यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन् चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खार्‍या पाण्यात विरघळून गेला असावा.

पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरात एक फेरी मारून झाली की, शांतव्वाची सकाळ पुरी होई. शांतव्वाचं मूळ गाव तिला अखेरच्या काळात आठवत नव्हतं; पण ती कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातली होती इतकं तिला माहिती होतं. डोक्यात जट आली म्हणून तिच्या बालपणीच तिला देवाला वाहिलेलं होतं; पण यल्लमाचा जग तिच्याकडे नव्हता. परडी, कोटंबा वागवत होती ती. घामटलेल्या कपाळावर हळदीचा मळवट भरून फिरायची. गळ्यात कवड्याची माळ अन् चरबटून गेलेल्या केसांच्या तेलकट, मळकट जटा. वेडेवाकडे दात, फेंदारलेलं नाक, मोठाल्या नाकपुड्या, ओठावर किंचित केसांची लव, वर आलेली गालफाडे, खोल गेलेले मिचमिचे डोळे, जाड भुवया, सदा हलत असणार्‍या कानाच्या जाड पाळ्या, नाकातल्या छिद्रात कसल्या तरी काडीचा बारीक तुकडा टोचलेला, कवड्याच्या माळेचे गळ्यावर पडलेले वळ, रंग फिकट झालेल्या हिरवट बांगड्या, तेलकट डाग पडलेलं खांद्यावरून ओघळणारं सैलसर पोलकं, अंगाभोवती कशी तरी गुंडाळलेली जुनेर साडी, लोकांनी टाकलेल्या काहीबाही तेलकट गुळचट पदार्थांनी लडबडलेली परडी हातात घेतलेली शांतव्वा अजूनही डोळ्यांपुढून हलत नाही.

शांतव्वा कितीतरी वर्षे बिदरमध्येच होती. तारुण्य संपलं आणि देवाच्या भक्तांचा तिच्यातला रस गेला. तिचे खायचे प्यायचे वांदे होऊ लागले, भीकही मागता येईना आणि पोटाला मिळेना अशा अवस्थेत ती राहू लागली. ज्या देवळाजवळ ती चोवीस तास बसून असायची, ते देऊळ रस्ता रुंदीकरणात पाडलं गेलं आणि ती अक्षरशः सडकेवर आली. इकडं तिकडं झोपावं म्हटलं तर, त्या त्या भागातले भिकारी तिला झोपू देईनासे झाले, हिच्यामुळे त्यांच्या घासातला एक घास कमी होईल अशी त्यांना भीती होती. सगळीकडून तिला हाकललं जाऊ लागलं. डोक्यावर फाटक्या लुगड्यात बांधलेलं गाठोडं अन् काखेत झोळी घेऊन फिरत फिरत सहाव्या सातव्या दिवशी ती रेल्वे स्टेशनजवळ आली. तिथल्या काही किन्नरांनी तिला सोबत घेतलं आणि त्यांच्याबरोबर पुण्यात आणलं. बुधवारात त्यांच्या गल्लीत आणून सोडलं.

पुण्यात आल्यावर शांतव्वाच्या पोटाचा प्रश्न मिटला; पण तिची अवहेलना सरली नाही. तिला कुणी काळजाशी धरलं नाही की कुणी तिच्या गालावरून मायेचा हात कधी फिरवला नाही. तिचे डोळे कुणी पुसले नाहीत की, तिच्या पायाला पडलेल्या भेगा कुणाला दिसल्या नाहीत. बघता बघता तिला पुण्यात येऊन दोन दशकं लोटली. तिला आता आसरा होता, गल्लीच्या कोपर्‍यावर असणार्‍या मरीआईच्या छोट्याशा देवळाजवळचा. रात्रीचा ठिय्याही पक्का झाला होता. भारतीच्या खोलीत एका ट्रंकेत तिच्या सामानाला जागा मिळाली होती. तिचे दिवस पाय खरडत खरडत जात होते, अन् अंधाररात्री वेदनांच्या गाळात सरपटत जायच्या. एका रात्री मरीआईच्या छोट्याशा देवळापाशी ती बसलेली असताना तिथली कुत्री भुंकू लागली, त्यांना काही तरी सुगावा लागला असावा. त्यांचं भुंकणं ऐकून त्याच रस्त्याने पळत जाणार्‍या दोन पाच टारगटांनी रस्त्याच्या कडेला पडलेले दगड उचलून मारले. त्यातले दोन दगड शांतव्वाला लागले. एक डोक्यात कानामागे वर्मी बसला, तर एक कपाळावर बसला. डोळा जाता जाता राहिला. तिच्या कपाळातून भळाभळा रक्त येऊ लागलं. कानामागं वर्मी लागलेल्या घावाने ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली. त्या गल्लीत तिची कुणी दखल घ्यावी असं काही विशेष त्यात नव्हतं. जोरात फेकून मारलेला दगड लागल्याने एक कुत्रंही तिथंच केकाटत होतं. त्या अंधाररात्री एक जखमी कुत्रं आणि एक जखमी बेवारस वयस्क स्त्री निपचित पडलेले होते. अखेर मध्यरात्र झाल्यावर कचरा उचलणार्‍या लोकांनी म्युनिसिपालटीच्या लोकांना कळवलं. शांतव्वाला ससूनमध्ये भरती केलं गेलं. घावाच्या निमित्ताने तिच्या जटा कापल्या गेल्या. एक मोठं ओझं अकस्मात उतरलं…

शांतव्वा शुद्धीवर आली आणि त्या दिवसापासून खेळणं हरवलेल्या लहान मुलासारखी ती भांबावून गेली. आपल्या जटा गेल्या याचा तिला आनंद झाला नाही, उलट आपलं काहीतरी हिरावून घेतलं, असंच तिला वाटू लागलं. भारती आणि तिचे सहकारी दोन तीन वेळा दवाखान्यात तिला भेटायला आले तेव्हा ती धाय मोकलून रडली होती. बरी होऊन परतल्यावर ती मूक राहू लागली. तिचं फिरणं कमी होऊ लागलं. काहींनी तिची सोय लावता येईल का, याचे प्रयत्न करून पहिले. अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जायला ती नको म्हणायची. ‘इथंच गल्लीतल्या उकिरड्याजवळच्या मरीआईच्या देवळाजवळ मला मरायचंय’ असं म्हणायची. खरं तर तिची देवावर तिळमात्र श्रद्धा नव्हती. ‘मला देवाला अर्पण केलं त्याच दिवशी सगळे देव माझ्यासाठी मेले’ असं ती सांगायची. आपण असे कोल्ह्याकुत्र्यागत मेल्यावर तरी जगाला काही कळेल, असं तिला वाटायचं. देवाच्या नावानं जगलेल्या लोकांचे हालही देव कुत्र्यासारखेच करतो, हे तिला जगाला दाखवून द्यायचं होतं, त्यासाठीच हा आटापिटा होता. कुणी तिच्या पुढ्यात काही टाकलं तर तितकंच ती खायची. तिच्या ओळखीतले लोक एकेक करून गल्ल्या, शहर बदलून निघून गेले होते, त्यामुळे तिची विचारपूस करणारं खास कुणी नंतर उरलं नव्हतं. कधीकधी भारतीच तिच्यासाठी काहीतरी खायला पाठवून द्यायची. शेवटच्या वर्षभरात तर तिच्या अंगावरच्या कपड्यांच्या चिंध्या झाल्या. हातापायाची लांबसडक बोटे कसनुशी दिसत होती, दंडाचं मांसल कातडं लोंबू लागलं होतं. डोळ्यांखालची वर्तुळं दाट काळी झालेली, हाडाचा सापळा उरलेला होता फक्त. त्या भेसूर चेहर्‍यावरही ती तेवढ्यात हळद लावायची, ‘आणखी अभद्र दिसायचं होतं का तिला’ या प्रश्नाचं उत्तर काही मिळालं नाही. शेवटच्या दिवसांत तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आभाळ भरून आलं की, छातीतला भाता बंद होतो की काय असं वाटायचं. पाऊस पडू लागला की, लाख गोष्टी आठवायच्या तिला. डोळ्यातून धारा वाहायच्या. फाटक्या पदराने डोळे पुसत शून्यात नजर लावून बसायची ती. ‘हा पाऊसच आपली सुटका करून जाणार आहे’ हे तिला पक्कं ठाऊक होतं…

एका पावसाळी पहाटे तिचं प्राणपाखरू उडून गेलं. एकदाची सुटली बिचारी. तिनं किती भोगलं अन् काय काय भोगलं याला न अंत ना पार. आयुष्यात तिनं काय कमावलं याच्या बेरजेसाठी एकही अंक काबील नव्हता, अन् तिनं काय गमावलं नाही, हे सांगायला हरेक शब्द कमी पडत होता. दुःखात सुख शोधताना, खरं सुख काय असतं हेच ती विसरून गेली होती. म्हणूनच की काय मेल्यावरही तिच्या चेहर्‍यावर हास्याची एक छटा पहिल्यांदाच उमटली होती. तिची मयत झालेलं बुधवारातल्या गल्लीत कळलं. अनेक जीव तळमळले. तिच्या कलेवराला दहन देऊन झालं. त्या नंतर जग तिला विसरून गेलं. जो तो आपल्या दुनियेत गर्क झाला. सामन्यांच्या दुनियेत जिथं कमालीचा रूक्षपणा येत चाललाय, तिथं या बाजाराची काय कथा? तरीही काही लोकांनी तिला आपलं मानून तिच्या आयुष्यातले काही सुखदुःखाचे क्षण वाटून घेतले होते. आता तिच्या पश्चात तिची आठवण निघणे कठीण होते; पण म्हातारपणाकडे झुकलेल्या भारतीला एका दुपारी तिची तीव्रतेने आठवण झाली त्याचं कारण म्हणजे भारतीच्या खोलीतली सफाई करताना ट्रंकेच्या ढिगार्‍यात ठेवलेली शांतव्वाची मोडकळीस आलेली ट्रंक!

भारतीने पुढे होत ती ट्रंक बाहेर खेचून काढली. त्यावर लागलेली जाळ्या-जळमटे पुसून काढली. धूळ झटकली. कडी कोयंडे कधीच तुटून गेलेले होते. आत काही मौल्यवान ऐवज असण्याची कसलीही शक्यता नसल्याने तिला कधी कुणी हात लावलेला नव्हता. तरीही ट्रंक उघडताना भारतीला थोडीशी धाकधूक वाटत होती. पत्रा गंजून गेलेल्या त्या ट्रंकचं झाकण तिनं मागे लोटून दिलं. काही क्षण भयाण शांततेत गेले आणि भारतीच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या ट्रंकेत लहान बाळाच्या हातात घालायचे गिलटाचे वाळे होते, चांदीचं पाणी दिलेलं एक काळपट पैंजण होतं जे बहुधा कधी पायात घातलेलं नव्हतं. बेन्टेक्सचे खोटे दागिने होते. छिद्र पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या, पदरावरची नक्षी उडालेल्या, दोन साड्याही होत्या. काळपट डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर होते. समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले, वीण उसवलेले दोन ब्लाऊज होते. एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी; पण एकाच जागी ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडीही होती. गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो, कुठली तरी जुन्या जमान्यातली बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर होती. हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगार्‍याची पुडी, स्पंज निघालेली दोरे तुटलेली बेरंग झालेली राखी होती. ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकड्याच्या हिरव्या बांगड्या होत्या. मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी होती. काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम होती. बोरमाळीच्या सरीला असणार्‍या लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे होते. कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती होती. वरचे अस्तर खरवडून गेलेली, पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स. फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी, मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे होते- ज्यात तिचं विसकटलेलं मन वसलं होतं. इतकं सारं सामावून घेणारी पत्र्यावरील फुलांचे चित्र धुरकट झालेली ती ट्रंक पाहून भारतीचं मन गलबलून गेलं होतं. खरं तर शांतव्वाची शिल्लक तेवढीच नव्हती अजूनही काही होतं. देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं बाकी होतं, टपरीमधल्या चहा कँटीनची किरकोळ उसनवारी होती. करपून गेलेल्या इच्छा होत्या, चक्काचूर झालेली स्वप्नं होती. मरून गेलेल्या वासना होत्या, घुसमटून गेलेलं मन होतं, खंगलेलं कलेवर सडकेवर टाकून बुधवारातली शांतव्वा वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत तडफडून मरून गेली, तेव्हा तिची शिल्लक इतकीच होती; पण कोणा कोट्यधीशाच्या शिलकेपेक्षा अधिक नीती त्यात होती, सच्चेपणा होता. त्यात उदासताही होती; पण काळीज चिरणारा टोकदार नियतीचा सलही होता. अजूनही कधी मंद धारांत कोसळणारा तसा पाऊस आला की, शांतव्वा डोळ्यापुढे येते आणि काळजातून तिच्या वेदनांचा झंकार होत राहतो. देवदासी हा शब्द जरी उच्चारला तरी शांतव्वा माझ्या डोळ्यापुढे तरळते.


कथा नलिनीची…

शांतव्वाची जशी दास्तान आहे तशीच नलिनीचीही एक कथा आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या चिकोडी तालुक्यातील बेडकीहाळ हे नलिनीचं गाव. ती लहान असतानाच तिची आई वारली, बापाने दुसरं लग्न केलेलं, सावत्र आई तिला जनावरासारखं वागवायची, अमानुष मारहाण करायची. तिला उपाशी ठेवलं जायचं. रात्रंदिवस कामाला जुंपलं जायचं, तक्रार केली तर आणखी जाच व्हायचा. दारुड्या बापाला तिच्यासाठी वेळच नव्हता. तिचे हाल पाहून अनेकांना वाईट वाटायचं; पण कुणीच मध्ये पडत नव्हतं, कारण तिच्या सावत्र आईचा भयंकर कजाग स्वभाव आणि कमालीची अरेरावी याला सगळे घाबरत. चिमुरड्या नलिनीला वाटायचं की, कुठल्या तरी नातलगाने यावं आणि या नरकयातनांतून आपल्याला मुक्त करावं, जमल्यास आपला सांभाळ करावा, त्या बदल्यात आपण आपल्या कातड्याचे जोडे करून त्याला अर्पावेत! पण तिची दाद फिर्याद घ्यायला कुणीच नव्हतं. तिच्या आईला तीन बहिणी होत्या, या तिघींनाही वाटायचं की सावत्र आईच्या जाचातून आपण नलिनीला मोकळं केलं पाहिजे; पण त्यांचीच परिस्थिती इतकी हलाखीची होती की, अन्नाच्या दोन घासाला त्या मौताज होत्या. राहायला झोपडी, हाताला काम नाही, नवरे कामचुकार आणि व्यसनी, खेरीज पोरांचं लेंढार पोटाला, अशी त्यांची अवस्था होती. त्यामुळं केवळ कोरडे सुस्कारे सोडण्याशिवाय त्या काहीच करू शकत नव्हत्या. अखेर त्यांनी आपल्या भावाला म्हणजे सिद्धूला गळ घातली. सिद्धूचं हातावरचं पोट होतं. सेंट्रिंग कामावर तो मजुरी करायचा, त्यातून मिळणार्‍या तुटपुंज्या उत्पन्नात त्याचं कसंबसं भागायचं. त्याची बायको मोलकरणीचं काम करत लोकांची धुणीभांडी करायची. हातातोंडाचा मेळ कसाबसा लागायचा.

सिद्धूचं गाव हुन्नरगी. वेदगंगेच्या काठावरचं हे छोटंसं खेडं. नदीकिनार्‍यावर असलेल्या महादेव मंदिरालगतच्या वस्तीत त्याची झोपडी होती. तिथून पंधरा किमी अंतरावर असलेल्या निपाणीला तो कामाला जायचा. तिथं काम नसलं तर कागल, बेडकीहाळ नाहीतर करनूरला जावं लागायचं. त्याचा अख्खा दिवस कामावर जायचा. घरी सावित्री आणि पोरं असायची. बायको सावित्रीचा विरोध पत्करून त्यानं नलिनीला आपल्या घरी नेलं; पण नलिनीचं दुर्दैव इथंही आडवं आलं. नलिनीची आबाळ होत राहिली आणि एके दिवशी सावित्रीचा लहान भाऊ श्रीपाद सावित्रीच्या घरी मुक्कामी आला. त्याची नजर वाईट होती, त्यानं नलिनीला हेरलं. तिची शिकार करण्याच्या वासावर तो घरात हुंगत राहिला. किशोरवयीन नलिनीला कुस्करण्याचा प्रयत्न त्याने केला. अचानक ओढवलेल्या प्रसंगी नलिनीने आरडाओरडा करताच शेजारपाजारचे लोक गोळा झाले, त्यांनी त्या पोराला जाम चोप दिला. सावित्री मध्ये पडली, तिने हात जोडले. लोकांच्या मिनतवार्‍या केल्या आणि भावाला कसंबसं वाचवलं. सावित्रीने गयावया केल्याने लोकांनी तिच्या वासनांध भावाला पोलिसात दिलं नाही. तो थोडक्यात बचावला. अधिक बदनामी टाळण्यासाठी त्याच दिवशी तो आपल्या गावी निघून गेला. तो सुटला; पण नलिनीचे दिवस फिरले. ‘नलिनीच खोडपत्री आहे, तिचं पाऊल वाकडं आहे, तिनेच गळ टाकून माझ्या भोळ्याभाबड्या भावाला फसवलं’ असा कांगावा सावित्रीने सुरू केला. बायकोपुढे हतबल झालेल्या सिद्धूला नलिनीच्या बाजूने ठाम उभं राहता आलं नाही. सावत्र आईने नलिनीचे जे हाल केले होते, त्याहून वाईट हाल आता होऊ लागले.

नलिनी घरातली सगळी कामं करून थकून जायची, मामाच्या पुढं तोंड उघडायला तिला मनाई होती. तिच्या वेदना सिद्धूला उमगत; पण तो पुरता हतबल होता. घरी कुणीच नसलं, सावित्रीमामी बाहेर गेलेली असली की, नलिनी उपाशी पोटाने नदीकाठी जाऊन बसायची. आपल्या मेलेल्या आईची आठवण काढून रडत बसायची, कदाचित नदीच्या प्रवाहात तिला आई भेटत असावी. आपल्या मनातली सगळी दुःखं ती नदीला ऐकवायची, तिच्या डोळ्यातून पाझरणारे अश्रू आपल्या ओंजळीत घेताच नदीला गदगदून यायचं. नलिनीचं कातरदुःख खर्‍या अर्थाने वेदगंगेनंच ऐकलं बाकीच्यांनी तर तेही केलं नाही. कधीकधी नलिनीला वाटायचं की, आपण आईच्या कुशीत लीन व्हावं, नदीत जीव द्यावा. तिनं एकदा प्रयत्न करून पाहिला; पण तोसुद्धा अंगलट आला. नदीपात्रात वाहून चाललेल्या नलिनीला काठावर धुणं धुणार्‍या एका बाईने वाचवलं. घरी गेल्यावर तिला सणकून मार बसला. आपल्याला मार खावा लागला याचं नलिनीला फारसं दुःख झालं नाही; परंतु नदीकडं जायची बंदी घातली गेल्याच्या लक्षवेदनांच्या इंगळ्यांनी तिला डसलं. त्या दिवसापासून ती स्वतःला कोसत, एकांतात कुढत जगू लागली.

इतकं होऊनही सावित्रीचं समाधान होत नव्हतं, नलिनीच्या आयुष्याचं वाट्टोळं व्हावं या असूयेनं तिला ग्रासलं होतं. एकदा तिची बहीण भामा तिला भेटायला आली. सावित्रीनं भामाला ‘त्या’ प्रसंगाविषयी सांगितलं. आपल्या भावाची किती बदनामी झाली हे सांगताना नलिनी किती हलकट मुलगी आहे हे सांगायला ती विसरली नाही. रात्रभर त्या दोघींनी खलबतं केली. नलिनी इथं राहिली तर आपल्या पोराबाळांवर अनिष्ट परिणाम होतील, शिवाय भविष्यात तिच्या लग्नाचा खर्च आपल्यालाच करावा लागणार त्याचा खड्डा वेगळाच. त्यापेक्षा तिला पद्धतशीरपणे घरातून हाकलून लावलं पाहिजे, यावर त्यांचं एकमत झालं. सावित्रीच्या बहिणीने यावर क्लृप्ती शोधली. दोनच दिवसांत नलिनीच्या केसात नवीन बट आल्याची बतावणी तिनं सुरू केली. यल्लम्माचा कोप होईल, नलिनीला देवीने बोलवलं आहे तेव्हा तिला लवकरात लवकर देवीच्या स्वाधीन केलं पाहिजे अशी आवई तिनं उठवली. काही दिवसांतच नलिनीचा विधिवत काटा निघाला. नलिनी देवदासी झाली. नंतर तिला अनेकांनी भोगदासी केलं.

लहानपणी वेदगंगेच्या पात्रापाशी बसून मनातलं मळभ रितं करू इच्छिणार्‍या नलिनीने देवदासी झाल्यानंतर पुन्हा कधीही नदीकाठ गाठला नाही. नलिनीच एक नदी झाली जिच्यात अनेकांनी डुबक्या मारल्या, तिचं निर्मळ पात्र नासवलं! सांगली जिल्ह्यातल्या जतच्या एसटी स्थानकानजीक रखरखीत उन्हाळ्यात नलिनी मला भेटली होती तेव्हा तिचं वय चाळीशीच्या आसपास झालेलं. डोक्यातल्या जटा तिनं पदराआड झाकल्या होत्या. तिच्या कपाळावरचा मळवट चिंबट झाला होता. काया म्लान झाली होती. चेहरा निस्तेज वाटत होता, सगळं अंग सैल झालं होतं. ब्लाऊजची बटनंदेखील तिने नीट लावली नव्हती, ओघळलेले स्तन त्यातून अर्धेउघडे दिसत होते. पायातल्या फाटक्या वहाणा आणि निर्‍या निसटलेली अंगावरची मळलेली साडी खूप काही सांगत होती. तिच्या हातात, गळ्यात काहीच नव्हतं. कलियुगातल्या शंकरानेच नागवलं असल्यानं तिला लंकेची पार्वती असंदेखील म्हणावंसं वाटलं नाही. माझ्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावताना तिच्या मळलेल्या भेगाळलेल्या तळहाताचा राठपणा उगाच अस्वस्थ करून गेला. तिच्या तोंडाचा देशी दारूचा वास माझ्या रंध्रात वेगाने घुसला. अतीव उग्र दर्प होता तो. तिच्या नजरेत एक खोल गेलेलं शून्य कृष्णविवर होतं, ज्यात डोकावताच नखशिखांत हादरून गेलो. तिनं कुंकू लावताच तिच्या पायाच्या दिशेने वाकलो, पायाच्या तर्जनीत खोल रुतून बसलेली जोडवी घायाळ करून गेली कारण बोटांना जोडव्यांची जखम झाली होती. पावलांच्या दिशेने वाकताच ती सर्रकन मागे सरकली. “इल्ले, इल्ले.. नको रे बाबा, माझ्या का पाया पडतोस?… छद्मी हसत पुढे म्हणाली, “अरे लोक तर माझे पाय फाकवतात!” एका फटक्यात तिने त्रिकालाबाधित सत्य सांगितलेलं. नलिनीशी बर्‍याच मनमोकळ्या गप्पा झाल्या. नलिनी बाणाच्या टोकासारखी होती अणकुचीदार! पण आपण कुणाच्या भात्यात आहोत आणि आपल्याला कोण वापरतं हे तिला कधीच कळलं नाही, जगाने मात्र तिचा टोकदारपणा मुंड व्हावा म्हणून प्रयत्न केलेला; पण या युद्धात जग हरलं आणि नलिनी जिंकली. तिचा टोकदार स्वभाव बदलला नाही. नलिनीची तुलना नकळत मी शांतव्वाशी कधी केली हे कळलेदेखील नाही इतकं तिने खेचलं होतं.

नलिनीला आपल्या आयुष्याचा पस्तावा नव्हता; पण त्यात जगण्याची ओढही नव्हती. ती पक्की नशेडी झाली होती. गांजा, दारू, तंबाखू यांचं व्यसन जडलं होतं तिला. ‘माणसांनी धोका दिला; पण व्यसनं मला कधीच धोका देणार नाहीत’ असं हसतमुखाने सांगणार्‍या नलिनीच्या डोळ्यात एका क्षणासाठी विलक्षण चमक तरळली, तेव्हा जीव कासावीस झाला. वासनेत स्वारस्य असण्याचा नलिनीला प्रश्नच नव्हता, कारण देहभावना काय असतात हेच मुळात तिला कधी कळू दिलं गेलं नाही. तिला सदैव कुस्करलं गेलं, रगडलं गेलं. तुला जर पुन्हा जन्म मिळाला तर काय व्हायला आवडेल असं विचारता निमिषार्धाचाही वेळ न लावता ती उत्तरली होती, “देवी ज्या वाघावर बसते ना, तो वाघ व्हायला आवडेल. एकेक माणूस, एकेक बाई मी चावून चावून खाईन! हे सांगताना तिनं इतकं विकट हास्य केलं होतं की, तिच्यातला लाव्हा त्यातून ओसंडून वाहत होता. तिच्या काही व्यसनांची पूर्तता करून तिचा निरोप घेताना मी थिजून उभा होतो. ती जड पावलांनी पुढे जात होती. रस्त्याला वळण लागताच तिने मागं वळून पाहिलं तेव्हा का कुणास ठाऊक; पण तिच्या डोळ्यात ओल जाणवली. हे असं केवळ कासावीस होत राहणं खूप अवघड असतं. काळीज विदीर्ण होऊन जातं. मधल्या काळात नलिनी आजघडीला जिवंत असेल का आणि असलीच तर कशा अवस्थेत असेल, याचा शोध घेण्याची हिंमत मी कधीच जुळवू शकलो नाही.

०००

उत्तर कर्नाटक आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक देवदासींना भेटलो; पण शांतव्वा आणि नलिनीला कधीही विसरू शकलो नाही, किंबहुना त्यांच्यासारख्या कुणी भेटल्याच नाहीत. कारण त्या प्रत्येकीची कथा वेगळी होती, पार्श्वभूमी वेगळी होती. क्वचित काहीजणी यातून सुटल्या होत्या; पण गतपिढीतल्या जेवढ्या म्हणून भेटल्या त्यांच्या लुगड्यात केवळ आणि केवळ अंधारच सापडत गेला, तो ही भोगवादाचा शाप लागलेला! देवदासींच्या आयुष्याचा पट मांडताच सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल कणव दाटून येते, आता कायद्याने बंदी घातलेल्या या प्रथेत डोकावताना दुःख वाटण्याआधी आपली आणि आपल्या समाजाची किळस वाटू लागते. या बायकांची जिंदगानी बरबाद करून आपल्या अभद्र विकृत संस्कृतीची सूक्ते रचून त्याचा कथित सात्त्विक आनंद आपण अनुभवत राहिलो. केवळ देवदासींच्या आयुष्याची परवड मांडून त्यातली जीवघेणी बोच उमगणार नाही त्यासाठी देवदासींच्या प्रथेचा, रिवाजाचा धांडोळा घेणं अनिवार्य ठरतं.


देवदासी : प्रथा आणि व्यथा

देवदासींची समस्या अनिष्ट धार्मिक रिवाज, अंधश्रद्धा आणि गैरसमज यांच्या जाळ्यात गुरफटलेली आहे. खरेतर देवदासी हा हिंदू धर्मातील समाजरचनेवरचा काळा डाग आहे. कितीही प्रयत्न झाले तरी, अजूनही तो सकल पुसला गेलेला नाही हे सत्य आहे. पुरुषी वर्चस्वाच्या शोषक सामाजिक उतरंडीतला तळाचा फुटलेला स्त्रीदेहाचा कलश म्हणजे देवदासी. देवदासी या केवळ नावाला देवाच्या दासी असतात. प्रत्यक्षात त्या असतात भोगदासीच. देवदासींवर लिहिताना कर्नाटकातील सौंदत्तीच्या यल्लमा देवस्थानला आणि तिथल्या रिवाजांना वगळून चालत नाही. सौंदत्ती (जि. बेळगाव) हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं यलम्माचं ठाणं. दर वर्षीच्या माघी, चैत्री पौर्णिमेला इथे यात्रा भरते. ‘आहेव पुनव’ (पौष पौर्णिमा) ते ‘रांडाव पुनव’ (मार्गशीर्ष पौर्णिमा) या काळात इथं कर्मकांडं चालतात. कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि इतर राज्यांतील हजारो भाविक या काळात देवीदर्शनाला यल्लम्माच्या डोंगरावर येतात. यल्लम्मादेवीचं मंदिर तेराव्या शतकातील आहे. देवी कडक; परंतु भावभोळी असल्याचं तिच्या भक्तांचं मत पूर्वापार चालत आलं आहे. सौंदत्तीतील देवदासी, जोगतिणी आणि जोगते (स्थानिक भाषेत जोगप्पा) यांना या दरम्यान उधाण आलेलं असतं. यल्लम्माचं वैधव्य सूचित करण्यासाठी तिची मानवी प्रतिनिधी असलेल्या जोगतिणीला रांडाव पुनवेला गावाबाहेर घेऊन जाऊन तिच्या हातातल्या बांगड्या फोडायच्या व आहेव पुनवेला पुन्हा भरायच्या असा हा विधी असतो.

रेणुका ही दक्षिण भारतातील एक प्रमुख मातृदेवता. ही रेणुकामाता कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. तिच्या भक्तांमध्ये जातींच्या पायर्‍यातील खालच्या स्तरातील लोकांची संख्या अधिक आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ व ‘सप्तमातृका’ हे दोन अर्थ होतात, जे तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात. यल्लम्मा व रेणुका यांचे भावैक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे (मांगिणीचे) मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मांगिणीच्या धडाला जोडले गेले, अशी पुराणकथा आहे. जिवंत झालेल्या दोघी म्हणजेच एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा. काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले, हे या कथेवरून सूचित होते. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे होत, असेही मानतात. रेणुका या शब्दाचा अर्थ रेणूमयी पृथ्वी असा लावला जातो. भूदेवीचे प्रतीक असलेल्या वारुळाच्या स्वरूपात प्रकट होणारी रेणुका आणि योनिप्रतीक असलेल्या कवड्यांचं यल्लम्माच्या पूजेतील महत्त्वाचं स्थान, अपत्यप्राप्तीसाठी वांझ स्त्रियांकडून तिला केले जाणारे नवस, आईबापाविना ती पृथ्वीतून निर्माण झाल्याची कथा; तसेच तिने कोंबडी बनून घातलेल्या तीन अंड्यांतून ब्रह्मा-विष्णू-महेश यांचा जन्म झाल्याची लोककथा इ. गोष्टींवरून यल्लम्मा ही सर्जनशील आदिशक्ती असल्याचे सूचित होते. यल्लम्माच्या उपासनेत जोगतिणींना व पुरुषत्वहीन जोगत्यांना असलेलं महत्त्व, पुरुष जोगत्यांनीही स्त्रीवेष धारण करण्याची प्रथा, वंशनिर्मिती केल्यानंतरही देवीचं कौमार्य भंगत नाही, या श्रद्धेमुळे तिला ‘कोरी भूमिका’ (कुमारी भूमी) मानण्याची पद्धत, परशुरामाला बिनबापाचा मुलगा म्हणून हिणवलं जाण्याची कथा इत्यादींवरूनही यल्लम्माच्या उपासनेत मातृतत्त्वाचं प्राधान्य व पितृतत्त्वाचं गौणत्व असल्याचं स्पष्ट होतं.

यल्लम्माच्या मूर्तीची बैठक चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या मस्तकी मुकुट, तर हातात डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्तीच्या यात्रेत देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ.प्रकारे नवस फेडले जातात. दोनेक दशकापूर्वीपर्यंत चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथेही रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जायची. सौंदत्तीत ब्रिटिश अमदानीतही असे घडत असल्याचे उल्लेख मिळतात. नवसाने झालेल्या मुलामुलींना वा केसात जट झालेल्या मुलींना देवीला वाहत. वाहिलेला मुलगा जोगती व मुलगी जोगतीण बने. मुली देवदासी बनून गणिका वृत्तीने जगत. कवड्यांची माळ घालणे, देवीची मूर्ती असलेली परडी म्हणजेच ‘जग’ डोक्यावर घेणे आणि कपाळाला भंडार लावणे, हे जोगती बनण्याच्या विधीतले भाग असत. फार पूर्वी नाही; पण वीसेक वर्षांपूर्वी दर वर्षी अक्षरशः शेकडो मुलींना या यात्रेत देवीला सोडलं जायचं. कोवळ्या मुलींना नग्न करून त्यांना लिंबाचा पाला नेसवला जायचा आणि भल्या पहाटे डोक्यावर घागर घेऊन तिनं देवीचा डोंगर चढायचा. मग तिथंच तिचं विधीपूर्वक लग्न लागायचं. लग्न कसलं, हा म्होतूर लागलेला असायचा. गळ्यात देवीच्या नावानं लाल-पांढर्‍या मण्यांचं मंगळसूत्र बांधलं जायचं. एकदा का तिचं लग्न झालं की अन्य पुरुषाशी तिनं लग्न करायचं नाही, जोगवा मागून खायचं, देवीची सेवा करायची अशी बंधने असत. हे एवढ्यावरच थांबत नसे, काही दशकांपूर्वी तर या मुलींच्या कौमार्याचा लिलाव व्हायचा! जो जास्तीत जास्त बोली लावेल त्याला तिचा कौमार्यभंग करायचा अधिकार मिळायचा. नंतर हेच तिचं प्राक्तन व्हायचं. बघता बघता ती शय्यासोबतीपुरती उरायची. कधी गावातच राहून, तर कधी मुंबईपुण्याच्या कुंटणखान्यात रवानगी होऊन तिचं प्रारब्ध रोज नागवलं जाई. महिला संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या न्यायालयीन लढ्यातून ही प्रथा वरवर तर थांबली आहे; पण छुप्या पद्धतीने अजूनही अशा घटना घडत असतात. कधी त्या उजेडात येतात तर कधी येत नाहीत.

देवीला मुली सोडणं, तिला देवदासी बनवणं हा गुन्हा आहे, असा कायदा ब्रिटिशांनी १९३४ साली केला होता. मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली या कुप्रथांना पुन्हा चांगले दिवस आले होते. मागील दशकात महाराष्ट्र व कर्नाटक सरकारने देवदासी प्रतिबंधक कायदा केला. त्यामुळे उघडपणे डोंगरावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मुली किंवा मुलगे सोडले जात नाहीत; परंतु अजूनही चोरून पुजार्‍याच्या घरी वा इतर ठिकाणी मुली सोडल्या जातात. मात्र हे प्रमाण आता खूपच कमी झालं आहे. मुलगी सोडतानाचा विधी हा पूर्वी विवाह सोहळ्यासारखा असे. या विधीत नवर्‍या मुलाऐवजी मुलीच्या शेजारी तांब्या पूजत. त्यावर ठेवलेला नारळ हे शंकराचं प्रतीक मानलं जातं. यावेळी पाच जोगतिणींची ओटी भरली जाई. हा सर्व खर्च मुलीच्या आई-वडिलांना करावा लागे. या लहान मुलीला नवं कोरं लुगडं नेसवलं जाई व लाल-पांढर्‍या मण्यांचं ‘दर्शन’ तिच्या गळ्यात बांधलं जाई. लग्न लागल्यावर ती नवजोगतीण तिथल्याच पाच जोगतिणींसह आजूबाजूच्या पाच घरी जाऊन जोगवा मागे. त्या रात्री या जोगतिणी यल्लम्माची भक्तिपर गाणी म्हणत.

हा विधी आटोपल्यावर ही मंडळी आपल्या गावी परत येत. इथे आल्यावर ज्याच्या घरातील मुलगी सोडली असेल, त्यांना आपल्या जातभाईंना जेवण द्यावं लागे. नंतर इतर जोगतिणींबरोबर हातात परडी घेऊन त्या लहान मुलीला जवळच्या पाच गावांतून जोगवा मागायला फिरवतात. कारण त्या गावांतील त्यांच्या भाऊबंदांना कळावं की, त्या मुलीला देवीला सोडली आहे व लग्नासाठी तिला त्यांच्याकडून मागणे येऊ नये असा आडाखा यामागे असे. लहान वय असल्यामुळे ती मुलगी कशीबशी साडी सावरत हे सगळं करत असे. आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय, याची तिला कल्पनाही नसे. साधारणपणे लहान वयातच या मुलींना सोडलं जायचं. कधी कधी तर अगदी बाल्यावस्थेत, पाळण्यात असतानाही सोडलं जायचं. सोडल्या जाणार्‍या मुली, बहुतांश करून मागासवर्गातील जातींतल्या असत. या जातीत आधीच सार्वजनिक जीवनातलं मागासलेपण असे, त्यात अंधश्रद्धा, गरिबी यांची भर पडे. त्यातून हे लोक मुली व मुले सोडायला राजी होत. या मंडळींचा देवीवरचा अंधविश्वास इतका पराकोटीचा होता की, साध्या-साध्या गोष्टी जरी आयुष्यात घडल्या, तर त्या देवीच्या कोपामुळेच घडल्या, अशी समजूत जरी एखाद्या म्हातार्‍या जोगतिणीने करून दिली, तरी पोटच्या मुली सोडायला ते तयार होत. याच्या जोडीने काही गोष्टी तर पूर्वापार चालत आल्यात. डोक्यात जट आली की देवीचं बोलावणं आलं. मग त्यावर काही उपाय नाही, अशी समजूत बाळगून आयुष्यभर ती जट सांभाळत जगणं, हे त्यांच्या नशिबी येई. काही जणी लांब जट ठेवण्यासाठी पिशवी शिवून त्यात ती ठेवत. अलीकडे निपाणी, गडहिंग्लज इत्यादी भागांत काही डॉक्टर व स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या स्त्रियांच्या जटा सोडवून त्यांचे केस पूर्ववत केले आहेत.

देवीला मुलं-मुली सोडण्याची कसलीही कारणं पुरेशी असत. घरात कुणी आजारी असलं, गोठ्यात बैल मेला, अंगावर खरूज उठली व ती लवकर बरी झाली नाही, तरीही त्या मुलीला किंवा मुलाला देवीला सोडल्याची अनेक उदाहरणं आहेत. एक तर गरिबीमुळे या लोकांना दवाखाना करणं परवडत नसे वा डॉक्टरपेक्षा यांचा दैववादावर जास्त विश्वास असे. केवळ भंडारा लावून रोग बरा होतो ही समजूत. वंशाला कुलदीपक असावा हा पूर्वापार चालत आलेला खुळचटपणा अनेक सुशिक्षितांमध्ये आजही आढळून येतो. सर्वार्थाने मागासलेल्या घटकांत तर अशा अंधश्रद्धांचा कहर असे. अनेक मुली जन्मास घातल्यावरही आपल्याला मुलगा व्हावा ही इच्छा असे. त्यासाठी पहिल्या मुलीला यल्लम्माला सोडली जायचं. एवढं करूनही बर्‍याचदा मुलगा होत नसे. एकदा सोडलेली मुलगी लग्नसंसार करू शकत नाही. तिला देवदासी म्हणूनच जगावं लागतं. केवळ अंधश्रद्धेतून हे आलेलं नाही, तर यामागे आर्थिक कारणंही जबाबदार आहेत. एखाद्या जोगतिणीला जर कुणापासून मूल झालं नाही, तर ती आपल्या नात्यातली किंवा कुणाची तरी मुलगी दत्तक घेई व लहानपणीच तिला देवीला सोडून आपल्या म्हातारपणाच्या उदरनिर्वाहाची तजवीज करे. असेही प्रकार घडत! आपल्या गळ्यात बांधलेलं यल्लम्माचं ‘दर्शन’ दुसर्‍या कुणाच्यातरी गळ्यात आपण मरण्याआधी बांधलं नाही तर देवीचा कोप होतो. सुखाने मरण येत नाही. आपल्या मुलीच्या, नातीच्या वा नात्यातल्या कुणाच्याही मुलीच्या गळ्यात एकदा हे बांधलं की, आपण यातून सुटलो अशी काहींची धारणा असते. वरवर ही अंधश्रद्धा असली, तरी तिची खरी कारणं आर्थिकही आहेत. ही मुलगी मोठी झाल्यावर जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करून म्हातारपणी आपल्याला बघेल, याची ती सोय असे.

वयात आलेल्या या तरुण मुली गावागावातून जोगवा मागत इतर जोगतिणींबरोबर फिरत, तेव्हा गावातील श्रीमंत जमीनदार किंवा दुकानदारांची त्यांच्यावर नजर असे. ताफ्यातल्या प्रमुख बाईला पैशाची लालूच दाखवून ती बाई त्या मुलीला फूस लावून त्याच्याबरोबर तिचा ‘झुलवा’ किंवा त्याची ‘रखेली’ म्हणून ठेवण्यात यशस्वी होई. झुलवा लावणे म्हणजे एकाच पुरुषासोबत लग्नाच्या बाईसारखं राहणं. याचा विधी थोडाफार लग्नासारखा असतो. झुलवा लावलेला पुरुष तिला शेतात घर करून देतो किंवा तिच्या घरी येत असतो. त्याच्यापासून तिला मुलं झाली, तर तो त्यांनाही पोसतो. हा उच्चवर्गीय असल्यामुळे अशा बाईला (जोगतिणीला) सहसा आपल्या घरी ठेवत नाही. बहुधा त्याचं पहिलं लग्न झालेलं असतं. हा झुलवा फार दिवस टिकतोच असं नाही. तो पुरुष जर मरण पावला किंवा काही काळाने त्यानं मदत द्यायची थांबवली, तर त्या बाईला वेश्याव्यवसायाशिवाय पर्याय उरत नाही. झुलवा न लावताही काही वेळा अशा मुलीला एखाद्या प्रतिष्ठित माणसाकडून दिवस गेले, तर तो सरळ हात झटकून मोकळा होतो व “हे मूल माझं कशावरून?,” असा सवाल निराधार मुलीला विचारतो. काही वेळा केवळ भंडार्‍याची शपथ घेऊन, “मी तुला आयुष्यभर, काही कमी पडून देणार नाही,” असं सांगून काम झाल्यावर तिला वार्‍यावर सोडून दिलं जातं. या अशिक्षित मुलींचा यल्लम्मा व तिच्या भंडार्‍यावर विश्वास असतो, याचा गैरफायदा असे लोक घेतात. या जोगतिणी दरवर्षी सौंदत्तीला यल्लम्माच्या जत्रेला जात असतात. जत्रेच्या वेळी देवीला नवस केलेल्या भक्तांना लिंब नेसवतात. लिंब नेसणं म्हणजे संपूर्ण अंगाला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधणं. सौंदत्ती डोंगराच्या पायथ्याशी जोगल गावी सत्यम्माचं देऊळ आहे व तिथे एक पाण्याचं कुंड आहे. या अस्वच्छ कुंडात भाविक अंघोळ करतात. काही नवस बोललेले (यात स्त्रियाही असतात) संपूर्ण अंगभर लिंब नेसून दोन-तीन किलोमीटर अनवाणी पायाने उन्हातून चालत डोंगरावर जातात. काही लोळण घेत नमस्कार घालत जाताना दिसतात. हे पाहिल्यावर अंधश्रद्धा कुठल्या थरापर्यंत जाऊन पोहोचली आहे, हे प्रकर्षानं जाणवतं.

परिसरातल्या लग्नप्रसंगात खेड्यापाड्यातून जोगतिणींना पहिला मान असतो. आपल्या ताफ्यासह तोरण घेऊन वाजतगाजत जोगतीण येते. एकीच्या हातात चौंडकं, दुसरीच्या हातात तुणतुणं, तिसरीकडे मंजिरी अशी वाद्यं असतात. वयस्कर जोगतिणीच्या हातात भंडार्‍याची पिशवी असते. ती लग्नघराच्या चौकटीला तोरण बांधते. या जोगतिणीला साडी-चोळी व बिदागी घरमालक देतो. यल्लम्माला मुलेही सोडली जातात. मुले सोडण्याचे प्रमाण तुलनेत खूप कमी आहे. कारण ‘धंद्या’च्या दृष्टीने मुलींचा जास्त उपयोग होतो. कधीकधी मुलींनाही शहरात जाऊन धंदा करावा असं वाटतं. काही जणी शहरात पळून जातात. शिवाय दलालांची नजरही अशा मुलींवर असतेच. गावात जोगवा मागून किंवा वेश्याव्यवसाय करूनही पोट भरणं अशक्य असतं. त्यामुळे त्यांचा ओढा शहराकडे असणं स्वाभाविक आहे. काही दलाल हे जत्रेच्या वेळी येऊन मुलगी हेरून ठेवतात. तिच्या पालकांना अनेक प्रलोभनं दाखवून तिला आपल्या ताब्यात घेतात. मुलीचे आई-वडील हे गरीब व मागासलेले असल्यामुळे नाईलाजानं व हिच्यामुळे दोन घास आपल्याला खाता येतील, या विचाराने हा सौदा करायला तयार होतात. अशा मुली मुंबई, मद्रास, पुणे, कोलकाता, बंगलोर अशा शहरातून वेश्याव्यवसायात ढकलल्या जातात. अंधश्रद्धा व गरिबीमुळे देवीच्या नावावर मुलींचा असा बळी दिला जातो. आजही महाराष्ट्राच्या सर्व भागात देवदासी आणि जोगते आढळतात. या सर्व प्रथा पूर्णतः बंद होतील तो दिवस सुदिन म्हणावा लागेल. त्या साठी काही लोक रक्ताचं पाणी करून काम करताहेत. त्यातलीच एक आहे सीतव्वा. समाजाला अंधारातून उजेडाकडे नेताना ती स्वतः जळत राहणारी स्त्रीज्योती आहे. सीतव्वाची दास्तान जितकी करुण आहे तितकीच रसरशीतही आहे.

देवदासींच्या कल्याणासाठी महाराष्ट्रातली काही मंडळी व्यक्तिशः तर काही जण एनजीओच्या माध्यमातून काम करत आहेत. यल्लम्मादेवीच्या नावाआडून कर्नाटकात या समस्येचे मूळ असल्याने तिथं भरीव काम होणं गरजेचं होतं आणि हा विडा पूर्वाश्रमीची देवदासी असलेल्या सीतव्वाने उचलला. सीतव्वा एका गरीब कुटुंबात जन्मलेली. तिच्या वडिलांना नऊ मुली होत्या. पहिल्या तीन मुली दगावल्यानंतर त्यांनी यल्लमाला नवस बोलला की, माझी एक मुलगी तुला अर्पण करेन. योगायोगाने उर्वरित सहा मुली जगल्या आणि दरम्यान आजारपणात सीतव्वाचे वडील वारले. नवरा मेलेला, घरची अत्यंत बिकट परिस्थिती आणि खाणारी तोंडे वाढलेली, अशा कात्रीत सीतव्वाची आई अडकली. अखेर तिने सीतव्वाला यल्लम्माला अर्पण करायचा अप्रिय निर्णय घेतला. पहिल्या इयत्तेत शिकणार्‍या सात वर्षांच्या सीतव्वाला सलग नऊ दिवस हळद लावली गेली, लिंबाची पाने घातलेल्या पाण्याने स्नान घातलं गेलं. नवव्या दिवशी नवं लुगडं नेसवलं गेलं, हातात हिरव्याकंच बांगड्या चढवल्या गेल्या, गळ्यात लालपांढर्‍या मण्यांचं दर्शन बांधलं गेलं. बिरादरीतल्या लोकांना जेवण दिलं गेलं. माणसांची वर्दळ दिवसभर होती, सीतव्वाला त्यादिवशी खेळायला जायचं होतं, ती फार खुशीत होती. आपलं बालपणच त्या दिवशी कुस्करलं जाणार होतं, हे तिच्या ध्यानीमनीही नव्हतं. आपण कुठल्या तरी आनंदोत्सवात असून त्याचा केंद्रबिंदू आहोत याचा तिला विलक्षण हर्ष झाला होता.

सीतव्वा सातव्या इयत्तेत असताना तिला एका जोदत्तीच्या उच्चवर्णीय जमीनदारासोबत ‘झुलवा’ म्हणून ठेवलं गेलं. त्या दिवशी ती लुटली जाईपर्यंत तिला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. त्या जमीनदाराला आधीच्या दोन बायका होत्या, त्याचं त्यांच्यावरही प्रेम(!) होतं. त्याच्यापासून सीतव्वाला दोन अपत्ये झाली. सीतव्वापासून झालेल्या मुलांवरही त्याने माया केली. त्यांचे कपडेलत्ते देण्यापासून ते अन्नधान्य पुरवण्याचं काम त्यानं केलं; पण त्यानं आपलं नाव त्यांना दिलं नाही. सीतव्वातला चार्म संपत आला तसा तो होळकेरीला तिच्याकडे कमी प्रमाणात येऊ लागला; पण त्यानं तिच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. या काळात सीतव्वाच्या मनात अनेक वादळं उठली आणि कालांतराने शांत झाली. दरम्यान कर्नाटक सरकारच्या वतीने देवदासी पुनर्वसन कार्यक्रम राबवला जाऊ लागला. यातील उपक्रमात ती हिरिरीने भाग घेऊ लागली. महिलांवरचा अन्याय, शोषण आणि देवाच्या नावावर चालत असलेलली स्त्रीत्वाची लुबाडणूक यावर तिची मते पक्की होऊ लागली. १९९० च्या सुमारास बेळगावमध्ये या अभियानाने काम थांबवलं तेव्हा आपणच अशी संस्था काढावी असं तिला वाटू लागलं. विचारांना मूर्त स्वरूप देत तिनं सप्टेंबर १९९७ मध्ये ‘महिला अभिवृद्धी मत्तू संरक्षण संस्थे’ (MASS) ही संस्था काढली. आता ती या संस्थेची सर्वेसर्वा आहे. आजघडीला साडेतीन हजारांहून अधिक देवदासी या संस्थेच्या सभासद आहेत. या संस्थेची सर्व पदे देवदासींकडेच आहेत. पाचशेहून अधिक मागास महिलांना यात सामील करून घेतलं गेलं आहे. संस्थेकडून राबवल्या जाणार्‍या उपक्रमात समन्वयक ते प्रशिक्षकाच्या जबाबदार्‍या बहुतकरून देवदासीच पार पाडतात. देवदासी महिलांना अर्थसाहाय्य, विधीसाहाय्य, गृहबांधणी, अपत्यांसाठी शिक्षण, तंटामुक्तीतून विवाद सोडवणे, अशा विविध पातळ्यांवर ही संस्था काम करते. तिने महिला स्वावलंबन समूह (SHG) बनवून या महिलांना आपल्या पायावर उभं केलं आहे. जी सीतव्वा किशोर अवस्थेत लुटली गेली, तीच आता अनेकांना आधार देऊन भावी पिढीत ‘कुणी सीतव्वा बनू नये’ म्हणून प्रयत्न करते आहे. जोगती आणि जोगत्यांना या बंधनातून मुक्त करणे, जातीअंताची लढाई होईल तेव्हा होईल; पण मागास जातीतील गरीब जनतेच्या डोक्यातून अंधश्रद्धेचा नायनाट करणं हे सीतव्वाचं पुढचं टार्गेट आहे. तिची जिद्द आणि सच्चेपणा पाहू जाता, ती यात यशस्वी होईल यात शंका नाही. रामायण काळातल्या सीतेहून अधिक कठोर अग्नीपरीक्षा दिलेल्या या सीतेचं सामाजिक भान तपश्चर्येनं भारलेलं आणि अत्यंत प्रेरणादायी आहे.


उपेक्षेचे धनी : किन्नर

जी गोष्ट देवदासींची आहे, तीच किन्नरांची आहे. देवदासींना किमान धार्मिक अधिष्ठानाचा आधार आहे; परंतु किन्नरांच्या नशिबी ते लटकं सुखही नाही. समाजानं कायमच त्यांची हेटाळणी केलीय, टवाळकी केलीय. अनैसर्गिक, अनिष्ट आणि छुप्या लैंगिक शोषणाचं किन्नर हे एक स्वस्त आणि मुबलक उपलब्धीचं साधन आहे हे समाजाला चांगलं ठाऊक आहे. तरीही गेंड्याची कातडी पांघरून सगळे कसे साळसुदासारखं जगत असतात, जणू भवताली काही घडतच नाही. आणि काही घडत असलंच तरी त्याच्याशी आपल्याला काहीही घेणंदेणं नाही असाच सर्वांचा सूर असतो. नेहमी ग्रांटरोड स्थानकापाशी असणार्‍या शबनमच्या टोळक्यातल्या परवीनने याविषयी एकदा खूप काही सुनावलं होतं. परवीन मूळची भाईंदरची. सलीम तिचं आधीचं नाव. बालवयापासूनच तिला मुलीसारखं राहायला, नटायला, सजायला आवडायचं. एखाद्या मुलीपेक्षाही नाजूक आणि देखणं सौंदर्य लाभलेलं असल्यानं कुणीही लगेच आकृष्ट व्हावं अशी तिची देहयष्टी होती. सलीमच्या बरोबरीच्या मुलांना दाढीमिशा आल्या; पण ओठावरची कोवळी लव वगळता पुरुषाची कोणतीच बाह्यलक्षणे त्याच्यात दिसत नव्हती. आवाजही काहीसा किनराच होता. त्या दरम्यानच त्याच्या नात्यातल्या जवळच्या व्यक्तीनं त्याचं लैंगिक शोषण केल्यानं तो कोलमडून गेला, त्याचं मनोबल खचलं. त्यानं मुलीसारखं राहण्याचा हट्ट केला; पण घरातले सनातनी विचारांचे लोक त्याचं काहीएक ऐकून घ्यायला तयार नव्हते, इतकेच नव्हे तर ज्यानं सलीमचं शोषण केलं होतं, त्यालाही पाठीशी घातलं गेलं. मधल्या काळात सलीमनं आपला मार्ग शोधला होता, शबनमच्या ग्रुपमधल्या नंदिनीनं त्याला नवं आकाश दाखवलं, ज्यातलं खुलेपण आणि स्वातंत्र्याचा कैफ त्याला विलक्षण सुखावून गेला.

त्या दिवशी त्यानं घर सोडलं आणि स्वतःला किन्नरांच्या टोळीत सामील करून घेतलं. सलीमची परवीन झाली. परवीनचं रूपडं पाहून पहिल्या नजरेत तो किन्नर असल्याचं कुणीही म्हणणार नाही, इतके फेमिनिश लुक्स तिच्या ठायी होते. आपल्या स्त्रीजीवनावर ती बेहद्द खूश आहे. मागे वळून पाहताना तिला केवळ वेदना आणि दुःखद आठवणींची वळणवाट दिसते, त्यामुळे ती गतकाळात रमत नाही. तिला भूतकाळाची चीड आहे, याचं एक कारण असंही होतं की, घर सोडल्यापासून एकदाही तिच्या घरच्यांनी तिची साधी चौकशी केली नव्हती. ती कशा अवस्थेत जगत असेल याची त्यांनी फिकीरही केली नव्हती. परवीन केवळ आपल्या कुटुंबावरच नव्हे, तर अखिल समाजावर नाराज होती, आपल्याला कुणीच समजून घेतलं नाही या टोचणीने तिला त्रास होई. एखाद्या मुलाला आपण पुरुष नसून आपल्यात स्त्रीत्वाचा अंश असून आपण स्त्रीसारखं राहिलं, बोललं, वावरलं पाहिजे असं वाटलं तर त्याकडे विकृती म्हणून न पाहता, त्याची जगण्याची आवड म्हणून का पाहिलं जात नाही, असा सवाल परवीन करते. जीन्स, टी शर्ट या वेशातली परवीन आधुनिक काळाची आणि सुधारणावादी विचारांची चाहती आहे. तिच्या वागण्या-बोलण्यातला विद्रोह ठसठशीतपणे समोर येत राहतो, तेव्हा तिच्या जगण्याच्या निर्धाराला सलाम करावा वाटतो. परवीन गाणं बजावणं करत नाही की, इतर काही किन्नरांप्रमाणे स्वतःला कमी लेखलं जावं असं कोणतंही काम करत नाही. खरंतर ती एक मिडीएटर आहे, मरीन ड्राईव्ह आणि चर्चगेट परिसरातील जिगोलोंसाठी (पुरुष सेक्सवर्कर्स) ती इन्फॉर्मर आहे. अनेक श्रीमंत आणि कुलीन स्त्रिया, मुली परवीनच्या माध्यमातून जिगोलोंशी संपर्क साधतात, परवीन दोघांकडूनही पैसे घेते. क्वचित कधी तिची फसवणूक झाली, तर आपला रुद्रावतारही दाखवते. नरिमन पॉइंटच्या आलिशान भागातील अनेक कॉर्पोरेट महिलांचा परवीनशी नित्य संपर्क असतो आणि ती त्यांच्या गरजा भागवते. परवीनला होणार्‍या कमाईतून तिने स्वतःचं घर घेतलेलं आहे, त्यात तिच्या ग्रुपमधले मेम्बर्स आलटून पालटून मुक्कामास असतात. ती ज्या जिगोलोंसाठी काम करते त्यातलाच एक असणारा आनंद नावाचा तगडा देखणा तरुण तिचा स्टेपार्टनर आहे, परंतु त्या दोघांत शारीरिक संबंध नाहीत. परवीनला आपल्या जीवनशैलीचा अभिमान आहे. आपण किन्नर असण्याचा तिला जरासाही खेद नाही, उलट त्याचं अप्रूप आहे. गतपिढीतल्या साडी नेसून दाढीचे खुंट वाढवून विशिष्ट शैलीत टाळी वाजवत पैसे मागत फिरणार्‍या किन्नरांचं परवीन हे नवं लवलवतं पातं आहे, ज्याला आपल्या धारदारपणाची सार्थ जाणीव आहे. आजच्या नव्या युगात आपल्या शारीरिक ठेवणीलाही पुरेपूर हक्क आहेत याची उमज आहे. परवीन ही नवकिन्नर आणि नव्या पिढीतल्या सामान्य जेंडर्सच्या नवनायकांच्या दरम्यानचा पूल होऊ शकते आणि आपल्या शारीरिक ठेवणीला शाप न समजता माथ्यावर ठळकपणे वागवताना आपलं नाणं खणकावून वाजवू शकते, याबाबत दुमत असण्याचं कारण नाही.

किन्नरांच्या जगातलं परवीन हे एक टोक म्हटलं तर सोनी हे दुसरं टोक मानलं जावं इतकं अंतर या दोघीत होतं. बीड जिल्ह्यातल्या वृषणविरहित बालकाच्या केसच्या वेळी सोनीची भेट झाली. ती मूळची नाशिकची; पण तिच्या मैत्रिणीकडे राहायला आलेली असल्याने योगायोगाने तिची भेट झाली. तिचा बॉडीटोन अजूनही स्मरणात आहे. केसांची झुलपं वेडीवाकडी होऊन तिच्या कपाळावर रुळायची, चुकून कधी विग घातलेला असे, तर त्याचं फेक असणं स्पष्ट दिसावं अशा पद्धतीने तो परिधान केलेला असे. सावळ्या कपाळावरचं बंद्या रुपयाच्या आकाराचं कुंकू ठळकपणे नजरेत भरायचं. फेंदारलेलं नाक, ओठातून बाहेर डोकावणारे जाडजूड मजबूत सुळे, बिडी सिगारेट पिऊन काळेकुट्ट झालेले राठ ओठ, खोल गेलेली गालफडं, किंचित पांढुरकं दिसू लागलेलं दाढीचं खुंट अशा अवतारात ती असायची. तिने अंगाला लपेटलेली साडी म्हणजे एखादं जुनेर पोतेरंच असायचं. ब्लाऊजची तुटलेली बटनं शिवण्याची तसदीदेखील ती घ्यायची नाही. ब्लाऊजमधून छातीवरचे कुरळे राठ केस बाहेर डोकावत याचंही तिला काही घेणंदेणं नसे. दिवसभर बाजारपेठेत नाही तर रेल्वे स्टेशन, द्वारका सर्कल, एसटी स्टॅन्ड परिसरात ती फिरायची. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून पैसे कमवायची. शारीरिक संबंधाविषयी काहीशी जागृत असूनही तिला खंडीभर पुरुष मित्र होते, जे तिचा केवळ टाईमपास म्हणून भोग घ्यायचे आणि हातावर चिरीमिरी ठेवायचे. एकलहरे सामनगाव झोपडपट्टी भागात तिचं खोपट होतं, ती नाशिकमध्ये असली तरच इथं राहायची नाहीतर तिचं वास्तव्य मित्रांच्या घरी वेगवेगळ्या ठिकाणी असायचं. दारू, सिगारेट, गुटखा, तंबाखू, गांजा सगळी व्यसनं तिला होती. मटका, आकडा, लॉटरी, व्हिडीओ पार्लर्समधले गेम असे नानाविध नाद होते. हातात पैसा आला की, तो वाट्टेल तसा उडवायचा, आजचा दिवस मनासारखा जगायचं, उद्याची पर्वा का करा, असं तिचं लॉजिक होतं.

सोनीला तिच्या गतकाळाबद्दल कितीही खोदून विचारलं तरी ती कधी खुलून बोलली नाही. अगदी त्रोटक माहिती मिळू शकली. ती लहान असतानाच तिचा जन्मदाता बाप देवाघरी गेला तेव्हा तिच्या आईने जुन्या यारासोबत लग्न लावलं, घरादाराला आणि दुनियादारीला कोलून ती दोघं लग्न करून एकत्र राहू लागली. त्यांच्या सुखात अडचण होती चिमुरडीचीच! सोनीचं आधीचं नाव काय होतं हे कळलं नाही. तिच्या सावत्र बापानेच वयाच्या सातव्या आठव्या वर्षी संतोषी या किन्नरगुरुपाशी तिला सोपवलं, तिने त्या पोराचा सांभाळ मुलीसारखा केला. त्यांच्यात राहून तो त्यांच्यातला एक झाला. ‘तो’चा ‘ती’ कधी झाला हे त्यालाही कळलं नाही. मात्र आपल्या जिंदगानीवर सोनी खूश नव्हती, तिला पुरुषही व्हायचं नव्हतं की स्त्रीही व्हायचं नव्हतं. तिला नेहमी वाटे की, आपल्याला स्वतंत्र ओळख असावी, आपण कुणाच्या राहणीमानाची, दिसण्याची कॉपी असू नये; पण तिच्या मताला इतरांच्या लेखी शून्य किंमत होती. जसजसं वय वाढत गेलं, तसतशी ती बेढब होत गेली. कळकटलेल्या अवतारामुळे ती कालगणिक ओंगळवाणी वाटू लागली. मात्र तिला याची पर्वा नव्हती. आपल्या जगण्याला अर्थ नाही आणि ही कृतघ्न दुनिया त्याला कारणीभूत आहे हे सूत्र तिच्या डोक्यात खिळा ठोकावा तसं रुतून बसलं होतं. जगावर सूड उगवण्याच्या नादात तिनं स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतलं होतं. इतक्या सार्‍या नकारात्मक बाबी तिच्या अंगी असल्या, तरी काही सद्गुणही अंगी होते. पदराला पैसे असले की, ती भटक्या कुत्र्या मांजरांना खाऊ घाले. भिकार्‍यांना पोटभर अन्न देई. कनवटीला दमडी नसली तरी, ती मनाची राणी होती, मोठ्या मनाने आणि सढळ हाताने मदत करी. तिचं टेम्पर भडकलेलं असलं की, मग मात्र कुणाचीच खैर नसे. सोनीला आपण किन्नर आहोत म्हणजे काही वेगळे आहोत असं कधी वाटलं नाही. मुळात एक नीरस, बेचव आयुष्य जगल्यानं तीच कळाहीन झाली होती. तरीही जगत होती, जमेल तेव्हा चांगलं वागत होती. खूप चिकित्सा करूनही सोनी आणि परवीन यांच्या जीवनाचा मथितार्थ उमगला नाही. मात्र एक गोष्ट कळली ती म्हणजे हे जीव सच्चे होते आणि जगाने यांना नासवलं होतं, आपल्या फायद्यासाठी हवं तसं वाकवलं होतं. जगाच्या परिघात ते कुठेच नव्हते; पण त्यांच्या परिघात जग बळजबरीने घुसत होतं!

सोनी आणि परवीन यांच्याहून भिन्न आयुष्य जगणार्‍या नंदाची भेट ठाण्याच्या तीनहात नाक्यावर झालेली. ट्राफिक सिग्नलवरती ठिय्या मारून बक्कळ माल कमावून त्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन आपल्या बाईपणात रममाण झालेली नंदा तिशीतली असावी. एकदम भडक मेकओव्हर, स्टायलिश राहणीमान, अंगाला झटके देत चालण्याची ’ती’ खास लकब आणि नेत्रपल्लवीतून शिकार करण्याचं कसब- असलं बरंच काही तिच्यात ठासून भरलं होतं. नंदा फिजिकल रिलेशन ठेवणार्‍यातली होती. पैशांच्या बदल्यात ती पुरुषांना रिझवायची, त्यांची भूक भागवायची. कुणी फसवायचा प्रयत्न केला, तर त्याला बेदम चोप देण्यात तिचा हातखंडा होता. तिच्या पैशात तिच्या गुरुची पाती होती, आपल्या कमाईचा हिस्सा ती गुरुस देई. मादक, लाघवी नंदाचं अंतःकरण कमालीचं कठोर होतं. ती कुणालाही राबवून घ्यायची, पैसा कमवायची, डोकं लढवून सावज गाठायची; पण तिने कधी चोर्‍यामार्‍या केल्या नव्हत्या. परिसरातील पोलीस मात्र तिला हरेक गुन्हेगारांची माहिती काढून घेण्यासाठी पिडायचे, आपली सोय पाहून ती तोंड उघडायची. वयात येताना आपल्यातील शारीरिक बदलांची जाणीव ओळखून तिनं युपीतलं बिजनौर सोडून इकडं धाव घेतलेली. एकेकाळी लोकलमधल्या किन्नरांच्या गँगचा ती हुकमी एक्का होती. सोनी आणि परवीनपेक्षा नंदामध्ये ठळकपणे जाणवलेली बाब म्हणजे तिला स्त्रियांची चीड होती, ती बायकांना कधीही जवळ करत नसायची. तिचे सगळे मित्र पुरुषच! तेही चांगल्या चुंगल्या घरातले कमावते दणकट! तिचे काही गोल फिक्स होते, तिला आपल्या बिरादरीतलं सर्वात मोठं घर घ्यायचं होतं, एक लाईफ पार्टनर पाहून त्याच्यासोबत आयुष्य काढायचं होतं. तिच्या आयुष्यात एक स्थैर्य होतं, एक ध्येय होतं जे परवीन आणि सोनीच्या आयुष्यात कुठेच दिसलं नव्हतं. २०१४ नंतर तिचा कधीही संपर्क होऊ शकला नाही. काहींनी सांगितलं की, ती मुंबई सोडून निघून गेली तर काहींनी सांगितलं की एकाने तिला हवं तसं घर दिलं तिथेच ती रमली. आणखी एकाने सांगितलं की, ती तिच्या गावी परतली. कुणी काहीही सांगितलं तरी विश्वास बसला नाही, कारण यातलं एकच उद्दीष्ट गाठून स्वस्थ बसणार्‍यातली ती नव्हती. या क्षेत्रात कुणाचं गायब होणं नवीन नाही आणि जगाचं त्या प्रति निष्ठुर, शुष्क असणंही नवीन नाही. तरीही काहींचं एकाएकी गायब होणं हुरहूर लावून गेलं. नंदा त्यातलीच एक होती. किन्नरांच्या माथी परवड अधिक लिहिली गेली असली, तरी आता हे चित्र थोडंसं बदलतंय याचं समाधान आहे. देवदासींच्या जगण्याला लोकांनी धार्मिक परंपरेचं लेबल तरी चिटकवलं; पण किन्नरांच्या वाट्याला अधिक उपेक्षा आणि शोषण आलं हे कुणी नाकारू शकणार नाही. अशा कैक अभागी आयुष्यांचा धांडोळा घेतला, तर त्यांच्या आयुष्यातला पराकोटीचा संघर्ष आणि स्वतंत्र जगण्याची अफाट जिद्द थक्क करून जाते. अंधारात लुप्त झालेल्या अशा अनेक ज्योतींनी आपल्या भवताली दाटलेलं तमस आपल्या नकळत दूर होत असतं, ज्याची आपल्याला थोडीही कदर नसते! उलट आपण त्यांचा तिरस्कार करतो, हेटाळणी करतो, वास्तविक जीवनात यांना आपण उचित सन्मान दिला पाहिजे इतकी तरी जाणीव समाजाला व्हायला हवी!

समीर गायकवाड, सोलापूर

संपर्क : ९७६६८ ३३२८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]