जोगत्याची पितरं

हरिभाऊ हिंगसे -

चैत्राच्या रणरणत्या उन्हाने कहर केला होता. उन्हाचा आगडोंब उसळला असतानासुद्धा आप्पांच्या वाड्याकडे लोकांनी धाव घेतली. सुतारनेटावरील म्हादबाचा पोरगा श्रीकांत सवंगड्याबरोबर खेळता खेळता बेसावध झाला होता. त्याला घेऊन म्हादबाने आप्पांच्याकडे धाव घेतली होती. आप्पांनी श्रीकांतकडे नजर टाकली. म्हादबाची बायको मंजाबाईने तर रडून गोंधळ घातला. आप्पांनी सर्वांना धीर दिला. त्यांनी श्रीकांतच्या अंगावरील कपडे काढले. थंड पाण्याने त्याचे अंग पुसले. लिंबूसरबत त्यास चमच्याने पाजले. तरीही पोरगं सावध होत नव्हतं. अख्खा गाव जणू वाड्यातच जमला होता. थोड्यावेळाने श्रीकांत थोडा सावध झाला. हातपाय हलवू लागला. तसा सर्वांच्या मनावरील ताण सैल झाला.

शांततेचा भंग करत मेंबरीन कस्तुरबाई कडाडल्या “हजारवेळा पोरांना व त्यांच्या आयांना त्या जोगत्याच्या वाड्यापुढनं जात जाऊ नका म्हणून सांगते, पर ऐकतं कोण?” कुसुमआक्काने कस्तुरबाईंच्या म्हणण्याला दुजोरा देत मान हलवली व म्हणाल्या, “खरंच की, आज आमावस्या आहे. त्या जोगत्याच्या वाड्यातील पित्रं आमावास्येला दाखला दावल्याशिवाय राहणार हाय का?” या दुकलीच्या बेतोड वक्तव्यावर पुरुष मंडळीतही कुजबुज सुरू झाली. तसं बापय मंडळीत चर्चेला उधाण आलं, “तुमची श्रद्धा हाय तर त्या पितराची पूजा करा, पर, बळी कशा पाय द्यायचा. एक कोंबडं बळी द्यायचा तर दोन-तीनशे रुपये खर्च. त्यापरिस त्येच पैसे हायस्कूलच्या बांधकामास मदत करा. आता सांगा, जवातवा हायस्कूलचं बांधकाम मधी घुसडत्यात. परत्येक घरानं देणगी देऊन श्रमदान केले तरी हायस्कूलच्या दोन-चार खोल्या उभ्या राहतील असं सांगत्यात.” एका दमात नारायण काकांनी मनातली घुसमट बोलून दाखवली.

नारायणकाकांचं म्हणणं सर्वांनाच पटत होतं. तसं अशोकरावनीही सांगायला सुरुवात केली, “जरा आठवा, त्यो जोगती मेल्यापासनं गावाला किती किती इपिताराला तोंड द्यावं लागलंय. विलासबापूंची सून पोरगं आडवं आलं म्हणून निमित्त झालं, आन पोरगी दगावली. म्या म्हणतो काय दुसर्‍या बायाबापड्या बाळंत होत नाहीत का? त्ये राहू द्या, ज्ञानबासरपंचांची कडब्याची गंज रानात द्यादिसा पेटली. ती गंज पेटवायला असल्या उन्हात कोण मरायला जातंय. पर, आसलं काय आप्पांना सांगायला जावं, तर त्येचं कारण त्ये येगळंच सांगत्यात.”

एव्हाना बेसावध झालेला श्रीकांत उठून बसला. आप्पांनी श्रीकांतला मांडीवर घेऊन त्याला बोलता केला. तो दूध प्यायल्यानंतर खेळण्यास बाहेर जाण्यासाठी धडपडू लागला. तसा वातावरणातला ताण एकदम सैल झाला. आप्पांच्या पाया पडून मंजाबाई श्रीकांतला घेऊन घराकडे जाण्यासाठी निघू लागताच बाया-पोरी वाड्याबाहेर पडली. वाड्यात उरली ती पुरुषमंडळी. आप्पांनी सर्वांकडे हसत पाहतच सांगितले, “श्रीकांतला उष्माघातामुळे भोवळ आली होती.

इतका वेळ आप्पा श्रीकांतवर उपचार करण्यात व्यग्र होते. तोपर्यंत पुरुषमंडळीत बरीच चर्चा झाली. आज काही झालं तरी, त्या पित्राचा सोक्षमोक्ष करूनच उठायचं. उगाच गावात कायच्याबाय व्हयाची वाट बघायची का? आप्पा उष्माघाताबद्दल सांगत होते. त्यांना थांबवत किरण म्हणाला, “उगा, लहान तोंडी मोठा घास नगं असं वाटतं पर, तुम्हास्नी माहीत नाय शिरकांतला तुम्ही तुमच्या परीनं उपचार करत व्हता, त्या येळला शिरकांतची मावशी – संजूताईनं एक अंडं जोगत्याच्या वाड्यापुढं टाकलं, तवा त्या पोराला आराम पडला. तुम्ही काय का म्हणाना, तुमचं सांगणं आम्हास्नी पटतया, पर वाडवडलापास्नं चालत आलंय ते काय उगाचंच हाय का?” वयाने पोरसवदा असलेल्या किरणने आप्पांना बोलण्याचं धाडस केलं. तसं पुरुषमंडळीत चुळबूळ सुरू झाली. चर्चेचा गलका वाढला. चर्चेतील अगतिक शब्द आप्पांच्या कानावर आदळत होते. आप्पा नि:शब्द झाले.

आप्पांच्या नि:शब्दतेतून एक कल्पना साकारू लागली, तसतसा त्यांच्या चेहर्‍यावरील एक वेगळाच आनंद ओसंडत होता. वाड्यात काही वेळ शांतता पसरली. आप्पांच्याकडे सर्वजण अधीरतेने पाहत होते. आप्पांनी बोलण्यास सुरुवात केली. “मंडळीनो, त्यो जोगती मेल्यापासून ह्या चार सहा महिन्यात गावातली एक गल्लीसुद्धा सुनी राहिली नाही की जिथं काही विपरीत घडलं नाही. मी इतके दिवस गावात काही घडलं तर त्या घटनेमागे काही ज्ञात अज्ञात कारणे असतात म्हणून सांगत होतो; परंतु गावापुढे एकामागून एक संकटे उभी राहू लागल्याने मलासुद्धा वाटू लागलं आहे की, काय सांगावं, त्या पितराचा कोप सुद्धा असेल!”

गावकरी अवाक् झाले. आप्पांनी पितराचं अस्तित्व व त्याचा कोप मान्य केल्याने सर्वांना हायसे वाटले. पितराच्या कोपातून गाव मुक्त होईल, याचे सर्वांना अधिक समाधान वाटू लागले. त्यांच्या बोलण्याने लोक मोकळे झाले. जोगत्याने पितर कोठून आणली, पितराला नैवेद्य कधी व कोणता दाखवायचा. त्यासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद इथपर्यंत मोकळेपणाने चर्चा झाली; परंतु त्या पितराची पूजा कोण करणार? इथेच चर्चेचा गाडा अडला. जो-तो आम्ही पूजा करणार नाही. पूजाविधी करताना काही चुकलं तर हकनाक आमची राखरांगोळी होईल, या अनामिक भीतीने जो-तो दुसर्‍याचे नाव सुचवत होता. इतका वेळ आप्पा शांतपणे चर्चा ऐकत होते. पूजा कोणी करायची, याचा निर्णय आप्पावर सर्वांनी सोपविला. आप्पांनी त्यांचे मत मांडण्यास सुरुवात केली.

“मित्र हो, त्या जोगत्याने ती पितरं बाहेर गावाहून आणली आहेत. तर, मला वाटतं त्या पितराची कायमची उठाठेव करण्यापेक्षा ती पितरं जर कडक देवऋषी आणून त्याच्याकडून त्या पितरांची बांधाबांध करून तो पितर घेऊन गेला, तर बरं होईल. आप्पांनी हा प्रस्ताव मांडताच किशोर मास्तरनी पुस्ती जोडली. “म्हसवड जवळच्या विरळीला जगुबाबा देवऋषी आहे. त्याने आतापर्यंत अनेक ठिकाणची पितरं बांधाबांध करून नदीद सोडून दिल्याचं मी ऐकतोय.” मास्तरचे वाक्य संपताच आप्पा म्हणाले, “तो जगुबाबा पितरांची पूजा, बांधाबांध, नैवेद्य व पितरं घेऊन जाण्यासाठी मानधन मात्र खूप घेतो. तेव्हा काय निर्णय घ्यायचा ते ठरवा.”

बैठकीत बराच वेळ चर्चा चालली. त्या पितराची कायमची डोकेदुखी संपली म्हणजे आम्हासनी शांत झोपा लागत्याल. अमावास्या-पुनवला काळजात धस्स करतया. त्याकरता गावकर्‍यांनी एकमुखाने काय खर्च येईल तो वर्गणी रूपाने गोळा करण्याचा निर्णय दिला, कोण किती वर्गणी देणार ते बघू म्हणजे पुढचे निर्णय घेणे बरे होईल, असे आप्पांनी सुचविताच किशोरमास्तरनी कागद-पेन घेऊन नाव-देणगी लिहावयास सुरुवात केली. नेहमीप्रमाणे पहिली बोली आप्पांची, आप्पांनी एकदम अकरा हजाराचा आकडा जाहीर केला. त्यानंतर सरपंच, पाटील, चेअरमन व ग्रामस्थांनी देणगीचे आकडे जाहीर केले. मोहनरावांनी मास्तरला वर्गणीची बेरीज करावयास सांगितले. जाहीर रक्कम त्रेपन्न हजार सातशे पन्नास झाली. आठवड्याभरातच बहुतांश रक्कम वाड्यावर जमा झाली. आप्पा व किशोर मास्तर जगुदेवऋषीला आणण्यासाठी विरळीला रवाना झाले.

धूळ उडवत आलेली जीप पाराजवळ थांबली. आप्पा व मास्तरबरोबर दोन नवखी माणसे जीपमधून उतरताच त्यांच्याभोवती बापये-बाया-पोरांनी गर्दी केली. आप्पांनी सरपंचांना जगुबाबाची ओळख करून दिली. दाढी-जटा वाढलेल्या, भगवी कफनी, कपाळभर विभूतीचा पट्टा ओढलेला, गळ्यात माळा, हातात त्रिशूळ दुसर्‍या हातात कमंडलू. काखेत अडकवलेली झोळी व त्याची करारी नजर पाहूनच गावकर्‍यांनी खरंच हा कडक देवऋषी आहे, अशी अटकळ मनाशी बांधली. वाड्यावर चहापान झाले.

देवऋषीने झोळीतून मानवी कवटी, हाडे, बाहुल्या व शेंदूर फासलेली दोन मोठी पितरे काढून एका ताटात मांडली. दुसर्‍या ताटात उद-उदाण, हळदी-कुंकू व फुले शिगोशिग भरली. जोगत्याच्या वाड्याकडे निघण्याची पूर्ण तयारी झाली. तोपर्यंत देवऋषी आल्याची वार्ता गावभर पसरल्याने आप्पांच्या वाड्यापुढे गर्दी जमली. देवऋषी पुढे व त्यामागे गावकरी असा लवाजमा जोगत्याच्या वाड्याकडे मार्गस्थ झाला. अजून दहा-पाच पावले चालतात नाही तोपर्यंत जगुबाबा घुमायला लागला. जोगत्याचा वाडा जसजसा जवळ येत होता तसतसे त्याचे भयंकर ओरडणे-घुमणे व नाचण्याने वेग घेतला. त्यामुळे बाया-पोरांची भीतीने गाळण उडाली. दोन-तीन पायर्‍यांवरून उड्या मारत त्याने जोगत्याच्या वाड्यात प्रवेश केला. देवऋषी जिवंत बाहेर येतोय का नाही? या धसक्याने वाड्यापुढे स्मशानशांतता पसरली. दोन-तीन मिनिटांच्या कालावधीत वाड्यातून एक जोरदार किंकाळी लोकांनी ऐकली. त्या पाठोपाठ देवऋषी पळत बाहेर आला. पूजेची दोन्ही ताटे त्याने घेतली. ताटात असलेल्या पितरांना त्याने तंत्र-मंत्राने जागे केले. मंत्र पुटपुटतच पुन्हा वाड्यात झेपावला. बाहेरील जमावाला त्याचे ओरडणे, पितराला आव्हान करणे व मंत्रांच्या आवाजाशिवाय बाहेरच्यांना काही समजत नव्हते. वाड्यातली पितरं उठली तर, आपल्या छाताडावर बसतील या भीतीने वाड्याची पायरी चढायचे धाडस कोणी करत नव्हते. अचानक एक पितर हातात धरून देवऋषी बाहेर आला, तसा तो फेकला गेला. तो उलथा-पालथा होत होता. ओरडणे-आव्हान-मंत्र चालू होते. त्याच्या जिवाचे होणारे हाल पाहवत नव्हते. तरीही हातातलं पितर त्याने सोडले नाही. त्या पितरास उदाचा धूर देऊन, मंत्र टाकून व पाणी शिंपडत शांत करून ताटात ठेवले, आरोंळी ठोकून देवऋषी पुन्हा वाड्यात गेला. बर्‍याच झटापटीनंतर दुसर्‍या पितरास घेऊन आला. पुन्हा आरोळी ठोकून आत गेला तो विजयीमुद्रेनं हातात एकदम तीन पितरे घेऊन उंबरठा ओलांडणार तोच पितरासह तो जमिनीवर धाडकन पडला. क्षणभर त्याची हालचाल काहीच जाणवली नाही. घाबरलेल्या बायांनी पोरांना घेऊन घराकडे धूम ठोकली. पुन्हा त्याची उलथापालथ-ओरडणे चालू होते तरीही त्याने हातातली पितरं जमिनीवर पडू दिली नाहीत.

ग्रामपंचायतच्या कट्ट्यावर मास्तरनी सभेची तयारी केली होती. देवऋषीसह, सरपंच-पाटील व गावकरी कट्ट्यावर जमले. टेबलावर पितरं ठेवलेले ताट, पूजेचे साहित्य ठेवल्यानंतर देवऋषीने बिदागीची रक्कम टेबलावर ठेवावयास सांगितली. किशोर मास्तरने पैशाची थैली व वर्गणीदारांच्या नावाची यादी आप्पांच्याकडे दिली. आप्पांनी वर्गणीदारांची यादी वाचून दाखवली व पैशांची थैली देवऋषींना देऊन त्यांना बोलण्याची विनंती केली.

देवऋषी बोलण्यासाठी उभे राहत असतानाच पोरांनी सागर-गोट्याशी खेळावे इतक्या सहजतेने तो पितरं झेलत होता. त्याने पितरांशी खेळत असताना अचानक पितरं सभास्थानाच्या चारीबाजूने भिरकावली. लोक घाबरले, उठून पळायच्या पावित्र्यात असताना त्याने जोरात आरोळी ठोकून सांगितले की, ‘जर कोणी जागेवरचे हालले, तर ती पितरं तुमच्या मागे लावीन.’ जमाव जखडला गेला. आप्पा, मास्तर व मोहितला फेकलेली पितरं आणावयास सांगितले. हुवाळी केली.

देवऋषीने सुरुवात केली, “गावकरी बंधूनो, आज सकाळपासून ते आतापर्यंतचा विधी तुम्ही पाहिलात. मला अतिशय समाधान वाटत आहे की, जोगत्याच्या पितरापासून आज गावची सुटका होत आहे.” ही पितरं किती पावरबाज आहेत, हे दाखवण्यासाठी तीन पुरुष व महिलांनी स्टेजवर या असे आवाहन केले; परंतु आप्पांनी-सरपंचांनी बोलावूनही पुढे येण्याचे धाडस कोणी केले नाही. मास्तरने त्यांची पत्नी सुवर्णाबाईस येण्यासाठी अंगुलीनिर्देश केला. सुवर्णाबाई उठताच सुजाता मेंबरीन त्यांच्यासोबत जात असल्याचे पाहून रोहन व मुकुलही स्टेजवर गेले. त्या चौघांच्या व आप्पांच्या हातात एक एक पितर देऊन फरशीवर घासावयास लावली. पितरं घासताना त्याच्यावरील शेंदराचे कवच निघू लागले. देवऋषीने ती पितरं जमावास दाखविण्यास सांगितले. शेंदराचा लेप गेल्याने उरले ते नदीतील गोल गोटे. त्याने ते गोटे हातात घेऊन जमावास दाखवून सांगू लागले, “मित्रहो, अघोरी विद्या म्हणून समाजाने ज्या पितरांंना मान्यता दिली आहे, त्या पितरात भलेबुरे करण्याची शक्ती असते, असा लोकांमध्ये भीतीयुक्त संभ्रम आहे. अशा अघोरी शक्ती, भानामती, मूठ मारणे, तंत्रमंत्र, जारण-मारण अशा स्वरूपात आहेत, अशी आपली ठाम मानसिकता आहे. देव-धर्मावरील श्रद्धांचा आधार घेऊन मांत्रिक-देवऋषी लुबाडत असतात.”

“मीसुद्धा पूर्वी हा देवऋषीचा वंगाळ धंदा करत होतो; परंतु डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी आयोजित केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता प्रशिक्षणातील त्यांचे विधायक मनोगत ऐकून मी प्रभावित झालो व हा फसवेगिरीचा धंदा सोडून समितीचा कार्यकर्ता झालो आहे. अंधश्रद्धेतील वास्तवता समाजाला कळावी म्हणून आप्पांनी व मास्तरांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. आता प्रश्न उरतो तो तुम्ही बिदागीसाठी जमवलेल्या या रकमेचा. या रकमेत मी स्वत:चे रु. ५०१ देणगी जमा करत आहे. मी विनंती करतो की, प्रत्येकाने श्रमदान करून सदर रक्कम तुमच्या मुलामुलींचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हायस्कूलच्या बांधकामासाठी कारणी लावावी.

जगु देवऋषी व आप्पांच्या जयघोषात आसमंत दुमदुमला.

– हरिभाऊ हिंगसे

अवचट इस्टेट, बारामती, जि. पुणे.

संपर्क : ९८८१७६००६०


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]