आंबेडकर आणि पेरियार

-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार रामासामी यांचे विचार म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू होत. पेरियार आणि आंबेडकर यांच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये साम्य होते. भारतीय समाजाला जातीव्यवस्थेच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी दोघांनीही आयुष्यभर प्रखर लढा दिला. दोघांनीही ज्या धर्माने चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण केली, त्या धर्माच्या विरोधात तीव्र संघर्ष केला. दोघांनी मंदिर प्रवेश, पाण्यासाठी सत्याग्रह अशी आंदोलने केली. इकडे बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले तर पेरियार यांनी देव देवतांच्या मूर्तींचे भंजन केले.

दोघांनीही विपुल प्रमाणात लेखन केले. दोघेही उत्कृष्ट वक्ते होते. पेरियार हे जातीने ओबीसी असले तरी, ते आयुष्यभर नास्तिकतेच्या भूमिकेत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक सिद्धांतकार होते, तर पेरियार हे क्रांतिकारक प्रचारक होते. पेरियार यांनी स्वतःची तुलना कधीही आंबेडकरांशी केली नाही. मायावरम येथे भरलेल्या दलितांच्या डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले की, “मी आता डॉ. बी. आर. आंबेडकरांना आपला नेता म्हणून स्वीकारले आहे आणि शोषितांचे राष्ट्रीय नेते म्हणूनसुद्धा स्वीकारले आहे. माझा ठाम विश्वास आहे की, केवळ डॉ. आंबेडकरच अस्पृश्यांवरील अत्याचाराचे समूळ उच्चाटन करू शकतात. डॉ. आंबेडकर हेच आपले सर्वांचे नेते आहेत. (दैनिक विदुथलाई १० जुलै १९४७)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जळगाव येथे १९२९ मध्ये आयोजित केलेल्या डिप्रेस्ड क्लासेस कॉन्फरन्ससाठी पेरियार यांनी शुभेच्छा संदेश पाठवला होता. तो बाबासाहेबांनी स्वतः वाचून दाखवला. या परिषदेचे संपूर्ण वृत्तांत पेरियार यांनी त्यांच्या रिव्होल्ट या इंग्रजी साप्ताहिकात प्रसिद्ध केला. तसेच पेरियार यांनी डॉ. आंबेडकरांच्या जातिसंस्थेचे निर्मूलन या पुस्तकाचा तमिळ अनुवाद करून अनेक आठवडे कुडी अरासु या त्यांच्या वृत्तपत्रातून १९३६ साली प्रसिद्ध केला.

भारतीय समाजातील धर्मव्यवस्था आणि जातव्यवस्था याविषयी पेरियार आणि आंबेडकर या दोघांनीही महात्मा गांधी यांच्याशी वाद विवाद केला होता. दोघांनाही गांधीजींची धार्मिक भूमिका पटली नव्हती.

पेरियार हे नास्तिक असल्यामुळे त्यांनी धर्म या संकल्पनेला ठामपणे विरोध केला. तर डॉ. आंबेडकरांनी धर्मातल्या जाती रचनेचा निषेध केला, तरी त्यांनी धर्माची आवश्यकता नाकारली नाही. म्हणून शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. ही एक गोष्ट सोडली तर, दोघांमध्ये अनेक साम्यस्थळे आढळतात. पेरियार यांनी आंबेडकरांना असा सल्ला दिला होता की, ‘तुम्ही वैयक्तिक बौद्ध धर्म स्वीकारण्याच्याऐवजी लाखोच्या संख्येने लोकांना सोबत घेऊन बौद्ध धर्म स्वीकारा. म्हणजे त्याचा एक मोठा परिणाम होईल.’

पेरियार आणि आंबेडकर यांची चार वेळा भेट झाली

पहिल्यांदा ७ जानेवारी १९४० रोजी मुंबई येथील धारावी या दक्षिण भारतीय यांची जास्त संख्या असलेल्या भागांमध्ये तमिळ समुदायातील लोकांची जस्टीस पार्टीच्या वतीने जाहीर सभा झाली होती. त्या सभेचे मुख्य वक्ते पेरियार होते आणि अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

८ जानेवारी १९४० रोजी मुंबईमध्ये बॅरिस्टर जिनासोबत स्वतंत्र द्रविडस्थान या देशाच्या मागणीसाठी पेरियार, आंबेडकर आणि बॅरिस्टर जिना एकत्र भेटले. ७ आणि ९ जानेवारी १९४० ला डॉ. आंबेडकरांनी पेरियार यांच्यासाठी खास भोजनाची व्यवस्था मुंबईमध्ये केली होती.

दुसर्‍यांदा पेरियार-आंबेडकर यांची भेट मुंबईमध्येच सात आणि आठ एप्रिल १९४० रोजी झाली. तिसर्‍यांदा २१ सप्टेंबर १९४४ रोजी डॉक्टर आंबेडकर हे व्हाईसरॉय कौन्सिलचे सदस्य म्हणून मद्रासला आले होते तेव्हा पेरियार त्यांना भेटायला गेले होते.

ब्रह्मदेशातील रंगून येथे ५ डिसेंबर १९४४ रोजी आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद आयोजित केली होती. त्या परिषदेला नास्तिक पेरियारसुद्धा गेले होते. त्यावेळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांची चौथी आणि शेवटची रंगूनमध्ये भेट झाली.

आंबेडकर आणि पेरियार या दोघांच्या नावाने आज देशभरातील सर्व आयआयटीमध्ये पेरियार -आंबेडकर स्टुडन्ट स्टडी सर्कल सुरू आहेत. दक्षिण भारतात पेरियार आणि आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण सुरू असते.

–रुपाली आर्डे-कौरवार, राहुल थोरात, प्रा. डॉ. अशोक कदम


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]