-
ठाण्यात १७ मुलींसह महिलांचे लैंगिक शोषण
पैशांचा पाऊस पाडतो, असे सांगत मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण करणार्या सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ ने अटक केली आहे. या टोळीमध्ये एका महिलेचा समावेश आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून टोळीकडून हा प्रकार सुरू असून त्यांनी आतापर्यंत १७ मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण केल्याची बाब तपासात उघड झाली आहे. ठाण्यातून बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या तपासादरम्यान हा प्रकार उघडकीस आला आहे.
असलम शमी उल्ला खान (५४), सलीम जखरूद्दिन शेख (४५), साहेबलाल वजीर शेख ऊर्फ युसूफ बाबा (मांत्रिक) (६१), तौसिफ शेख (३०), शबाना शेख (४५), शब्बीर शेख (५३) आणि हितेंद्र शेटे (५६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यामध्ये साहेबलाल वजीर शेख ऊर्फ युसूफ बाबा हा मुख्य आरोपी आहे.
ठाण्यातून एक १६ वर्षीय मुलगी महिन्याभरापूर्वी बेपत्ता झाली होती. या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्या पथकाकडून करण्यात येत होता. या तपासादरम्यान बेपत्ता झालेली मुलगी एका मैत्रिणीच्या घरी राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली. यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे चौकशीत समोर येताच पोलिसांनी या प्रकरणातील सात जणांना अटक केली.
चित्रफितीतून दाखवायचे पैशांचा ढिगारा
गरीब आणि पैशांची गरज असलेल्या मुली आणि महिलांना ही टोळी हेरायची आणि पैशांचा पाऊस पाडण्याची बतावणी करायची. यावर विश्वास बसावा म्हणून ते भ्रमणध्वनीमध्ये रेकॉर्डिंग करून ठेवलेल्या चित्रफिती दाखवायचे. यामध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला आहे, असे चित्र दाखवायचे. पैशांचा पाऊस पाडण्याचे असे प्रलोभन पीडित मुली आणि महिलेला दाखवून ते विधी करण्यासाठी तयार करायचे. पूजा करणारा किंवा तिथे हजर असलेल्या व्यक्तीच्या अंगात जीन येईल आणि विधीला बसलेल्या मुली व महिलेसोबत लैंगिक संबंध केल्यानंतर तो खूश होऊन करोडो रुपयांच्या पैशांचा पाऊस पाडतो, असे पीडित मुली आणि महिलांना सांगण्यात येत होते. त्यानंतर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला जायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.