पुंडलीक

ह.भ.प. देवदत्त दिगंबर परुळेकर - 9442055221

अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ भारतीय संस्कृतीतील संत आणि समाजसुधारकांचा वारसा मानते. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र हा वारसा वाचक, कार्यकर्त्यांपर्यंत सातत्याने पोचवत असते. यापूर्वीही स्त्रीसंत, संत रोहिदास, बसवण्णा, चक्रधर, कबीर यांचे कार्य आणि कर्तृत्व याविषयी वार्तापत्रात विस्तृत लेख, वार्षिक सदरे आली आहेत. हल्ली धर्माविषयी बरेच बोलले जाते. तथाकथित स्वयंघोषित साधू संतधर्माची मांडणी अत्यंत विकृतपणे, द्वेष पसरविण्यासाठी करत असतात. या पार्श्वभूमीवर संतांचा ‘धर्म’ काय आहे, त्याची उभारणी कोणत्या मूल्यांवर झाली आहे, यांचा ऊहापोह करणारे सदर आम्ही या अंकापासून चालू करत आहोत. त्यामुळे आज विकृतपणे सांगितला जात असलेला धर्म आणि संतांचा धर्म यात काय विसंगती आहे, याची कल्पना वाचकांना नक्कीच येईल. सदर लिहीत आहेत, कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध असलेले, वेंगुर्ल्याच्या मामासाहेब दांडेकर दिंडीचे संचालक ह. . . देवदत्त परूळेकर.

संतांनी दाखविलेला धर्ममार्ग म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाला भागवत संप्रदाय असेही म्हटले जाते.

राजर्षी शाहू महाराजांचे एक जवळचे मित्र व सल्लागार राजारामशास्त्री भागवत हे वेदशास्त्रसंपन्न विद्वान होते. वेदोक्त प्रकरणात शाहू महाराजांसाठी पूजाविधी करताना संबंधित भटजी वेदोक्त मंत्र म्हणत नाहीत, हे राजर्षींना दाखवून देणारे हे राजारामशास्त्रीच! त्यांनी खूप मूलभूत विचार मांडणारे लेखन केले आहे. पुढे दुर्गाबाई भागवतांनी ते संपादित करून प्रसिद्ध केले.

राजारामशास्त्री भागवतांनी वारकरी धर्माला ‘पुंडलिकाचा मार्ग’ असे म्हटले आहे. राजारामशास्त्री लिहितात,

“बाकीच्या हिंदुस्थानातील भाषांविषयी आम्हास काही माहिती नाही; पण मराठी ही निःसंशय आगमाची भाषा होय. ज्ञान व भक्ती या दोहोंची सांगड ज्या प्रस्थानाने घातली ते पंढरपूरचे प्रस्थान. या प्रस्थानास आपण पुंडलिकावरून ‘पुंडलिकाचे प्रस्थान’ असे नाव देऊ.” (प्रस्थान म्हणजे धर्ममार्ग.)

“…या प्रस्थानातल्या लोकांचा आगम म्हटला म्हणजे ज्ञानेश्व्री व तुकारामबोवांची गाथा. सर्व महाराष्ट्रात एक मूठभर महाशास्त्री व ओंजळभर पुराणिक असतील, ते सोडून अशेष ब्राह्मणवर्ग व राहिलेले अशेष तीनही वर्ण प्रायः पुंडलिकी मार्गाचे असतात. तेव्हा ज्ञानेश्वरी व तुकारामबोवांची गाथा या दोन्ही ग्रंथांस आम्हा मराठ्यांचा आगम म्हटले असता ते यथार्थ आहे. आम्हा मराठ्यांस नाही श्रुतींची गरज, नाही स्मृतींची गरज, नाही भगवत्पादांच्या वेदान्तभाष्याची गरज.”

“…जर एखादा धर्मसंबंधी महासिद्धान्त मराठ्यांस अगदी सुलभ करून देण्याची इच्छा असली, तर जसे ख्रिस्ती लोक बायबलाच्या वचनाच्या आधारे बोलतात, त्याप्रमाणे आम्हा मराठ्यांस ज्ञानेश्वरांच्या किंवा तुकारामबोवांच्या वचनांचा आधार धरून काम केले पाहिजे.”

माउलींचे पालखी प्रस्थान आपल्याला परिचित आहेच. ‘प्रस्थान’ या शब्दाचा अर्थ सुरुवात असा लावला तरी वारकरी संप्रदायाची सुरुवात पुंडलिकापासून होते. पुंडलिक हा वारकरी गंगेची गंगोत्री आहे.

पंढरपूरला चंद्रभागेच्या वाळवंटात आज आपल्याला पुंडलिकाचे मंदिर पाहायला मिळते. पूर्वी तिथे मंदिर नव्हते, तरी पुंडलिकाचे प्रतीक म्हणून दाखविले जाणारे शिवलिंग मात्र त्या ठिकाणी होते. पुंडलिकाचे मंदिर पुढे चांगदेवांनी बांधले, असे मानले जाते. सध्याचे पुंडलिकाचे देऊळ मात्र इ. स. 1750 मध्ये होळकरांनी बांधले. या पुंडलिकरायामुळेच पंढरीनाथ विठ्ठलाचे पंढरीला आगमन झाले, असे मानले जाते. पुंडलिकाची कथा इतिहासात सापडत नाही. ती पौराणिक आहे असे सांगितले जाते. जनसामान्यांत मात्र ही लोककथा वर्षानुवर्षेअत्यंत लोकप्रिय आहे. ती कथा सर्वसाधारण अशी –

भीमा नदीच्या तीरावर राहणार्‍या जानुदेव व सत्या या दांपत्याचा मुलगा म्हणजे पुंडलिक. हा वयात येताच याचे लग्न एका सुस्वरूप मुलीशी झाले. आपल्या पत्नीचे लाड पुरविण्याच्या नादात पुंडलिक आई-वडिलांचे उपकार विसरला. तो आई-वडिलांना तुच्छ लेखू लागला, त्यांचे हाल करू लागला. शेवटी या त्रासाला कंटाळून जानुदेव व सत्या घर सोडून काशीयात्रेला निघून गेले.

कालांतराने पुंडलिकही काशीयात्रेला जायला निघाला. वाटेत एके दिवशी त्याचा मुक्काम कुक्कुट ऋषींच्या आश्रमात पडला. या आश्रमात पुंडलिक रात्री झोपला असता मध्यरात्री त्याला जाग आली. त्याने पाहिले की तीन अत्यंत कुरूप स्त्रिया आश्रमात आल्या. आश्रमात ज्या भागात कुक्कुट ऋषी राहत होते त्या भागात त्या गेल्या. पुंडलिक अस्वस्थपणे या भयंकर कुरूप स्त्रिया कोण असाव्यात, याचा विचार करत अंथरुणावर चुळबुळत राहिला.

पहाटेच्या सुमारास तीन अत्यंत तेज:पुंज सुंदर स्त्रिया आश्रमातून बाहेर पडताना त्याने पाहिल्या. पुंडलिकाला आणखीच आश्चर्य वाटले. या तेजस्वी सुंदर स्त्रिया कोण असाव्यात? तो विचार करू लागला. पुंडलिकाने या गोष्टीचा शोध घ्यायचे ठरविले. त्याने आपला आश्रमातील मुक्काम वाढविला. तीन रात्री त्याने पुन्हा हाच प्रकार घडलेला पाहिला.

तिसर्‍या रात्री मात्र त्याने सारा धीर एकवटला. पहाटेला कुक्कुट ऋषींच्या आश्रमातून बाहेर पडणार्‍या ‘त्या’ तेजस्वी स्त्रियांना त्याने विचारले, “तुम्ही कोण आहात? हा प्रकार आहे तरी काय?”

त्या अत्यंत तेजस्वी सुंदर स्त्रिया पुंडलिकाला म्हणाल्या, “आम्ही गंगा, यमुना व सरस्वती या तीन नद्या आहोत. आम्ही मुळात अत्यंत पवित्र आहोत. आमच्या पात्रात जे पापी लोक स्नान करतात, त्यांची पापे आम्ही धुतो. ती पापे आमच्या पाण्याने धुतली जातात आणि आमच्या पवित्र जलामुळे ते पापी लोक पवित्र होतात, शुद्ध होतात. दिवसभर अशा अनेक पापी लोकांचे पाप आमच्या पात्रात विसर्जित झाल्याने आम्हीच अपवित्र, कुरूप दिसू लागतो, म्हणून मध्यरात्री आम्ही तिघीही जणी महात्मा कुक्कुट ऋषींच्या पददर्शनाला येतो. त्यांच्या या आश्रमात येऊन येथील परिसर झाडून, पुसून स्वच्छ करतो. कुक्कुट ऋषींच्या पद दर्शनाने आम्ही पुन्हा तेजस्वी, सुंदर व पवित्र होतो.” असे सांगून त्या तिन्ही नद्या निघून गेल्या.

ज्या नद्या सर्व पापी लोकांना पवित्र करतात, त्यांना पवित्र करण्याचे सामर्थ्य संत-महात्म्यांच्या दर्शनात असते. असे सामर्थ्य असणारे कुक्कुट ऋषी यांचे आपण दर्शन घेऊन पवित्र व्हावे, असे पुंडलिकाला वाटले. पुंडलिकाने कुक्कुट ऋषींच्या पर्णकुटीचे दार हळूच ढकलले. ते उघडेच होते. आत पाहतो तर कुक्कुट ऋषी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्यात मग्न होते. पुंडलिकाने कुक्कुट ऋषींच्या चरणी लोळण घेतली. दयाळू ऋषींनी पुंडलिकाला मातृ-पितृ सेवेचे महात्म्य सांगितले आणि पुत्रधर्माचा उपदेश केला.

या उपदेशाने पुंडलिकाची मती पालटली. आपण आई-वडिलांबरोबर आतापर्यंत जे वर्तन ठेवले ते योग्य नव्हे हे त्याला उमगले. आपल्या दुष्ट, पापी वर्तनाबद्दल त्याला पश्चात्ताप झाला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला आई-वडिलांच्या सेवेचे महत्त्व पटले. तो आई-वडिलांना जाऊन भेटला. त्यांची त्याने क्षमा मागितली. त्यांची काशीयात्रा त्याने यथासांग पुरी केली. त्यांना सन्मानाने घरी आणले. मग तो सदैव त्यांची सेवा-शुश्रुषा करू लागला. पुंडलिकाच्या या मातृ-पितृ सेवेने भगवान प्रसन्न झाले. पुंडलिकाला भेटायला स्वत: आले. पण आपल्या आई-वडिलांच्या सेवेत अंतर पडू नये म्हणून पुंडलिकाने देवाला उभे राहण्यासाठी जवळ पडलेली एक वीट भिरकावली. देव त्या विटेवर पुंडलिकाची वाट पाहत कमरेवर हात ठेवून उभे राहिलेत. देवाने पुंडलिकाला वर मागायला सांगितले. पुंडलिकाने देवाला म्हटले, “देवा मला माझ्यासाठी काहीच नको. तू आज जसा माझ्या समोर समचरण उभा आहेस तसाच त्याच रुपात सर्व मूढ, पापी, सामान्य जनांच्या उद्धारासाठी निरंतर उभा राहा.” देवाने पुंडलिकाचे मागणे मान्य केले, तोच हा देव पंढरीनाथ, विठ्ठल आजही भिवरेच्या तटी उभा आहे.

पुंडलिकाची कथा संतांच्या वारकरी धर्माच्या काही तत्त्वांकडे निर्देश करते, ती तत्त्वे कोणती?

1) आपल्या आई-वडिलांचा योग्य सन्मान न राखणारा, त्यांचे हाल करणारा पुंडलिक पापी आहे. त्याला पुढे पश्चात्ताप होतो आणि त्याच्यात परिवर्तन होते, असे ही कथा सांगते.

माणूस हा स्खलनशील प्राणी आहे. त्याच्यातील पशू केव्हा-केव्हा जागा होतो. तो दुष्ट, पापी कृती करतो, तरीही आपल्याला आपल्या पाप कर्माबद्दल पश्चात्ताप झाला तर आपण त्या पापातून मुक्त होऊ शकतो. आपले जीवन सन्मार्गाकडे वळवू शकतो, असे संत सांगतात. तुकाराम महाराज म्हणतात –

अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥

हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥

अनुतापाने म्हणजे पश्चात्तापाने क्षणात पाप नष्ट होते. अनुतापाच्या गंगेत चित्त न्हाले की त्यालाच प्रायश्चित्त समजावे. हा पश्चात्ताप मात्र मनापासून हवा.

संत हे मृदु हृदयाचे असतात. त्यांचे हृदय करुणेने भरलेले असते. प्रत्येक पापी व्यक्तीलाही जीवन सुधारण्याची संधी मिळायला हवी, असे त्यांना वाटते. तुकोबांना छळणार्‍या रामेश्वर भट्टांना तुकोबांनी सन्मार्गाला लावले. त्यांनी तुकोबांची आरती रचली.

तुकीता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले ।

म्हणोनि रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले ॥

आपल्या अंगावर थुंकणार्‍या यवनाला नाथांनी मुक्त केले. निळोबा वर्णन करतात –

यवन अंगावरी थुंकला । प्रसाद देऊनी मुक्त केला ॥

ज्ञानोबा माउलींना समाजातील दुष्टांनी काय कमी छळले? पण माउलींनी त्यांना शाप दिले नाहीत. उलट ‘पसायदाना’त स्वतःसाठी काहीही न मागता माउली प्रार्थना करतात –

जे खळांची व्यंकटी सांडो ।

दुष्ट माणसांच्या मनातील वाकडेपणा नष्ट होवो.

(क्रमशः)

लेखक संपर्क : 94420 55221


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]