-
पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुका हा आदिवासीबहुल भाग असून येथे मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पसरलेल्या दिसतात. या अंधश्रद्धा दूर करण्याच्या हेतूने तलासरी पोलिस स्टेशनने यंदाच्या गणपती उत्सवामध्ये जादूटोणाविरोधी कायद्यातील विविध कलमांचे चित्ररूपी प्रदर्शन मांडून दर्शनासाठी येणार्या तलासरीतील नागरिकांमध्ये अंधश्रद्धे विरोधात जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलासारी भागातील अंधश्रद्धा दूर करण्याच्या उद्देशाने सदर उपक्रम हाती घेण्यात आल्याबद्दल तलासरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय मुतडक व त्यांचे सहकारी पोलीस यांचे पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती व तलासरी शाखेच्या वतीने डॉ. बी. ए. राजपूत यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित पुस्तकांचा संच देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तलासारी शाखेचे सदस्य प्रा. निलेश साळवे व प्रा. महेश माळवदकर, प्रा. भास्कर गोतीस हे देखील उपस्थित होते. विजय मुतडक हे कामानिमित्त बाहेर असल्याने त्यांच्या वतीने उपनिरीक्षक दत्ता शेळके व सहकारी पोलीस यांनी सत्कार स्वीकारला.
तलासरी तालुक्यात शासकीय रुग्णालयात अघोरी पद्धतीने उपचार केल्याची घटना घडली होती. तसेच एका महिला पोलीस कर्मचार्यांची भोंदूबाबाकडून आर्थिक व शारीरिक फसवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनांची संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. अशातच तलासरी पोलीस स्टेशनचे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृतीचे हे पाऊल एक स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत पालघर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष डॉ. बी. ए. राजपूत यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
तलासरी पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षी गणपती उत्सव साजरा करण्यात येतो. या प्रसंगी विविध प्रकारचे देखावे आयोजित करण्यात येतात. यंदाच्या वर्षी विजय मुतडक यांच्या पुढाकारातून अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय घेऊन जादूटोणा विरोधी कायद्यातील विविध कलमांचे चित्ररूपी प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात आले होते. तलासरी परिसरातील अनेक नागरिक पोलीस स्टेशनमध्ये विराजमान गणपतीचे दर्शन घेण्यासाठी भेट देतात. अशावेळी त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचविण्यामध्ये तलासरी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस यशस्वी झाल्याचे दिसून येते. या त्यांच्या पुढाकाराबद्दल समाजातील विविध नागरिकांमध्ये चर्चा असल्याचे दिसून येते.