-
गोकुळ अष्टमी असो, गणपतीच्या आगमनाची किंवा विसर्जनाची मिरवणूक असो, नवरात्री असो, दिवाळी असो किंवा राजकीय पक्षांच्या सभा निवडणुका असोत किंवा गल्ली बोळातील एखाद्या राजकीय नेत्याचा वाढदिवस असो ढोल ताशांचा गजर, डी. जे. चा दणदणाट आणि फटाक्यांची आतषबाजी करतच ते साजरे करायचे, अशी जणू प्रथाच पडून गेलेली आहे. यामुळे होणार्या ध्वनी प्रदूषणामुळे समाजाला प्रचंड आर्थिक, सामाजिक नुकसान होत आहे. आता येणार्या दिवाळीत देशभर जवळजवळ १४०० कोटी रुपयांची उलाढाल होणारे फटाके फोडले जातील.
आवाजाची पातळी साठ डेसिबलच्या वर गेली की माणसाला त्रास होतो. अॅटमबॉम्ब, सुतळी बॉम्बसारख्या फटाक्यांची पातळी नेहमीच १००च्या वर असते. या ध्वनी प्रदूषणामुळे रक्तदाबात वाढ, चीडचीड, मानसिक ताण, श्रवणदोष इत्यादी दुष्परिणाम संभवतात. रात्री-अपरात्री उडालेल्या फटक्याने निद्रानाश होतो. लहान मुले, वयोवृद्ध रुग्ण यांचा जीव घाबरतो. अभ्यासात व्यत्यय येतो. अनेक पशुपक्षी घाबरून सैरावैरा पळताना मृत्युमुखी पडतात. वाहन चालवणारी माणसे दचकून अपघात होतात. फटाक्यांतील रसायनांमुळे कार्बन मोनोक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, माग्नेशियम पेंटाक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड इत्यादी विषारी वायू व मॅग्नेशियम, सल्फर, फॉस्फरस, कार्बन ट्रायनायट्रोटोल्यून इत्यादींच्या धनकणिका वातावरणात मिसळतात. त्यामुळे व विषारी वायूंमुळे दमा, खोकला, अलर्जी, डोकेदुखी, दृष्टी मंदावणे, त्वचारोग, कर्करोग, वाढता रक्तदाब, मतिमंदत्व, मज्जातंतूवर परिणाम यापैकी काहीही होऊ शकते. तात्पुरता क्षणिक आनंद मिळवण्यासाठी जाणूनबुजून आजारांना निमंत्रण दिले जाते. फटाक्याने आग लागणे, भाजणे आणि मालमत्तेची व जीविताची हानी होणे या सर्व गोष्टी प्रतिवर्षी वाढत्या प्रमाणावर होत आहेत. फटाक्यांच्या कारखान्यात बहुसंख्य बालकामगार राबत असतात. या कारखान्यांची स्थिती अतिशय वाईट असते. त्या बाल कामगारांना अतिशय तुटपुंजा पगार असतो. खरेतर बाल कामगारांना कामावर ठेवणे गुन्हा आहे. फटाके विकत घेत आपण या शोषणालाच मान्यता देत असतो.
या सर्वांचा विचार करून सुप्रीम कोर्टाने पर्यावरण संरक्षण कायदा (EPA)अंतर्गत दिल्ली आणि उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या राज्यातील एनसीआर विभागात फटायांचे उत्पादन, विक्री आणि साठवणूक या सर्वांवर बंदी घातली व या बंदीची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे नाहीतर तो कोर्टाचा अवमान मानला जाईल असा सज्जड दमही दिला.
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती २००६ पासून फटाकेमुक्त उत्सव! प्रबोधन मोहीम अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय या ठिकाणी राबवत आहे. त्यात मुलांना फटाके उडविण्यामागील शारीरिक, आर्थिक धोके सांगणे, पर्यावरणाला असणारा धोका स्पष्ट करून सांगणे आणि फटाक्यांना मुलांना आवडतील अशी पुस्तके, विज्ञान खेळणी घेण्यासारखे पर्याय देणे. आंनिसच्या प्रकाशन विभागानेही या दिवाळीत फटाके नको, पुस्तके घ्या! ही मोहीम सुरू केली आहे. अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ही मोहीम जोराने राबवतील यात काहीच शंका नाही.
