धर्मांधता, सांप्रदायिकता, हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे

जावेद अख्तर -

(जावेद अख्तर यांना मानाचा रिचर्ड डॉकिन्स पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या संदर्भात त्यांची ‘वायर’च्या

सिद्धार्थ भाटिया यांनी घेतलेली मुलाखत…)

सिद्धार्थ : जावेद सर, आपले ‘वायर’ वर स्वागत आहे. आपण ‘द वायर’चे जुने मित्र आहात आणि मुक्त पत्रकारितेचे पाठीराखे आहात. आज आपल्याला प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल आपले मनापासून अभिनंदन! तसे पाहता आतापर्यंत आपण बर्‍याच पुरस्कारांचे मानकरी आहात. पण आज हा रिचर्ड डॉकिन्स यांच्या नावावर मिळालेला हा पुरस्कार अत्यंत मानाचा खास आहे. पुरस्कारासोबत मिळालेले मानपत्र मी उध्द़ृत करू इच्छितो. मानपत्र म्हणते की हा पुरस्कार ‘धर्मनिरपेक्षता, विवेकवाद या मूल्यांना मानणार्‍या आणि वैज्ञानिक सत्याच्या बाजूने जाहीरपणे उभे राहणार्‍या व्यक्तीस देण्यात येतो.’ परंतु आजकाल विवेकवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे सकारात्मक (पॉझिटिव्ह) गुण मानले जातात का, याबाबत माझ्या मनात शंका आहे. काय वाटते आपल्याला याबाबत?

जावेद अख्तर : हे नक्कीच चांगले आणि सकारात्मक गुण आहेत. परंतु आजकाल या कोरोनाच्या दिवसात ‘पॉझिटिव्ह’ हा शब्दच संशयाच्या भोवर्‍यात सापडला आहे आणि त्यात नकारात्मक (निगेटिव्ह) सूचकता आली आहे. त्यामुळे तुम्ही ‘पॉझिटिव्ह’ असूनही एका अर्थाने ‘निगेटिव्ह’ असता.

धर्मनिरपेक्षता आणि विवेकवाद ही मूल्ये आज पुराणी आणि कालबाह्य झाली आहेत, असे तर आपणास म्हणायचे नाही ना?

– छे, छे ! खरं पाहिलं तर हे प्रवाद येतात आणि जातात. जगाचा खरा ओढा कुठे चालला आहे, जग कुठला मार्ग स्वीकारीत आहे, दिवसेंदिवस पिढ्यान्पिढ्या काय प्रगती होत आहे, हे पाहिले तर जगातील विवेकवादी लोकांची टक्केवारी प्रत्येक समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. तसं पाहिलं तर असे दिसून येते की, जेव्हा समाज एखादी विचारप्रवृत्ती वा श्रद्धा नापसंत करतो, तेव्हा बरेच लोक तसाच आव आणताना दिसतात. भारतीय समाजात आजकाल असा मोठा वर्ग आहे की, जो निरीश्वरवादी, विवेकवादी असल्याचा आव आणीत आहे. आमच्यासारखे काही बाहेर येऊन न हिचकिचता उघडपणे आपले विचार व्यक्त करतात. पण असे बरेच लोक आहेत, जे मोकळेपणाने बोलत नाहीत, आपले मन उघडे करीत नाहीत. परंतु मनोमन त्यांचा घटनेच्या आशयावरील विश्वास डळमळीत झाला आहे.

परंतु जेव्हा समाजात धर्माचे अवडंबर माजते, तेव्हा मी निरीश्वरवादी आहे, असे म्हणणे सोपी गोष्ट नाही. एक वेळ मी विवेकवादी आहे, हे म्हणणे चालून जाईल; पण निरीश्वरवादी…

– त्याचे असे आहे की, विवेकवादी असण्यामध्ये तुम्ही निरीश्वरवादी असणे अध्याहृत आहे; अन्यथा आपण विवेकवादी असूच शकत नाही. मी स्वतः अत्यंत धर्मविरोधी असल्याने असे म्हणणे माझ्या सोयीचे आहे. अत्यंत धार्मिक असणे आणि सांप्रदायिकतावादी असणे यात फरक आहे. पण तुम्ही धार्मिक असाल तरी तुम्ही सांप्रदायिकतावादी असण्याची खूप मोठी शक्यता असते. पण अशीही धार्मिक माणसे असू शकतात, जी सांप्रदायिकतावादी नाहीत; परंतु हे अपवादानेच घडते, तसा नियम असत नाही. मात्र तुम्ही निरीश्वरवादी असलात तर तुम्ही धर्मनिरपेक्ष असण्याची मोठी शक्यता असते. निरीश्वरवादी असूनही तुम्ही सांप्रदायिकतावादी असू शकता. यात सरमिसळ नको करूया. निरीश्वरवाद आणि धर्म; त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्षता आणि सांप्रदायिकता याची गफलत नको करूया. सांप्रदायिकता आणि धर्मनिरपेक्षता यात वितंड आहे तर धर्माचा वाद निरीश्वरवादाशी आहे. ही दोन वेगळी द्वंद्वे आहेत.

परंतु जाहीरपणे आपला धर्म सांगण्यामुळे तुम्हाला ‘संप्रदायवादी’ असे लेबल लावले जाते. वीसएक वर्षांपूर्वी मी संप्रदायवादी आहे, असे म्हणायची लाज वाटत असे; परंतु अलिकडे मी संप्रदायवादी आहे, हे सांगण्याची लाज वाटेनाशी झाली आहे.

– त्यांनी हल्ली काय केलं आहे, माहीत आहे, त्यांनी आपली सांप्रदायिकता राष्ट्रवादाखाली झाकली आहे. तुम्ही जर त्यांचा ‘कम्युनॅलिझम’ मानला नाही तर तुम्ही देशद्रोही ठरवले जाता. कारण त्यांचा ‘कम्युनॅलिझम’ म्हणजे त्यांचा राष्ट्रवाद आहे. हा त्यांचा सध्याचा डाव आहे. मी जर संघपरिवाराच्या विचारसरणीला किंवा गोळवलकरांच्या विचारांना विरोध केला तर मी देशद्रोही ठरतो. त्यांच्या सांप्रदायिकवादाने राष्ट्रवादाचे रूप घेतले आहे. पण हा राष्ट्रवाद नव्हे, खरा राष्ट्रवाद हा कुठल्याही संप्रदायापलिकडे आहे.

गेली काही वर्षे जावेदसाब या गोष्टी बर्‍याच अतार्किक झाल्या आहेत आणि तुमच्यावर व्यक्तिशः हल्ले झाले आहेत आणि बर्‍याच वेळा हल्ला करणारे मुस्लिम होते. ते तुम्हाला – मी माझे शब्द काळजीपूर्वक वापरायला हवे – धर्मद्रोही किंवा धर्मातील आंतरिक शत्रू ठरवितात. मला आठवते, एकदा तुम्ही म्हणाला होता की, तुम्हाला हिंदूंपेक्षा मुस्लिमांकडूनच अधिक हल्ले आणि धमक्या येतात, हे खरं आहे का? आणि याचं कारण काय असावं ?

– नाही, नाही, असं नाही. दोघांकडूनही सारख्याच धमक्या येतात. त्याबाबत दोघेही समसमानच आहेत. कुणी कुणाच्या मागे नाही. त्यातील सत्य असं आहे की, तुम्ही जर सांप्रदायिकता आणि धर्मांधतेच्या विरोधात असाल तर तुम्ही त्यात निवड करू शकत नाही की या सांप्रदायिकतेला मी विरोध करीन आणि ही मला चालेल. ही धर्मांधता चूक आहे आणि ही बरोबर आहे, असे आपण म्हणू शकत नाही. पण खरं पाहता या देशात बर्‍याच जणांनी असे केले आहे. बरीच जणं असे करतात. म्हणून असा प्रघात आपल्याला दिसतो. पण हे बरोबर नाही. आपण सगळ्यांना सारखाच न्याय द्यायला हवा. धर्मांधता, सांप्रदायिकता हुकूमशाही; मग ती कुठल्याही रंगाची का असेना, ती नाकारलीच पाहिजे. मला इतिहासात थोडे गम्य वाटते आहे. या मुंबईत तीन वेळा मला पोलिसांनी संरक्षण देऊ केले होते. खरं तर माझ्या इच्छेविरुद्धच होते ते. पण ते म्हणाले, त्याची जरुरी आहे आणि आम्ही हे संरक्षण देणारच आणि या तीन वेळांपैकी दोनदा मुल्लांमुळे ही वेळ आली होती आणि एकदा दुसर्‍या बाजूकडून आली होती. कारण ज्या क्षणी तुम्ही सत्य बोलता आणि तुम्ही त्या संप्रदायाबाहेरची ती व्यक्ती असता, तेव्हा त्यांना ते इतके बोचत नाही. त्याचं काय आहे की, त्यांच्या मताने कुणी मुस्लिम व्यक्ती ‘स्युडोसेक्युलारिस्ट’ असू शकत नाही; फक्त हिंदूच ‘स्युडोसेक्युलॅरिस्ट’ असू शकतात. बाहेरच्या कुणी टीका केली तर ती समजू शकते त्याला ‘स्युडोसेक्युलर’ म्हटले जाते. संघपरिवारातील कुणी टीका केली तर त्याचे एवढे वाटत नाही. परंतु तुमच्याच जमातीतील कुणी आपल्याच संप्रदायाबद्दल टीका केली तर तो दगाबाज ठरतो, जिहादी ठरतो. ते पाठीत खंजीर खुपसणे होते. आम्हीच कसे आमच्याबद्दल म्हणू शकतो की लाऊडस्पीकर हळू आवाजात लावायला हवा किंवा बंद करायला हवा?

असं असायला काय कारण असावे? मी एक शक्यता सुचवीत आहे. भारतातील मुस्लिम स्वतःला beseiged, असुरक्षित समजतात आणि त्यांना आपल्या बाजूचे कुणी साथीदार असण्याची गरज भासते. खरच त्यांना असुरक्षित वाटतं का?

– हे खरं आहे. त्यांना खरोखरच एक प्रकारची असुरक्षितता जाणवते. पण त्यांनी विचार करायला हवा की अशी वेळ त्यांच्यावर का आली. दुसर्‍या धर्मात जुलमी शक्ती आहेतच; पण एक प्रकारची जुलमी सत्ता त्यांच्या अंतर्गतही असते. तुम्ही दुसर्‍या जमातीतील फॅसिस्ट शक्तीविरोधात लढू शकत नाही, जोवर तुम्ही तुमच्या स्वतःच्या धर्मातील फॅसिस्ट शक्तींविरोधात आवाज उठवत नाही. परंतु मुस्लिम मूलतत्त्ववादींकडे खोट्या आपुलकीने पाहिले जाते. तुम्ही या दोघांत असा भेदभाव केला तर तो तुमच्या कामी येणार नाही. चॅरिटीप्रमाणेच This fight also should start at home. आपल्या घरापासूनच याची सुरुवात व्हायला हवी आणि हे गेली कित्येक वर्षेचालले आहे. ही अल्पसंख्याकांची धर्मांधता, ही बहुसंख्याकांची धर्मांधता असा फरक असू शकत नाही. दोन्ही सारख्याच वाईट. दोन्ही आपल्या लोकांना चुकीच्या मार्गावर नेत असतात आणि जमातीतील सामान्य नागरिकाला हे बजावले पाहिजे की, ते पण या परिस्थितीला तेवढेच जबाबदार आहेत.

जेव्हा तुम्ही सामान्य नागरिक असं म्हणता, माझ्याप्रमाणे तुमच्याही हे पाहण्यात आलं असेल की शिक्षणाची पातळी मुसलमानांच्यातही दिवसेंदिवस वाढत आहे. मी त्यांच्यापैकी काहींना भेटलो आहे. ते एका संभ्रमात पडले आहेत. त्यांना असं वाटत आहे की, ज्याला ‘इस्लामिक संस्कृती’ म्हणतात, ती त्यांनी नाकारता कामा नये. परंतु त्यांना सर्व बाजूने कोंडीत पकडले जात आहे.

– ‘इस्लामिक संस्कृती’ असा एक शब्दप्रयोग केला जातो. परंतु इस्लामिक संस्कृती नावाचं असं काही अस्तित्वात नाही.ते एक मिथक आहे. तुम्ही सौदी अरेबियाला जाऊन पाहा ना, इस्लामिक कल्चर नावाचं तिथे काही आहे का? तिथे मक्का आहे, मदिना आणि काबा आहे; पण इस्लामिक संस्कृती नावाची चीजच आढळून येत नाही. हे म्हणजे युरोपातील सर्व देशांची संस्कृती एकत्र करून त्याला ख्रिश्चन संस्कृती म्हणण्यासारखे अतार्किक आहे. दोन्ही सारखेच चूक आहे. तिथे इटली, जर्मनी, इंग्लंड आहेत, फ्रान्स आहे. त्यांचे प्रत्येकाचे आपापले कल्चर आहे, आपापल्या वेगवेगळ्या चाली-रीती आहेत. तसेच वेगवेगळ्या मुस्लिम देशांचे आपापले वेगळे कल्चर आहे. बाहेर कशाला? भारताचंच उदाहरण घ्या ना. इथे उत्तर हिंदूस्थानात उर्दू बोलणार्‍यांची संस्कृती एक आहे, तर तामिळ बोलणार्‍या तामिळ मुस्लिमांची आपली अशी वेगळी संस्कृती आहे. मल्याळी मुस्लिम, जो मल्याळी भाषा बोलतो, त्याची संस्कृती वेगळी आहे. काय या सर्वांच्या संस्कृती एकच आहेत, असं म्हणता येईल? इस्लामिक संस्कृती, इस्लामिक आर्किटेक्चर असं काही नाही. इराणमध्ये आर्किटेक्चर आहे, टर्कीमध्ये काही कला आहे, त्याला तुम्ही इराणी संस्कृती म्हणू शकता. त्याला टर्की कल्चर म्हणा. उझबेकमध्ये आहे त्याला उझबेकी आर्किटेक्चर म्हणा. इस्लाममध्ये आर्किटेक्चर आहे; पण इस्लामिक आर्किटेक्चर, इस्लामिक संस्कृती हा काय प्रकार आहे, हे माझ्या आकलनाबाहेरचे आहे.

खरं पाहता भारतावर इतक्या संस्कृतींचा प्रभाव आहे. त्यात अलगतावाद आणण्याऐवजी त्याचे आपण स्वागत केले पाहिजे. आपल्याकडे पर्शिअन संस्कृती आहे, तुर्की आहे, अरेबिक आहे आणि इतर देशांची पण आहे, इथे ख्रिस्ती आहेत…

– कुणीतरी एक छान उपमा दिली आहे. भारत एक मोठ्या पिझ्झासारखा आहे. त्यात ब्रेडचा एकच एक जाड बेस आहे; पण त्यावरचे टॉपिंग बदलते, त्याप्रमाणे त्याची चव बदलते. पण हा बेस इतका मजबूत आहे की, ज्या काही संस्कृती येथे आल्या, त्यांनी भारतीय स्वरूप घेतले. आता त्याचे काय स्वरूप आहे? त्या आता इराण वा टर्की अशा उरल्या नाहीत, त्यांनी पूर्णपणे भारतीय रूप घेतले आहे. भाषेबाबतही तेच आहे. आपण उर्दूमधून काही शब्द घेतले, पर्शियामधून काही शब्द घेतले. पोर्तुगीज भाषेतून, संस्कृत भाषेतून असे अनेक भाषांतून असतील; परंतु त्याचे चलन भारतीय वळणावर गेले. जसे की ‘अमीर’ हा अरेबिक शब्द आहे. पण ‘अमीरों’, ‘अमिरी’ हे भारतीय शब्द आहेत. ‘हवा’ हा पर्शियन शब्द आहे. परंतु ‘हवाएँ’, ‘हवाओं’ हे भारतीय शब्द झाले. जेव्हा-जेव्हा आपण बाहेरून शब्द घेतले, आपण त्याला भारतीय चलन, व्याकरण लावले. आणि हेच कला काय, संगीत, पाककला यांनाही लागू आहे. ते वेगवेगळ्या देशांतून आले असले, तरी शेवटी त्यांनी पूर्णपणे भारतीय रूपच घेतले आहे. ते इतके भारतीय झाले आहेत की जेव्हा तुम्ही भारताबाहेर या गोष्टींना सामोरे जाता, तेव्हा ते वेगळे भारतीय म्हणून तुमच्या पुढे येतात.

भारतीय बिर्याणी याचे चांगले उदाहरण आहे.

– अगदी माझ्या ओठावर आलेले शब्द आपण बोललात.

या गोष्टींचा परस्पर संबंध आहे का, माहीत नाही. पण हल्ली सार्वजनिक जीवनात धर्माचे अस्तित्व वाढत असतानाच एकीकडे माणसाची सामाजिक सहानुभूती; खासकरून असुरक्षित लोकांबाबत कमी-कमी होताना दिसत आहे. खासकरून या स्थलांतरित कामगारांबद्दल मी व्यथित झालो आहे. या कामगारांना ना सरकारकडून मदत मिळाली, ना समाजाकडून. ते आपल्या जीवनाचा एक भाग आहेत, त्यांनी ही शहरे घडवली आहेत, हे आपण मान्य केले नाही. या बदलाचे कारण काय असेल?

जा : ही खूप विचित्र बाब आहे की, तुम्ही सांगत आहात, त्याप्रमाणे समाजात एकीकडे धार्मिकता वाढत आहे, तर मानवता कमी-कमी होत आहे. आपल्याला पुनःपुन्हा हे सांगितलं जातं की, धर्म तुम्हाला सद्गुण देते. तुम्हाला सहसंवेदना देते. इतर मानवांप्रती प्रेमभावना देते. परंतु जे घडत आहे ते अगदी याच्या उलट आहे. धर्म वर-वर येतो आहे, तर दुसर्‍याबद्दलची कणव खाली-खाली जात आहे. कुठे धर्माने तुम्हाला मानवता शिकवली? कुठल्या धर्माने? सत्य हे आहे की तुम्ही धर्माशिवाय ही चांगली व्यक्ती होऊ शकता; धर्मामुळे नव्हे, अगदी कुणीही.

आजच्या परिस्थितीला जागोजागची प्रांतिक सरकारे जबाबदार आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला ही सरकारे तयारीत नव्हती. जेव्हा पडदा खाली ओढला, लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा त्यांनी विचार तरी केला होता का, की रोजंदारीवर असलेल्या या लाखो कामगारांवर याचा काय परिणाम होईल? कदाचित याची कल्पना त्यांना आली नसावी. रस्त्यावर उतरून पत्रकारिता निभावणार्‍या पत्रकारांच्या वार्तांकनामुळे, बर्‍याच कालावधीने का होईना, ही गोष्ट देशाच्या ध्यानात आली. व्यवस्थापन, उद्योजक, कॉर्पोरेट विश्व पूर्णपणे याबाबत अनभिज्ञ होते, असंवेदनशील होते. पण कुणी त्याची दखल घेतली नाही. लाखो लोक स्थलांतर करीत होते. हे स्थलांतर सत्तेचाळीस सालच्या फाळणीच्या तोडीचे; किंबहुना त्याहून अधिक होते. यात एकच आशेचा किरण म्हणजे ज्या-ज्या खेड्यांवरून, शहरांवरून हे लोक गुजरले, तेथील लोक घराबाहेर पडले, त्यांना मदत केली, त्यांना अन्न दिले, पाणी दिले, कपडे दिले; एवढेच नव्हे, तर चपलाही दिल्या. तेव्हा असे म्हणता येईल की, भारतात कुठेतरी मानवता जिवंत आहे. केवळ काही उद्योजक, काही कारखानदार, काही कॉर्पोरेट यांच्याकडे बघून आपण म्हणू शकत नाही की, भारतातील माणुसकी संपली आहे. सामान्य माणूस दुसर्‍या सामान्य माणसाचे दुःख समजू शकतो, ही एक खास बात आहे.

कुणीच या गोष्टीचा विचार केला नाही. व्यवस्थापनाने आपली जबाबदारी पूर्णपणे डावलली. समाजातील या वर्गाकडे दुर्लक्षच केले; परंतु त्यांच्या कामाचा, सेवांचा पुरेपूर फायदा मात्र घेतला.

– ही असंवेदना विलक्षण आहे आणि इतकी दूरवर आणि खोल पोचली आहे की, मी काही माध्यमांतील बातमीदारांची मुलाखत घेतली. हे लोक अत्यंत असंवेदनशील आहेत, स्थलांतराच्या या परिस्थितीबाबत, पूर्णपणे असंवेदनशील. त्यांचे ठाम म्हणणे होते की ‘भले की बंगले लाख लुभावणे असले तरी आपले घर ते आपले’ या भावनेने घराची आठवण त्यांना हजार-बाराशे मैल रस्ता तुडवत घराकडे नेत आहे. ते घरासमोरचे अंगण, ती वाहती नदी, तो पिंपळ यांची त्यांना ओढ लागली आहे. एक पत्रकार कसं काय हे ठासून सांगू इच्छितो की, घराच्या आठवणीने व्याकुळ होऊन हे लोक घराकडे निघाले आहेत? त्यांचा रोजगार गेला आहे म्हणून नव्हे, भुकेने ते व्याकुळ झाले आहेत, म्हणूनही नाही. त्यांच्या तोंडावर त्यांच्या रोजंदारीचे दरवाजे बंद करण्यात आले. जो कारखानदार आजवर त्यांच्याकडून काम करून घेत होता, त्या कारखानदाराला ते उद्या काय खाणार, हा प्रश्न पडला नाही. सरकारला त्यांच्यावर काय प्रसंग गुजरला आहे, याची काही दखलच नाही. त्यांच्या घरी परतण्याची ही सर्व कारणे ते मानतच नाहीत. घराच्या आठवणीने ते परत जात आहेत, असेच ते म्हणत होते.

तुम्ही माध्यमांची गोष्ट सांगितली. परंतु माध्यमं तर आता आस्थापनांच्या बाजूची बनली आहेत. आपली पूर्वापार चालून आलेली भूमिका तर त्यांनी कधीच सोडली आहे. ती आस्थापनांचा जणू भाग बनू लागली आहेत. माध्यमं लोकांचा आवाज म्हणून उरली नाहीत. ही इतकी विचित्र परिस्थिती बनली आहे. मला वाटतं, आम्ही पत्रकार असंवेदनशील झालो आहोत, जनतेपासून तुटून पडलो आहोत, दूर गेले आहोत. ज्यांचा आवाज उठवणे आमचे काम असते, त्या सामान्य जनतेपासून आम्ही तोडले गेले आहोत.

– ते म्हणतात की, भारताची 75 टक्के जनता खेड्यात राहते. परंतु कोरोनापूर्व काळात तुम्ही एखाद्या वाहिनीवरील बातम्या पाहिल्या असता त्यातल्या किती गावासंबंधी असतात? गावाकडचे किती प्रश्न मांडतात? त्यांचे आरोग्य, शिक्षण, तेथील सुविधा यांची चर्चा कधी होते? हा कुठल्याही वाहिनीवर चर्चिला जाणारा मुद्दा नसतो, ना कधी होता. याचा अर्थ 75 टक्के जनता ही नकोशी, निरर्थक झाली आहे. त्यांना काही महत्त्व नाही. मग कुणाला महत्त्व आहे? जे लोक रेफ्रिजरेटर विकत घेऊ शकतात, एअरकंडिशनर विकत घेऊ शकतात, भिंती रंगवायचे महागडे रंग घेऊ शकतात. टेलिव्हिजन या लोकांसाठी आहे. कारण तो जाहिरातींवर चालतो. जे या महागड्या वस्तू विकत घेतात, त्यांना कुठली माहिती, बातमी ऐकायला आवडेल त्याच बातम्या टेलिव्हिजनवर दिल्या जातात.

म्हणजे प्रेक्षकवर्ग हा गिर्‍हाईक वर्ग आहे?

अगदी बरोबर! अगदी बरोबर! तेव्हा गावामध्ये कुणी मरत असेल तर ते दाखवून काय फायदा? तो तर काही रेफ्रिजरेटर खरिदणार नाही.

एक कवी म्हणून तुम्हाला काय जाणवलं या परिस्थितीत?

मी या काळात काही कविता लिहिल्या आहेत आणि लवकरच त्या पुस्तकरुपात छापून येतील. काही आजकालच्या आहेत, तर काही यापूर्वीच्या परिस्थितीबद्दल आहेत.

मग नवी कविता आम्हाला ऐकवणार का?

जरूर. मी ऐकवतो एक कविता. ही तर इतकी ताजी तीन-चार दिवसांपूर्वीचीच आहे. तसं, मी कविता कधी वाचत नाही. परंतु ही नवी आहे. फक्त एकदाच शबाना आणि काही निवडक मित्रांनाच आतापर्यंत फोनवर ऐकवली आहे. तेव्हा मला ती वाचून दाखवावी लागेल.

काही हरकत नाही. जरूर वाचा.

या कवितेचं शीर्षक आहे ‘हमसफर’ म्हणजे सहप्रवासी.

त्याचं आधीच इंग्रजीत भाषांतर केलं आहे. मी आपल्याला मेल करेन.

हमसफर

दोनो जलती-तपती सडकपर सूरज के गर्मी से पिघलते,

भूक और प्यास की गठरी उठाये हुए कंधोंपर,

नंगे पाँव, बडे नगर से, अपने छोटे गांव को,

अपने छोटे घरों को लौट रहे है।

वो घर, जो पैरों की ताकद, दिल की हिम्मत से भी आगे,

बहुतही आगे, जाने कितनी दूरीपर है।

सूखे होंठ है, खाली आँखे, पाँवमे छाले।

पर चलते रहने के सिवा रस्ता भी क्या है?

तरक्की के दरवाजे जब दोनों के मूँह पर बंद हुए थे।

ठेकेदार ने जब था इन्हे आधी बनी बिल्डिंग से निकाला।

कौन था इनका पूछनेवाला?

कोई भी उम्मीद किसी रस्ते में नहीं थी।

सब नगरी सुनसान पडी थी।

हर बिल्डिंग अनजान खडी थी।

सारे मकान और सारी दुकाने अपनी आँखे बंद किए थे।

उसी नगर में अब ये दोनो थे परदेसी, जहाँ ये बरसो मरे जीए थे।

सारे खुदाओं के घर पर भी लगा था ताला।

किससे मांगता मांगनेवाला? कोई नहीं था।

चारों तरफ बस एक सन्नाटा गूंज रहा था।

वो लाऊड स्पीकर भी अब चुप थे, कल जो दोनो को थे बताते,

कौन हो तुम, और क्या है पूरी और सच्ची पहचान तुम्हारी?

सुनो और समझो बात हमारी,

वो है बाबर की औलाद और तुम हो महाराणा के बेटे।

दोनों का इतिहास अलग है। दोनों का संस्कार अलग है।

दोनों के विश्वास अलग है।

वो लाऊड स्पीकर भी चुप थे, जो थे बताते,

वो है भूतों के पुछनेवाले और तुम हो गझनी के सिपाही,

सच्चे राह के सच्चे राही।

दोनों का ईमान अलग है। दोनों का अरमान अलग है।

दोनों की मंझीलही अलग, रस्तेही अलग।

ऐसा ग्यान एरियल बाटते सारे लाऊड स्पीकर अब चुप है।

और ये दोनो देख रहें है। दोनो जलती-तपती सडक पर,

सूरज के गर्मी से पिघलते, नंगे पाँव,

अपने कंधोेंपर अपने भूक और प्यास की गठरी लेकर,

न जाने कितनी सदियों से युंही चलते है।

पेटके आग में दोनों जिंदा जलते है।

अब दोनों ने है ये जाना।

एक अमिरी एक गरिबी, दुनियामें बस दो ही जाते है।

बाकी सब झूटी बातें।

अनुवादक – प्रभा पुरोहित संपर्क – 96191 93363


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]