आहाराला पूरक जीवनशैली

डॉ. विनायक हिंगणे -

आहाराविषयी बोलताना एक विषय आपल्याला नेहमीच भुरळ घालतो तो म्हणजे वेगवेगळ्या घटकांचे महत्त्व. संधिवात असेल तर अमुक खाऊ नये, डायबेटीसच्या रुग्णांना तमुक पदार्थ गुणकारी, असे आपण नेहमीच ऐकतो. आहाराविषयी चारचौघांतील गप्पा असोत किंवा शास्त्रीय शोधनिबंध असो, आहारातील वेगवेगळे घटक कसे काम करतात याविषयी सगळ्यांनाच रस असतो. आहार घटकांची शरीराच्या कामामध्ये एक ठरावीक भूमिका असते. प्रत्येक आहार घटक एक ठरावीक काम करून आरोग्य राखतो. त्यांची कमतरता पडली तर आजार होतात. याशिवाय काही पदार्थांना औषधी गुणधर्म असतात असे मानतात. अशा वेळी प्रश्न पडतो की, ठरावीक घटकांना महत्त्व द्यायचे की संपूर्ण आहाराचा विचार करायचा ? याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. आहारात जर एखादा घटक कमी पडला तर काय अडचणी येऊ शकतात किंवा एखादा घटक कमी पडू नये म्हणून जास्त भर दिल्यास संतुलन कसे बिघडू शकते हे दोन मुख्य मुद्दे आपण आज बघणार आहोत.

आहार घटक व संतुलन :

आहारात वेगवेगळे घटक असतात, हे आपल्याला माहीतच आहे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे ढोबळपणे मोठे रासायनिक घटक असतात. यातून आपल्याला ऊर्जा मिळते व शरीर बांधणी घडते. काही पदार्थांत यातील एखादा घटक मोठ्या प्रमाणात असतो. उदाहरणार्थ, अंड्यात प्रथिने मुबलक असतात तर धान्यात कर्बोदके मुबलक असतात. पण याचा अर्थ अंडी म्हणजे, फक्त प्रोटीन्स किंवा धान्य म्हणजे फक्त कर्बोदके असा नाही. अंड्यात बर्‍याच प्रमाणात स्निग्ध पदार्थ सुद्धा असतात. तर धान्य आणि कडधान्यात कर्बोदकासोबत प्रथिने सुद्धा असतात. शिवाय प्रत्येक नैसर्गिक खाद्यपदार्थात काही प्रमाणात कुठले तरी जीवनसत्त्व (व्हिटॅमिन व मिनरल) असते. त्यामुळे विचार करताना काही फक्त प्रोटीन कर्बोदके किंवा चरबी असा न करता त्या पदार्थाचा स्वतंत्र विचार करणे व्यावहारिक ठरते. शिवाय आहारातील तंतुमय पदार्थ (फायबर) हा आपल्या शरीरास ऊर्जा किंवा शरीर बांधणीस तेवढा उपयोगी नसला तरी आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो. आतडीचे आरोग्य, आतडीतील उपयुक्त जीवाणू व अनेक आजारांपासून संरक्षण मिळण्यासाठी ते महत्त्वाचे ठरते. प्रथिने, कर्बोदके व चरबी सोबतच फायबरची सुद्धा मोठी गरज आपल्याला असते. व्हिटॅमिन (जीवनसत्त्वे) व मिनरल (खनिज पदार्थ) हे सुद्धा काही प्रमाणात आपल्याला लागतात व ते वेगवेगळ्या अन्नात सापडतात. त्यामुळे सोपे करण्यासाठी आजकाल रासायनिक आहारघटक स्वतंत्रपणे बघण्यापेक्षा पदार्थांचे गट केले जातात. धान्य व पिष्टमय पदार्थ, डाळी व कडधान्य, फळे व पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ, मांस व मासे, तेल, तूप, स्निग्ध पदार्थ व प्रक्रिया केलेले पदार्थ असे हे काही महत्त्वाचे गट आहेत. या वेगवेगळ्या गटातील पदार्थ ठरावीक प्रमाणात वापरले, तर आपला आहार संतुलित होतो. यातून आपल्याला कमतरतेचे आजार व अतिसेवनाचे आजार टाळता येतात. संतुलित आहार सुचवणारे हे चित्र बघावे. कमतरता किंवा अतिसेवनाचे आजार ह्यांचा उपचार करताना ह्यात बदल केले जातात. काही ठरावीक प्रसंगी उदा. गरोदर महिला किंवा आजारी व्यक्ती ह्यांना सुद्धा वेगळ्या विशिष्ट आहाराची गरज असू शकते. पण असे आहार तज्ज्ञ व्यक्तीकडून घ्यावे लागतात. सर्वसाधारण व्यक्तीला संतुलित आहाराचाच जास्त फायदा होतो.

कमतरतेचे आजार व त्यांची जनमानसातील भीती :

आरोग्यशास्त्रात एक क्रांतिकारी शोध हा एका ठरावीक आहार घटकाविषयी होता. अगदी पंधराव्या-सोळाव्या शतकापासून स्कर्व्ही आजाराची लक्षणे नाविकांमध्ये दिसायची. काही ठिकाणी लिंबूवर्गीय फळांनी हा आजार बरा होतो असे ज्ञात होते. १७९५ मध्ये जेम्स लिंड नावाच्या एका स्कॉटिश डॉक्टरने नाविकांना लिंबू व संत्री अशा फळांचा रस देण्याची सुचवले. यामुळे स्कर्व्ही आजार बरा व्हायला लागला. पुढे काही वर्षांनंतर ‘व्हिटॅमिन सी’ या जीवनसत्त्वाचा शोध लागला आणि स्कर्व्ही आजार व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होते, हे दिसले. इथूनच कमतरतेमुळे होणारे आजार याविषयी संशोधनाला वेग आला. आहार हा औषधासारखा प्रभावी ठरू शकतो हे दिसायला लागले! व्हिटॅमिन सी १ च्या कमतरतेमुळे होणारा बेरीबेरी आजार व्हिटॅमिन बी १ दिल्यानंतर बरा होतो हे सुद्धा दिसले. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो असे कळले. रक्तक्षय, प्रतिकारशक्ती कमी होणे इ. अनेक आजारांचा संबंध व्हिटॅमिन कमतरतेशी दिसला. यातून पुढे कुठल्या खाद्यपदार्थांत कुठले व्हिटॅमिन जास्त प्रमाणात आहे, हे शोधणे सुरू झाले. असे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यावर कमतरतेचे आजार बरे होतात असे दिसले. यामुळे ठरावीक कमतरतेच्या आजारावर ठरावीक पदार्थ गुणकारी हे सगळे वैद्यक शास्त्र बोलायला लागले. खरे तर आहारात विविधता असेल तर निरोगी लोकांना व्हिटॅमिन्स किंवा मिनरलची कमतरता पडत नाही. संतुलित आहार अनेक कमतरता टाळण्यासाठी सक्षम असतो, हा बोध आपण यातून घ्यायला हवा. एखादा पदार्थ अवाजवी प्रमाणात खाऊन व्हिटॅमिनची कमतरता टाळणे शक्य होत नाही. अशा प्रकारे कधी कधी आहाराचे संतुलन ढळते. गुळात लोह (अगदी काही अंशतः साखरेपेक्षा) जास्त असते. म्हणून काही मधुमेही लोक लोहाची कमतरता टाळण्यासाठी भरपूर गूळ खातात. अशावेळी त्यांना फायदा होण्याऐवजी शुगर वाढून त्रासच जास्त होतो. काही लोक कॅल्शियम वाढवण्यासाठी भरपूर दूध पितात व विनाकारण वजन व चरबी वाढवून बसतात. शिवाय, काही आजारांमुळे जीवनसत्त्वांची कमतरता होऊ शकते. अशा वेळी तो आजार बरा करणे हा उपाय असतो. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे असते. उदा. आतडीच्या काही आजारात समतोल व पूरक आहार घेऊन सुद्धा कमतरतेचे आजार घडतात. आतडीचे आजार बरे झाल्यावर कमतरता सुद्धा सुधारते. प्रत्येक वेळी मुबलक खाणे हा योग्य मार्ग असतोच असे नाही.

प्रथिने आणि उर्जेची कमतरता :

महाराष्ट्रात डॉ. रवींद्र कोल्हे यांनी काही दशकांपूर्वी मेळघाटमध्ये आदिवासी बालकांमधील उपोषणाचा अभ्यास केला. यात प्रोटीनच्या व उर्जेच्या कमतरतेमुळे बालके आजारी पडतात आणि दगावतात असे दिसले. त्यामुळे लहान मुलांच्या पोषणाकडे सुद्धा आपण गंभीरतेने बघायला लागलो. फक्त मेळघाटच नाही, तर महाराष्ट्रातील इतर भागात सुद्धा असे प्रथिने व उर्जेचे कुपोषण दिसायला लागले. देशभरच हा कुपोषणाचा विषय ऐरणीवर आला. त्यामुळे लहान मुलांच्या अन्नामध्ये प्रथिने व ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणात कशी येईल, सकस आहार कसा देता येईल याची चर्चा सुरू झाली. लहान मुलांना पहिले सहा महिने फक्त मातेचे दूध देणेच योग्य असते. पूरक आहार सहा महिन्यांनंतर सुरू करावा व आपल्या संतुलित आहारातील घटक मुलांना हळूहळू सुरू करावेत. डाळीचे पाणी किंवा पाणी घातलेले दूध असे पदार्थ न देता मुलांना खाता येईल असाच पण मोठ्यांचा संतुलित आहार द्यावा असे तज्ज्ञ सुचवतात. यामुळे मुलांमधील कुपोषण टाळायला मदत होते. जास्त ऊर्जा असणारे किंवा जास्त तेल-तूप असणारे/ मीठ व साखर अति प्रमाणात असणारे पदार्थ लहान मुलांमध्ये टाळावेत असे मार्गदर्शक तत्त्वे सांगतात. यामुळे अति पोषण/ लठ्ठपणा टाळायला मदत होते. आपल्याकडे मुलांचा आहार व त्यांचे आरोग्य याची योग्य शहानिशा न करता भरपूर खाऊ घालण्याकडे कल असतो. गुबगुबीत न दिसणारे मूल हे कुपोषित असते, असा लोकांचा गैरसमज होतो. मग त्या बाळाला बळजबरी खाऊ घालण्याचा प्रयत्न होतो. त्यासाठी जास्त साखरेचे किंवा चमचमीत पदार्थ दिले जातात. वेळप्रसंगी जंक फूड दिले जाते. टीव्ही किंवा मोबाईलसमोर गुंतवून जास्त भरवले जाते. असे करणे टाळावे.

कमतरता ते अतिपोषण :

कुपोषणाचा हा काळ हळूहळू बदलला. गेल्या काही दशकांमध्ये खाद्य मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायला लागले. अन्नपुरवठा सुरळीत व्हायला लागला. दुष्काळ पडणं कमी झालं आणि आपला आर्थिक आणि सामाजिक स्तर सुद्धा सुधारला. त्याच्यामध्ये अन्नाची मुबलकता झाली, धान्याची मुबलकता झाली. या सोबतच आपल्या आहारातील तेल, तुपाचं आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण सुद्धा वाढलं. भारतच नव्हे, तर इतर विकसनशील देश सुद्धा अन्नधान्याच्या बाबतीत सक्षम होत गेले. सगळीकडेच धान्याची व अन्नाची मुबलकता वाढली. याशिवाय इंडस्ट्रीमध्ये बनणारे खाद्यपदार्थ यांचे प्रमाणसुद्धा वाढले. त्यामुळे खूप काळ टिकणारे पाकीटबंद पदार्थ आपल्याला सहज उपलब्ध व्हायला लागले. आपल्या पारंपरिक अन्नासोबतच फास्ट फूड प्रक्रिया केलेले पदार्थ आणि उपाहारगृहात उपलब्ध असणारे पदार्थ यांचं प्रमाण वाढलं. भारत आणि उपखंडामध्ये लठ्ठपणाची एक लाट आली आणि हळूहळू लठ्ठपणा आणि अति पोषण यामुळे होणारे आजार सुद्धा वाढले, पण याविषयी जनजागृती हवी तशी अजूनही झालेली नाही. त्यामुळे भारत हे अतिपोषण आणि त्यातून होणारे आजार जसे की, मधुमेह यांचे माहेरघर झालं असून सुद्धा त्याकडे अजूनही जनतेचे हवे तसे लक्ष नाही. साखर कमी करावी, जंक फूड कमी करावे, हे आजकाल आपल्याला कळतं. पण अन्नाच्या बाबतीमध्ये संतुलन हे अजूनही हवे त्या प्रमाणात दिसत नाही. जिथे अन्न, ऊर्जा व प्रथिनांची कमतरता या लहान मुलांच्या आहारातील महत्त्वाच्या समस्या होत्या. गेल्या काही दशकांमध्ये ही परिस्थिती बदलत गेली आणि अति पोषण किंवा जास्त खाणे हा लहान मुलांच्या आहारातील दोष बनत गेला. आता शहरी विभागांमध्ये अगदी लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत तसेच तरुण पिढीत सुद्धा लठ्ठपणा ही एक महत्त्वाची समस्या होऊन बसली आहे. सोबतच किशोरवयीन मुलांमध्ये डायबेटीस, उच्च रक्तदाब इत्यादी जीवनशैली संबंधित आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. आहारामध्ये गेल्या काही दशकांमध्ये जे बदल होत गेले आहेत, त्यांच्याविषयीची जागरूकता समाजात झपाट्याने पसरलेली नसून ही एक मोठी समस्या आपल्यासमोर भेडसावत आहे. सध्या आजोबा-आजी असणारे लोक व आई-वडील असणारी पिढी हे सगळे कमतरतेच्या आजारांविषयी जागरूक असणारे लोक होते. त्या काळातील आहारविषयक लोकशिक्षण हे मुख्यत्वेकरून कमतरतेला कसा आळा घालता येईल याविषयीचे होते. त्यामुळे अति पोषणाच्या समस्या कशा हाताळाव्यात हे या पिढीला पुन्हा शिकवण्याची गरज आता भासत आहे. लठ्ठपणा किंवा अतिपोषण यांचा उपचार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे खरेतर महत्त्वाचे आहे. काही फॅड डायट हानिकारक ठरू शकतात. आहार कमी करताना सुद्धा त्यात कसे संतुलन ठेवता येईल ह्याचा विचार व्हावा. कमतरतेचे आजार कसे टाळता येतील व दिसल्यास त्यांचे निदान व उपचार कसे होतील हे बघणे खूप महत्त्वाचे असते.

आहाराला पूरक जीवनशैली :

आहारासोबतच आपली जीवनशैली कशी आहे याचा खूप मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. शारीरिक हालचाल, झोप व ताणतणाव नियंत्रण ह्या आहारासोबतच आहाराशी खूप जवळून निगडित आहेत. प्रत्येकासाठी आदर्श आहार हा वेगळा असू शकतो. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनशैलीनुसार त्याचा आदर्श आहार बदलू शकतो. उदाहरणार्थ, एखादा खेळाडू असेल तर त्याच्यासाठी ऊर्जा प्रथिने यांची गरज एखाद्या बैठे काम करणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त असू शकतं. म्हातारपणामध्ये, गरोदरपणामध्ये आणि लहानपणी आहाराच्या काही विशेष गरजा असतात. त्यामुळे अशा ठरावीक व्यक्तींना वेगळा आहार लागतो. पण एखादे बैठे काम करणार्‍या व्यक्तीला किंवा डायबेटीससारखा आजार असणार्‍या व्यक्तीला आहाराची गरज वेगळी असते. आहारातील हे बारकावे सगळ्यांनी समजून घेणे विवेकी आहारासाठी आवश्यक आहे. आपल्या दिवसभरातील शारीरिक हालचाल व व्यायाम यांच्यावर सुद्धा आहार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. काही लोक सुरुवातीच्या काळात खूप कष्टाची कामे करतात. त्यांची शारीरिक हालचाल भरपूर असते. काही कारणाने त्यांची शारीरिक हालचाल बंद झाल्यास व्यायाम कमी झाल्यास त्यांचे वजन वाढू लागते व आरोग्याच्या काही समस्या दिसायला सुरुवात होते. अशा वेळेस त्यांच्या शरीरातील उर्जेची गरज कमी झालेली असते. आहाराची गरज कमी झालेली असते. पण आहारात योग्य ते बदल न केल्यास, आहार कमी न केल्यास त्यांना आरोग्याचे प्रश्न उद्भवू लागतात. अति पोषण किंवा कुपोषणात जीवनशैलीकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज असते.

डॉ. विनायक हिंगणे

(एम.बी.बी.एस., डी.एन.बी. मेडिसीन) बुलडाणा


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]