कोरानानंतरचे जग – आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते

डॉ.विप्लव विंगकर - 9920128628

फ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यांलुक नान्सी यांचा जन्म 26 जुलै 1940 रोजी झाला. ते पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांचे पहिले पुस्तक 1973 साली प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक विचारवंतांवर पुस्तके लिहिली आहेत. त्यात जॉर्ज विल्हेम फ्रेड्रिक, हेगेल, इमॅन्युएल कांट, रेने देकार्ते, मार्टिन हैडेगर यांचा समावेश होतो.

फ्रँको बेरार्डी हे इटली या देशातील तज्ञ आहेत. त्यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1949 रोजी झाला. त्यांचा अभ्यासाचा मुख्य विषय साम्यवाद असून हुकुमशाही विरोधातील सिद्धांतवादी आणि कार्यकर्ते आहेत. त्यांचे कार्य औद्योगिकीकरणानंतरच्या भांडवलशाही मधील मीडिया आणि माहिती तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावर केंद्रित आहे. त्यांनी दोन डझनपेक्षा अधिक पुस्तके, अनेक निबंध लिहिले आहेत, तसेच अनेक व्याख्याने दिलेली आहेत.

पीटर हॉलवर्ड हे कॅनडा देशाचे नागरिक असून यांचा जन्म 1968 साली झाला. अ‍ॅलन बड्यू आणि जिल दल्युज यांच्यावर त्यांनी केलेले लिखाण प्रसिद्ध आहे. वसाहतवादानंतरच्या विषयावर आणि समकालीन हैती या देशावर त्यांनी लिखाण केले आहे. काही नियतकालिकांचे ते सहभागी संपादक देखील आहेत. विविध विश्वविद्यालयात त्यांनी तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.

‘कोविड-19’ संकटाच्या पार्श्वभूमीवर, ‘इंडी जर्नल’ या वेब पोर्टलवर डॉ. विप्लव विंगकर यांनी ज्यां-लुक नान्सी, फ्रँको बेरार्डी आणि पीटर हॉलवर्ड या विचारवंतांचे विचार विस्तृतपणे मांडले आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाचकांसाठी ते सारांशरूपाने देत आहोत.

चीनमधील वुहान येथे नोव्हेंबर 2019 मध्ये प्रकट झालेल्या, अत्यंत सूक्ष्म अशा कोरोना व्हायरस उर्फ ‘कोविड-19’ या विषाणूने फेब्रुवारी 2020 या महिन्यात मात्र महामारीचे आक्राळविक्राळ स्वरूप धारण केले. ‘लॉकडाऊन’ हा नवीनच प्रकार मानवाने अनुभवला व अजूनही अनुभवत आहे. आज संपूर्ण जग अक्षरशः बंद पडले आहे. समस्त मानवजात ‘कोविड-19’ने लादलेल्या नजरकैदेचा अनुभव घेत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता, उद्योग, कृषी आणि सेवा ही क्षेत्रे जवळजवळ पूर्णतः थंडावली आहेत; फक्त सरकारी आरोग्यसेवा, जीवनावश्यक वस्तू पुरवणार्‍या सेवा आणि पोलिस यंत्रणा कार्यरत आहे.

भारतातील मध्यमवर्ग आपल्या संपन्नतेचा फायदा घेऊन घरात खाऊन-पिऊन निवांत आहे, तर रोजंदारीवर काम करणारे लोक उपासमारीने हवालदिल झाले आहेत. हे ‘कोविड-19’ संकट दूर व्हायचे, तेव्हा होईल. परंतु,सामान्य लोक जीवन-मरणाच्या लढाईत गुंतलेले असताना आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही विचारवंत; विशेषतः डाव्या विचारांचे या समस्येकडे; विशेषतः लोकांना समोर ठेवून कोणत्या दृष्टिकोनातून पाहत आहेत, त्यांचे मत काय आहे, हे पाहणे उद्बोधक होईल.

हे संकट म्हणजे स्वतःला पुन्हा समजून घेण्याची संधी! ज्यां-लुक नान्सी (Jean-Luc Nancy)

सगळ्या जगात ‘कोविड-19’ने निर्माण केलेल्या अरिष्टात एकीकडे एकाधिकारशाही प्रवृत्ती असलेला यंत्रणांबद्दलची स्वीकारार्हता वाढीस लागण्याची शक्यता असताना, दुसरीकडे उदारमतवादी कल्याणकारी राज्य व्यवस्थादेखील पुन्हा उभारी घेऊ पाहत आहे. अशा द्वंद्वात, माणूस असण्याची वैश्विक जाणीव काय असावी, याबाबत फ्रेंच तत्त्ववेत्ते ज्यां-लुक नान्सी चिंतन व्यक्त करत आहेत.

नान्सी यांच्या मते, प्रत्यक्षात बघायला गेलं, तर हा विषाणू आपलं सामूहिकीकरण करत आहे. हा आजार आपल्याला समानतेच्या आधारावर एक करत आहे आणि त्याचसोबत वैश्विक भूमिका घेण्यासाठी आपणाला एकत्रित व्हायला भाग पाडत आहे. याचं एक उदाहरण म्हणून आपण पर्यावरणातील जो नाटकीय बदल झाला आहे, हे सांगून त्या आधारे डिजिटल भांडवलशाही कोलमडून पडत आहे, असे भाष्य काही लोक करत आहेत, हे निदर्शनास आणतात. पण नान्सी या बाबतीत असा सल्ला देतात की, आपण अशा नाजूक विषयाबाबत उपहास न करता आपण स्वतःला आपल्या समूहाबाबत अजून चांगल्या अर्थाने कसं समजून घेऊ शकतो, याची विचारणा केली पाहिजे.विलगीकरण हे आपल्या स्वसंरक्षणासाठी असलं, तरीही आपण त्याला आपल्या अधिकारांची वंचितता म्हणून पाहत आहोत, असेही नान्सी म्हणतात.

नान्सी शेवटी म्हणतात, आजची ही परिस्थितीच या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या मार्गांचा विचार करण्यासाठी योग्य आहे. आणि असं झालं नाही, तर आपण जिथून सुरुवात केली आहे, तिथंच जाऊन पडू. आपण पुन्हा नव्यानं जग बघू; पण मग आपणाला दुसर्‍या महामारीसाठी तयारी ठेवली पाहिजे.

कोरोना संकट हे नव्या सामाजिक इच्छा अंगीकारण्याची संधी! – फ्रँको बेरार्डी

फ्रँको बेरार्डी हे इटालियन मार्क्सवादी तत्त्ववेत्ते कोरोनाच्या संकटाबद्दल मत प्रस्तुत करताना पुढीलप्रमाणे विश्लेषण करतात – या विषाणूबाबत सध्या आपणाला फारशी कल्पना नाही. जगभरातील वैज्ञानिक त्याबाबत संशोधन करत आहेतच आणि म्हणूनच आपण असे म्हणू शकतो की, एका अज्ञात गोष्टीने जगाला गुडघे टेकायला भाग पाडले आहे आणि जग ठप्प झाले आहे. या ठप्प होण्याला दोन कारणं आहेत; मूळ विषाणू मानवी शरीरात प्रवेशित झाल्यामुळे हे जग बंद पडलं आहे. पण त्याचसोबत या विषाणूचं माहितीच्या विषाणूमध्ये रूपांतरण झाल्यामुळे प्रादुर्भावाच्या भीतीपोटी हे जग ठप्प पडलेलं आहे.

‘कोविड-19’चा परिणाम म्हणून आपण आपला बहुतांश वेळ ‘ऑनलाईन’ असण्यात घालवत आहोत. कारण आपली सर्व प्रकारची नाती स्पर्श आणि एकत्रिता यांपासून दूर ठेवली नाहीत, तर ती आपणालाच धोकादायक ठरणार आहेत, असा इशारा ते देतात. या काळात सतत ‘ऑनलाईन’ असल्यामुळे कदाचित आपण ‘ऑनलाईन’ असण्याच्या क्रियेला आजाराच्या अनुषंगाने बघायला लागू, याचा यापेक्षा भयावह काळ म्हणजे यानंतरच्या काळात कदाचित आपल्या या एकटेपणाच्या आठवणीमुळे व या महामारीच्या आठवणीमुळे एक दिवस अचानक आपण सर्वच आपल्या ‘ऑनलाईन स्क्रीन्स’ बंदही करू. अर्थात, या महामारीच्या काळात सतत ‘ऑनलाईन’ असल्याने त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यवर होणार आहे, हे नक्कीच. भारतासारख्या देशात कदाचित हा परिणाम शारीरिक आरोग्यावर देखील होण्याची शक्यता आपणास नाकारता येणार नाही, असे बेरार्डी म्हणतात. आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याचा संबंध येणार्‍या काळातील अर्थव्यवस्थेशी जोडणं गरजेचं आहे, असे बेरार्डी यांचे मत आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, यावर आता तुमची संपत्ती सिद्ध होऊ शकत नाही. त्याऐवजी तुमच्याकडे किती भक्कम मानसिक स्थैर्य आहे, या आधारे तुमची संपत्ती निश्चित होईल. या काळात पैशांच्या कार्याचं निलंबन हे भांडवलशाहीमधून बाहेर पडण्याची किल्ली आहे, आणि याच द्वारे आपण भांडवल, पैसे आणि संसाधनांची संधी यांच्यातील नातं संपुष्टात आणून नव्या जगाची निर्मिती करू शकतो. या नव्या जगात संपत्तीचं मूल्य हे पैशावर न ठरवता आपण किती दर्जात्मक जीवन जगतो, यावर ठरेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

या अरिष्टांतून बाहेर पडत असताना शेअर बाजारासाठी काय चांगलं आहे, याचा विचार करणं, हे आपलं काम नाही आणि आपण याबद्दल विचारही करू नये. याउलट आपणाला माणूस म्हणून काय उपयोगाचं आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे, असे मत ते मांडतात.

आता आपण ठरवायचं आहे की, आपल्याला कशा जगात जगायचं आहे. – पीटर हॉलवर्ड

पीटर हॉलवर्ड हे कॅनडा देशातील तत्त्ववेत्ते आहेत. ते म्हणतात, आपणाला नेहमीच आपलं जग कसं असावं, याबाबत काही गोष्टी ठरवण्याची संधी मिळत असते. परंतु ही संधी नेहमीच येते, असं नाही. त्याचसोबत प्रस्थापित जग आणि व्यवस्था स्वतःचं हित जपण्यासाठी आहे, ते जग बदलण्याची संधी आपणास देत नाही. जग बदलायचं असेलच तर कुठल्या तरी बाह्य गोष्टीनं हे जग व त्याची व्यवस्था अस्ताव्यस्त करावी लागते. याचसोबत जी शक्ती या व्यवस्थेचं पुनर्निर्माण करत असते, जपत असते, ती मूळ शक्तीच उखडून टाकणं गरजेचं असतं.

या अरिष्टानंतर जे काही आर्थिक नुकसान होणार आहे, त्याचे मोजमापही करता येणे शक्य नाही. हे सर्व होत असताना एकाधिकारशाहीची खांदेपालट होताना दिसत आहे. याच काळात राज्यसंस्था आणि बहुराष्ट्रीय कंपन्या किंवा कॉर्पोरेट हाऊस या संकटाच्या काळात देखील स्वतःचा फायदा करून घेण्यात गर्क आहेत. या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांना शक्य तेवढ्या कमी नुकसानीत ही व्यवस्था टिकवून ठेवायची आहे. हे अरिष्ट आपल्या जीवनावर बेतले असल्याने जगातील लोक अस्तित्वात असलेल्या दोन्ही प्रभुत्ववादी घटकांचं वर्चस्व व त्याचसोबत त्यांच्याकडून लादले जाणारे आक्रमक सुरक्षात्मक उपाय काही विरोध न करता स्वीकारत आहेत, असे हॉलवर्ड म्हणतात.

हॉलवर्ड अनेक प्रश्न उपस्थित करतात. आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं काही लोकांचा जीव हे इतर लोकांच्या जीवापेक्षा अतिमहत्त्वाचा आहे? आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं आपली अस्तित्वात राहण्याची किंमत ही आपल्या जन्मभूमीआधारे अथवा आपल्या कौटुंबिक परिस्थितीच्या आधारे किंवा आपल्या पैसे खर्च करण्याच्या कुवतीवर ठरणार असेल? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं संपत्ती मूठभर लोक बहुतांश लोकांची लुबाडणूक करून निर्माण करत असतात? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं ठराविक लोकांची भरभराट ही बहुतांशाच्या जोरावर होत असते? आपणाला अशा जगात राहायचं का, जिथं बहुतांश लोकांना काय पाहिजे आणि त्या गोष्टी कशा प्रत्यक्षात आणायच्या, याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार नाही? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं आपल्या जीवनशैलीवर आणि उत्पन्नावर व त्याचसोबत कॉर्पोरेट अर्थव्यस्थेवर, उत्तरदायित्व नसलेल्या खाजगी शोषणकर्त्यांचे वर्चस्व आहे? आपणाला अशा जगात जगायच आहे का, जिथं आपली सरकारं या बड्या भांडवली कॉर्पोरेट हाऊसचे आणि त्यांच्या नफ्याचे प्रतिनिधित्व करतात? याव्यतिरिक्त आपणाला मूलभूत प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे उपचार, आरोग्यसेवा, औषधासंबंधीचे संशोधन, श्रमविभागणी, श्रमवेळ, श्रमवेतनाची किंमत इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचे निर्णय हे कॉर्पोरेट हाऊसतर्फे घेतले जावेत की लोकांच्या प्रतिनिधीद्वारे? आपणाला अशा जगात जगायचं आहे का, जिथं लोकांपेक्षा नफा जास्त महत्त्वाचा मानला जातो? ते पुढे प्रश्न करतात की, आपणाला या सर्व प्रश्नांना उत्तर देण्याची संधी चालून आली आहे. या सर्व परिस्थितीत आपण काय करणार आहोत? येणार्‍या भविष्यात काय करावं आणि काय करू नये, याबाबत काही भविष्य वर्तवू शकत नाहीत; पण काही महत्त्वाच्या गोष्टींची यादी मात्र नक्कीच करू शकतो, असे म्हणून ते पुढील यादी देतात.

1. शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण या मूलभूत गोष्टी आहेत, म्हणून त्यांना अतिरिक्त प्राधान्य द्यावं.

2. खाजगी आर्थिक साधनं आपण आपले सामाजिक सामूहिक ध्येय गाठण्यासाठी उपयोगात आणावीत.

3. राष्ट्रीयकरणास अधिकाधिक वाव द्यावा.

4. खाजगी संपत्ती व नफ्यावर अधिक कर वाढवावा.

5. सर्वच पद्धतीच्या श्रमांना समान मान्यता द्यावी व त्यानुसार वेतन द्यावे.

6. श्रमिक, पर्यावरण आणि प्राणिमात्रांचे कल्याण या गोष्टींना प्राधान्य द्यावे.

संकलन : उत्तम जोगदंड (साभार इंडी जर्नल वेब पोर्टल)