सनातन समाजाची चिकित्सा करत त्याला विवेकनिष्ठ नि विज्ञाननिष्ठ बनवणं, हेच ‘अंनिस’चे कार्य

राजीव देशपांडे -

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सन २०२० चा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांनी केलेल्या ‘अंनिस’ कार्याचा गौरव केला. ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्याबरोबर अनेक वर्षे कार्यरत होते. साहित्यिक, संशोधक, भाषांतरकार, संपादक म्हणून त्यांनी केलेले कार्य असो वा वंचित समूहाच्या संस्था विकासाचे कार्य असो; ते त्यांचा सामाजिक व वैचारिक पिंड स्पष्ट करणारा आहे. वि. . खांडेकरांच्या समग्र असंकलित, अप्रकाशित साहित्य संपादनाचे कार्य (३६ ग्रंथ) पूर्ण केल्यानंतर नुकतेच त्यांनी ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ (१५ खंड) संपादन कार्य पूर्ण केले आहे.

डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्याशी ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ साठी राजीव देशपांडे व अनिल चव्हाण यांनी संपादक मंडळामार्फत संवाद साधून ‘बदलत्या परिप्रेक्षात ‘अंनिस’चे कार्य’ असे सूत्र घेऊन त्यांची मते जाणून घेतली, त्यांचा हा धांडोळा

डॉ. सुनीलकुमार लवटे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने २०२० चा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. हा गौरव ते डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्याबरोबर आणि त्यानंतर त्यांच्या खुनानंतरही ‘अंनिस’चे काम करत होते किंवा त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांच्या मराठी पुस्तकांचा हिंदीत अनुवाद करून डॉ. दाभोलकरांचे; पर्यायाने ‘अंनिस’चे काम आणि विचार राष्ट्रीय पातळीवर पोचविण्याचे काम केले, यासाठी तर होताच; पण तेवढ्यापुरताच मर्यादित नव्हता, तर त्याही पलीकडे जात, आजवरच्या आयुष्यात त्यांनी आपल्या विवेकाच्या व तत्त्वनिष्ठेच्या कसोटीवर जी अतिशय खडतर आणि संघर्षमय अशी यशस्वी वाटचाल केलेली आहे, त्या वाटचालीचा तो गौरव होता. या वाटचालीत, आजच्या प्रस्थापित सुरक्षित कौटुंबिक चौकटीबाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा ध्यास घेतलेला विद्यार्थी किंवा प्राध्यापक, साहित्यिक, संपादक, भाषांतरकार, संशोधक अगर वंचित समूहाच्या संस्थांच्या विकासासाठी झटणारा कार्यकर्ता अशा विविध भूमिका निभावत त्यांनी त्यांचा सामाजिक आणि वैचारिक पिंड स्पष्ट केलेला आहे. आपले विचार आणि कार्याचा देशविदेशात ठसा उमटविणार्‍या अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीचा मागोवा घेण्याच्या दृष्टीने आम्ही त्यांना त्यांच्या बालपणापासूनच्या जीवनप्रवासाबद्दल विचारले.

ते म्हणाले, “पंढरपुरातील वा. बा. नवरंगे अनाथालयात माझा जन्म झाला. तिसरीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले आणि १९५९ मध्ये मी कोल्हापूरच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन बालगृहात आलो. कोल्हापुरात हे बालगृह ‘रिमांडहोम’ म्हणून प्रसिद्ध होते. तेथील मुलांकडे गुन्हेगार म्हणूनच बघितले जाई. सुरुवातीला आम्हाला कैद्यांसारखे नंबरनेच संबोधले जायचे. पुढे, शाळेत गेल्यावर मला नाव लागले, ‘सुनील श्रीपाद लवटे.’ खाण्याची, राहण्याची कमालीची गैरसोय, शाळेतील टिंगलटवाळी, हे सारे सहन करण्याची ताकद शाळेतील एका शिक्षकाने दाखवलेल्या वाचनालयाच्या वाटेने दिली. पुढे, याच रिमांड होमचा कायापालट करण्यासाठी मीच पुढाकार घेतला. या अनाथ, बालगुन्हेगार मुलांसाठीच्या ‘रिमांड होम’चे रूपांतर ‘बालकल्याण संकुला’त करण्यात माझे नक्कीच योगदान आहे. त्यासाठी मला अनेक संघर्षमय प्रसंगांना जरी तोंड द्यावे लागले, तरी शासन, लोक यांचा सहभाग घेण्यातही मी यशस्वी झालो. डॉ. किरण बेदींनी बालसंकुलास दिलेल्या भेटीच्या वेळेस कौतुक करत आपल्या पुरस्काराची रक्कम बालसंकुलास दिली. ही माझ्या कामाची जणू पोचपावतीच होती.

सातवीनंतर माध्यमिक शिक्षणासाठी मी कोल्हापुरातील आंतरभारती शाळेत आलो आणि तेथे ‘ज्ञानपीठ’विजेते साहित्यिक वि. स. खांडेकरांचा सहवास, साने गुरुजींच्या साहित्याचे वाचन, समाजवादी वातावरण, ‘आंतरभारती’चे संस्कार यामुळे माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. पुढील आयुष्यात वंचितांसाठी केलेल्या सामाजिक, साहित्यिक कामाचे बीज आंतरभारती शाळेत रुजले गेले.

अकरावीची परीक्षा पास झाल्यावर अनाथालयाच्या रिवाजाप्रमाणे आयटीआय वगैरेमध्ये जाऊन एखादा तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम केला जायचा. मी मात्र उच्च शिक्षण घ्यायचे ठरवले आणि त्याप्रमाणे उच्च शिक्षणासाठी गारगोटीच्या मौनी विद्यापीठाचा रस्ता धरला आणि तेथे भारत सरकारची शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाचा निर्वाहभत्ता मिळवत ग्रामीण विद्यापीठाच्या पदवीसमान शिक्षण पदविकेत मी भारत सरकारचा सर्वप्रथम ‘रोल ऑफ ऑनर’ मिळवला. मौनी विद्यापीठात माझा संपर्क डॉ. द. वि. चिक्करमाने, स्नेहलता दसनूरकर, डॉ. श्रीपाद दाभोलकर, डॉ. जे. पी. नाईक, चित्रा नाईक अशा दिग्गज माणसांशी आला. तेथील परूळेकर वाचनालयाने माझी हिंदी, इंग्रजी, मराठी वाचनाची भूक भागविली.

शिक्षण पदविका मिळाल्यानंतर मला तीस ठिकाणी शिक्षक नियुक्तीचे कॉल आले. मात्र मी कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुयातील एका खेड्यातील ‘आंतरभारती’च्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. पुढे, शाळेत शिकवता-शिकवता मी शिवाजी विद्यापीठातून हिंदी विषयात एम. ए. झालो व ‘यशपाल ः व्यक्तित्व एवं कृतित्व’ हा हिंदीतील संशोधन प्रबंध सादर करून पीएच.डी.ही पूर्ण केली. कोणताही आधार नसताना, अनाथाश्रमातील एका मुलाने केवळ स्वकष्टाच्या बळावर परिश्रमाने आणि बुद्धीने डॉटरेट मिळविली, ही गोष्ट माझ्यासाठी आणि समग्र वंचित वर्गासाठी निश्चितच अभिमानास्पद होती. त्याचवेळेस मी मनोमन ठरवून टाकले की, आपण आता वंचितांच्या कामात स्वत:ला झोकून द्यायचे. मग मी अनाथ, निराधारांच्या संगोपन, पुनर्वसन कार्यावर लक्ष केंद्रित केले. १९८० ते २००० दरम्यान झपाटून काम केले. वंचित बालक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव भरवणे, अनाथांसाठी नोकर्‍यांमध्ये आरक्षणाचा मुद्दा आम्ही लावून धरला आणि त्यात यशस्वीही झालो. बालकांचा राष्ट्रीय संरक्षण कायदा व हक्क, अनाथाश्रम, रिमांड होम यांचा दर्जा सुधारणे, त्या संदर्भातील प्रशासन यंत्रणेचे विकेंद्रीकरण, योजनांचे एकत्रिकरण यासंबंधीच्या भारतीय शिष्टमंडळातून मी युरोप, आशियातील १५ देशांचा दौरा केला. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचा कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करताना मी कारागृह, पोलीस चौकी सुधारणा व बंदी बांधवांना मानवाधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

पुढे, मी कोल्हापुरातील महावीर कॉलेजचा प्राचार्य म्हणून निवृत्त झालो. शिक्षक आणि प्रशासक अशा दोन्ही भूमिका मी अतिशय समर्थपणे सांभाळल्या. कॉलेजमध्ये विविध शैक्षणिक प्रयोग करत त्या कॉलेजची एक वेगळी ओळख निर्माण केली. या काळात मी ‘एकविसाव्या शतकातील समग्र शिक्षण’, ‘नवे शिक्षण-नवे शिक्षक’, ‘वाचन’ अशी शैक्षणिक विषयावरील महाविद्यालयीन कारकिर्दीतील अनुभवावर आधारित पुस्तके मी लिहिली.

‘आंतरभारती’ आणि गारगोटी येथे मला अनेक साहित्यिकांचा सहवास लाभला. वि. स. खांडेकर यांच्यासारख्या साहित्यिकाशी माझी वैयक्तिक जवळीक निर्माण झाली. समृद्ध शिक्षक, साहित्यिकांचा सहवास, मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील अभिजात साहित्याचे वाचन आणि प्रत्यक्ष जगताना, सामाजिक कार्य करताना आलेले कडू-गोड अनुभव यांची सांगड घालत मी माझी साहित्यनिर्मिती केली. ‘खाली जमीन, वर आकाश’ हे माझे आत्मकथन साहित्यविश्वात प्रचंड गाजले. त्याचे ब्रेल लिपीसह अनेक भाषांत अनुवाद झाले, या पुस्तकाला अनेक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांनी गौरवले गेले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांचे काम आणि विचार हिंदी भागात नेणे ही ‘अंनिस’चा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी मानली आणि हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे मानून मी त्यांचे मराठीतील समग्र साहित्य हिंदीत अनुवादित, संपादित करण्याचे काम केले आहे; तेही ‘राजकमल’सारख्या अग्रगण्य प्रकाशकातर्फे! आज त्या पुस्तकांच्या आवृत्त्या निघत असल्याचे पाहून मला नक्कीच समाधान वाटत आहे. तसेच सयाजीराव गायकवाड यांच्या मराठी साहित्याचा अनुवाद- संपादन करण्याच्या कामातही मी पुढाकार घेतला. वि. स. खांडेकरांच्या समग्र असंकलित, अप्रकाशित साहित्य संपादनाचे कार्य (३६ ग्रंथ) पूर्ण केल्यानंतर नुकतेच मी ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’ (१५ खंड) संपादन कार्य पूर्ण केले आहे.”

लवटे सरांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल शासन आणि समाजाने विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. या साहित्यिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांच्या भाषांतर व समीक्षेस राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार, हिंदी मराठी अनुबंधकार्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा सौहार्द सन्मान, असे विविध राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार मिळाले आहेत. ‘या पुरस्काराची रक्कम म्हणजे समाजाचे संकल्पित धन असते,’ अशा धारणेने आजवर मिळालेल्या पुरस्कारांची सुमारे २५ लाखांची रक्कम त्यांनी विविध शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक गरजू संस्थांना देऊन टाकली आहे. आपले अनेक विद्यार्थी त्यांनी लिहिते केलेले आहेत. अनेक नवलेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहीत त्यांना प्रोत्साहित केलेले आहे.

माणसाचं जगणं एक शोध असतो, तो सतत चालू राहिला पाहिजे. शोध थांबला की त्यानंतरचं जगणं म्हणजे मरण असतं. दुसर्‍याच्या जीवनात जगण्याचं स्वारस्य निर्माण करणं, जगण्याची आस्था जागवणं म्हणजे जगणं,’ असा विचार मांडणारे डॉ. सुनीलकुमार लवटे, दुसर्‍याच्या जीवनात जगण्याची आस्था निर्माण करणार्‍या समाजातील अशा संस्था, व्यक्ती, चळवळी यांच्याशी सातत्याने संपर्कात असतात, त्यांच्या कार्यात सहभागीही असतात. अंधश्रद्धा निर्मूलन ही अशीच त्यांच्या आस्थेची चळवळ आहे. या चळवळीची वाटचाल कशी चालली आहे, यावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्यामुळेच आम्ही जेव्हा आजच्या जागतिकीकरणाच्या काळात तुम्ही ‘अंनिस’च्या चळवळीकडे कसे पाहता, असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले,

“जागतिकीकरणाचे वर्ष हे भारताच्या स्वातंत्र्योत्तर कालखंडातले मूलभूत परिवर्तनाचे मध्यवर्ष. स्वातंत्र्यानंतर चार दशकांपेक्षा अधिक काळ लोटलेला. या काळात भारतात नि महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक जीवनात मोठ्या प्रमाणात बदल झाले. एक प्रकारच्या द्वंद्वात किंवा किंकर्तव्यमूढ जीवनात जागतिकीकरणानं प्रत्ययकारी बदल घडवून आणले. ते बदल स्थानिक मनोधारणेतून जागे करत वैश्विक भान देणारे म्हणून महत्त्वाचे ठरले. या बदलाने यंत्रयुगाची जागा तंत्रयुगाने घेतली. मुद्रितांचा अवकाश माध्यमाने व्यापला. काळ, काम, वेगाचे त्रैराशिक मूलत: बदलले. सहजीवन, एकात्मता, समाजवाद, धर्मनिरपेक्षता संकल्पनांना या नव्या बदलांनी पुनर्विचारास भाग पाडले. विसाव्या शतकाचा १९९० पर्यंतचा काळ डाव्या विचारप्रभावांचा, समाजवादी विचारवर्चस्वाचा; मात्र हंगेरी, पोलंड, रशिया, चीन, उत्तर कोरिया, यूबा, लाओस, जर्मनी, रुमानिया इत्यादी देशांतील साम्यवादी विचार व व्यवहारविसंगतीने या विचारमोहातून जगास व्यवहाराकडे पाहण्यास भाग पाडलं. सर्वांना सामावून घेणारा महाराष्ट्र, मराठी, मराठा-महाराष्ट्र संस्कृतीचा समर्थक झाला. कामगार, कष्टकरी वर्गवर्चस्व संपुष्टात येऊन जाती-धर्म अहंकार, अस्मिता प्रबळ झाली. साहित्यात दिखावा आला. मंडल आयोगानंतरच्या काळात सामाजिक आराखडा बदलला. यातून विवेकवाद आणि विज्ञाननिष्ठ समाजधारणेचे महत्त्व अधोरेखित होत गेले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नि तिच्या कार्याचा उदय ही परिस्थितीची कालसापेक्ष निर्मिती व आवश्यकता म्हणून पुढे आली.”

कार्य नि विचार म्हणून आपण या चळवळीच्या विकासाकडे कसे पाहता?

“जागतिकीकरणपूर्व महाराष्ट्र हा धर्मश्रद्ध असला, तरी विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून महाराष्ट्राने सातत्याने समाज नि धर्मसुधारणांचे स्वागत नि समर्थनच केले आहे, म्हणून तर आपण महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा ‘पुरोगामी महाराष्ट्र’ म्हणत मिरवत आलो आहे. महाराष्ट्रात समाज नि धर्मसुधारणांचा विकासपट वा आलेख रेखाटायचा झाला, तर तो ‘ईश्वरकेंद्री’ चळवळीकडून ‘मानवकेंद्री’ चळवळीकडे तो झेपावताना दिसतो. ‘अंनिस’ने गेल्या तीन दशकांहून अधिक काळाचा (३३ वर्षांचा) केलेला लेखाजोखा सांगायचा झाला, तर ‘अंनिस’ चळवळीने ‘मानवकेंद्री’ कार्यास ‘मानवाधिकार केंद्री’ वा स्नेही बनवले, असे म्हणणे अधिक संयुक्तिक होईल; म्हणजे जसे ‘गणेशमूर्ती दान’ उपक्रम आपण एकीकडे जनजागृतीने जनसहभागी केला, तर दुसरीकडे गणेशमूर्ती पर्यावरणपूरक असावी म्हणून ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ऐवजी शाडू वा मातीची करावी, म्हणून प्रबोधनाबरोबर न्यायालयीन लढ्याद्वारे तिला जनहिताचे बनवत शासन/प्रशासनावर पर्यावरणपूरकतेचा, प्रदूषणमुक्त जलसाठे, जलप्रवाह मानवाच्या अंतिम हिताचे असल्याचे जनमानसशास्त्रास पटवून दिले. ईश्वर, धर्म, परंपरेपेक्षा ‘मानवहित प्रथम’ ही भावना जनतेने स्वेच्छा अंगीकारली. शासन/प्रशासनाने पूरक भूमिका बजावत न्यायालयीन मानवहितकारी व पर्यावरणरक्षक निर्णयांची कार्यवाही सक्षमपणे व्हावी, म्हणून मूर्तिदान कुंड, रक्षादान कुंड उभारून जलस्रोत, जलप्रवाह व जलसाठे पेय व शुद्ध राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली; पण त्याचे प्रबोधन ‘अंनिस’ने सातत्यपूर्णरीत्या, सत्याग्रही वृत्तीने व संयमाने केले, हे विसरता येणार नाही. आज गणेशमूर्ती दान, निर्माल्यदान, दुर्गामूर्ती दान ही विज्ञाननिष्ठ समाजाची सर्वपक्षीय चळवळ बनली आहे. भविष्यकाळात सार्वजनिक गणेशमूर्ती लहान करणे, गणेशोत्सव ‘प्रबोधनोत्सव’ करणे (व्याख्यानमाला, मुलाखती, संस्कारशील मनोरंजनपर कार्यक्रम, ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव नि मिरवणुका इ.) यातून आपणास आपल्या सण-उत्सवांना प्रगल्भ, प्रदूषणमुक्त, अभिरुचीसंपन्न मनोरंजनाचे व प्रबोधनाचे कसे करता येईल, हे पाहिले पाहिजे. यातूनही पूर्वसूरींनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंतीसारखे समारंभ अधिक समाजहिताचे कसे होतील, असा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे नि त्यासाठी आपली आदर्श सार्वजनिक मंडळे सक्रिय करून समाजापुढे कृतिशील वस्तुपाठ वा आदर्श प्रस्तुत केला, तर अन्य विद्यमान सार्वजनिक उत्सव मंडळेही भविष्यात आपले अनुकरण करतील, असा विश्वास ‘अंनिस’ समाजमानसात जागवेल, तर उद्याचा महाराष्ट्र वा भारत विज्ञाननिष्ठ व विवेकशील होण्यास वेळ लागणार नाही. सनातन समाजाची चिकित्सा करत त्याला विवेकनिष्ठ नि विज्ञाननिष्ठ बनवणं, हेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य आहे.”

अंधश्रद्धांद्वारे शोषण आणि आर्थिक शोषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे समजावण्याची ही योग्य वेळ नाही का?

“अगदी चांगला नि मूलभूत प्रश्न आहे हा. आपण गेल्या शतकातील प्रबोधन व जनजागृतीचा धांडोळा घेतो, तेव्हा लक्षात येते की, कार्ल मार्सने आर्थिक शोषण हा मानवी विकासातील मुख्य अडथळा असल्याचे जगास पटवून दिले. ‘दुनिया के मजदूरों… एक हो’च्या कार्ल मार्सच्या विचारांनी बुलंद झालेल्या नार्‍याने सारा शोषित वर्ग एक झाला. कामगार, शेतमजूर, दलित, आदिवासी, शोषित स्त्रीसमाज, वेठबिगार, हातावरचं पोट असलेला रोजंदारीवरील असंघटित मजूर, धरणग्रस्त, विविध प्रकल्पग्रस्तांच्या जागतिक ऐयाने वैश्विक शोषण संपले नसले, तरी शोषणापासून मुक्तीचा विचार जसा गेल्या शतकाची देणगी, तसा अंधश्रद्धेद्वारे शोषण हा प्रत्येक मानवास मिळणारा हक्क नि अधिकार व्हायचा, तर ‘अंनिस’ने त्या दृष्टीने महाराष्ट्रात पारित करवून घेतलेले कायदे, हे या संदर्भात उचललेले कालोचित पाऊल होय. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन अधिनियम-२०१३’ या कायद्याचे नुसचे नाव वाचले, तरी आपल्या लक्षात येते की, हा कायदा अंधश्रद्धा निर्मूलनाचा देशातील अत्यंत पुरोगामी व व्यापक सामाजिक कायदा आहे. तो देव, धर्मविरोधी कायदा नसून देव, धर्माच्या नावे प्रचलित प्रथा, अंधश्रद्धा इत्यादींद्वारे श्रद्ध व अज्ञानी लोकांच्या अमानुष व अघोरी शोषणाविरुद्धचा व आगतिक जगणं जगण्यास भाग पाडणार्‍या शोषकांविरुद्धचा (बुवा, मांत्रिक, तांत्रिक इत्यादी) असून तो मानवहितवर्धक सामाजिक कायदा आहे. तीच गोष्ट ‘महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम – २०१६’ ला राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने सन २०१७ ला मंजुरी मिळाल्याने त्याचेही कायद्यात रूपांतर झाले असून, तोही मानवाधिकार केंद्रित चळवळीचे यश म्हणून नमूद करावा लागेल. त्यासही ‘अंनिस’ने बळ दिले होते.”

अंनिस’ चळवळ अधिक प्रभावी होण्यासाठी काय करणे आवश्यक आहे?

“अंनिस’ने प्रारंभापासून अंधश्रद्धा निर्मूलनाची चतु:सूत्री स्वीकारलेली आहे – १) शोषण, दिशाभूल करणार्‍या अंधश्रद्धांना विरोध करणे. २) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार, प्रसार आणि अंगीकार करणे. ३) धर्माची कृतिशील, विधायक; प्रसंगी कठोर चिकित्सा करणे. ४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वत:ला जोडून घेणे. ही चतु:सूत्री समजावताना डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, ‘अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात क्रोधापेक्षा करुणा आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे.’ हा विचार-विवेक मानवतावादी आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. भारत हा बहुभाषी, बहुवांशिक व बहुजातीय, बहुसांस्कृतिक देश आहे. या देशातील सर्वधर्मीय भारतीय असून घटनेने सर्व जात, धर्मियांना पूजाविधी स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे या देशात बहुसंख्येच्या आधारे अल्पसंख्य धर्म, जात, वर्ण, वंश, लिंग, भाषा, प्रदेश अशा कोणत्याच निकष वा कसोटीवर कुणासही आक्रमण, अत्याचार, उन्माद करण्याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटना देत नसल्याने शोषण व अत्याचारमुक्त भारतीय समाज हे भारतीय राज्य घटनाप्रदत्त अभयदान आहे.”

“अजून आपल्यापुढे कौमार्य चाचणी, सामाजिक बहिष्कार, गुप्तधनाचे प्रलोभन दाखवत नरबळी होणे, अंधश्रद्धा नि प्रथांच्या आधारे होणारे वैविध्यपूर्ण शोषण (संततिप्राप्ती, मन:शांती, ईप्सित साध्य इत्यादींसाठी) थांबलेले नाही. भारतीय समाज जेव्हा देव, धर्म, नवस, उपवास, तीर्थयात्रा उत्सव इत्यादी अनुत्पादक गोष्टींऐवजी शिक्षण, शेती, स्थावर, उद्योग, व्यापारकेंद्री खर्च करेल, तेव्हा बेरोजगारी, आत्महत्या, व्यसन, चोरी, मारामार्‍या, ईर्षा (राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इ.) कमी होऊन भारतीय समाज समन्वयी, सद्भावी, संयमी होईल व त्याच्या बौद्धिक, भौतिक विकासास गती येईल. ‘अंनिस’ जेव्हा हे विवेकी, वैज्ञानिक व मानवी कार्य भविष्यलक्ष्यी कार्यक्रम म्हणून हाती घेईल, तेव्हा आशिया खंडाचा विकास युरोपसारखा होण्यास वेळ लागणार नाही. ते आपले एकविसाव्या शतकाचे विवेकी ध्येय व्हायला हवे.”


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]