रचनात्मक कार्याचा दीपस्तंभ : एन. डी. सर

विजय चोरमारे -

प्रा. एन. डी. पाटील हे 1985 मध्ये विधानसभा निवडणुकीत ‘पुलोद’ आघाडीचे उमेदवार म्हणून कोल्हापूर शहर मतदारसंघातून उभे होते. प्रचारासाठी वारेमाप खर्च करायचा नाही; त्यामुळे त्यांनी पदयात्रांच्या माध्यमातूनच प्रचारावर भर दिला होता. होळीचा दिवस होता. सायंकाळच्या वेळी त्यांची पदयात्रा सुरू असताना ती एका पेठेत पोचली. तिथे होळी पेटवण्याची तयारी सुरू होती. पदयात्रा तिथे पोचल्यावर कार्यकर्तेउत्तेजित झाले. अनायसे उमेदवारच आलेत म्हटल्यावर त्यांच्या हस्ते होळी पेटवू, असे त्यांना वाटले. खरेतर उमेदवारासाठीसुद्धा ही सुवर्णसंधीच होती. कार्यकर्तेपदयात्रेला सामोरे गेले आणि त्यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना होळी पेटवण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी एन. डी. पाटील यांनी त्यांना ठाम नकार दिला आणि आपण होळीसाऱख्या कर्मकांडामध्ये सहभागी होणार नाही, असे सुनावले. काही लोकांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला, ‘इथं एवढी- एवढी मते आहेत त्यावर परिणाम होऊ शकतो.’ त्यावर ते म्हणाले, ‘एकही मत मला नाही मिळाले तरी चालेल; पण मी असल्य कर्मकांडामध्ये सहभागी होणार नाही.’

एन. डी. पाटील यांचे स्वभाववैशिष्ट्य आणि जीवनमूल्यांचे दर्शन घडवण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे ठरू शकते. सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्या भूमिकेवर ते किती ठाम राहिले, हे अशा शेकडो घटनांमधून महाराष्ट्राने अनुभवले आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या शाहू सभागृहातल्या त्यांच्या एका भाषणाला मी रिपोर्टर म्हणून हजर होतो. तिथं त्यांनी सत्यनारायण पूजेच्या भाकडकथेची चिरफाड केली. साधू वाण्याच्या नावेची गोष्ट सांगताना त्यामागचे विज्ञानही उलगडून दाखवले. जोपर्यंत बोट किंवा जहाज पाण्यावर तरंगते, तोपर्यंत त्याने सारण केलेले पाणी त्याच्या वजनाइतके असते. पण एकदा पाणी आत जायला लागले की ते जहाजाचे वजन वाढते. ते पाण्याखाली जाते आणि एकदा वजनामुळे पाण्याखाली गेलेली वस्तू वर येत नाही. जहाजाच्या, नावेच्या विशिष्ट आकाराचा फायदा हा फक्त तरंगत असतानाच होतो; बुडल्यावर नाही. म्हणून एकदा बुडालेले जहाज वर येत नाही, हे साधे विज्ञान आहे. परंतु तरीसुद्धा सत्यनारायणाच्या पूजेमध्ये पूजा घातल्यानंतर साधू वाण्याची नाव वर आल्याची गोष्ट सांगितली जाते. हे सगळे तपशीलवार सांगून एन. डी. पाटील म्हणाले, ‘म्हणून मला असे वाटते की, किमान सत्यनारायण पूजा घालणार्‍या भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाची तरी डिग्री काढून घ्यायला पाहिजे.’ त्यांच्या या विधानाची तेव्हा मी बातमीत चौकट केली होती.

1975 मध्ये ‘समाजवादी प्रबोधिनी’ची स्थापना करण्यात आचार्य शांताराम गरूड यांच्यासोबत एन. डी. पाटील, गोविंदराव पानसरे, प्राचार्य म. द. देशपांडे यांचाही पुढाकार होता. आचार्य गरूड यांची अभ्यासू वृत्ती, प्रश्न समजून घेण्याची, तो प्रश्न पटल्यावर त्याच्याशी तद्रुप होण्याची वृत्ती, यामुळे प्रबोधिनीचे मार्गदर्शक म्हणून सर्वानुमते त्यांचे नाव निश्चित झाले. ‘शास्त्रीय समाजवादाचं खुलं व्यासपीठ’ अशी ‘समाजवादी प्रबोधिनी’ची ओळख आहे. प्रबोधिनीच्या इमारतीची पायाभरणी केली, तेव्हा समाजाच्या रागलोभाची पर्वा न करता देशात विज्ञाननिष्ठा निर्माण करण्याचा संदेश एन. डी. पाटील यांनी दिला. उदाहरण देताना म्हणाले, “आपण सुधारणेला, प्रबोधनाला अभ्यासक्रमापासून सुरुवात केली पाहिजे. जो देव कधी पाहिला नाही, तरी देवा किती तुझे सुंदर आकाश, असं म्हणतो. सशाचे कान लांब का झाले. कारण देवाने ते उपटले वगैरे. सशाचे कान लांब झाले, ही गोष्ट मुलांच्या मनात अंधश्रद्धा निर्माण करते. आकाश सुंदर का? तर म्हणे ते देवाने निर्माण केले. क्रमिक पुस्तके मुलांना जे बाळकडू देतात, तोच मुळी अवैज्ञानिक डोस आहे.” क्रमिक पुस्तके बदली पाहिजेत. चौकसबुध्दी, विज्ञाननिष्ठा आली पाहिजे. अशी भूमिका त्यांनी त्या काळात घेतली. त्यानंतर वृत्तपत्रांतून एन. डी. पाटील यांच्याविरोधात अनेक पत्रेही छापून आली की, यांचेच कान लांब झालेत वगैरे.

हायस्कूलमध्ये असताना वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी एन. डी. पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पेठवडगावला जाऊन दारू दुकानाविरोधात आंदोलन केलं. ते दुकान बंद पाडलं होतं. त्या काळात सोमवारी पेठवडगावला जनावरांचा बाजार भरायचा. आष्ट्यापासून पंधरा किलोमीटरवर. वडगावचा, सांगलीचा आणि कराडचा असे मोठे जनावराचे बाजार त्या काळात भरायचे. वडगावच्या बाजाराच्या दिवशी देशी दारू दुकानाची अफाट विक्री व्हायची. दारूविक्रीला आळा घालावा, असा काँग्रेसच्या कार्यक्रमाचा भाग होता. जशी लग्नातली उधळमाधळ कमी करायची तसाच हा दारूबंदीचा भाग होता. ‘वडगावचं हे दुकान बंद झालं पाहिजे,’ असं कुणीतरी सुचवलं. त्यावर शाळकरी एन. डीं.नी चळवळ करायचं ठरवलं. त्यावेळी दारू दुकानांचे लिलाव व्हायचे. दारूचा गुत्ता म्हणायचे. वडगावला वर्षाकाठी तीन-चार हजारांचा असलेला लिलाव 65 हजार रुपयांपर्यंत पोचला होता. हे दारू दुकान बंद पाडण्याचा कार्यक्रम घेतला. सोमवारी बाजाराच्या दिवशी गर्दी असायची म्हणून निदर्शनं करायचे. आष्ट्याच्या शाळेतले खैरमोडे सर मुलांना उत्तम रीतीने घडवीत होते. ते आंदोलनासाठी सुट्टी द्यायचे. मुलं झेंडा घेऊन उभी राहायची. आलेल्या लोकांना दारू पिऊ नका म्हणून सांगायची. त्याचं पुढारीपण एन. डी. पाटील करीत होते. सोबत शाळेतले विद्यार्थीमित्र होते. ढवळी, बागणी आणि शिगावचे लोकही मुलांना पाठिंबा द्यायला यायचे. दुकानासमोर उभं राहून मुलांनी ‘पिकेटिंग’ करायला सुरुवात केली. कुणी घोटभर घेतलेली असायची, ते मुलांना बाजूला ढकलून दुकानात जायचे. मग मुलं दुकानाच्या वाटेत आडवं झोपायला लागली. त्यामुळं पिणार्‍यांची पंचाईत व्हायला लागली. तशातही काही बहाद्दर चुकवत चुकवत आमच्या अंगावर पाय न देता दुकानात जायचे. मुलं गांधीवादी सत्याग्रह करीत होती. गुरांच्या बाजारात आलेल्या काही मंडळींचं आंदोलनाकडं लक्ष असायचं. दुसर्‍या आठवड्यापासून बाजारातल्या लोकांचा पाठिंबा मिळायला लागला. मुलांच्या अंगावरून जाणार्‍यांना लोक खांद्यावरच्या चाबकानं फोडून काढायचे. ‘सोन्यासारखी पोरं झोपलीत, त्यांच्या अंगावरून जाताय, लाजा वाटत नाहीत का,’ वगैरे शिव्या घालायचीत. एका बाजूला मुलांचा अहिंसक सत्याग्रह आणि दुसरीकडे ही चाबूकवाल्यांची राखीव फौज. असे सहा आठवडे सोमवारचे आंदोलन चालले. तोपर्यंत दारूच्या दुकानाचा पुढचा लिलाव आाला. 65 हजारांचं अबकारी उत्पन्न देणारं ते दुकान होतं. निदर्शनांमुळं बोली बोलायचा कुणी आलं नाही. एकानं कुणीतरी तीन हजारांची बोली सांगितली. तो काही लिलाव केला नाही. त्यानंतर मग कोल्हापूरची यंत्रणा जागी झाली. काही आंदोलक पोरांना पोलिसांनी पकडून नेलं. वडगावच्या पोलीस ठाण्यात घेऊन गेले. बाकीच्या पोरांना सोडून दिलं आणि एकट्या एन. डी. पाटील यांना वडगावच्या लॉकअपमध्ये एक दिवस ठेवून कोल्हापूरच्या जेलमध्ये नेलं. अशा रीतीनं त्यांची राजकीय कारकीर्द कोल्हापूरपासून सुरू झाली.

प्रा. एन. डी. पाटील हे फिरस्ते गृहस्थ. ते जेव्हा पक्षाचे मुखपत्र चालवत होते, तेव्हा प्रवासात असताना, एसटी स्टँडवर वगैरे बसून लेखन केलं. नंतरच्या काळात त्यांचं कार्यक्षेत्र वाढत गेलं. त्यांना लोक ठिकठिकाणाहून बोलावू लागले. आज इकडे, तर उद्या उलट्या दिशेला. उलटा-सुलटा प्रवास व्हायचा. लोकांच्या प्रश्नांसाठी शारीरिक कष्टांची पर्वा न करता ते प्रवास करीत राहिले. त्यामुळे लेखनावर मर्यादा आल्या तरी त्यांनी वाचन ‘अपडेट’ ठेवलं. त्यातूनही चळवळीला आवश्यक असेल तेव्हा-तेव्हा एन. डी. पाटील यांनी लेखन केलं.

शेतीमालाच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांचं प्रबोधन करावं म्हणून ‘शेतीमालाच्या किमती’ ही पुस्तिका लिहिली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय, म्हणून त्यांनी त्यांच्यावर एक पुस्तिका लिहिली. शिक्षणाच्या प्रश्नावरची त्यांची पुस्तिका विशेष गाजली. त्याचाही एक किस्साच आहे. 1967 साली तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरींचा आणि एन. डी. पाटील यांचा संघर्ष झाला. एस.एस.सी.ची परीक्षा ते दोन स्तरावर घ्यायला निघाले होते. एस.एस.सी. बोर्ड ऑर्डिनरी आणि एस.एस.सी. अ‍ॅडव्हान्स; तर अ‍ॅडव्हान्सची एस.एस.सी. म्हणजे हायर इंग्रजी, हायर मॅथेमॅटिक्स. ऑर्डिनरी एस.एस.सी. म्हणजे लोअर इंग्लिश आणि लोअर मॅथ्स. पण लोअर इंग्रजी, लोअर मॅथ्स, घेणार्‍या पोरांचं भवितव्य काय, तर झिरो. त्यांना सगळे दरवाजे बंद. अशा परिस्थितीमध्ये अनेक लोकांनी त्याचं समर्थन केलं; पण एन. डी. पाटील यांनी नाही केलं. 1967 साली एन. डी. या प्रश्नावर ठामपणाने उभे राहिले. अनेकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की, ‘आपल्या पोरांची कत्तल होते हो, आपल्या मुलांकरिता ही सोपी परीक्षा आहे.’ त्यावर एन. डी. म्हणायचे, दुधाची गरज भागवण्यासाठी अश्वत्थाम्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून देत होती, तसं करायचं आहे का? त्यावेळी एन. डी. मोठ्या प्रमाणावर सभा घेऊन जनजागृती करीत होते. एके दिवशी शेकापचे ज्येष्ठ नेते दाजीबा देसाई त्यांना म्हणाले, “सभा घेतो आहेस ना, या सभा तुझ्या संपून जातील, काय उपयोग आहे त्याचा? एक दिवस बसून लिहून काढ.” मग त्यांनी एन. डीं.ना दोन दिवस कोल्हापूरला पी. जी. पाटलांच्या घरात कोंडून ठेवले. पी. जी. पाटील तेव्हा कोल्हापुरात प्राचार्य होते. मग तिथं बसून त्यांनी ‘श्वेतपत्रिकेचे कृष्णस्वरूप’ ही पुस्तिका लिहिली. लेखनाच्या बाबतीत एन.डीं.चं म्हणणं असं होतं की, “मी प्रचारक आह; म्हणजे हे जे अकॅडेमिशीयन्स आहेत ना तसा मी नाही. मी याचं सोंग आणत नाही. त्यामुळे माझ्या पुस्तकाचे मथळेसुद्धा त्या समोरच्या माणसाला कळावेत असे असतात.”

शिक्षणाच्या प्रश्नावर शांताराम गरुड, प्राचार्य म. द. देशपांडे, पानसरे या सगळ्या मंडळींनी तगादा लावून शिक्षणावर एक पुस्तिका लिहून घेतली. ती 80-90 पानांची पुस्तिका ‘समाजवादी प्रबोधिनी’ने प्रसिद्ध केली. त्या पुस्तिकेचा मथळा ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?’ असा आहे. “माझ्या ऑडियन्सला त्या टायटलमधून निम्मंअधिक कळावं,” असा त्यांचा आग्रह असायचा. “आजची शिक्षणव्यवस्था’ असे टायटल असेल तर कोण वाचणार?” असं ते म्हणायचे.

प्रारंभीच्या काळात एन. डी. चळवळीमध्ये पूर्णवेळ काम करायला मुंबईमध्ये गेले. गिरणी कामगारांच्यात उतरले, त्यांच्यात काम केलं. त्या कालखंडामध्ये मध्यमवर्गाची भूमिका सार्‍या चळवळींना मदतकारक होती; किंबहुना हा मध्यमवर्ग या दबलेल्या, श्रमजीवी लोकांच्या चळवळीला नेतृत्व द्यायला उत्सुक असे. तो नुसती बघ्याची भूमिका घेत नव्हताच, तर नेतृत्व करीत होता आणि हे नेतृत्व तो करीत असल्यामुळे या चळवळींना उठावदारपणा येत असल्याचं एन. डीं.चं म्हणणं होतं. कामगारवर्गाचं पुढारीपण याचा अर्थ, कामगारांतले फार थोडे पुढारी असत. पुढारीपण हे मध्यमवर्गातले जाणते, त्या प्रश्नाचे आकलन असणारे करत आणि कामगारवर्ग त्यांना बळ देत असे. कामगार वर्गाचीच चळवळ कामगार वर्गासाठीच असते; पण कामगार वर्गाच्या बाहेरच्या जाणत्या लोकांनी तिचं नियंत्रण करणं किंवा तिचं नेतृत्व करणं गरजेचं असतं, असं त्यांचं मत असे.

एन. डी. पाटील यांची ओळख ‘रस्त्यावरचा संघर्ष करणारा योद्धा’ अशी आहे. त्या प्रतिमेत त्यांना बंदिस्त करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. त्यापलिकडे त्यांनी केलेल्या रचनात्मक कामाकडे मात्र दुर्लक्ष झाले. रयत शिक्षण संस्थचे कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले काम महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातले सर्वांत महत्त्वाचे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, इस्लामपूरची महात्मा फुले शिक्षण संस्था, सातार्‍याची डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, बेळगावची दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक संस्था, कालकुंद्रीचे खेडूत शिक्षण मंडळ, इचलकरंजीची समाजवादी प्रबोधिनी अशा संस्थांचे प्रमुखपद स्वीकारून रचनात्मक कामातही त्यांनी योगदान दिले. पुरोगामी विचारधारेने चालणार्‍या अशा अनेक छोट्या-मोठ्या संस्था, चळवळी आणि कार्यकर्त्यांच्या मागे एन. डी. पाटील आधारवडासारखे उभे राहिले, या चळवळींना त्यांचा मोठा आधार होता.

संपर्क : 95949 99456


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]