ह.भ.प. देवदत्त परुळेकर -

भारतीयांनी मानलेली धर्म, अर्थ, काम व मोक्ष ही मानवी जीवनाची मूलभूत उद्दिष्टे म्हणजे चार पुरुषार्थ होत. सामान्यतः यज्ञादी शास्त्रविहित कर्मांचे आचरण आणि सत्य, अहिंसा इत्यादींनीयुक्त असे शुद्ध नैतिक वर्तन म्हणजे धर्म होय. मानवाला ‘कामा’ चे जितके स्वाभाविक आकर्षण असते तितके धर्माचे नसते. म्हणून त्याने आपले मन प्रयत्नपूर्वक धर्माकडे वळविणे आवश्यक असते. कारण धर्माच्या अभावी जीवन स्वैर व उच्छृंखल बनून अधःपतित होते. परंतु धर्म हा दुःखपर्यवसायी व लोकविद्विष्ट असेल तर त्याचा त्याग करावा, असेही मत होते. अर्थसाधना म्हणजे उपयुक्ततावादाच्या दृष्टिकोनातून भूमी, सोनेनाणे, पशू, धान्य इत्यादींची प्राप्ती, वृद्धी व रक्षण करणे होय. अर्थाच्या अभावी शरीरधारणाही अशक्य असल्यामुळे इतर पुरुषार्थांची प्राप्तीही अशक्य होते आणि व्यक्ती व समाजाचे स्वास्थ्य नष्ट होते. अर्थाचा अतिरेकी हव्यास मात्र अनिष्ट होय. इंद्रियांनी अनुकूल विषयांचा सुखोपभोग घेणे म्हणजे कामपूर्ती होय. धर्माशी अविरोधी ‘कामा’ ला गीतेत परमेश्वराची विभूती मानले आहे. कामतृप्ती ही अन्नाप्रमाणेच अत्यावश्यक असल्यामुळे, तिच्या अभावी व्यक्ती विकृत आणि दुःखी बनते, हा विचार वात्स्यायनापासून बर्ट्रांड रसेलपर्यंत अनेकांनी मांडला आहे. परंतु माणसाचा स्वाभाविक कल ‘कामा’ कडेच असल्यामुळे संतुलन साधण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो आणि त्यानंतर संसारचक्रातून सुटका होऊन परमानंद लाभतो, अशी सामान्यतः मोक्षकल्पना आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनातील मूलभूत उद्दिष्टे म्हणून मानण्यात आलेल्या धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांपैकी मोक्ष हा अंतिम व सवश्रेष्ठ पुरुषार्थ होय. जन्ममरणाच्या दुःखदायक फेर्यातून कायमची सुटका झाल्यामुळे होणारे सर्वश्रेष्ठ पारमार्थिक कल्याण, हा स्थूलमानाने मोक्ष या संज्ञेचा पारिभाषिक अर्थ आहे. बंध व मोक्ष या परस्परविरुद्ध अर्थाच्या संज्ञा असून अज्ञानामुळे बंध व ज्ञानामुळे मोक्ष प्राप्त होतो, असे बहुतेक भारतीय दर्शनांनी व संप्रदायांनी मानले आहे. मोक्ष या अर्थाने मुक्ति, अपवर्ग, कैवल्य (शुद्धत्व, एकत्व), निःश्रेयस (आत्यंतिक कल्याण), निर्वाण (विझणे), परमपुरुषार्थ, उद्धार इ. शब्दही वापरले जातात. यांपैकी निर्वाण हा शब्द प्रामुख्याने बौद्ध व जैन दर्शने वापरतात. पारलौकिक कल्याण दर्शविण्यासाठी स्वर्ग हा शब्दही वापरला जातो. परंतु स्वर्गसुख भोगणारास पुण्यसंचय संपला असता पुन्हा जन्ममरण असल्यामुळे स्वर्ग हे फल नाशवंत आहे, तर मोक्ष अविनाशी आहे, असे भारतीय मानतात. (संदर्भ – मराठी विश्वकोषातील आ. ह. साळुंखे यांच्या नोंदी)
आद्यशंकराचार्यांनी स्त्रियांना व शूद्रांना मोक्षाचा अधिकार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे.
या पार्श्वभूमीवर संतांनी मोक्ष म्हणजेच मुक्ति यासंबंधी घेतलेली भूमिका वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ज्ञानेश्वर माऊलींचा एक प्रसिद्ध अभंग आहे, तो असा –
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल ।
ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश।
झाका झाकी त्यास कासयाची ॥२॥
जंववरी देह आहे तंववरी साधन।
करूनियां ज्ञान सिद्ध करा ॥३॥
गृह दग्ध न होतां शिंपीजे उदक ।
शेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥
आहे मी हा कोण करावा विचार।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अभंगाचा भावार्थ असा –
मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार आहे. असे मानणारे महामुर्ख आहेत. जसे दिवा मालवल्यावर प्रकाश कसा राहील व मग घरांतील झाकाझाक कशी करणार? त्याप्रमाणे जोपर्यंत देहांत जीव आहे, तोपर्यंत प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे. घर जळून खाक झाले नाही, तो पर्यंतच विझवण्याची खटपट केली पाहिजे ते जळून गेल्यावर पाणी मारण्याचा काय उपयोग होणार? मी कोण आहे याचा अगोदर विचार करा. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या, असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
ज्याला मोक्ष किंवा मुक्ति म्हणतात ती याची देही याची डोळा प्राप्त करून घ्यावयाची गोष्ट आहे, असे ज्ञानेश्वर माऊलींचे स्पष्ट प्रतिपादन आहे.
आत्मज्ञान प्राप्त होणे म्हणजेच परमेश्वराच्या स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजेच मोक्ष होय. हा मोक्ष एकदा प्राप्त झाला की पुन्हा जन्माला यावे लागत नाही. जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्तता होते. मुक्ति हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे, अशी पारंपरिक धर्माची मांडणी आहे. परंतु मुक्ति हाच अंतिम पुरुषार्थ नसून भक्ती हा पंचम पुरुषार्थ जीवनाचे सर्वश्रेष्ठ ध्येय आहे असे संतांचा धर्म मानतो. ज्ञानेश्वर माउलींची उक्ती प्रसिद्ध आहे –
चहू पुरुषार्थाच्या शिरी । भक्ती जैसी ॥
भक्ती हाच जीवनाचा मार्ग, भक्ती हीच जीवनाची निष्ठा आणि भक्ती हे जीवनाचे अंतिम ध्येय असे संतांचा धर्म मानतो. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आद्यशंकराचार्य आणि ज्ञानेश्वर माउली यांच्या विचार विश्वातील फरक स्पष्ट करताना म्हटले आहे – भक्ती ज्ञानाचे साधन म्हणूनच शंकराचार्यांनी मान्य केली, अंतिम निष्ठा म्हणून नव्हे. ज्ञानदेवांनी ज्ञानमयभक्ती, अद्वैतभक्ती किंवा परमभक्ती म्हणून भक्ती अंतिम निष्ठा म्हणूनच स्वीकारली.
अंतिम साध्य व साधन म्हणून ज्ञानेश्वर माउलींनी भक्तीला अनन्य महत्त्व दिले आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर माउली स्पष्टपणे बजावतात. ‘भक्तिवीण मुक्ती बोलो नये।’ अंतिम निष्ठा म्हणून माउली निव्वळ ज्ञानापेक्षा ज्ञानोत्तर भक्तीला महत्त्व देतात ते असे-
एर्हवी निजी ना चौथी। हे पहिली ना सरती।
पै माझिया सहजस्थिती। भक्ती नाव ॥
या ज्ञानभक्ति सहज। भक्तु एकवटला मज।
तो मीचि केवळ हे तुज। श्रुतही आहे ॥
ते हे कल्पादी भक्ति मियां। भागवतमिषें ब्रह्मया।
उत्तम म्हणौनि धनंजया। उपदेशिली ॥
ज्ञानी इयेते स्वसंविती। शैव म्हणती शक्ति।
आम्ही परमभक्ति। आपुली म्हणो ॥
ज्ञाननिष्ठेचाच भक्ती हा उल्हास असतो असे माउली सांगतात–
स्वकर्मांच्या चोखौळी । मज पूजा करूनी भली ।
तेणे प्रसादे आकळी। ज्ञाननिष्ठेतें ॥
ते ज्ञाननिष्ठा जेथ हाततसे। तेथ भक्ति माझी उल्लासे।
तिया मजसी समरसे। सुखियां होय ॥
संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे-देहुकर म्हणतात. ज्ञानदेव हा महाराष्ट्राचा एक आकर्षणबिंदू आहे. अनेकांना ज्ञानदेव आपले असल्याचे वाटते. हे चांगले आहे. पण जेव्हा ज्ञानदेव आपलेच आहेत असे वाटायला लागते तेव्हा मात्र थोडी पंचायत होते. ऐतिहासिक तथ्य असे सांगते की मुळात गहिनीनाथांनीच नाथसंप्रदायाची आपली परंपरा निवृत्तीनाथांना उपदेश देताना महाराष्ट्रातील कृष्ण-विठ्ठल म्हणजे वारकरी संप्रदायात मिळवून टाकली. नाथ परंपरेतून ज्ञानदेवांना काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाचा वारसा मिळालेला होता. काश्मिरी शैव हे अद्वैतवादीच असले तरी त्यांचे अद्वैत शंकराचार्यांच्या नावाने मांडण्यात येणार्या अद्वैतापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे ज्ञानदेव अद्वैती असलेच तर शैवाद्वैती आहेत शंकराद्वैती नव्हेत.
ज्ञानदेवांच्या अद्वैत तत्त्वज्ञानाचा आणि वारकरी संप्रदायाचा संबंध नेमका कोठे येतो, हा प्रश्न येथे उपस्थित होतो आणि त्याचे उत्तर अमृतानुभवात मिळते.
तत्त्वज्ञानात व आचारात भक्तीचे नेमके स्थान कोणते ही एक महत्त्वाची समस्या आहे. ज्ञानदेव व वारकरी विचारधारा भक्ती मानणारे आहेत. ज्ञानदेवांना भक्तीचे समर्थन करावयाचे आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञ कांट यांच्या चौकटीचा उपयोग करून सांगावयाचे झाल्यास असे म्हणता येईल की, अद्वैतात भक्ती ही कशी शक्य आहे हे ज्ञानदेवांना दाखवायचे आहे आणि हे दाखविण्याची गरज निर्माण होते. आचार्यपक्षात भक्तीचे महत्त्व गौण आहे. भक्ती ही ज्ञानयोग्यता अंगी यावी यासाठी फारतर चित्तशुद्धीचे साधन म्हणून मान्य आहे. ज्ञान झाल्यावर भक्तीची गरज नाही. किंबहुना ऐक्यतेच्या अवस्थेत भक्ती शक्यही नाही. दुसर्या शब्दांत सांगायचे म्हणजे कर्माच्या क्षेत्रात जसे टिळक हे आचार्यपक्षाचे विरोधक आहेत तसे भक्तीच्या क्षेत्रात ज्ञानदेव हे आचार्यपक्षाचे विरोधक आहेत. टिळक आणि ज्ञानदेव हे दोघेही तसे अद्वैतीच आहेत. पण टिळकांना आचार्यपक्षाचे अद्वैतवादी सत्ताशास्त्र जसेच्या तसे स्वीकार्य आहे. ज्ञानदेवांना मात्र दुसर्या प्रकारचे अद्वैत अभिप्रेत आहे.
डॉ. सदानंद मोरे पुढे म्हणतात, ज्ञानालाही भक्ती कशी संभवते याचे उत्तर देताना ज्ञानदेवांनी चिद्विलासवादाचा उपयोग करून घेतलेला आहे. भक्तीसाठी द्वैत लागते व ज्ञानी तर अद्वैतानुभूतीत गढलेला. भक्तीने अद्वैताला बाधा येईल! ज्ञानदेव असे दाखवतात की, अद्वैताला धक्का न लागता भक्ती शक्य आहे. त्यांनी उदाहरण दिले आहे ते असे-
देव देऊळ परिवारू। कीजे कोरोनी डोंगरू।
तैसा भक्तिव्यवहारू। का न व्हावा?॥
म्हणजे अद्वैताला भक्ती कशी शक्य आहे असे विचारणार्याला ते डोंगरात कोरलेल्या लेण्याचा दाखला देऊन भक्ती कशी शक्य नाही, असा आव्हानात्मक प्रतिप्रश्न विचारतात. परंतु एखादी गोष्ट केवळ शक्य आहे एवढे दाखवून दिल्याने ती कर्तव्य आहे किंवा इष्ट आहे असे निष्पन्न होत नाही. भक्तीमुळे अद्वैताला बाधा येत नाही हे ठीक आहे. परंतु अद्वैतावस्थेपेक्षाही काहीतरी अधिक लाभ त्यात असेल तरच शक्यतेवरून इष्टतेकडे जाता येईल. येथेही ज्ञानदेव असाच दाखला देऊन आव्हानात्मक प्रतिप्रश्न विचारतात.
अहो ऐक्याचे मुदल न ढळे।
वरी साजिरेपणाचा लाभु मिळे।
तरी स्वतरंगाची मुकुळारे। तुरंबु का पाणी?॥
तुकोबांनी मुदलाबद्दलच्या तिन्ही शक्यता फारच चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत-
१) मुदलामध्ये पडे तोटा। ऐसा खोटा उदीम॥
२) मुदल जतन झाले। मग लाभाचे काय आले॥
३) सर्वात्मकपण। माझे हिरोनी नेतो कोण॥
मनी भक्तीची आवडी। हेवा व्हावी ऐसी जोडी॥
असेही म्हणता येईल अमृतानुभवातून ज्ञानदेवांनी भक्तीचे जे समर्थन केले ते पुढील सर्व वारकरी संतांनी गृहीत धरलेले आहे.
– ह.भ.प. देवदत्त परुळेकर
लेखक संपर्क : ९४२२० ५५२२१