अंनिसच्या फटाकेमुक्त आनंदी दिवाळी या अभियानात सामील व्हा!

अनिल करवीर - 9823280327

भारतीय संस्कृती निसर्गाच्या अधिक जवळ जाणारी आहे. भारतीय सण म्हणजे निसर्गाची पूजा; मात्र असे असताना अलिकडच्या काळात सणांनीही प्रदूषण वाढविण्यात मोठा हातभार लावला असल्याचे नाकारता येत नाही. दिवाळी म्हणजे सणांचा राजा. हा सण संस्कृती व परंपरा जपण्याच्या नावाखाली भरपूर फटाके फोडून साजरा केला जातो.

फटाक्यांची आतषबाजी करताना ध्वनीची तीव्रता किती प्रमाणात वाढते, याचा कधी आपण विचारच करत नाही. ध्वनी व वायू प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा तोल बिघडतो व फार मोठ्या संकटास आपण आमंत्रण देतो. अतितीव्रतेच्या आवाजाचे फटाके अनेकांना कायमस्वरुपी बहिरेपण देऊन जातात, तर अनेक चिमुकल्यांना शारीरिक अपंगत्व. सप्तरंगाची रंगाची उधळण करीत आकाशात जाऊन फुटणारे भुईनळे, काळा-पिवळा धूर सोडणार्‍या सापाच्या गोळ्या, धूर सोडत गरगर फिरणारी भुईचक्रे पेटवत दिवाळी साजरी केली जात असली, या धुराबरोबर सल्फाइड, सल्फर डायॉक्साइड, पोटॅशिअम कार्बोनट यांसारखी विषारी द्रव्ये वातावरणात पसरत असतात. दिवाळीत संपूर्ण वातावरणात सल्फरजन्य संयुगाचे धूलिकण पसरलेले असतात. वेगवेगळ्या रंगांची उधळण करणारे फटाके पर्यावरणाची हानी करतातच; शिवाय अस्थमासारखे श्वसनाचे आजार या काळात बळावतात.

पर्यावरणाची स्थिती दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर खालावत जात आहे. त्याचे चटके, फटके आपण सोसत आहोत, तरीही दिवाळीच्या चार-पाच दिवसात कुठे एवढे फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असा चुकीचा विचार करणारी मंडळी उरल्या-सुरल्या पर्यावरणाचा बळी घेण्याचे कर्म करत आहेत. त्यामुळे दिवाळी ध्वनी व वायू प्रदूषण मुक्त होण्यासाठी सर्वसामान्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे.

सर्व प्राणिमात्रांसाठी, व्यक्तींसाठी; तसेच पर्यावरणासाठी येणारा दिवाळीचा सण सुरक्षित आणि अनुकूल पध्दतीनं साजरा करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून पुढच्या पिढीला चांगले पर्यावरण देण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे दरवर्षी व्यापक स्वरुपात फटाकेमुक्त दिवाळी अभियान शाळा कॉलेजमध्ये राबविले जाते. यंदा शाळा-कॉलेज बंद असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने वेबिनार घेऊन, सोशल मीडियावर जनजागृती करून हे अभियान जोमाने राबविले जाणार आहे. कोरोनामुळे बरेच महिने लॉकडाऊन असल्यामुळे लोकांचा रोजगार गेला आहे, व्यवसाय नाही, आर्थिक मंदीसदृश वातावरण आहे. अशा वातावरणात महागड्या प्रदूषणकारी फटाक्यांवर वायफळ खर्च न करणं शहाणपणाचं नाही का?

चला तर मग प्रदूषणमुक्त, आनंदी व निरोगी दिवाळी साजरी करूया… आणि संकल्प करूया…

सण दिवाळी वर्षाचा, आम्ही साजरा करणार दीप लावू विवेकाचा, नाही फटाके फोडणार


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ]