पडद्यावर झळकणारे डॉ.आंबेडकर दलित सिनेमा शैलीचा उदय

प्रा. हरीश वानखेडे -

बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीकडून त्यांची पद्धतशीरपणे उपेक्षा केली गेली आहे. त्याचप्रमाणे दलित समाजाशी संबंधित राजकीय आणि सामाजिक कथांमध्ये त्यांना दुर्लक्षिले जाणं सहज नजरेस पडते.

गेल्या दशकात विशेषत: दलितबहुजन पार्श्वभूमीतील चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या आगमनाने आंबेडकरांच्या पडद्यावरील प्रतिमेला नवा अर्थ आणि सत्य जोडलं गेलं आहे. उदाहरणार्थ, नागराज मंजुळे यांनी त्यांच्या ‘फँड्री’ (२०१३) मध्ये म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दाखवून, ग्रामीण भारतीय जातीय संबंधांचे अपरिवर्तनीय स्वरूप आणि विरोधाभास चित्रित केला आहे.

भारतीय चित्रपटांच्या इतिहासात २०२३ हे वर्ष अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी लक्षात राहील. या वर्षात पठाण, गदर-२, जवान आणि अ‍ॅनिमल यांसारख्या चित्रपटांनी १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडून, व्यावसायिक यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले. नेत्रदीपक अ‍ॅक्शन, ड्रामा, गाणे आणि मनोरंजक नृत्य त्याचबरोबर लक्षवेधक भावनिक कथा यांमुळे उद्योगाची श्रेणीही वाढली. मात्र, हे वर्ष आणखी एका गोष्टीसाठी लक्षात राहील. ते म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जातीचा प्रश्न यांनी मोठ्या समूहाच्या सांस्कृतिक परीघात केलेला प्रवेश!

बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्मितीतील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक असले, तरी गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय चित्रपटसृष्टीकडून त्यांची पद्धतशीरपणे उपेक्षा केली गेली आहे. त्याचप्रमाणे दलित समाजाशी संबंधित राजकीय आणि सामाजिक कथांमध्ये त्यांना दुर्लक्षिले जाणं सहज नजरेस पडते. हॉलिवूडचे दिग्दर्शक रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी त्यांच्या गांधींवरील सर्वोत्तम चित्रपटात, आंबेडकरांची केलेली उपेक्षा दिसून येते. वसाहतविरोधी लढा, राष्ट्रनिर्मिती किंवा राष्ट्रवाद यांवरील ऐतिहासिक पटांमध्ये गांधी, नेहरू, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वांना स्थान दिलेले दिसते, परंतु आंबेडकरांचा जात व्यवस्थेविरोधी लढा, समाजसुधारणा चळवळ आणि दलितांचे असुरक्षित सामाजिक-आर्थिक वास्तव उपेक्षेचा धनी ठरलेलं दिसतं.

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत आंबेडकरांचे नाव किंवा छायाचित्र वचित कधीतरी पडद्यावर दिसत होते. आर्ट हाऊस किंवा समांतर सिनेमा चळवळीतील निशांत (१९७५), पार (१९८१) आणि दामूल (१९८५) यांसारखे काही चित्रपट दलितांवरील अत्याचार, जातीय शोषण, हिंसा यांवर बेतलेले असले तरी, त्यांनी उघडपणे डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या राष्ट्रीय जीवनातील सहभागाकडे दुर्लक्ष केलं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, १९८० च्या दशकाच्या मध्यात मुंबईनं नवं चेतनेनं उर्जित झालेल्या दलित पँथर्सच्या शक्तिशाली चळवळीचा जन्म पाहिला. पण गंमत म्हणजे, बॉम्बे सिनेमानं दलित तरुणांच्या मुख्य प्रवाहाच्या राजकीय चर्चाविश्वातील या प्रभावी आगमनाकडे लक्ष दिलं नाही. याचप्रमाणे याच दशकात जेव्हा बहुजन समाज पक्षाने उत्तर प्रदेशात जोरकस राजकीय भूमिका घेतली, तेव्हाही अभिजात वर्गाच्या चिंता आणि हितसंबंधांचे कथानकच चित्रपटांमधून पुढे चालू राहिलं.

११९० च्या दशकात जेव्हा व्ही. पी. सिंग यांच्या संयुक्त आघाडीचे केंद्रात सरकार आलं, तेव्हा सामाजिक न्यायाच्या राजकारणाने राष्ट्रीय पातळीवर लक्ष वेधून घेतलं, त्यामुळे एक छोटासा बदल दिसून आला. १९९४ मध्ये जब्बार पटेलांनी सामाजिक न्याय मंत्रालयाच्या सहकार्याने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ नावाचा बायोपिक दिग्दर्शित केला. अर्थात, तो मर्यादित चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. याच काळात मराठीतील ‘भीम गर्जना’ (१९९०) आणि तेलुगूमधील ‘डॉ. आंबेडकर’ (१९९२) यांसारखी आंबेडकरांवरील काही प्रादेशिक चरित्रेही बनवली गेली. ज्यामुळे मुख्य प्रवाहातील सिने संस्कृतीत आंबेडकरांचा प्रभावी प्रवेश झाला.

१९९४ मधील शेखर कपूरचा फूलनदेवीच्या जीवनातील संघर्ष आणि विजय यांवरील ‘बँडिट वीन’ सिनेमा दलित-बहुजन आयकॉनचं जीवन सर्जनशीलपणे दाखवतो. तथापि, १९९० च्या दशकातील हे चित्रपट राष्ट्रीय चित्रपट संस्कृतीत अवास्तव, भानहीन वाटतात. त्यात वचितच दलितांचे खरे प्रश्न मांडलेले आढळतात.

आंबेडकरांचे मुख्य प्रवाहात येणे

गेल्या दशकात विशेषत: दलित-बहुजन पार्श्वभूमीवरील चित्रपट निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकारांच्या आगमनाने आंबेडकरांच्या पडद्यावरील प्रतिमेला नवा अर्थ आणि सत्य जोडलं गेलं आहे. उदाहरणार्थ, नागराज मंजुळे यांनी त्यांच्या ‘फँड्री’ (२०१३) मध्ये म. फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा दाखवून, ग्रामीण भारतीय जातीय संबंधांचे अपरिवर्तनीय स्वरूप आणि विरोधाभास चित्रित केला आहे. नागराज मंजुळे यांनी त्यांच्या अलीकडील हिंदी चित्रपटात ‘झुंड’ (२०२१, अमिताभ बच्चन असलेल्या) मध्ये आंबेडकर जयंतीचा सामूहिक उत्सव दाखवला आहे. त्या दिवशी लोकं सहजपणाने आणि आनंदाने नाचून जयंती साजरी करत आहेत. हा चित्रपट आंबेडकरांची प्रतिमा केवळ जातीविरोधी प्रतीक म्हणूनच नव्हे तर नवीन पिढीसाठी बाबासाहेब प्रेरणेचे प्रतीक आहेत, उत्सवमूर्ती आहेत असंही दाखवतो.

आंबेडकर आता पडद्यावर अधिक दिसत आहेत. त्यांचा फोटो पोलीस स्टेशन, कोर्ट किंवा सरकारी कार्यालयात लटकलेला दिसतो. जरी त्यांचे पोर्ट्रेट राज्य संस्थांच्या निष्क्रियतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘प्रॉप’ म्हणून वापरले जात असले, तरी त्याचा वापर नवीन क्षेत्रात देखील विस्तारत आहे. नेहमीच्या प्रतीकात्मकतेच्या पलीकडे, आंबेडकर एक प्रेरक शक्ती म्हणून उदयास आले आहेत. ते पात्र आणि कथा मंथनांवर प्रभाव टाकतात. सध्या तिची ‘दलित सिनेमा’ शैली म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अमित मसुरकर यांच्या ‘न्यूटन’ (२०१७) मध्ये आपल्याला आंबेडकरांचा फोटो पडद्यावर फक्त काही सेकंदासाठी दिसतो, परंतु तो नायकाच्या घटनात्मक कर्तव्य आणि कायद्याच्या राज्यासाठीच्या बांधिलकीचा एक महत्त्वाचा संकेत आहे.

तमिळ चित्रपट दिग्दर्शक पा. रणजीथ अधिक धाडसी आहेत. त्यांनी आंबेडकरांचे नाव, छायाचित्र, पुतळा, घोषणा आणि निळा रंग, तसेच दलितांची इतर प्रतीके त्यांच्या कथनांमध्ये अग्रभागी ठेवली आहेत. उदाहरणार्थ ‘कबाली’ (२०१६) मध्ये नायक (रजनीकांतने साकारलेला) आंबेडकरांच्या ड्रेस सेन्सची प्रशंसा करतो आणि चांगले कपडे हे माणूस असल्याचे प्रतीक आहेत असं सुचवतो. आंबेडकरांचे छायाचित्र रणजीथच्या चित्रपटांमध्ये पार्श्वभूमी सजवण्यासाठी निष्क्रिय ‘प्रॉप’ म्हणून वापरले जात नाही, तर ते आंबेडकरांचं सामाजिक आणि राजकीय महत्त्व अधोरेखित करते. अनेकदा उपेक्षित लोकांवर सतत होणार्‍या अन्यायाविरुद्ध ते बलवान, अत्याचारी उच्चभ्रू लोकांशी लढण्याची तयारी असलेले दर्शवते.

असाच दृष्टिकोन आपल्याला शैलेश नरवडे यांच्या ‘जयंती’ (२०२१) मध्ये दिसतो. ज्यात त्यांनी आंबेडकरांची एक बौद्धिक गुरू म्हणून ओळख करून दिली आहे. त्यांचे लेखन आणि भाषण नायकाला अन्यायाविरुद्ध लढण्यास प्रवृत्त करते. त्याला एक धैर्यवान आणि शूर व्यक्ती बनवते. आंबेडकरांची वैचारिक मूल्ये आणि दलित राजकीय जाणीव यांचा ठळक व थेट आंबेडकरांचा संदर्भ असलेली ही मांडणी भारतीय सिनेमासाठी नवीन आहे.

टी.जे. ज्ञानवेलचा तमिळ चित्रपट ‘जय भीम’ (२०२१, सूर्यासह) भटक्या जमातीतील एका माणसाची कथा मांडतो. ज्याच्यावर पोलिसांकडून अत्याचार होतो आणि त्याला दीर्घ न्यायालयीन लढाईनंतरच न्याय मिळतो. हा चित्रपट रोजच्या जगण्यात वंचित लोक अनुभवत असलेली गरिबी, पोलिसांची क्रूरता आणि भेदभाव या समस्यांचे परीक्षण आंबेडकरी दृष्टिकोनातून करतो. शोषित घटनांना संविधानच न्याय देऊ शकते, असं हा चित्रपट दर्शवतो. तसेच मारी सेल्वाराजच्या अलीकडील चित्रपट ‘मामनन’ (२०२३, तमिळ) मध्ये दलित नायक विनम्र किंवा शतिहीन दाखवलेला नाही, तो सामाजिक आणि राजकीय बदलाचा एक प्रतिष्ठित प्रतिनिधी म्हणून कार्य करतो. आंबेडकरवादी राजकीय चळवळींकडून मोठ्या प्रमाणात घेतली गेलेली ही एक मूलगामी कल्पना आहे.

या वर्षी जात आणि दलित प्रश्नावर दोन महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘गुथले लाडू’ (२०२३) आणि ‘कस्तुरी’ (२०२३) या दलित मुलांच्या त्यांच्या जन्मामुळे त्यांना तुच्छतेची आणि भेदभावाची वागणूक मिळाल्याच्या दोन चित्तवेधक कथा आहेत. ‘गुथले’ ही एका वाल्मीकी मुलाची कथा आहे. ज्याला शाळेत प्रवेश घ्यायचा असताना छळाचा सामना करावा लागतो. आधुनिक शिक्षण ही दलितांना दारिद्य्र व सामाजिक गुलामगिरीच्या अंधार्‍या कोठडीतून बाहेर काढण्याची, त्यांना विकास व राजकीय बदलाचा फायदा उपभोगण्याची संधी देणारी गोष्ट आहे, अशी कल्पना आंबेडकरांनी केली होती. दलितांमधील शिक्षणाची आकांक्षा आणि शिक्षणास सामाजिक व आर्थिक गतिशीलतेसाठीचं एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन आंबेडकरांच्या मूलभूत शिकवणुकीशी निगडित आहे.

‘कस्तुरी’ चित्रपटात दलितांचे जीवन दयनीय बनवणार्‍या सामाजिक आणि आघातांचे कथन प्रामाणिक आणि सर्जनशीलपणे केलं आहे. या चित्रपटात एक दलित मुलगा आहे. तो आणि त्याचे कुटुंब स्वच्छतेचे काम करते. ज्याची त्याला लाज वाटते. तो ‘कस्तुरी’च्या शोधात आहे. कस्तुरीचा दैवी सुगंध त्याची मळमळणार्‍या गंधापासून मुक्तता करेल असं त्याला वाटत. ही केवळ दलितांच्या शारीरिकच नाही तर अत्यंत मानसिक वेदनेची हृदयद्रावक कहाणी आहे.

हिंदू समाजात अंतर्भूत असलेल्या सामजिक समस्येचं सखोल निदान डॉ. आंबेडकरांनी केलं होतं. या दोन्ही कथा या जातिव्यवस्थेच्या भेदभावपूर्ण स्वरूपाभोवती फिरतात. जेव्हा या कथा प्रसारमाध्यमांमध्ये वापरल्या जातात, तेव्हा त्या केवळ व्यापक प्रेक्षकांना शिक्षित करत नाहीत, तर उपेक्षित सामाजिक घटकांना अन्याय आणि जाती-आधारित असमानतेशी लढण्यासाठी प्रेरणा देतात, प्रोत्साहित करतात. आंबेडकर आणि त्यांच्या विचारांची सध्याच्या काळातील प्रस्तुतता दाखवतात.

आंबेडकर छोट्या पडद्यावर

ओटीटी प्लॅटफॉर्मने एक योग्य गोष्ट केली, ती म्हणजे त्याने कथानक आणि कल्पनांचे लोकशाहीकरण केलं. आधी आपण छोट्या पडद्यावर पारंपरिकपणे काय पाहतो त्यास आव्हान दिलं. ओटीटी प्लॅटफॉर्मवर निर्माते अस्वस्थ करणारे, बंडखोर पट निर्माण करतात. अर्थात, अद्याप इथली ‘सेन्सॉरशिप’ हाताळण्याजोगे आव्हान आहे. ज्यामुळे सर्वसामान्य माणसांसह दलितांच्या जीवनातील कथांना संधी मिळत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आंबेडकरांची हजेरी आणि दलितांभोवतीच्या कथा यांची अचानक झालेली वाढ पाहायला मिळते. सध्या मोठ्या प्रमाणात दलित-बहुजन प्रेक्षक ओटीटी प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते आहेत, जे त्यांचा इतिहास, गतकाळातील त्यांच्या समाजाची सांस्कृतिक मूल्ये, त्यांची प्रतीके आणि शौर्याच्या कथा शोधत आहेत, या तर्काने ही वाढ समजून घेतली जाऊ शकते.

आंबेडकरांच्या जीवनातील घटनांचे चित्रण करणार्‍या तीन लांबलचक वेब सिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. प्रथम, ‘एक महानायक-डॉ. आंबेडकर’ (२०२०) Zee 5 वर चालणार्‍या प्रदीर्घ टेलि-मालिकांपैकी एक चरित्रात्मक कथा आहे. जिचे २७ सीझन आणि २५० हून अधिक भाग आहेत. ही मालिका लोकप्रिय अभिजात मिथकं आणि धार्मिक कथांसारखे काहीएक कलात्मक स्वातंत्र्य घेते. या मालिकेने तिची सर्जनशीलता, उत्पादन गुणवत्ता आणि कलात्मक सादरीकरणाने समीक्षकांना प्रभावित केले आहे. Disney+Hotstar वर ‘डॉ. आंबेडकर-एका महामानवाची गौरवगाथा’ (२०२०) ही एक प्रभावी मराठी वेब सिरीज आहे. यात आंबेडकरांच्या बालपणापासूनच्या घटना अतिरंजितपणे रंगवून, त्यांच्या विलक्षण व्यक्तिमत्त्वाभोवती मिथकं निर्माण करून चित्रित केल्या आहेत. Sony Live वर ‘रिमेम्बरिंग आंबेडकर’ नावाचा एक तासाचा संगीतमय भाग आहे. ज्यात आंबेडकरांच्या वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय जीवनातील शौर्याचे पैलू दाखवले आहेत.

‘Made in Heaven’ या वेब सीरिजमधली नीरज घायवानची ‘The Heart Skipped a Beat’ हा दलितांच्या कलासंग्रहात सर्वांत प्रभावी भर घालणारा पट आहे. पल्लवी मानके (राधिका आपटे) ही एक अभिमानी दलित प्राध्यापिका आहे. ती आयव्ही लीग विद्यापीठात शिकवते. तिला तिची पूर्वीची ‘अस्पृश्य’ भारतीय ओळख दाखविण्यास कोणताही संकोच वाटत नाही. ती एका संवेदनशील आणि पुरोगामी भारतीय-अमेरिकन वकिलाशी विवाहित आहे, तरी तिला तिच्या विवाह सोहळ्यात बौद्ध विधी जोडायचा होता तेव्हा तिला सामाजिक दडपण आणि चिंतांचा सामना करावा लागतो. त्यास भारताच्या सामाजिक जीवनात प्रस्थापित करावयाच्या तत्त्वांचे प्रतिनिधित्व करणारं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र केंद्रस्थानी ठेवून हा सोहळा अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे, ‘सिरियस मेन’ (नेटफ्लिक्स), ‘महाराणी’ (सोनी लिव्ह), ‘पाताळ लोक’ (अ‍ॅमेझॉन प्राइम), ‘दहाड’ (अमेझॉन प्राइम), ‘आश्रम’ (एमएक्स प्लेयर) या मूळ वेब सिरीज आणि ‘कटहल’ (नेटफ्लिक्स) व ‘परीक्षा’ (झी-५) सारखे चित्रपट दलित पात्रांबद्दल एक नवीन भूमिका मांडतात. त्यांना त्यांची सामाजिक ओळखीबद्दल आणि ती सार्वजनिकपणे ठासून मांडण्याबद्दल जागरूक असल्याचे दाखवतात. तसेच त्यांची सामाजिक न्याय आणि समान सन्मानाची मागणी दाखवतात.

सामाजिक माहितीपट

या काल्पनिक कथांना वास्तविक सामाजिक वास्तव्यांमधून घेतलेले प्रेरणादायी जीवनपट पुरवत आहेत. उदाहरणार्थ, Netflix वरील चार भागांतील ‘डॉटर्स ऑफ डेस्टिनी’ (२०१७) हा माहितीपट. ज्यात अत्यंत भेदभाव आणि अपमानास्पद सामाजिक वातावरणात शिकण्यासाठी धडपडणार्‍या दलित शालेय विद्यार्थ्यांची प्रभावी कथा सांगितली आहे. सामाजिक समस्या, दारिद्य्र आणि शोषण यावरील माहितीपट बरेच असले, तरी प्रामुख्याने उपेक्षित घटकांवर हिंसाचार व भेदभावाची निर्मिती करणार्‍या जातीय उतरंडीचे चित्रण करणारे माहितीपट आपल्याला फार कमी दिसतात. दलितांची असुरक्षितता, सामाजिक बहिष्कार आणि शोषणात्मक परिस्थितीत जगत असलेला मोठा समुदाय दाखवणारा स्टालिन केचा ‘इंडिया अनटचड’(२००७) हा पहिला उत्तम दीर्घ माहितीपट आहे.

आनंद पटवर्धन यांचा ‘जय भीम कॉम्रेड’ (२०११, ३ तास २० मिनिटे) दोन दशकांचा प्रवास आणि महाराष्ट्रातील दलित पँथर्सच्या चळवळीचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास बारकाईने सादर करतो. या तरुण आंबेडकरी समूहाच्या उदय आणि पतनाचा मागोवा घेतो.

माहितीपट निर्मात्यांची नवीन पिढी, विशेषतः दलित-बहुजन सामाजिक पार्श्वभूमीतील नवीन पिढी, यात महत्त्वाचं योगदान देत आहे आणि मुख्य प्रवाहातील क्षेत्रात आंबेडकरांचं व्यक्तिमत्त्व व विचारांवरील वाद-संवाद वाढवत आहे. उदाहरणार्थ, ज्योती निशाचा ‘BR Ambedkar : Now and Then’ (२०२३) हा एक दीर्घ लांबीचा माहितीपट. ज्यात ती भारतातील दलितांच्या आयुष्यातील दुर्दशेचा वेध घेते. ज्योती निशा ही बहुजन-स्त्रीवादी चित्रपट निर्माती आहे. ती आंबेडकरवाद्यांचा सामाजिक न्याय आणि सन्मानासाठीच्या संघर्षाची गुंफण पितृसत्ताविरोधी लढ्याशी घालून एक नवी नजर देते.

या शैलीत सोमनाथ वाघमारे यांचा ‘चैत्यभूमी’ (२०२३) हा माहितीपट उत्कृष्ट भर घालतो. मुंबईतील आंबेडकरांच्या अंत्यसंस्काराची जागा आता त्यांच्या लाखो अनुयायांना प्रेरणा देणार्‍या आणि आकर्षित करणार्‍या ऐतिहासिक वास्तूमध्ये कशी रुपांतरीत झाली, याचा वेध घेतो.

उदयोन्मुख दलितबहुजन मीडिया संस्कृती

एवढ्या प्रदीर्घ बहिष्कारानंतर आंबेडकर हळूहळू लोकप्रिय सिनेमा, टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश करत आहेत, ही दलित-बहुजन सांस्कृतिक मूल्ये हळूहळू मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये एकत्रित होत आहेत, याची ही एक पोचपावती आहे. हा नवीन अंकुर असला, तरी यात चित्रपट उद्योगाच्या लोकशाहीकरणासाठी संवाद सुरू करण्याची आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांप्रति संवेदनशील आणि त्या घटकांची जाणीव असलेल्या अधिक कथनांचा स्वीकार क्षमता यात आहे.

आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वात मानवी हक आणि सामाजिक न्यायासाठी जागतिक चळवळींना प्रेरणा देण्याची क्षमता आहे. याची पोचपावती म्हणजे हॉलिवूड दिग्दर्शक Ava DuVernay च्या Origin (2023, Isabel Wilkerson यांच्या ‘कास्ट’ या पुस्तकावर आधारित) हा नवीन चित्रपट ज्यात आंबेडकर (गौरव पठानियाने साकारलेले) हे वांशिक भेदभाव आणि ज्यूंविरुद्ध द्वेष समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून दाखवले आहेत. हा सिनेमा आंबेडकरांना आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर आणतो. पाश्चात्त्य जगताला दलित-बहुजन चळवळी, सामाजिक उतरंड आणि जाती-आधारित हिंदू व्यवस्थेविरुद्धच्या लढ्यातील आंबेडकरांचे योगदान यांचा परिचय करून देतो.

सांस्कृतिक उद्योग विशेषत: सिनेमात, पारंपरिक सामाजिक अभिजात वर्गाचे वर्चस्व राहिले आहे. त्यांनी त्यांच्या सामाजिक आणि राजकीय हितसंबंधांना फारसा प्रतिकार न करता निर्मिती केली आहे. उपेक्षित गट हे मनोरंजनाचे निष्क्रिय प्राप्तकर्ते आहेत. ते त्यांच्या जीवनाबद्दल किंवा आवडींबद्दल फारसे बोलत नाहीत. अशा व्यवस्थेत लोकशाही सुधारणा आवश्यक आहे. आंबेडकरांचा पडद्यावर झालेला उदय आणि नवजात दलित सिनेमा शैलीत, एका नवीन आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार सिनेमॅटिक संस्कृती आणण्याची क्षमता आहे. तिच्यात चित्रपट उद्योगाचे खर्‍या अर्थाने लोकशाहीकरण करण्याची क्षमता आहे!

(लेखक हरीश एस. वानखेडे हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) सेंटर फॉर पॉलिटिकल स्टडीज, स्कूल ऑफ सोशल सायन्सेस येथे सहायक प्राध्यापक आहेत. प्रस्तुत लेख The Frontline मध्ये २२ डिसेंबर २०२३ रोजी ‘Ambedkar, on a device near you’ या शीर्षकाखाली प्रकाशित झाला होता. त्याचा मराठी अनुवाद सौरभ बागडे, पुणे यांनी केला आहे.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]