पिंपरीचे विधवा प्रथा निर्मूलनाचे पाऊल

प्रमोदिनी मंडपे - 8600101063

‘अंनिस’ने हेरवाड आणि माणगाव या दोन ग्रामपंचायतींना त्यांच्या विधवा प्रथा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल गौरवले व पुरस्कृत केले. हेरवाडचे उदाहरण समोर ठेवून सातार्‍यातील कार्यकर्ते शंकर कणसे यांनी पिंपरी (ता. रहिमतपूर) या गावातील क्रांतिसिंह नाना पाटील ग्रामसंघ आणि ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या दोन संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातील सव्वाशे, दीडशे महिलांना एकत्र केले. त्या कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांनी त्यानंतर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. त्यापैकी भोसले मॅडम म्हणाल्या, “मला वैधव्य येऊन बावीस वर्षे झाली. या बावीस वर्षांत मला खूप वाईट अनुभव आले. लग्नकार्यात मला मागं सरकून बसावं लागायचं. पुढे जायचं नाही, हळद लावायची नाही, ओटी भरायची नाही. हे सगळं ऐकून वागून खूप वाईट वाटायचं. दहा वर्षे तर मी कुठे गेलेच नाही. नंतर विचार केला, आता आपली मुलं मोठी झाली. त्यांच्या कार्यात लोकांनी यायला हवं, म्हणून मी जायला लागले. मी बाळंतिणीची ओटी आणलेली असायची. शेजारणीला म्हणावं लागायचं, एवढी माझी ओटी भरा; पण त्या सुद्धा बर्‍याच वेळा दुर्लक्ष करायच्या. निदान मी समाविष्ट होते, तेवढं तरी समाधान होतं. नंतर कोणीतरी ते ओटी भरायचं. आजपासून मी आता भाग घेईन. अहो, आम्ही इच्छुक असतो; पण इतरांनी आम्हाला सामावून घ्यायला हवं ना!” तेथे सधवा व विधवा दोन्ही होत्या. सकाळी 10 वाजताच जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्यात त्यांची सभा घेतली. मी व वंदना माने या महिलांशी बोललो. अनेक महिलांनी आणि वर सांगितलेल्या दोन्ही गटाच्या प्रतिनिधींनी आपापली मतं मांडली. कणसे यांनी प्रतिज्ञा तयार केली होती. डॉ. माने यांनी स्वतः केलेली कविता चालीवर गाऊन दाखवली. मैदानामध्ये उभे करून सर्व महिलांना शपथ दिली. नंतर एकमेकींना कुंकू लावले. त्या वेळी प्रत्येकीच्या चेहर्‍यावर अतिशय समाधान दिसत होते.

त्यातल्या एका बाईच्या सासूबाई आणि आई दोघी विधवा होत्या. लोक म्हणायचे, ‘त्यांच्या हातून नको शुभकार्य करायला.’ पण आता मात्र त्या सासूला किंवा आईला विचारल्याशिवाय आणि त्यांना पुढं बोलवल्याशिवाय काही करत नव्हत्या. ममताबाई कणसे म्हणाल्या, “कधी-कधी लहान मुली विधवा झालेल्या असतात. आम्हाला पूर्वी जावंसं वाटायचं; पण असं झाल्यापासून मी कधी कुठल्या कार्यक्रमाला जात नव्हते. आता मात्र इथून पुढं नक्की जात जाईन.” यमुनाबाई जंगम म्हणाल्या, “लहान मुली विधवा होतात ना, तेव्हा खूप वाईट वाटतं. वय जास्त असेल तर वयोमानाप्रमाणे दुःख कमी असतं. पण लहान वयात; काही नकळत्या वयात कुठलं सुख मिळायच्या आधी असं झालं तर खूप गहिवरून येतं.” आणखी एक जण म्हणाली, “माझी मावशी विधवा झाली आणि त्या वेळेला तीच पद्धत होती. त्या प्रेतावरच तिचे अलंकार, जोडवी, बांगड्या काढायला सुरुवात झाली; आणि ते पण पुरुष काढत होते. इतकं वाईट वाटत होतं. त्या दुःखात ती तर बेशुद्ध झाली. सगळं समाजासमोर कशाला करायचं ना! तिला वेळ पण दिला नाही.”

विद्याताई जाधव म्हणाल्या, “माझी एक मैत्रीण होती. आणि तिचे मिस्टर गेले, तेव्हा मी तिथे गेली होती. या म्हणताहेत तसंच बघा. तिसर्‍या दिवशी महिला नुसत्या तुटून पडल्या. बांगड्या काढताहेत, मंगळसूत्र काढत आहेत. मला चैन पडना. मी म्हटलं, ‘तिला जरा तरी सावरू द्या.’ त्या थांबल्या आणि आजपर्यंत तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. मला बरं वाटलं.” सुमन जाधव सांगत होत्या, “माझी पुतणी विधवा झाली. लोक मंगळसूत्र काढायला लागले, बांगड्या फोडायला लागले तर तिनं स्वतःच्या हातानं ते सगळं काढून दिलं, जोडवी दिली. म्हणाली, ‘मला याचं काही वाटत नाही. नवरा दारू पित होता, मारत होता. सुखच नव्हतं. असला काय गेला काय!”

आणखी एका ताईनं सांगितलं, “माझा मुलगा म्हणतो कुंकू लाव. पण अजून वर्षश्राद्ध झालं नाही. आता ऐकताना माझं हृदय भरून आलं. असं वाटतं कुणी काय म्हणंल का? मी बाहेर पहिल्यांदाच आले आज. काही महिलांना त्यांच्या घरातील कार्यात भाग घेता आला नाही. शेजारणीकडून सगळं करून घ्यावं लागलं; पण शेजारीण आता म्हणते, ‘मुलाच्या लग्नात तरी त्यांना आमच्याबरोबर तेे सगळं करता येईल. आम्हाला पण बरं वाटेल.”

रजनी माझी विद्यार्थिनी. तिचा नवरा काविळीमुळे वारला. तिचं लग्न होऊन फक्त तीन वर्षं झाली होती. गळ्यात नवेकोरे फॅशनेबल मंगळसूत्र होते. तिला ते काढायचे नव्हते. त्यावेळी तिने सांगितले, “हे माझ्या स्वप्नात आले व मला शपथ घातली. म्हणाले, ‘काही झालं तरी मंगळसूत्र काढायचं नाही. कुंकू पुसायचं नाही.” ती आजतागायत मंगळसूत्र घालते आहे. तिने शोधलेला उपाय खरंच खूप मनाला भावला. एक ऑफिसर महिला स्वतःचा अनुभव सांगत होत्या. आठ वर्षे त्या पतीपासून विभक्त होत्या. त्यावेळी शेजारणी त्यांना सर्व कार्यक्रमांत बोलवत होत्या. नुकतेच मिस्टर वारले. हे इतरांनाही कळले आणि आता त्या शेजारणी बोलवत नाहीत. त्या म्हणाल्या, “मी पूर्वी जशी होते तशीच आज आहे, कुंकू लावते, मंगळसूत्र घालते; पण इतर महिलांना मी कुंकू लावत नाही न जाणो त्यांना नाही आवडले तर…!”

दशरथ रणदिवे यांनी यावर एक व्हिडिओ तयार केला. तो पाहून विविध प्रतिक्रिया आल्या. एका स्त्रीने सांगितले, “मी हा व्हिडिओ पाहून खूप रडले, शब्द नाहीयेत माझ्याकडे कौतुक करायला. अतिशय छान उपक्रम. खूप छान! ताई, तुम्ही सगळ्या देवी आहात. मी स्वतः या सगळ्या यातना भोगल्या. समाज विधवा महिलांना अर्धमेली करतो. ही अनिष्ट प्रथा बंद करायला कायदाच करायला हवा शासनाने. ही नम्र विनंती.” दुसर्‍या एका बंधूने एक कविता केली आहे. त्यांनी सांगितले की, “हा उपक्रम स्तुत्य आहे. सलाम तुमच्या कार्याला! आणि विधवा भगिनींच्या जीवनावर मी एक गाणे तयार केले ते पाठवतो.” सर्व महिलांना यावेळी शपथ दिली. त्यामध्ये – ‘एखाद्या स्त्रीचा पती निधन पावला तर मी तिचे कुंकू पुसणार नाही. बांगड्या फोडणार नाही. गळ्यातील कोणतेही अलंकार काढणार नाही. अशा महिलांना माझ्या घरगुती कार्यक्रमात सामावून घेऊन इतर महिलांप्रमाणे सन्मानाची वागणूक देईन’. या अर्थाची शपथ सर्वांनी त्या ठिकाणी घेतली.

लेखिका संपर्क ः 86001 01063


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]