फारूख गवंडी - 8766980285
अगर हिजाब नोचोंगे, तो हिजाब के साथ हूँ |
और अगर हिजाब थोपोगे, तो हिजाब के खिलाफ हूँ |
इराणमधील २२ वर्षांची तरुणी मेहसा अमिनी. नुकतंच तारुण्यात पदार्पण केलेली, भविष्यातील अनेक स्वप्ने रंगवत, नुकतंच फुलत असणारं निरागस फूल. पण तिला याची कल्पना देखील नसणार, लवकरच हे निरागस फूल अमानुषपणे खुडले जाणार आहे, जशा हजारो लाखो निरागस कळ्या, फुले खुडल्या जातात. राजरोसपणे. दररोज. दि १३ सप्टेंबर, २०२२ रोजी भावासोबत ती इराणची राजधानी तेहरान या शहरात पर्यटनासाठी गेली. बस तेहरानला पोहोचताच तिला अटक करण्यात आली. ही अटक, इराण सरकारने नैतिकतेचे नियम पाळण्यासाठी ज्यांची पगारी नेमणूक केली आहे, त्या पोलिसांनी केली. त्याला ‘मोरल पोलिसिंग’ अर्थात ‘गस्त ए इर्शाद’ म्हटले जाते. असे पोलीस तिकडे पगारी नेमले आहेत. आपल्याकडे अजून अशा ‘मोरल पोलीस’ अर्थात संस्कृतिरक्षकांना सरकारी पगार सुरू झाला नाही. पण ते स्वयंघोषित बिनपगारी फुल अधिकारी आहेतच की. अर्थात, नैतिकतेची जबाबदारी पुरुषांच्या जगात स्त्रियांकडेच घाऊक दिलेली असते. त्यामुळे सगळी बंधने आणि जबाबदारी अपरिहार्यपणे स्त्रियांकडेच असते. मेहसाने हिजाब डोक्यावरून व्यवस्थित घेतलेला नव्हता, हा तिच्यावर आरोप होता. आता व्यवस्थित म्हणजे कसा? याची काही व्याख्या तिकडच्या कायद्यात करण्यात आलेली नाही. इराण मध्ये सन १९३६ साली हिजाबवर बंदी घालण्यात आली; म्हणजे सार्वजनिक ठिकाणी हिजाब बॅन. सन १९७९ साली आयातुल्ला खोमानी यांच्या नेतृत्वाखाली इस्लामिक क्रांती झाली आणि इराणला इस्लामिक प्रजासत्ताक घोषित करण्यात आले; म्हणजे ‘शरियत’ कायदा लागू झाला; म्हणजे धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र आली आणि सुरू झाला खेळ, सामान्य लोकांच्या जीवाशी. मग सगळीकडे बंधने आलीच आणि याचे सर्वांत जास्त बळी या स्त्रियाच असणार होत्या. महात्मा फुलेंनी सांगितल्याप्रमाणे सर्वच धर्मग्रंथ पुरुषांनी लिहिल्यामुळे स्त्रियांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. झालंही तसंच. सन १९८० साली सर्वप्रथम सरकारी कार्यालयात हिजाब सक्तीचे झाले. सन १९८३ साली सात वर्षांवरील सर्व स्त्रियांना हिजाब सक्तीचे करण्यात आले. पुढे, हिजाब नसेल तर तो दंडनीय अपराध ठरवण्यात आला. तो नसेल किंवा व्यवस्थित नसेल, तरीसुद्धा १० ते ६० दिवसांचा तुरुंगवास. १०० ते १००० रुपयांपर्यंत दंड किंवा ७४ चाबकाचे कोडे मारणे आदी शिक्षा कायद्याने संमत झाल्या, तर आपल्या मेहसा अमिनीला या संस्कृतिरक्षकांनी पोलीस स्टेशनमध्ये नेले. मेहसाला जिवंत नेण्यात आले होते. पण एका तरुणीच्या जिवंत, खळाळत्या, निरागस शरीराचे रूपांतर आपल्या ‘महान’ धर्माच्या रक्षणासाठी निर्जीव, बेकार प्रेतामध्येच करून तीन दिवसांनी कुटुंबीयांकडे देण्यात आले. पोलीस जरी म्हणत असले की, मेहसाला अटक केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे उपचारांसाठी तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिच्या कुटुंबीयांना हे मान्य नाही, त्यांच्या म्हणण्यानुसार ती निरोगी होती. तिला कधीही हृदयविकाराचा त्रास नव्हता. तिच्या अंगावरील, विशेषतः चेहरा आणि पायांवरील जखमा स्पष्ट दाखवतात की, हा संस्कृतिरक्षकांनी केलेला सरकारी खूनच आहे. इतकी प्रचंड मारहाण अटक करताच तिला करण्यात आली. यावरून स्त्रियांबद्दलच्या द्वेषाचा कोणता कडक गांजा हे संस्कृतिरक्षक मारतात, हे स्पष्ट होते. मेहसाच्या अकाली मृत्यूनंतर इराणमध्ये स्त्रियांचे अद्भुत आंदोलन सुरू झाले. अनेक इराणी स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. हिजाब काढून त्यांची त्या जाहीर होळी करीत आहेत. पुरुषी दृष्टिकोनातून सौंदर्याचे प्रतीक समजले जाणारे स्वतःचे केस कापून टाकत आहेत. स्वतःच्या केसांचा जुडगा काठीला अडकवून निषेधाचा झेंडा बुलंद करीत आहेत. काही तरुणी हिजाबच काय, तर शरीरावरील कपडे काढून आधुनिक तरुणी असल्या मध्ययुगीन मानसिकतेला भीक घालणार नसल्याचा निर्धार व्यक्त करीत आहेत. या आंदोलनात तीसपेक्षा जास्त आंदोलक पोलीस गोळीबारात बळी गेले आहेत. हजारो लोक जखमी झाले आहेत. इराणच्या स्त्रियांची मागणी एकच आहे, हिजाबसक्तीसारखे स्त्रियांवर बंधने लादणारे कायदे रद्द करा आणि संपूर्ण आंदोलनाची घोषणा आहे. हुकूमशहा मुर्दाबाद! इराणमध्ये ही आंदोलने नवीन नाहीत. परंतु इराणचे पुरुषी हुकूमशहा असली आंदोलने निर्दयपणे चिरडून टाकीत आहेत. गेल्या १४ वर्षांपासून हिजाबविरोधी आंदोलन पत्रकार मसिह अली नेजाद ही सोशल मीडियावर चालवत आहे. विरोधामुळे आणि जीवाला धोका असल्याने ती अमेरिकेतल्या अज्ञात स्थळी राहून ‘ऑनलाइन’ आंदोलन चालवत आहे. सोशल मीडियावर महिलांनी हिजाब उतरवणे, केस मोकळे सोडणे, हिजाबची सार्वजनिक होळी करणे, आंदोलनाला पाठिंबा देणार्या पुरुषांनी स्वतः हिजाब घालून फोटो पोस्ट, शेअर करणे आदी आंदोलनाची कार्यपद्धती आहे. सोशल मीडियावर #LetUsTalk, MyStealthyFreedom, WhiteWednesday अशा‘ टॅगलाइन’वरून हिजाबविरोधात आवाज बुलंद केला जात आहे. आंदोलनाची जमेची बाजू ही आहे की, यात पुरुषांचा, युवकांचा, तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे. सध्या मेहसा अमिनीच्या निमित्ताने चालू असणारे हिजाबविरोधी आंदोलन हे इराणच्या नागरिकांचे नसून कुर्दिश नागरिकांचे आहे, असा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे. हे प्रचार करणारे भारतीय मुस्लिम संस्कृतिरक्षक तरुण आहेत. यात यांचे दोन दावे आहेत – एक कुर्दिश या वंशाच्या स्त्रियांचे हे आंदोलन आहे; संपूर्ण इराणच्या स्त्रियांचे नाही आणि दोन – कुर्दिश वंशाच्या लोकांचा धर्म मुसलमान नाही. वरील दावे तकलादू आणि ठिसूळ आहेत. ज्यांना ‘सामाजिक न्याय ’ही संकल्पना मान्य नाही, ज्यांना न्याय स्वतःच्या जाती, धर्म, पंथ, प्रांतापुरता मर्यादित आहे. जे माणसाला याच परिप्रेक्ष्यात पाहतात, त्यांना माणसांची दुःखे ती काय माहीत असणार? पण याची सत्यता देखील तपासू शकतो. तुर्की, इराण, इराक, सीरिया, आर्मेनिया या देशांत कुर्द समुदायाच्या लोकांची जनसंख्या जवळपास साडेतीन करोड आहे आणि या प्रत्येक राष्ट्रात ते अल्पसंख्य आहेत. फक्त इराकमध्ये कुर्दिश समुदायाचे प्रांतिक सरकार आहे आणि थोडेबहुत हक्क आहेत. पण इतर ठिकाणी त्यांना न्याय्य हक्कांसाठी झगडावे लागत आहे. इराणमध्ये १० टक्के कुर्दिश समाजाची संख्या आहे. ते लोकसंख्येच्या प्रमाणात तिसरे आणि अल्पसंख्य आहेत. कुर्दिश समुदायातील लोकांचा धर्म बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आदी आहे. पण मुख्यतः इस्लाम; आणि सुन्नी इस्लाम आहे, काही शिया मुस्लिम आहेत.
मुस्लिम जगतात नेहमीच हिजाब, बुरखा, नकाब, तीन तलाक, हलाला, बहुपत्नीत्व याची चर्चा होत असते. या सर्व बाबी मुस्लिम स्त्रियांशी संबंधित आहेत आणि याबाबतीत स्त्रियांना काय वाटते, हे लक्षात न घेता ही बंधने नेहमीच धर्माचा पुरुषांना सोयीस्कर अर्थ लावून तिच्यावर लादली जातात. सध्या मुस्लिमांचे राक्षसीकरण करण्यासाठी याचा सोयीस्कर वापर करण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक मुस्लिम स्त्रिया कोषात जात आहेत आणि परिवर्तन अवघड होत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी स्त्रियांना वेळ न देता, प्रबोधन न करता, त्यांच्या सुरक्षिततेची हमी न देता, जोर-जबरदस्तीच्या मार्गाने तिचे खच्चीकरण करण्यासाठी हिसकावून काढले जाते. त्यावेळी आपण तिच्यासोबत राहिले पाहिजे. वरील वस्त्रांबाबत नीटशी माहिती देखील आपण करून घेतली पाहिजे. उदा. – हिजाब म्हणजे फक्त ‘हेडस्कार्फ.’ डोक्यापासून मानेपर्यंत गुंडाळली गेलेली ओढणी. ही ओढणी आता सर्वत्र स्त्रिया, मुली वापरतात. बुरखा म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सर्व शरीर झाकणारा गाऊन. यात चेहरा, डोळे सोडून झाकला जातो आणि शक्यतो काळ्या रंगाचा असतो. शिया मुस्लिम स्त्रिया पांढरा बुरखा परिधान करतात आणि नकाब म्हणजे बुरख्याव्यतिरिक्त हात आणि पाय दिसू नयेत, म्हणून सॉक्स घालणे, म्हणजे डोळे सोडून नखशिखांत शरीर झाकणे. मुस्लिम स्त्रियांवरील या बंधनाबाबत ‘कुराण’ आणि ‘शरियत’चा देखील विचार करणे संयुक्तिक ठरेल. पवित्र कुराणमध्ये अनेक अरबांच्या रूढी, प्रथा, परंपरा यांचा उल्लेख आहे. साहजिकच त्या काळातील आणि भूभागाचे संदर्भ कुराणमध्ये आहेत. बुरख्यासंदर्भात कुराणातील काही ‘आयती’ म्हणजे श्लोकांचा अर्थ आपण पाहू. नजर खाली वळवून परस्परांशी बोलावे आणि लज्जारक्षणासाठी आपला देह वस्त्रांकित ठेवावा, या बाबी स्त्रिया नि पुरुष दोघांनाही समान आहेत. गुलामगिरीची प्रथा असणार्या काळात गुलाम स्त्रिया या उपभोग्य वस्तू आहे, अशी समाजाची धारणा होती. त्यामुळे त्यांची छेडछाड करणे हा आपला अधिकार ते समजत. तेव्हा गुलाम स्त्रिया व कुलीन स्त्रिया यांच्यातील फरक स्पष्ट व्हावा; विशेषतः पहाटेसारख्या अंधुक प्रकाशात, म्हणून कुलीन स्त्रियांनी सादरीसारखे वस्त्र आपल्या डोक्यावरून व अंगावरून घ्यावे, अशा अर्थाचा एक श्लोक आहे. महाराष्ट्रातील अजगर अली इंजिनियर, अब्दुल कादर मुकादम ते जगभरातील अनेक इस्लामी तत्त्ववेत्त्यांनी यासंदर्भात मोठी चर्चा आणि मांडणी केलेली आहे. कुराणाची पुरोगामी मांडणी करणारे अभ्यासक; यात मुस्लिम स्त्रिया देखील आहेत. ते म्हणतात, “नखशिखांत बुरखा घेऊन आपला देह झाकून ठेवावा, असा अर्थ काढण्यास कुराण व ‘हदीस’ वाङ्मयात कसलाही आधार नाही. स्त्रियांनी विनयशील वेशभूषा करावी, अशी कुराणाची रास्त अपेक्षा आहे. पण कडव्या मुल्ला-मौलवींना हा अर्थ मान्य नाही आणि बहुतांश मुस्लिम समाज या मुल्ला-मौलवींच्या धार्मिक प्रभावाखाली आहे. दुसरा मुद्दा आहे, ‘शरियत’चा. इस्लामिक प्रजासत्ताक घोषित करणे, म्हणजे ‘शरीयत’ च्या कायद्यानुसार राज्य चालवणे. ‘शरियत म्हणजे समाजच्या नियंत्रण व नियमनासाठी बनवण्यात आलेली आचारसंहिता; आणि यासाठी निर्माण केलले न्यायशास्त्र म्हणजे फिक.’ थोडक्यात, इस्लामी जनतेचं नियमन आणि नियंत्रण करणारा कायदा. हे कायदे बनवत असताना इस्लामच्या दोन स्तोत्रांपासून बनविले जातात. एक कुराण आणि दोन मोहम्मद पैगंबर साहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या जीवनचरित्रावर लिहिले गेलेले प्रसंग, ज्याला ‘सुन्ना’ म्हणतात. हे सर्व एकत्र करून लिहिले गेले याला ‘हदीस’ म्हणतात. इतके सर्व लक्षात घेतल्यानंतर आपणास कळू शकते की, जवळपास दीड हजार वर्षांपूर्वींचे कायदे जर आधुनिक, एकविसाव्या शतकातील माणसांना लागू करायचे झाले, तर काय-काय अडचणी येणार आणि हे कायदे करणार ते सर्व पुरुषच. म्हणूनच ज्या-ज्या मुस्लिम राष्ट्रांत ‘शरियत’चे कायदे लागू आहेत, त्या-त्या ठिकाणी स्त्रिया आणि सर्वसामान्य नागरिकांचे असेच दमन होत आहे. आधुनिक मानवाने आधुनिक मूल्ये घेऊन वाटचाल करावी. अर्थात, जुने कोणत्याही धर्मातील असो, जे-जे चांगले, ते-ते घ्यावं. पण चांगले म्हणून घ्यावे. अशावेळी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. डॉ. दाभोलकर सर्वच धर्मांची कठोर; पण विधायक चिकित्सेचा आग्रह ‘अंनिस’च्या माध्यमातून धरत. यातून धर्माची फोलफट निघून जातील आणि मूल्यव्यवस्थेचा रसरशीत गाभा घेऊन पुढे जाता येईल, असे ते म्हणायचे आणि सर्व संत आणि समाजसुधारकांनी हेच काम केल्याचे ठासून सांगायचे. जरी आंदोलन इराणचे असलेे तरी भारतीयांनी यातून धडा घेण्यास हरकत नाही, नाहीतर मुस्लिम देश किती कट्टर आहेत, असले तुणतुणे वाजवून आपली द्वेषाची तलफ भागवण्यासाठी याकडे बघू नये. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांची युती किती अभद्र असते, याचा गांभीर्याने विचार कृती करावी. ज्यांनी भारतात. ‘शरियत में दखलअंदाजी नहीं चलेगी,’ अशा घसा फोडून घोषणा दिल्या. आणि ‘पहले हिजाब, फिर किताब’ अशी ऊरबडवी पोस्टर लावली, अशांच्या किती नादी लागायचे, हे भारतीय मुसलमानांनी, आणि त्यात मुस्लिम स्त्रियांनी या घटनेतून लक्षात घेतले पाहिजे. धर्म ही गोष्ट प्रगतीच्या आडवी येऊ देऊ नये. धर्मावर आधारित व्यवस्था त्या देशातील स्त्री-पुरुषांना कशी उघडी-नागडी करून भिकेला लावते, हे हिंदूंच्या नावावर ब्राह्मणी राष्ट्र ज्यांना हवे आहे, त्यांनी लक्षात घ्यावे आणि खरंच या घटनेचा निषेध करायचा असेल, तर भारताची वाटचाल इराणच्या वाटेवर न करण्याची शपथ घ्यावी.
वर्ग, लिंग, जाती, धर्म, प्रांत अशा सर्व प्रकारच्या भेदांस स्त्री ही बळी आहे. सर्व जातींचं, धर्मांचं, संस्कृतीचं, नैतिकतेचं रक्षण करण्याची जबाबदारी पुरुषी व्यवस्थेने घाऊकपणे तिच्यावर लादली आहे, म्हणून साहीर उद्वेगाने म्हणतो –
औरत ने जन्म दिया मर्दों को,
मर्दोने उसे बाजार दिया.
बाजार म्हणजे वेश्यालय.
म्हणून या दमनकारी व्यवस्थेविरुद्ध, तिच्या स्वातंत्र्यासाठी लढणारी प्रत्येक स्त्री स्वतःसाठी लढताना दिसत असली तरी ती लढाई संपूर्ण मानवतेसाठी असते आणि म्हणूनच लढणारी प्रत्येक स्त्री माझी मुलगी, बहीण, आई असते. माझा त्यांना संपूर्ण पाठिंबा असतो; मग त्या इराणच्या स्त्रिया असोत, कर्नाटकातील मुस्कान असो व शाहीनबागच्या शानदार स्त्रिया असोत. मुद्दा साधाच आहे – स्त्रिया न्याय मागत आहेत. पितृसत्ताक व्यवस्थेने तो नाकारला नाही पाहिजे. शेवटी एका अनाम कवीची भावना महत्त्वाची आहे –
हमारी बेटियाँ, तुम्हारी बहनें!
कब क्या ओढ़ें, कब क्या पहनें!!
इसका ़फैसला, अब वही करेंगी!
साड़ी, जिंस, हिजाब या गहने!!
लेखक संपर्क ः ८७६६९ ८०२८५