अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल

साभार लोकसत्ता -

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.

हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का, याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने 2019 रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाडीत हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.

पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणार्‍या दुबईस्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती; तज्ज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी 95 लाखांचे सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आले.

पिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण 7.5 कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा, यासाठी सीबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकार्‍यानं सांगितलं आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं, हे स्पष्ट होईल.