-
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रभा पुरोहित यांचे आत्मकथन ‘आमी बी घडलो…’ याचे प्रकाशन प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते, अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात तसेच प्रमोद निगुडकर आणि अनिरुद्ध लिमये यांच्या विशेष उपस्थितीत केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या मृणाल गोरे दालनात गोरेगाव, मुंबई येथे संपन्न झाले.
या वेळी कवयित्री नीरजा म्हणाल्या, “हे पुस्तक म्हणजे अंनिस चळवळीचा दस्तावेज आहे. सध्याच्या अस्थिर सामाजिक आणि राजकीय वातावरणात जेव्हा एकदम निराश व्हायला होते, तेव्हा अशी पुस्तके आपल्याला उभारी देतात. संत तुकारामांच्या ‘आमी बी घडलो तुमी बी घडा ना’ या अभंगातील ‘आमी बी घडलो…’ हे या पुस्तकाचे शीर्षक आहे. ते प्रभाताई यांच्यासाठी अगदी सार्थ आहे.
प्रमुख पाहुण्या नीरजा पुढे म्हणाल्या की, सध्या धर्माचे अवडंबर माजविले जात आहे, त्यातून संस्कृतीचे डबके तयार होत आहे. तेव्हा अशा परिवर्तनवादी चळवळींची आवश्यकता वाढत आहे. तर्कशुद्ध विचार करणारे विचारवंत आता दिसत नाहीत. त्यामुळे प्रतिगामी लोक आपल्याला अनेक शतके मागे नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेव्हा ‘अंनिस’ सारख्या चळवळीची गरज निर्माण होते.”
अंनिसच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की, प्रभाताईंचे हे पुस्तक सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून वाचायला हवे. आत्मकथनाबरोबरच ते अंनिस चळवळीचा इतिहासही सांगते.
लेखिका प्रभा पुरोहित म्हणाल्या की, माझ्या ह्या जडणघडणीसंबंधी लिहीत असताना अंनिसच्या सान्निध्यातील मंतरलेले ते दिवस आणि डॉ. दाभोलकरांच्या कल्पक नेतृत्वाखाली आपले प्रभावक्षेत्र सातत्याने विस्तारणारी अंनिस पुन्हा अनुभवता आली. माझे हे लेखन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारे आणि थोडेफार चळवळीतल्या कार्यकर्त्यांना उत्साह देणारे आणि थोडेफार मार्गदर्शन करणारे ठरावे अशी माझी मनोमन इच्छा आहे. “संत बसवेश्वरांचा अनुभवमंटप जाळणारे, तुकारामांची गाथा पाण्यात बुडविणारे, गांधींना संपविणारे, दाभोलकर, पानसरे यांचा खून करणारे आणि परवा पुण्यात निखिल वागळे, असीम सरोदे ह्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे हे सारे सूत्रधार एकाच सनातनी कुळीतले आहेत असे मला वाटते. अशा मार्मिक उद्गारांनी त्यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.
याप्रसंगी प्रमोद निगुडकर, अनिरुद्ध लिमये, राहुल थोरात, पुस्तकाच्या संपादिका संगीता जोशी यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. प्रा. ज्योती मालंडकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, तर अंनिसच्या मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष सुनीता देवलवार यांनी आभार मानले.
अंनिस गोरेगाव शाखेचे कार्यकर्ते नितांत पेडणेकर, शुभदा निखार्गे, राजेंद्र लांजेकर, सई सावंत, अमित फोन्डेकर, दीपक कसबे आणि आशा पडळकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
या कार्यक्रमास वंदनाताई शिंदे, किरण जाधव, गणेश चिंचोले, भाऊ सावंत, अर्जुन जगधने, अनिश पटवर्धन, अक्षिता पाटील, चंद्रकांत कांबळे आदी अंनिस कार्यकर्ते उपस्थित होते.