डॉ. विनायक हिंगणे -

पारंपरिक औषधी आणि घरगुती उपाय आपल्याला सगळ्यांना जवळचे वाटतात. आजीबाईचा बटवा किंवा स्वयंपाकघरातील पदार्थ असो, आपल्याला त्यांच्या रूपात एक सुरक्षित व भरवशाचा उपाय दिसत असतो. थोडी कणकण असली, तर आपले घरगुती कम्फर्ट फूड आपला पहिला उपाय असतो. किरकोळ त्रास असेल तर आपण घरगुती उपायच करतो. बहुधा त्याचा फायदा सुद्धा होतो. घरगुती उपायातील बरेचसे पदार्थ हे आपल्या अन्नाचा भाग असतात. उदाहरण म्हणजे काही मसाल्याचे पदार्थ औषध म्हणूनसुद्धा वापरतात. काही पदार्थ हे ठरावीक त्रासांसाठी औषध म्हणून राखीव असतात. बहुदा त्यांचा उपयोग थोड्या काळासाठी करण्यात येतो. हे उपाय बरेचदा मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीत येतात. क्वचित मित्रपरिवार- नातेवाईक यांच्या सल्ल्याने असे उपाय केले जातात. अनुभव चांगला आल्यास ते पुढे पाठवले जातात. थोड्या काळासाठी आणि सौम्य त्रासांसाठी असे उपाय बर्यापैकी सुरक्षितसुद्धा ठरतात. मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करणे किंवा पाण्याची वाफ घेणे असे उपाय डॉक्टरसुद्धा सुचवतात; पण अशा उपायांच्या मर्यादा लक्षात घेणे हेसुद्धा महत्त्वाचे ठरते. विशेषतः माहितीच्या महापुरात व जाहिरातबाजीच्या काळात आपण घरगुती उपायांना वैद्यकीय उपचार समजण्याची चूक होऊ शकते. आजच्या लेखात आपण अन्नघटकांच्या औषधी गुणधर्मांचे फायदे आणि मर्यादा यांचा थोडा विचार करू या.
आपण अनेक गोष्टी अचूकपणे मोजतो त्याप्रमाणे औषधाचा फायदा आणि तोटा सहजपणे मोजता येत नाही. एखाद्याने औषध घेतल्यावर त्याला वैयक्तिक फायदा झाल्याचे जाणवू शकते; पण प्रत्यक्षात हा फायदा त्या औषधामुळे झाला आहे की योगायोग आहे हे पडताळून बघणे आवश्यक असते. यासाठी एक पद्धत आधुनिक वैद्यकशास्त्रात विकसित झाली आहे. याला रँडमाईज कंट्रोल ट्रायल किंवा ठउढ असे म्हणतात.
एखाद्या औषधाचा किंवा खाद्यपदार्थाचा खरा फायदा कितपत होतो हे समजण्यासाठी आपल्याला RCT समजून घ्यावे लागेल. या पद्धतीत आपण रुग्णांचे दोन गट करतो. या दोन्ही गटांमध्ये साधारणतः समानता असणारे पेशंट असतात. ज्या औषधाचे परिणाम आपल्याला तपासून बघायचे असतात, ते टेस्ट औषध आपण एका गटाला देतो. दुसर्या गटामध्ये आपण प्लॅसिबो म्हणजेच कुठलेही गुणधर्म नसणारे औषध देतो. आता टेस्ट औषधाने किती फायदा होतो ते प्लॅसिबो औषधाशी तुलना करून बघतो. कधी कधी टेस्ट औषधांची तुलना प्रस्थापित स्टँडर्ड उपचाराशी करतो. जर टेस्ट औषधाचा फायदा प्लॅसिबोपेक्षा लक्षणीय दिसत असेल तरच त्याला फायदा म्हणता येईल. जर फारसा फरक नसेल तर टेस्ट औषधाचा फायदा हा एक योगायोगच म्हणावा लागेल. दोन्ही मधील फरक तपासण्यासाठी संख्याशास्त्राचा उपयोग केला जातो.
नवीन कुठलेही औषध प्रभावी ठरवण्याआधी आरसीटी केल्या जाते. बरेचदा वेगवेगळ्या रुग्णांच्या गटांमध्ये अशा आरसिटी केल्या जातात. अशा अनेक आरसीटींचा संकलित अभ्याससुद्धा आपल्याला करता येतो. या सगळ्या शास्त्रीय अभ्यासात आपल्याला औषधाच्या फायद्याचा एक शास्त्रीय पुरावा मिळतो. आधुनिक औषधशास्त्रात आरसिटीमधून मिळालेला पुरावा हा मजबूत पुरावा मानण्यात येतो. काही अभ्यासांमध्ये दोन गटात तुलना करण्यात येत नाही फक्त एका गटातील प्रभाव बघण्यात येतो. हे अभ्याससुद्धा महत्त्वाचे असतात; पण त्यांचा पुरावा अॅलींपेक्षा कमकुवत असतो. डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा अनुभव हासुद्धा महत्त्वाचा असतो; पण वैज्ञानिकदृष्ट्या यांचा पुरावा हा दुय्यम मानला जातो. कारण त्यात वैयक्तिक पूर्वग्रह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाद्यघटकाचा एखादा परिणाम अभ्यासतानासुद्धा अशा आरसिटी करण्यात येतात. एखादा खाद्यपदार्थ किती गुणकारी आहे याची आरसिटी उपलब्ध असल्यास त्याचा पुरावा आपल्याला फायद्याचा ठरतो.
काळे जिरे (ब्लॅक क्युमिन) याचे शास्त्रीय नाव नायजेला सटायवा असे आहे. या काळ्या जिर्याचे उदाहरण आपण बघू या. जून २०२३ च्या जर्नल ऑफ फंक्शनल फुड्स या वैद्यकीय जर्नलमध्ये नायजेला सटायवावर एक मेटा अॅनालिसीस प्रसिद्ध झाला. मेटा अॅनालिसीस म्हणजे आरसीटी अभ्यासांचा एक सामूहिक अभ्यास. नायजेला सटायवावर जवळपास २७ आरसिटी अभ्यास सापडले व त्यातील २१ अभ्यास मेटा अॅनालिसिससाठी उपयुक्त दिसले. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अॅलींमध्ये नायजेला सटायवाचे पावडर किंवा तेल हे प्लेसेबो किंवा सनफ्लावर तेल विरुद्ध तपासण्यात आले. या वेगवेगळ्या आरसिटीमध्ये नायजेला सटायवा हे वजन कमी करण्यासाठी प्लॅसेबोपेक्षा जास्त उपयोगी आहे, असे दिसले. या सगळ्या आरसीटींचा सामूहिक अभ्यास केला असतासुद्धा नायजेला सटायवा (काळे जिरे) आठ आठवडे खाल्ल्यास वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे काळे जिरे हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते याला भक्कम वैज्ञानिक पुरावा आपल्याला सापडतो.
याविरुद्ध आपल्याकडे वजन कमी करण्यासाठी प्रचलित असलेला एक घरगुती उपाय म्हणजे लिंबू आणि मध रोज सकाळी घेणे. हा उपाय खूप प्रसिद्ध असला तरीही त्याच्या उपयुक्ततेविषयी शंका उपस्थित केली जाते. माझ्या काकांनी सलग वर्षभर मध लिंबू घेऊन जवळपास पाच बाटल्या मध संपवले पण वजन अर्धा किलो सुद्धा कमी झाले नाही.
या विषयी आपण शास्त्रीय अभ्यास शोधायला गेल्यास फारसे अभ्याससुद्धा सापडत नाहीत. लिंबू व मध खाल्ल्यामुळे वजन कमी होते असे दाखवणारी एकही आरसिटी आपल्याला दिसत नाही. त्यामुळे लिंबू व मध खाऊन वजन कमी होते असे म्हणायला वैज्ञानिक पुरावा आपल्याला उपलब्ध नाही.
काळ्या जिर्यात थायमोक्विनोन नावाचा घटक आढळतो. हा घटक थायराइड व इन्सुलिन या हार्मोन्सवर परिणाम करून वजन कमी करण्यासाठी मदत करतो असा वैज्ञानिकांचा निकष आहे. प्लॅसिबो व सूर्यफूल तेल यांच्या विरुद्ध जेव्हा काळे जिरे तपासले गेले तेव्हा काळ्या जिर्यामुळे वजन कमी होते हे दिसले. मधातसुद्धा वजन कमी करणारे घटक आहेत, असा काही वैज्ञानिकांचा अंदाज आहे; पण मध आणि लिंबू खाऊन वजन कमी होते असे शास्त्रीय अभ्यासात दिसून आले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात लिंबू मधाने वजन कमी होण्याची शक्यता कमी असते. यात वैयक्तिक अनुभवाची भर घालायची असल्यास मध व लिंबू खाणारे अनेक रुग्ण वजन कमी होण्याऐवजी वजन वाढवून येतात असे मला दिसले आहे.
आहारात एखादा पदार्थ जर काही औषधी गुणधर्म देत असेल तर छानच आहे; पण जिथे औषधी गुणधर्म तिथे दुष्परिणाम सुद्धा आलेच. त्यामुळे अशा औषधी गुणधर्माचा आहार घेताना काही काळजी घ्यावी लागते. पपनस किंवा ग्रेप फ्रूट नावाचे फळ हेसुद्धा वजन कमी करण्यासाठी काही लोक वापरतात. हे फळ जास्त प्रमाणात खाल्ल्याने त्यातील काही घटक इतर औषधांच्या कामात अडथळा निर्माण करू शकतात. हीच घटना एका तरुणीच्या बाबतीत घडली. तिला डीप वेन थ्रोंबोसिसला सामोरे जावे लागले. (म्हणजेच पायाच्या मोठ्या शिरेत रक्ताची गाठ झाली) ही केस लॅनसेट या वैद्यकीय जर्नलमध्ये एप्रिल २००९ ला प्रकाशित झाली. जास्त सेवनाने एखाद्या फळाचासुद्धा दुष्परिणाम होऊ शकतो, असे इथे दिसले. दुसरे एक उदाहरण बघू या. कीटो डायट किंवा कमी कर्बोदके असलेले आहार हे रक्तशर्करा म्हणजे शुगर कमी करण्यासाठी मदत करतात. याबद्दलसुद्धा अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत; पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा औषधे गरजेनुसार न जुळवता असे आहार घेतल्यास शुगर खूप होऊन त्रास होण्याचा धोका असतो. त्यामुळे आहारात औषधी गुणधर्माचे खाद्यपदार्थ वापरताना सारासार विचार व गरज पडल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक असतो.
घरगुती उपाय हे कधीतरी उपयोगी तर कधीतरी कुचकामी असतात हे आपल्याला वरील उदाहरणांवरून कळले असेल. आपण दर वेळी अशा उपचारांची शास्त्रीय शहानिशा करू शकत नाही. त्यामुळे जिथे आरोग्याला मोठा धोका असेल किंवा काळजीचा आजार/ लक्षणे असतील अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक ठरतो. नाहीतर कॅन्सरसारख्या ठिकाणीसुद्धा आवश्यक असे उपचार सोडून लोक निरर्थक उपचार करत बसतात.
काही दिवसांपूर्वी एका क्रिकेटरने स्वतःची पत्नी ही इंटरमिटंट फास्टिंग (दिवसातून काही काळ उपाशी राहणे) व आहारात काही बदल केल्याने कॅन्सर मुक्त झाली असे घोषित केले. यात त्या पेशंटवर शस्त्रक्रिया व केमोथेरपीसारखे उपचार झाले ही गोष्ट मागे पडली व सामान्य लोकांना असे वाटायला लागले की, फक्त आहारबदल, हळद, कडुनिंब व इंटरमिटंट फास्टिंगमुळे रुग्ण पूर्णपणे बरा झाला. हा गैरसमज एवढा मोठा होता की, काही रुग्णांनी योग्य वैद्यकीय उपचार सोडून त्या ऐवजी उपास करण्याचा विचार केला. त्यामुळे टाटा कॅन्सर रुग्णालयाला जनजागृती करणारे एक पत्रकच काढावे लागले. कॅन्सर हा गुंतागुंतीचा आजार असून त्याचा उपचार अनेक पातळ्यांवर करावा लागतो. इंटरमिटंट फास्टिंगचे आरोग्याला काही फायदे होतात. निरोगी आहारसुद्धा महत्त्वाचा आहेच. हळदीचे काही गुणधर्म आरोग्याला फायद्याचे आहेत; पण याचा अर्थ त्यामुळे कॅन्सर बरा होतो असे नाही. आपण सुरुवातीस बघितल्याप्रमाणे आरसिटी किंवा मेटा अनालीसिस असे भक्कम पुरावे असलेले अभ्यास या बाबतीत उपलब्ध नाहीत. या उलट शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिओथेरपी इत्यादींचा कितपत फायदा होतो, याविषयी अनेक सखोल अभ्यास उपलब्ध आहेत. जरी सगळेच कॅन्सर रुग्ण यामुळे पूर्ण बरे होत नसले, तरी अनेक रुग्ण अशा आधुनिक वैद्यकीय उपचारांनी कॅन्सरमुक्त होत असतात. जे पूर्ण बरे होत नाहीत त्यांनासुद्धा दुखणे व त्रास कमी करण्यासाठी आधुनिक उपचार मदत करत असतात. हे वैद्यकीय उपचार करताना काही साईडइफेक्ट्ससुद्धा रुग्णांना होतात. कुठलाही सबळ पुरावा नसलेले उपचार करताना त्यांचा फायदा होण्याची आशा कमी असते. शिवाय साईडइफेक्टसुद्धा होण्याची भीती असते. उपाशी राहण्याने कॅन्सर रुग्णांना कुपोषण होऊन धोका वाढतो. अशा कारणाने कॅन्सरच्या रुग्णांना आहार हा तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्यास व आवश्यक त्या शस्त्रक्रिया आणि औषधीसुद्धा तज्ज्ञांच्या सल्ल्याने दिल्यास फायदा होतो.
हेच चित्र जीवनशैलीशी निगडित आजारांच्या बाबतीत मात्र वेगळे आहे. इंटरमिटंट फास्टिंग व आहार बदल हे लठ्ठपणा, डायबेटिस इत्यादी आजारांच्या उपचारात खूप महत्त्वाचे ठरतात. इथे आहार बदल हा प्राथमिक उपचार ठरतो. याबद्दलसुद्धा शास्त्रीय अभ्यास उपलब्ध आहेत. वैद्यकीय पाठ्यपुस्तकातदेखील डायबेटिस व उच्च रक्तदाबाच्या उपचारात प्रथम आहार बदल सुचविला जातो.
आजारांची गंभीरता जशी वाढत जाईल तसे उपचार व आहार यांची भूमिका किचकट होत जाईल. तज्ज्ञांची गरजही त्याच प्रकर्षाने जाणवेल. आपण साधी छोटी यंत्रे स्वतः ठीक करू शकतो; परंतु किचकट यंत्रांना हात घालणे अवघड असते तसा हा प्रकार आहे. सेल्फ हेल्प पुस्तके, व्हिडिओ व माहितीचा सुकाळ आपल्याला एक खोटा आत्मविश्वास देतात. त्याला बळी पडून निर्णय घेण्याऐवजी विवेकी निर्णय घेतल्यास आहार व घरगुती औषधे आपल्याला निश्चितच फायदा देतील.
–डॉ विनायक हिंगणे
एम.बी.बी.एस., डी.एन.बी. (मेडीसिन)